Monday, September 2, 2013

आपणच आपले खरे वैरी

माणसाला जीवनात अपयश आले म्हणजे तो त्याचे खापर दुसऱ्या कुणाच्याातरी माथी फोडतो. मात्र त्याला मिळालेल्या यशाचे श्रेय तो लगेच स्वत:कडे घेतो. हा एकंदरीतच मानवी स्वभाव आहे. माणसाने नि:पक्षपणे, तटस्थपणे किंवा साक्षीभावाने आपल्या यश-अपयशाचे मूल्यमापन करावे. म्हणजे त्याच्या लक्षात येईल की, आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले वैरी आहोत. भगवंत भगवदगीतेमध्ये म्हणतात-

उद्धरेदात्मनात्मानम् न आत्मानमवसादयेत्।

आत्मैवात्मनम् बंधू: आत्मैव रिपू आत्मन:।।

मी एखाद्यावर प्रेम करीत असतो तेव्हा मी स्वत:चा मित्र असतो आणि मी जेव्हा कुणाचातरी द्वेष करीत असतो तेव्हा मी स्वत:शीच शत्रुत्व करतो. सगळ्या संतांनी आपल्या मनातील विकार हेच आपल्या दु:खाचे कारण सांगितलेेले आहे. म्हणून समर्थांनी इतरांना उपदेश करण्यापेक्षा स्वत:ला उपदेश करायला सांगितले. आपणच आपल्या मनाला समजावून सांगितले पाहिजे.

नको रे मना क्रोध हा खेदकारी।

नको रे मना काम नानाविकारी।

नको रे मना लोभ हा अंगीकारू।

नको रे मना मत्सरू दंभ भारू।

अनेकदा आपल्या मनात चालू असलेल्या विकारांच्या धुमाकुळामुळे आपण अस्वस्थ असतो. ही अस्वस्थता अनाठायी क्रोधाच्या रूपाने प्रगट होते. अलीकडे मानसशास्त्रज्ञ सांगतात. 'घरात पत्नीशी भांडण झाले की साहेब त्याचा राग ऑफिसात आपल्या हाताखालच्या माणसाला रागवून काढतात. साहेब ऑफिसात रागवले की माणूस घरात मुलाबाळांना मारहाण करून साहेबांचा बदला घेतो. अनेकदा मुले आईवडिलांचा राग घरातील बाहुलीवर काढतात,' असे हे दुष्टचक्र चालू राहते. माणूस जर विकारशून्य होईल, तर त्याचा प्रत्येक व्यवहार शांतपणे होईल.

संत अधूनमधून रागवतात, पण त्यांचा राग खेदकारी नसतो, तो हितकारी असतो. कारण त्यांचा राग फक्त ओठावर असतो, पोटातून नसतो. आपण जेव्हा चिडतो जेव्हा क्रोध आपला स्वभावच असतो. राग आणलेला असावा, आलेला नसावा. काही माणसांना दिवसातून ३-४ वेळा चिडायची सवय झालेली असते. त्यांना क्रोधासाठी किरकोळ कारण पुरते. काही विपरीत घडले म्हणून ते चिडत नसतात. त्यांची चिडायची वेळ झाली म्हणून ते चिडतात. पण असा तापट माणूस घरात असो अथवा ऑफिसात असो, तो कोणालाही आवडत नाही. पूवीर्च्या काळी क्रोधाच्या भरात ऋषीमुनींनी शाप दिल्याच्या अनेक पौराणिक कथा आपण ऐकतो. या ऋषीमुनींबद्दल आपल्या मनात फार आदराची भावना नसते.

येथे काम शब्द इच्छा या अर्थाने आला आहे. तर लोभ हा शब्द फाजिल अपेक्षा या अर्थाने आला आहे. अनेकदा आपल्या मनात कशाचातरी लोभ निर्माण होतो. आपली पात्रता नसल्यामुळे आपल्याला ती वस्तू मिळत नाही. शेवटी ज्या माणसाला ती वस्तू मिळते त्याच्याबद्दल आपल्या मनात मत्सराचा भाव निर्माण होतो. स्पधेर्च्या भावनेतून नोकरीच्या जागी अथवा सार्वजनिक जीवनात आपण अकारण अनेक शत्रू ओढवून घेतो. राजकारणात तर फाजिल महत्त्वाकांक्षेमुळे माणसे अनेक संकटे ओढवून घेतात. समर्थ म्हणतात-

येथ बोल नाही जनासी। हे अवघे आपणाच पासी।

सिकवावे आपल्या मनासी। क्षणक्षणा।।

माणसाने किती लोभ धरावा याला काही मर्यादा आहे का? अमेरिकेसारखे वैभवशाली राष्ट्रदेखील भ्रष्टाचारग्रस्त आहे. पैशासाठी माणसे वाटेल ती तडजोड स्वीकारतात. म्हणून समर्थ म्हणतात-

अतिमूढ त्या दृढबुद्धी असेना।

अतिकाम त्या रामचित्ती वसेना।

अतिलोभ त्या क्षोभ होईल जाणा।

अतिविषयी सर्वदा दैन्य वाणा।।

नको रे मना दव्य ते पुढीलांचे।

अति स्वार्थ बुद्धी ने रे पाप साचे।

घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।।

न होता मनासारिखे दु:ख मोठे।।

माणसाच्या इच्छा केव्हा संपणार आहेत. इच्छा या वर्तुळांसारख्या आहेत. वर्तुळ माणसाला फिरवत ठेवते, पण पोहचवत कुठेच नाही. म्हणून सगळ्यांनी संसारचक्र असा शब्द वापरला. ययाती १००० वषेर् जगला. अनेक विषय त्याने भोगले. पण १००० वर्षांनंतर त्याच्या इच्छा अपूर्णच राहिल्या. याउलट नचिकेत लहानपणापासून विरक्त होता. जेवढ्या इच्छा जास्त तेवढी अगतिकता जास्त. जेवढा लोभ जास्त तेवढी अशांती जास्त. वाममार्गाने घरात आलेली संपत्ती त्या कुटुंबात अशांती आणि संघर्ष निर्माण करते. आपल्या ज्या कर्मामुळे भावीकाळात दु:ख भोगावे लागेल, अशी वाईट कर्म आपण निर्धारपूर्वक टाळली पाहिजेत. जैन धर्मातील अपरिग्रहाचे व्रत हे लोभावरील औषध आहे.

- सुनील चिंचोलकर

लेखांक : ७३

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive