Monday, September 2, 2013

त्रिविध तापांचे लक्षण

भगवान बुद्ध म्हणतात- 'जग हे दु:खमय आहे. आसक्ती हे दु:खाचे मूळ आहे. अनासक्त झाल्यास दु:खाचा नाश होऊ शकतो.' पारमाथिर्क ग्रंथात संसारातील दु:खाची चर्चा वारंवार केली जाते. समर्थ रामदास त्याला अपवाद नाहीत. माणसाने आपल्या जीवनाचे सिंहावलोकन केल्यास त्याला जाणवेल की जीवनात त्याला खूप दु:ख भोगावे लागले आहे. या दु:खाच्या विचाराद्वारे संत आपल्याल निष्क्रिय करू इच्छित नाहीत तर दु:खाचा सदुपयोग कसा करून घ्यावा ते शिकवतात. समर्थ तर म्हणतात-

' त्रिविध तापे पोळला। संसारदु:खे दुखावला।

तोचि अधिकारी जाला। परमार्थाचा।।

सगळी अनुकूलता असताना वैराग्य निर्माण झाले असे विवेकानंद आणि अरविंद अपवाद असतात. सामान्य माणूस संसारातील दु:खातूनच भगवंताकडे ओढला जातो. प्रिय व्यक्तीचा मृत्यू, धंद्यात बसलेला फटका, घटस्फोटासारखी घटना यातून माणसाला जीवनाचे व्यर्थत्व कळते. तो शाश्वत सुखाचा शोध घेऊ लागतो. म्हणून 'आपत्ती हा महान शिक्षक आहे' असे स्वामी विवेकानंद म्हणत.

आयुष्यभरात प्रत्येक माणसाला जी नाना दु:खे भोगावी लागतात, त्याचे तीन भाग शास्त्रकारांनी पाडले. त्याला त्रिविध ताप असे म्हणतात. (१) आध्यात्मिक ताप (२) आधिभौतिक ताप (३) आधिदैविक ताप. तापांच्या या तीन प्रकारांचे सुंदर वर्णन समर्थांनी दासबोधात केले आहे. माणूस एकदा जन्माला आला की त्याचा देह, इंदिय आणि प्राण यांच्याशी सतत संबंध येतो. या संबंधातून त्याला काही दु:खे भोगावी लागतात. त्याला समर्थ आध्यात्मिक ताप असे म्हणतात. शास्त्रामध्ये अध्यात्म या शब्दाचा अर्थ शरीर असा होतो. शरीराचे स्वरूपच असे आहे की ते अधूनमधून बिघडते. स्कूटरला अंत:करण नसल्यामुळे ती बिघडल्यास स्कूटरला वेदना होणार नाहीत. माणसाला अंत:करण असल्यामुळे त्याला वेदना जाणवतात. अगदी पहिलवानाचे शरीर असले तरी त्यात रोगजंतू निर्माण होतात. रामकृष्ण परमहंस, बाबामहाराज आवीर्कर, गोळवलकर गुरुजी यांच्यासारख्या सत्पुरुषांना-देखील कॅन्सर होऊ शकतो. समर्थांनी जग उघड्या डोळ्यांनी पाहिले. त्यामुळे त्यांना नाना प्रकारची दु:खे पाहायला मिळाली. स्मृती तल्लख असल्यामुळे आणि असामान्य प्रतिभा लाभल्यामुळे समर्थ प्रत्येक गोष्टीची लगेच यादी सादर करतात. आध्यात्मिक तापाच्या यादीत त्यांनी सुमारे १०० रोगांची नावे दिली. खरुज, नारू, नखुरले, गोवर, देवी, काखमांजरी, मूळव्याध, गालफुगी, वात, उसण, नायटा, गजकर्ण, पंड्यारोग, क्षयरोग, अर्धशिशी अशी भली मोठी यादी देताना समर्थांचा अनुप्रास कुठेही चुकत नाही. उदाहरणार्थ-

मुरडा हागवण उन्हाळे। दिशा कोंडतां आंदोळे।

येक वेथा असोन न कळे। या नाव आध्यात्मिक।।

वृद्धापकाळी प्रकृतीच्या नियमानुसार शरीरात काही आजार निर्माण होतात. मोतीबिंदू, काचबिंदू, संधिवात, ऐकायला कमी येणे, गुडघे आणि कंबर दुखणे, दात पडणे, रक्तदाब वाढणे या सगळ्या दु:खांना समर्थ आध्यात्मिक ताप म्हणतात.

ज्यावेळी माणसाचा बाह्यजगताशी संबंध येतो आणि त्यातून अचानक एखादे दु:ख वाट्याला येते त्याला समर्थ आधिभौतिक ताप म्हणतात. रस्त्याने चालले असताना रिक्षाची धडक बसणे, लोकलच्या प्रवासात बॉम्बस्फोट घडणे, जंगलात मधमाशा चावणे, रात्री डास आणि ढेकूण चावणे, चित्रपट पाहत असताना थिएटरला आग लागणे, बागेत फिरत असताना सर्पदंश होणे, सासू खाष्ट मिळाली किंवा सून दुष्ट निघाली त्यामुळे दोघांनी एकमेकांना त्रास देणे, हे सर्व आधिभौतिक ताप आहेत. सध्या आपल्या वाट्याला जे मायबाप सरकार आले आहे, त्यातून निर्माण झालेले विजेचे भारनियमन, पाणीटंचाई, रस्त्यावरील खड्डे, महापुरात उडालेली दैना, या सर्व भेटी आधिभौतिक ताप आहेत.

आपल्ऱ्या गतजन्मीच्या चांगल्या वाईट कर्मांमुळे या जन्मी आपल्या वाट्याला दु:ख येणे याला समर्थ आधिदैविक ताप म्हणतात. भगवान बुद्धांनी कर्मविपाकाच्या सिद्धांतावर जोर दिला. प्रत्येक माणसाला त्याच्या कर्माची फळे याच जन्मी अथवा पुढच्या जन्मी भोगावी लागतात. खरे सांगायचे म्हणजे आध्यात्मिक आणि आधिभौतिक तापातील अनेक दु:खे आपल्या गतजन्मींच्या कर्माचे परिणाम असतात. अशा वेळी त्याला आधिदैविक तापच म्हटले पाहिजे. ती रिक्षा नेमकी माझ्या अंगावर का आदळावी? तात्पर्य, अनेक दु:खांचा अंतर्भाव आधिदैविक तापात करता येईल.

माणसाने दु:खातून अंतर्मुख व्हावे. मी देह नसून आत्मा आहे, हे लक्षात घेतल्यास आध्यात्मिक ताप संपेल. जग मिथ्या आहे याचा अनुभव घेतल्यास आधिभौतिक ताप संपेल आणि निर्वासन झाल्यावर पुनर्जन्म टळल्यास आधिदैविक तापातून सुटका होईल.

- सुनील चिंचोलकर

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive