Sunday, September 15, 2013

Lokdev Ganapati


लोकदेव गणपती Lokdev Ganapatiगणपती हा अतिप्राचीन देव आहे. तो आदिदेव आहे. तो भारतातलं दैवत असला तरी जगत्-व्यापी आहे. नेपाळ, तिबेट, म्यानमार, थायलंड, इंडोचायना, जावा, बोर्निओ, बाली, श्रीलंका, जपान, इंग्लड, अमेरिका इथेही गणेशमूर्ती असून यातल्या काही ठिकाणी गणेश मंदिरंही आहेत. पण याशिवाय गणपतीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुलदैवत कोणतंही असलं तरी त्यांच्या देव्हाऱ्यात गणपतीची मूर्ती, प्रतिमा किंवा तांदळामधलं (नर्मदेतला तांबडा खडा) त्याचं स्वरूप हे असतंच. असा हा राजापासून रंकापर्यंतच्या घरांत रोज पूजला जात असलेला देव गणपती. खऱ्या अर्थाने लोकदेव आहे.


गणपती हा गणांचा अधिपती आहे. म्हणजे तो शौर्याचं प्रतीक आहे. तसा तो विघ्नांचं हरण करणाराही आहे आणि म्हणूनच रोज प्रातःकाळी आपण प्रथम त्याचं स्मरण करताना म्हणत असतो -

वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।। (वाकडी तोंड असलेला, मोठ्या शरीराचा, कोटी सूर्याप्रमाणे कांती असलेला, अशा हे देवा, तू माझी सर्व कार्यं निर्विघ्न बनव.)

ही झाली रोजची प्रार्थना. पण गणपती हा मंगल कार्याचाही देव आहे. आपण आरंभलेलं शुभकार्य व्यवस्थित पार पडावं याकरिता त्याची प्रथम ओम भूभुर्व‍ः स्वः महागणपतेय नमः या मंत्राने षोडशोपचारे पूजा करण्यात येते. अन् त्यानंतर मंत्राद्वारे प्रार्थना करण्यात येते.

कार्य मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धामारि। विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायका।। (हे विधात्या, देवांच्या नायका गणपती, तू प्रसन्न होऊन माझं कार्य सिद्धीस जावो. तसंच सारी संकटं नाहिशी होवोत.)

बारसं, मुंज, लग्न असो वा वास्तूशांती, इतकंच काय, पण प्रेताला मंत्राग्नी देतानाही गणेशाचं स्मरण केलं जात असतं. अग्नी देणं हा आपल्याकडचा सोळावा संस्कार आहे. ज्या ईश्वराच्या धरून आपण भूतलावर आलो, त्याच्याकडे परत जाणं म्हणजे मृत्यू. लेकीने माहेरी जावं तशी ही यामागची मंगल भावना. लग्न-मुंजीच्या पत्रिकांवर गणपतीचं चित्र घालून आपण 'श्री गजानन प्रसन्न' ही ओळ लिहितो अन् मग कुलदेवतांची नावं घालतो. अशा शुभप्रसंगी दाराला तोरण बांधून तिथे गणपतीचं चित्र लावण्यात येत असतं. पूर्वी घर बांधताना घरामध्ये एक कोनाडा ठेवून त्यात गणपतीची मूर्ती ठेवत असत, जेणेकरुन नियोजित वेळेत घर बांधून व्हावं. असा हा गणपती म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाशी दैनंदिन आणि प्रासंगिक स्वरूपात एकरूप झालेला ओमकार.

भगवत्प्राप्तीसाठी ओमकार हे सोपान आहे. हे वेदरूपी रसांचा रस व वेदरूप अमृताचं अमृत आहे. ओमकार हे ब्रह्माच आहे. प्रत्येक मानवाच्या हृदयात ओमकार हा अनाहत नाद चालू असतो. ओमकारापासून या सृष्टीची निर्मिती झाली. ओमकार हे गणेशरूप आहे. यातूनच परा, पश्यंती, मध्यमा व वैसरी या वाणींचा उगम झाला. म्हणूनच अक्षराला अविनाशी म्हटलं आहे. ओमकार हा वेदाचा गूढ संकेत आहे. वेद म्हणतात 'ज्याला ओमकार समजला नाही. त्याला काहीच समजलं नाही. पू.विनोबांनी गीतेचं भाषांतर मराठी भाषेतून 'गीताई' म्हणून केलं आहे. त्यात ते म्हणतात,

'गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता। पडता रडता घेई उचलोनी कडेवरी।।'

अशा या गीतेत भगवंतांनी ओमकाराचं गूढ विशद केलं आहे. भगवंत म्हणतात मी ओमकार आहे. हे परमपद आहे. चार वाणी ज्या ओमकारमय आहेत. त्यातला अर्थ प्रतिवादक स्फोटक रूप मीच आहे. त्यातूनच सर्व प्रकारच्या ध्वनी, भाषा, भावांचा विकास झाला आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात ओमपासूनच केली आहे. ते श्रीगणेशाचं नमनच आहे.

मानवाचं शरीर हे पंचमहाभूतांनी तयार झालं आहे. पंचमहाभूतांचे गुण शब्द, रूप, रस व गंध आहेत. या गुणांद्वारेच मानवाला या जगताचं ज्ञान घेता येतं. परंतु यातून रसस्वादन, आनंद घेताना मानव आपल्या विकारामुळे, रज, तम गुणामुळे विकाराचंच आस्वादन घेतो. विषयाच्या आस्वादनात त्याला इतकी गोडी लागते की तो आसक्त होतो. या अतिआसक्तीमुळे खऱ्या आनंदापासून तो वंचित राहतो आणि दुःखच ओढावून घेतो आणि शेवटी त्यातच त्याचा अंत होतो. म्हणून श्री गणेशाच्या उपासनेने त्याला जाणून घेतलं असता आपले विकार कमी होऊन तो सत्वगुणी होऊन तो शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध याद्वारे आनंदाचं आस्वादन घेऊ शकतो. याकरिताच श्री गणेशाने आपल्याला भाषा व लिपीद्वारे वेदाचं ज्ञान दिलं आहे. एवढंच नव्हे तर हे वर्ण मातृका म्हणून अव्यक्त स्वरूपात षट्चक्रांच्या ठिकाणी बसत आहेत. भक्ती कृपेद्वारा जेव्हा या षट्चक्रांचे भेदन होते, त्यावेळी त्या मातृका शक्ती-देवता प्रसन्न होऊन ज्ञानप्राप्ती आणि आनंद देतात. अशा रितीने श्रीगणेश जो वर्णरूपाने सगुण स्वरूपात आहे तोच मातृका म्हणून अंतरंगात शक्ती माध्यमातून वास करत आहे. तेव्हा हे गणेशाचं सूक्ष्मरूप त्याच्या अंगप्रत्यंगाद्वारे या वाङ्मय स्वरूपातून समजून घेऊन त्याची उपासना करणं आवश्यक आहे.

त्याने पायदळी तुडवल्या जाणाऱ्या दुर्वांना प्रिय करून घेतलं आहे. त्याचबरोबर ज्यांना आज समाजात परिस्थितीमुळे, भ्रमामुळे, गरिबीमुळे, अज्ञानामुळे नीच स्थिती प्राप्त झाली आहे, अशा नीच स्थितीचा तो उद्धार करतो. श्रीगणेशाला २१ दुर्वा प्रिय आहेत. कारण तो आपलं वर्चस्व भगवत चरणी (सत्व, रज, तमगुण) अर्पण करून निष्काम वृत्तीने जनावरांचं पोषण करून त्यांना जीवनदान देण्याचं महत् कार्य करत आहे. हे आदर्श म्हणून पूर्वांना शिरावर धारण केलं आहे. हे मानवाला त्यागाचं उदाहरण म्हणून पूर्वांच्या तीन दलांना सत्व, रज, तम गुणांना अर्थ आहे. जर २१ दुर्वा गणेशाला भक्तिभावाने वाहिल्या म्हणजे त्याला सर्वस्व अर्पण केलं, त्याला समर्पित केलं तर तो आत्मानंदरूपी मोदक देतो. २१ या आकड्याचं विश्लेषण एकनाथ महाराज असं करतात- एक+वीस=एकवीस म्हणजेच एक विसावा. एक मन व दश इंद्रियं व त्यांचे गुण हे गणेशाला अर्पण करायचे आहे. हीच गणेशाची खरी उपासना.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive

Follow by Email