Friday, September 6, 2013

पाकच पोसतोय यासिनचे कुटुंब!

पाकच पोसतोय यासिनचे कुटुंब!

yasin-bhatkal

इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक यासिन भटकळच्या डोक्यावर पाकिस्तानचा हात असल्याचे ढळढळीत पुरावे मिळू लागले असून, भटकळ कुटुंबीयांनाही चरितार्थ चालवण्यासाठी सीमेपलिकडूनच पैसे पुरवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या कुटुंबाला पाकिस्तानच पोसत असल्याची कबुली खुद्द यासिन भटकळनंच दिल्याचं सूत्रांकडून समजतं.

भारतात दहशतवादी कारवाया करणा-या अतिरेक्यांचं पाकिस्तानात अगदी अगत्यानं स्वागत होतं, त्यांना 'राजेशाही' आश्रय दिला जातो. त्यामुळे, भारतातील ५० हून अधिक बॉम्बस्फोटांच्या कटात सहभागी असलेला यासिन भटकळ पाकिस्तानचा एकदम 'खास माणूस' असणार, हे उघडच होतं. आता यासिनच्या अटकेनंतर त्याचं हे 'पाकिस्तान कनेक्शन' उघड होऊ लागलंय. पाकची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयमधील लेफ्टनंट कर्नल पातळीवरच्या एका अधिका-याच्या आपण संपर्कात होतो, असं भटकळनं एनआयएच्या (राष्ट्रीय तपास संस्था) चौकशीदरम्यान सांगितलं होतं. बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षणही त्यानं पाकमध्येच घेतलं होतं. इतकंच नव्हे तर, यासिन भटकचे भाऊ, रियाझ आणि इक्बालही सध्या कराचीतच असल्याचं बोललं जातंय.

पण, पाकिस्तानचा वरदस्त फक्त तिघा भटकळ बंधूंवरच नव्हता; तर त्यांच्या कुटुंबाचीही खातिरदारी ते करत होते, असं स्वतः यासिननंच सांगितलंय. आपल्या कुटुंबालाही पाकिस्तानकडून आर्थिक मदत केली जात होती, असं त्यानं म्हटलंय. यासिनच्या या कबुलीमुळे त्याच्या अब्बू आणि चाचाचा खोटारडेपणा उघड झाला आहे. यासिन सात वर्षांपासून आमच्या संपर्कात नव्हता, तो जिवंत आहे की नाही, हेही आम्हाला ठाऊक नव्हतं, तो नक्कीच निर्दोष असेल, असं सांगून अब्बू आणि चाचानं त्याच्या कारवायांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या छत्रछायेखालीच इंडियन मुजाहिदीन भारतात दहशतवादी कारवाया करत असावी, असा संशय गुप्तचर संस्थेला आहे. भटकळची चौकशी सुरू असतानाच, सुरक्षा यंत्रणांनी यासिनचा साथीदार तेहसीन ऊर्फ तबरेज ऊर्फ मोनूचा शोधही सुरू केलाय. तसंच, भारतात आत्मघातकी दहशतवादी तयार करण्याच्या कटाबाबतही सगळी माहिती त्यांना यासिनकडून काढून घ्यायची आहे.म्हणे, मी यासिन भटकळ नाहीच!

 yasin-bhatkal
'स्फोट होतच असतात, त्यात काय एवढं विशेष'... असं बरळून आपल्या निर्दयीपणाचं दर्शन घडवणारा इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक यासिन भटकळची नवी नौटंकी आज पटियाला हाऊस कोर्टात पाहायला मिळाली. आपण यासिन भटकळ नाहीच आहोत, कुणीतरी वेगळेच आहोत, असा कांगावा त्यानं न्यायमूर्तींपुढे केला, तेव्हा ही 'ड्रामेबाजी' पाहून पोलिसांची साफच 'सटकली'.

अर्थात, यासिन भटकळच्या खोटारडेपणावर अजिबात विश्वास न ठेवता न्यायमूर्तींनी त्याला १२ दिवसांची एनआयएची (राष्ट्रीय तपास संस्था) कोठडी सुनावली आहे.

देशभरातील ४५ हून अधिक बॉम्बस्फोटांच्या कटाचा सूत्रधार असलेल्या मोस्ट वॉन्टेड यासिन भटकळला काल भारत-नेपाळ सीमेवर अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्याला दिल्लीच्या पटियाला कोर्टापुढे हजर करण्यात आलं. देशाविरुद्ध युद्ध पुकारण्यासारखा गंभीर गुन्हा त्याच्यावर नोंदवण्यात आला असल्यानं त्याला एनआयएची कोठडी होणार, हे जवळपास नक्कीच होतं आणि झालंही तसंच. पण, बंद खोलीत झालेली सुनावणी यासिन भटकळच्या 'तो मी नव्हेच'मुळे नाट्यमय ठरली.

आपले सगळे गुन्हे काल पोलिसांसमोर कबूल करणा-या यासिन भटकळच्या वकिलांनी कोर्टात 'बॉम्ब'च टाकला. हा यासिन भटकळ नसून मोहम्मद अहमद आहे, असा खळबळजनक दावा करून त्यांनी सगळ्यांना चक्रावून टाकलं. परंतु, त्याची फारशी गांभीर्यानं दखल न घेता न्यायमूर्तींनी भटकळवरील भयंकर गुन्हे पाहून त्याची रवानगी १२ दिवसांच्या एनआयए कोठडीत केली. त्याच्या चौकशीतून कितीतरी स्फोटांचे धागेदोरे तपास यंत्रणांना मिळणार आहेत. दहशतवादी संघटनांचे नेटवर्क कसं काम करतं, हेही भटकळकडून जाणून घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. 

 

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive

Follow by Email