Monday, September 2, 2013

मन ही संकल्पना

सगळ्या संतांनी मन ही संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण मनाचे यथार्थ वर्णन करणे कठीण आहे. हे सर्वांच्या ध्यानी आले. पश्चिमेच्या मानसशास्त्रज्ञांना-देखील मनाचे नीट आकलन झालेले नाही. ज्ञानेश्वर महाराज तर मन ही संकल्पनाच नाकारतात. त्यांच्या मते मनाला मन हे नाव देणं हाच मुळी मानसिक भ्रम आहे. माऊली म्हणते-

वाया मन हे नाव। येरवी कल्पनाची सावेव।

जयाचेनि संगे जीव-। दशा वस्तु।।

समर्थांनी आत्माराम या ग्रंथात मनाला माया म्हटले आहे. माया ज्याप्रमाणे प्रत्यक्ष अस्तित्वात नाही तरीही जीवाला भटकत ठेवते, तसे मन वासनेवर आरूढ होऊन जीवाला पुन:पुन्हा जन्म घेण्यास भाग पाडते. तुकाराम महाराज तर म्हणतात-

काय काय करितो या मना। परि नायके नारायणा।।

करू नये त्याची करी विवंचना। नेऊ पतना आदरिले।।

आवरिता चित्त नावरे दुर्जन। घात करी मन माझे मज।।

हे मन चंचल असून आवरता आवरत नाही ही सर्वच संतांची जुनी तक्रार आहे. परमार्थ अवघड झाला तो मनाच्या या विक्षिप्ततेमुळे. अर्जुनासारख्या महान योध्याला भगवंताने जेव्हा ध्यानयोग सांगितला, तेव्हा त्यानेदेखील मला माझे चंचल मन आवरता येत नाही, अशी प्रामाणिक कबुली दिली. अर्जुनाकडे एकाग्रतेची शक्ती होती म्हणून त्याला पक्ष्याचा डोळा फक्त दिसत होता. ध्यान ही एकाग्रतेपेक्षा श्रेष्ठ गोष्ट आहे. एकाग्रतेत मन जिवंत असते. ध्यानात मन संपवावे लागते. मन संपल्याशिवाय समाधी लाभत नाही. हिंदी भाषेत शांतीला फार गोड शब्द आहे. हिंदीत अमन म्हणजे शांती. जोपर्यंत मन आहे तोपर्यंत अशांतीच आहे. म्हणून उन्मनी अवस्थेत मन शिल्लक राहत नाही. आध्यात्मिक साधनेचे सर्व प्रकार मन विसजिर्त करण्यासाठी आहेत.

मन हे एक उपकरण आहे; त्याला अंत:करण देखील म्हणतात. भगवंताने गीतेत आपल्या विभूती सांगताना 'इंदियांमध्ये मी मन आहे', असे सांगितले. म्हणून काहीजण मनाला अकरावे इंदिय म्हणतात. हे अकरावे इंदिय दाही इंदियांचे मालक आहे. (क्चश्ाह्यह्य) पण मालक नोकरांमध्ये फार मिसळायला लागला की कारखान्याची भट्टी बिघडते. तसे मन इंदियांच्या अधीन होऊन नाना समस्या निर्माण करते. समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले, ते मनावर विजय मिळविण्यासाठी. एकदा मन ताब्यात आले की इंदियांवर विजय मिळवणे सोपे जाते. एकनाथ महाराज तर म्हणतात-

मनाचा अनिवार मार। कोण राहे मनासमोर।

मनास पैजी अैसा थोर। सुर नर असुर दिसेना।।

म्हणून ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले. मनाला प्रेमाने जिंकण्याचा मार्ग समर्थांनी मनाच्या श्लोकाद्वारे शोधून काढला. त्यांच्या मते लोकांना दोष देण्यापेक्षा माणसाने आपल्या मनाला समजावून सांगावे.

डॉ. इंदुताई लिमये यांनी समर्थांच्या अप्रकाशित रचनांचे संशोधन केले. ही अप्रकाशित कविता आता प्रसाद प्रकाशनने प्रकाशित केली आहे. त्यात 'मन' नावाचे स्वतंत्र प्रकरणच आहे. त्यात समर्थ म्हणतात-

मन हे ना कळे कवणा। परम दुर्जय जाणा।।

चपळपण या मना। उपाय नाना व्यर्थची हो जाणा।।

हारी हारादिक थोर थोरा। येणे भुलविले जाणा।।

समर्थांनीदेखील करुणाष्टकात 'अचपळ मन माझे नावरे आवरिता।।' अशी प्रामाणिक कबुली दिली आहे. यासंबंधी एक विनोदी कथा आहे. एका वैद्याने एका रुग्णाला एक औषध दिवसातून तीन वेळा घ्यायला सांगितले. मात्र औषध घेताना उंटाची आठवण आल्यास औषध लागू पडणार नाही असे सांगितले. त्या माणसाने आयुष्यात कधी उंटाचा विचार केला नव्हता. मात्र औषध घेताना उंटाला विसरायचे या प्रयत्नात उंट आठवू लागला. मन असे विक्षिप्त आहे. म्हणून समर्थ एका अभंगात मनाला मर्कट म्हणतात. उलट मनाचे लाड करणे म्हणजे सापाला दूध पाजणे आहे असे स्पष्ट म्हणतात. मन शांत नसताना केलेला सगळा परमार्थ ढोंग आहे, असा परखड शेरा समर्थ मारतात.

मात्र हे मन आवरण्याचा सोपा मार्ग समर्थ सांगतात. सद्गुरूच्या कृपेने किंवा सत्संगतीने साधकाला मन आवरता येते. ज्याने आपले मन जिंकले आहे अशा माणसाच्या सहवासात राहून आपले मन त्याच्या मनाला विलीन करणे हा मनोजयाचा साधा सोपा मार्ग समर्थ सांगतात. संतांचे व्हा आणि मन ताब्यात घ्या, असा हा रोखठोक सौदा आहे. हरिपाठात ज्ञानेश्वर माऊलींनी हेच सांगितले- 'संतांचे संगती मनोमार्ग गती। आकळावा श्रीपती येणे पंथे।' लोकांनी आज सत्संग ही फॅशन करून टाकली. अन्यथा सत्संगामागे मनोजयाचीच कल्पना होती.

- सुनील चिंचोलकर

लेखांक : ९१

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive

Follow by Email