Sunday, September 15, 2013

विश्वरुप अवतरला महागणपती


विश्वरुप अवतरला महागणपती


japan
अद्भुत सार्मथ्याने भक्तजनांना आपलंसे करणाऱ्या गणनायक गणेशाने केवळ भारतभूमीच नव्हे तर अवघ्या विश्वात आपले स्थान निर्माण केले आहे. या कालावधीत तर गणेश भक्तीत लाखो-कोट्यवधी भक्त पार बुडून गेलेले दिसतील. सुखकर्ता , दु:खहर्ता म्हणून ख्यातनाम असलेल्या गणरायाच्या एका दर्शनानं मन प्रसन्नचित्त होण्याची किमया घडताना दिसते.


गणेशोत्सवाच्या काळात तर अवघा महाराष्ट्र विनायकाच्या गजरात स्वत:ला बुडवून घेतो. जात-पात, धर्म-वंश यांच्या पल्याड जाऊन गणेशानं भक्तगणांच्या हृदयात स्थान मिळवलंय. भारतात अग्रपूजेचा मान मिळवलेल्या गणेशानं परदेशातही असंख्य रूपामंध्ये दर्शन दिले आहे. शेजारच्याच नेपाळ , श्रीलंकासह अगदी जपान , रोममध्येही गणेश मूर्ती पूजल्या जाताना दिसतात.

सर्वसाधारणपणे गणेशमूर्तींबरोबर नयनरम्य , भलेमोठे देखावे महाराष्ट्रातील उत्सवाचे एक स्वरूप मानले जाते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचे तत्त्व आजही अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक जपले जाते. अनेक प्रांतात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण, परदेशातही गणेश भक्तिभावाने पूजला जातो. तर काही ठिकाणी केवळ गणेशाची मूर्ती आढळते. 

जपानमध्ये सहसा इतरत्र न दिसणारी हसतमुख मूर्ती आढळते. कोबो-डाई म्हणून ओळखली जाणारी या मूर्तीत विद्येच्या स्वामीचे स्वरूप प्रकट होते. चतुर्भुज असलेल्या या गणेशानेकुऱ्हाड, कुंभ, धनुष्यबाण, पुष्पमाला धारण केले आहे. तर निळे डोळे, हसरा चेहरा असलेली ही मूर्ती पुस्तकावर विराजमान असते. इतिहासात डोकावून पाहिले असता साधारणपणे नवव्या शतकापर्यंत जपानला गणेशाची काहीही माहिती नव्हती. काबोदौची डाइती याने प्रथम गणेशाची स्थापना केली. याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे बावीस इंचापेक्षा जास्त मोठी मूर्ती आढळत नाही.

शेजारच्याच नेपाळमध्ये गणेशाने वेगळे स्वरूप धारण केले आहे. या ठिकाणी गणेशाला शिवपुत्र न मानता स्वयंभू असे 'सूर्य-विनायक' मानण्यात येते. त्याच वेळी येथील गणेश सूर्यपुत्र असल्याच्या संकेतांनाही स्पष्ट नाकारण्यात आले आहे. काठमांडूपासून आठ मैलावर असणाऱ्या भाटगाव येथे सूर्य विनायकाचे मंदिर उभारण्यात आले आहे. सूर्य विनायक चतुर्भुज असून त्याने परशू , मोदक पात्र, रद व जपमाळ धारण केले आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्य विनायकाच्या कपाळावर तिसरा नेत्रही असतो. जपमाळ, पायावरील नक्षीदार चिलखत असे कोठेही न आढळणारे स्वरूप येथे पाहता येते.

तब्बल पाचव्या शतकाच्या प्रारंभापासून गणेशाची चीनमध्ये उपासना केल्याचे मानले जाते. 'विनायक' व 'कात्रितेन' असे जपानप्रमाणेच दोन प्रकार चीनमध्ये दिसतात.

दुसरीकडे हिमालयाच्या पर्वत शिखराच्या रांगेत चीन तुर्कस्तानच्या खोऱ्यात अल्ची छोट्याशा प्रांतातील गणपती नक्कीच लक्ष वेधून घेणारा आहे. या ठिकाणी गणेशाला अग्रपूजेचा मान दिला जातो. भव्य अशी ही गणेशमूर्ती मृगचर्मावर स्थापनापन्न झाली असून त्याच्या शेजारीही दोन मृग असतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे या गणेशाची सोंड सरळ व समांतर रेषेत आहे.

चौथ्या किंवा पाचव्या शतकात इराणमध्ये गणेश पूजनाला सुरुवात झाल्याचे मानण्यात येते. उत्खन्नात सापडलेल्या एका थाळीवर येथील गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. या ठिकाणी योद्धाच्या स्वरुपात ही मूर्ती कोरलेली आहे. गणेशाने डाव्या हातात सर्प, उजव्या हातात त्रिशूळ धारण केला आहे. मूर्तीचे कपडे इराण पद्धतीचे असून पर्शियन पद्धतीचा मुकुट डोक्यावर आहे.

कंबोडियातील गणेश 'प्रहकनेस' म्हणून ओळखला जातो. ब्राँझमध्ये बनवण्यात आलेली गणेश मूर्तीच १३ व्या शतकात निर्मिती झाली होती. कंबोडियाचे राजे वापरत असलेल्या मुकुट, अलंकाराप्रमाणे ही मूर्ती सजवलेली आहे. या देशाच्या संस्कृतीचे शिल्प सौंदर्याचे दर्शन या मूर्तीतूनच दिसून येते. मात्र, अशी मूर्ती भारतात आढळत नसून कंबोडियाच्या इतिहासातही ही दुर्मिळ मानली जाते. यासह काम्पूचिया, मध्य आशिया, तिबेट, एन्डेअर, अफगाणिस्तान, बाली, मेक्सिको, बोरो, रोम, हनोई, ब्रह्मादेश अशा विविध भागातही गणेशाचे अस्तित्व दिसून येतो.


No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive

Follow by Email