Tuesday, September 3, 2013

गणेशविद्येचे गमक


गणेशविद्येचे गमक



अमृतपुत्रांचा हा भारत देश गतकालाच्या वैभवशाली आणि गौरवशाली पदचिन्हांनी अंकित झालेला आहे . आपल्या प्राचीन तसेच अर्वाचीन तत्त्वचिंतकांनी सतत गतिमान असणाऱ्या धर्माच्या वैज्ञानिकतेचे प्रतिपादन करीत तदनुसार कर्मामध्ये समाजाला रत केले . केवळ धर्माच्या वैज्ञानिकतेचे ज्ञान होणेच आवश्यक नाही , परंतु त्यानुसार कर्म करणेही तितकेच आवश्यक आहे , असा बोध गतकाळाच्या अनुभवाने भारतीयांनी जन्मत : मिळाला आहे . कारण नशीब असते असे मानता नशीब घडवावे लागते त्यासाठी आवश्यक असलेले कर्म करण्यातच जीवनाची इतिकर्तव्यता आहे .

भारतीयांचे सर्व सण - उत्सव तसेच परंपरा या चंद्राच्या परिभ्रमण कालाशी संबंधित आहेत . मन अर्थात चंद्राचे परिभ्रमण माध्यम वापरून आपल्या सर्व उत्सवांची कुशलतेने गुंफण करण्यात आली आहे . काल हा गतिमान आहे कालाची गती अवध्य आहे . त्यामुळे तिथींना अनुसरूनच सर्व उत्सवांची रचना केली गेली आहे . आपल्या वैभवी परंपरा वसंदादी ऋतूंच्या अनुक्रमाने आपल्या उत्सवांना विविध आयाम देत व्यक्तीने समूहासह समष्टीकडे कसे जावे , याचा पाठ देताना दिसतात . विविध देवी - देवतांच्या माध्यमातून निसर्ग प्रतिमांच्या साकार रूपाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची सदैव संधी शोधणारा आपला देश धन्य होय . कृतज्ञता करूणेनेच विश्वाकडे निरागस दृष्टीने पाहावे , हे आपल्याला आपल्या पूर्वजांकडून मिळालेल्या संस्कारांचे फलित होय . उत्सव मानवाला मानवाशी जोडण्याचा अपूर्व अनुभव आहे . जन्माला आलेला प्रत्येक सजीव म्हणजे मानव , पशुपक्षी वृक्षवेलीही स्पंदित होत असतात . विश्वाच्या स्पंदनांशी सायुज्य होण्याचे स्वप्न उराशी बाळगून होणारे सर्व सजीव सृष्टीचे स्पंदन हाच निसर्गाचा उत्सव होय .

गुरूत्वाकर्षणाने बांधलेला देह हा पृथ्वीतत्त्वाचा आहे . पंचमहाभूतांनी व्याप्त असणाऱ्या जीवाच्या देहाला मनही आहे . या पृथ्वीलाही मन आहे . ते पृथ्वीमातेचे मन म्हणजे दृक् प्रत्ययी चंद्र ! या चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे होणाऱ्या कोनांमुळे तिथींची पर्यायाने उत्सवांची निर्मिती होते . देह - पृथ्वी , मन - चंद्रमा आणि आत्मतत्त्व भगवान सूर्यनारायण यांचे अनुबं धित भ्रमण हेच वैश्विक नैसर्गिक कंपन होय . याचप्रमाणे सामाजिक मनांचे एकत्रित कंपन त्याचे दृश्यस्वरूपाचे वर्तन म्हणजे कालक्रमात गुंफलेले उत्सव आहेत . ' ऋतू ' या शब्दाचा संबंध मनाशी असून ' सत्य ' शब्दाचा वाणीशी संबंध आहे . मनाला साक्षी ठेवून वाणीने सत्य सांगणारा कवी म्हणजेच ' ऋषी '! ऋषींना ऋताचे ज्ञान झाले त्यांनी वाणीद्वारे सत्याचे प्रतिपादन केले . त्यांच्या वाणीतून उमटलेल्या वचनांना ' दर्शनशास्त्र ' ही संज्ञा प्राप्त झाली . यामुळे उत्सवांकडे बघण्याची दृष्टी बदलली उत्सवांतून सूक्ष्माकडे जाण्याचा प्रवास कसा असावा , याचा विचार समृद्ध झाला . उत्सवांमधील ज्येष्ठराज असा उत्सव म्हणजे गणेशोत्सव . भारत ीयांच्या क्रमबद्ध विकासाचा , मूलाधाराचा हा उत्सव आहे . समग्र विश्व शब्द मातृकेतूनच उत्पन्न झाले आहे . शब्द हेच सृष्टीचे मूळ आहे तर गणेशविद्या हा शब्दोत्सव आहे .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive