Monday, September 2, 2013

मरणाचा स्वानंदे स्वीकार

मृत्यू हे मानवी जीवनातील एक कटू सत्य आहे. या जगात जन्माला येणारा प्रत्येक जीव, मग तो देव असो अथवा मनुष्य, पशू असो अथवा पक्षी, मरणार आहे हे नक्की. तरीदेखील प्रत्येक मनुष्य अशा तोऱ्यात वागत असतो की जणू तो अमरपट्टा घेऊन आला आहे. आपला अहंकार, आपले हेवेदावे, आपले ममत्वाचे विषय हे सारे मृत्यू एका फटकाऱ्यात नष्ट करतो. मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात-

मना पाहतां सत्य हे मृत्यभूमि। जितां बोलती सर्वही जीव मी मी।

चिरंजीव ते सर्वही मानीताती। अकस्मात सांडूनिया सर्व जाती।।

मरे येक त्याचा दुजा शोक वाहे। अकस्मात तोहि पुढे जात आहे।

पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्यातें। म्हणोनि जनी मागुता जन्म घेते।।

मृत्यूच्या बाबतीत समर्थ नेहमी 'अकस्मात' शब्द वापरतात. मृत्यू अचानक येतो. कुणालाही आपण केव्हा मरणार आहोत हे ठाऊक नसते. यातच मृत्यूचे खरे सौंदर्य दडले आहे.

नागपूर येथे माझ्या परिचयाचे एक गृहस्थ हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. चौथ्या दिवशी ते ज्या ऑफिसमध्ये नोकरी करत होते त्या ऑफिसातील लोकांनी शोकसभा घेतली. त्या ऑफिसातील पन्नास वर्षांचे मॅनेजर शोकसभेचे अध्यक्ष होते. शोकसभेत त्यांनीही भाषण केले. योगायोगाने त्याच रात्री शोकसभेचे अध्यक्षदेखील हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. तेव्हा ऑफिसातील सगळे लोक समर्थांनी वरील श्लोकांत वर्णन केलेल्या वास्तवतेची चर्चा करीत होते. मरण अकस्मात येते हे खरे असले तरी मरण कुणालाच नको असते, हेदेखील तितकेच खरे असते. यक्षप्रश्ानमध्ये यक्षाने युधिष्ठिराला विचारले- ''या जगातील सर्वात मोठे आश्चर्य कोणते?'' तेव्हा युधिष्ठिर म्हणाला- ''अनेक माणसे मेलेली आपण डोळ्याने पाहतो, तरी प्रत्येकजण स्वत:ला चिरंजीव समजतो. हे या जगातील सर्वात मोठे आश्चर्य आहे.''

म्हणून समर्थ म्हणतात- 'मरणाचे स्मरण असावे। हरिभक्तिस सादर व्हावे' किंवा 'आपणांस आहे मरण। म्हणोनि राखावे बरेपण' लोकांशी चांगले संबंध ठेवले नाही तर खांदा द्यायलाही कोणी येणार नाही, अशी मौलिक सूचना समर्थ देतात. संत कबीर म्हणतात- ''मी जन्माला आलो तेव्हा सारेजण हसत होते. पण मी एकटा रडत होतो. मात्र जीवनातील माझे कर्तृत्व असे असेल की मी मरताना हसत असेन आणि बाकीचे सारे रडत असतील.'' याचा अर्थ, मरण अटळ असेल तर आपण मरणाचा बाऊ का करावा? आपण मृत्यूचा आनंदाने स्वीकार करावा.

सामान्य माणसाचे मरण आणि संतांचे मरण यांमध्ये मूलभूत फरक आहे. संत मृत्यूला आनंदाने आलींगन देतात. ज्ञानोबा माऊलींनी २२व्या वषीर् संजीवन समाधी घेतली. शंकराचार्यांनी ३२व्या वषीर् देहत्याग केला. स्वामी विवेकानंदांनी ३९व्या वषीर् शांतपणे देह ठेवला. संतांनी जीवनावर मनापासून प्रेम केले. लोकांना जगण्याची प्रेरणा दिली. पण ज्यावेळी मरणाचा प्रसंग आला तेव्हा त्यांनी शोक केला नाही. वासना शिल्लक असल्यामुळे माणूस मृत्यूला घाबरतो. काही ठिकाणी मृत्यूनंतर शोकाचे बीभत्स प्रदर्शन पाहायला मिळते. अज्ञानातून हे सारे घडते. टिळकांचा तरुण मुलगा प्लेगच्या साथीत मरण पावला. हे कटू सत्य लोकमान्यांनी स्वीकारले. ते शांतपणे म्हणाले- ''गावांतील होळी पेटली म्हणजे प्रत्येक घरातील एक गोवरी जाणारच.'' याचा अर्थ ते मनाने कठोर होते असाही नाही. शिवाजी महाराज अफजलखानाच्या मोहिमेवर होते, तेव्हा त्यांच्या पत्नी सईबाईसाहेब मरण पावल्या. पण महाराजांनी हा आघात पचविला. ते मोहीम सोडून राजगडावर परत आले नाहीत.

मरणाची अटळता सांगताना समर्थ रामदास यमराजांच्या नि:पक्षपातीपणाचे कौतुक करतात, कारण तुम्ही गरीब असा अथवा श्रीमंत असा, राजा असा अथवा भिकारी असा, विद्वान पंडित असा अथवा मूर्ख असा मृत्यू सर्वांना सारखे लेखतो. ''मृत्यु न म्हणे हा भूपति। मृत्यु न म्हणे हा चक्रवतिर्। मृत्यु न म्हणे हा राजकारणी। मृत्यु न म्हणे परनारी। मृत्यु न म्हणे संन्यासी। मृत्यु न म्हणे ब्राह्माण।'' या ओव्या अत्यंत प्रभावी वाटतात. किंवा ''गेले बहुत पराक्रमी। गेले बहुत कपटकमीर्। गेले विद्येचे सागर। गेले बळाचे डोंगर। गेली पंडितांची थाटें। गेली शब्दांची कचाटे।'' या ओव्यादेखील मनावर ठसतात. समर्थांच्या मते जे आत्मज्ञान प्राप्त करून घेतात ते मृत्यूनंतर चिरंजीव राहतात. म्हणून माणसाने 'मरावे परी कीतिर्रूपी उरावे।'

- सुनील चिंचोलकर

- लेखांक : ५९

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive