Monday, September 16, 2013

Rudhit Fasalela Ganeshotsav






रूढीत फसलेला गणेशोत्सव


'शास्त्रात् रुढिर्बलियसिl' असे एक संस्कृत वचन प्रसिद्ध आहे. शास्त्राधारे वागायचे म्हणजे काटेकोर नियमांचे पालन करावे लागते. परंतु स्वभावतः चंचल असणारे मनुष्याचे मन सुखासुखी कोणत्याही बंधनात स्वतःला बांधून घ्यायला राजी नसते. समूहमनाचा स्वभावही कायदा, शास्त्र, नियम मोडण्याला अनुकूल असतो. परंतु निर्बुद्धपणे एखादी चुकीची गोष्ट रूढ करून त्याचे 'प्रबळ रुढी'त रुपांतर करणे मात्र, या समूहमनाला चटकन जमते! याचे उत्तम उदाहरण म्हणजे, आमच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील तर्कविसंगत रुढी!
ganesh 
 भारतीय संस्कृतीत वर्षभर कसले ना कसले सण-उत्सव-महोत्सव परंपरेप्रमाणे सतत सुरू असतात. त्या उत्सवात सर्वाधिक लोकप्रिय उत्सव म्हणजे भाद्रपदातील गणेशचतुर्थीचा गणेशोत्सव. सगळ्या उत्सवांत जसा रुढींचा पगडा भक्तीपेक्षा जास्त असतो. तसाच तो या गणेशोत्सवातही असतो. आता तर या 'रुढींचे पालन करणे' हाच गणेशोत्सवाचा खराखुरा 'धर्म' झाला आहे. गणेशपूजनाला गौण महत्त्व आले आणि मूर्तीची भव्यता, सजावटीचा डामडौल. विसर्जनाची सवाद्य मिरवणूक, 'नवसाला पावणारा' अशी जाहिरातबाजी, स्थानिक-राज्यस्तरीय व राष्ट्रीय नेत्यांचे मोठमोठे कटआऊटस्, दर्शनासाठी लांबचलांब रांगा, डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई... असल्या बाह्य व अनावश्यक गोष्टींना आता फार फार महत्त्व आले आहे. कौटुंबिक गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याचा, लोकमान्य टिळकांचा हाच उद्देश असेल काय?

'गतानुगतिक लोक: न लोक: पारमार्थिक:l' असे एक प्रसिद्ध वचन आहे. गतानुगतिकत्वपणे वागणे-चालत राहणे, ही लोकांची मानसिकता असते. आपण जे करतो, जी देवाची भक्ती करतो, ती तर्कसुसंगत आहे की नाही, एवढाही विचार सामान्यपणे केला जात नाही. वर्षानुवर्षं, पिढ्यान् पिढ्यांच्या रुढींचा प्रभाव समाजमनावर इतका प्रचंड असतो की, ती विशिष्ट रुढी चुकीच्या पद्धतीने आमलात आणली किंवा ती रुढीच बाद केली तर, रुढीप्रिय समाजमन फार धास्तावून जाते. त्यात जुन्या पिढीतील बुजुर्ग पण निर्बुद्ध मंडळी तर फारच आग्रही असतात. त्यामुळे उत्सवात रमणारा सामान्य माणूस प्रबुद्ध, शहाणा, विवेकी होण्याऐवजी दिवसेंदिवस दुर्बल, हतबल, पराधीन, दैववादी व ध्येयशून्य होत चालला आहे.

या चुकीच्या प्रथा कशा रूढ होत जातात, ते आता पाहू या!

गणेशमूर्ती घरी आणली की, तिची पूजा करण्यापूर्वी प्रथम त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असते. ती दोन प्रकारची असते. एक चलप्रतिष्ठा व दुसरी अचलप्रतिष्ठा. मंदिरातील मूर्ती चौथऱ्यावर घट्ट, न हलणाऱ्या अवस्थेत स्थापन करावयाच्या असतात, म्हणून मंदिरात अचल प्रतिष्ठापना केली जाते. घरच्या देव्हाऱ्यातील देव व मूर्ती या हलवण्यायोग्य असल्याने त्यांची चलप्रतिष्ठा केली जाते. गणेशचतुर्थीला मूर्ती घरात आणून त्या मूर्तीत प्रथम प्राणतत्त्वाचे संक्रमण करून, म्हणजे मातीच्या मूर्तीत प्राणशक्ती समा‌विष्ट करून, ती दुकानातील मूर्ती 'पूजनीय' करायची असते. दुकानात लहानमोठ्या मूर्ती हारीने मांडलेल्या असतात. पण कोणी त्या मूर्तींना नमस्कार करत नाही. कोणी हार घालत नाही की कोणी त्या मूर्तींची आरतीही करत नाही. कारण त्या मूर्ती गणेशाच्या असल्या, तरी त्यांत प्राणतत्त्व नसते. त्या मूर्ती म्हणजे, मातीला दिलेला सुबक आकार. तेथे देवत्व, देवकळा, चैतन्य नसते, म्हणून पूजनीयताही नसते.

गणेशमूर्ती घरची असो, सार्वजनिक असो, विसर्जनापूर्वी संध्याकाळी तिची निरोपाची उत्तरपूजा करून पहिल्या दिवशी त्या मूर्तीत समाविष्ट केलेले प्राणतत्त्व काढून घ्यावयाचे असते. चलप्रतिष्ठा असली, तरी गणेशमूर्ती एकदा चौरंगावर वा देव्हाऱ्यात स्थपन केली की, ती विसर्जनापर्यंत वारंवार जागेवरून हलवायची नसते. विसर्जनादिवशी संध्याकाळी थोडक्यात पंचोपचार पूजा-आरती झाली की, प्रार्थना-सांगणे-गाऱ्हाणे करून झाले की, मूर्तीवर अक्षता टाकून, तिच्यात समाविष्ट केलेले प्राणतत्त्व काढून घ्यायचे असते आणि लगेच ती मूर्ती इंचभर हलवायची असते.

एकदा उत्तरपूजा करून मूर्तीतील देवकळा काढून घेतल्यानंतर, म्हणजे मूर्तीतील देवत्व विसर्जन केल्यानंतर, आता त्या मूर्तीत फक्त मातीची सुबक मांडणी असते; तिथे देवत्व नसते, याची नोंद घ्यावी.

अज्ञानजन्य चुकीची रुढी किती हास्यास्पद असते, ते आता पाहा-

देवत्व विसर्जित झालेल्या मूर्तीबरोबर दहीभात नेणे, ती मूर्ती नदी, सागर, तलावावर नेल्यानंतर तेथेे पुनः कापूर जाळून, गर्दीतल्या गर्दीत मोठ्याने झांजा वाजवून आरती करणे, हा शुद्ध बावळटपणा, वेडेपणा आहे, हे तुमच्या ध्यानात कसे येत नाही?

डोक्यावरच्या गणेशमूर्तीत गणेशतत्त्वच नसताना आपण दहीभाताचा नवैद्य दाखवून आरती कोणाची करतो आहोत? एवढा साधा विचारही या गणेशभक्तांना कसा सुचत नाही? आणि कोणी सांगितला, तरी मुळीच पटू नये, इतकी ही चुकीची रुढी समाजमनात वज्रलेप झाली आहे! या रुढीचे विसर्जन आधी कसे होईल याची काळजी आता पर्यावरणप्रेमींनी करून, घरोघरी जाऊन प्रबोधन करायला हवे. काळाची ती गरज आहे.

अशीच एक अनिष्ट प्रथा आता महाराष्ट्रात सर्वत्र रूढ होत आहे.

विशेषतः सार्वजनिक गणेशमूर्तीच्या संदर्भात ही नोंद करीत आहे. कोणी महनीय व्यक्ती, पक्षप्रमुख, राजकीय पुढारी, मंत्री, आमदार अशी मंडळी या मूर्तीच्या दर्शनाला आली की, संयोजक मोठ्या मंडळींच्या हातात आरतीचे तबक ठेवून आधी गणरायाची आरती करवून घेतात. ही अत्यंत चुकीची, खुळेपणाची प्रथा महाराष्ट्रात रूढ होणे, हे चांगले लक्षण नव्हे!

चौरंगावरची मूर्ती प्राणप्रतिष्ठित देवमूर्ती असते. तो शो पीस नव्हे! सकाळी सोळा उपचारांनी महापूजा, नैवेद्य, आरती व प्रार्थना आणि संध्याकाळी थोडक्यात पंचोपचार पूजा, नैवेद्य, आरती-प्रार्थना अशी योग्य पद्धती पूजेसाठी असते. असे असताना कोणीही यावे, कधीही यावे आणि आरती करावी, ही कुठची प्रथा? तो बाप्पा आपला भालदार-चोपदार असतो काय? येणारी व्यक्ती किंवा नेता त्या गणरायापेक्षाही मोठा असतो काय? ती प्राणप्रतिष्ठित गणेशमूर्ती म्हणजे आयोजकांना 'गुळाचा गणपती' वाटतो काय? नेते-पुढारी यांनी दर्शनाला यावे, यासाठी संयोजक गणेशोत्सव साजरे करतात काय? स्थापन केलेल्या देवमूर्तीविषयी काही विचार, काही प्रतिष्ठा, काही पाळणूक, हे संयोजक करणार आहेत की नाहीत?

दुसरे असे लक्षात घ्यावे की, ही येणारी मंडळी मुळात आरती करण्यासाठी आलेलीच नसतात. कार्यकर्त्यांच्या विनंतीचा मान राखून गणेशाला 'धावती भेट' देणे, एवढाच त्यांचा हेतू असतो. असे असताना वेळी-अवेळी त्यांच्याकडून 'आरती' करवण्याचा अट्टाहास कशासाठी? या प्रकाराला अज्ञान किंवा 'लाचारी' असे म्हणतात!

'जे आरतीच्या वेळी हजर असतील, त्यांनाच आरतीचा लाभ मिळेल', असे सांगण्याचे नैतिक धैर्य या संयोजकांना कधी प्राप्त होईल, तो सुदिन म्हणायचा!

आणखी एक नवीन चुकीची प्रथा रूढ होत आहे.

गणेशाची मोठी मूर्ती तयार होण्यापूर्वी त्या मूर्तीचा पाय आधी आणून त्याची सांगोपांग पूजा करावयाची! 'कधी देखिले ना ऐकिले' असा हा चमत्कारिक प्रकार आहे. मुंबईतील एका मोठ्या सार्वजनिक गणेशमंडळाने दोन-तीन वर्षे हा पाद्यपूजनाचा वाजतगाजत उपक्रम केल्यानंतर आता उपनगरांतील मोठ्या मूर्तींच्या संयोजकांनाही, मातीच्या पायाची समारंभाने पाद्यपूजा करण्याची कळ येऊ लागली आहे! वेळीच या चुकीच्या प्रथेला आवर घातला नाही, किंवा या रुढीचा निषेध केला नाही, तर हे लोण सर्व महाराष्ट्रभर पसरेल. आणि येत्या काही वर्षांत गणेशोत्सवाची ती 'गरज' होऊन जाईल!

उद्या कुणी मूर्तीचा एखाद हात किंवा मूर्तीचे कान आणून त्याची आधी पूजा सुरू केली तर ? कोण आवर घालणार यांना? पूर्ण मूर्तीची पूजा, प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरच करायची असते. सुट्या-सुट्या अवयवांची पूजा हा सर्व प्रकार गणेशभक्तीच्या नावाखाली होत असला, तरी तो अत्यंत अशास्त्रीय व धक्कादायकच आहे. तो तत्काळ बंद व्हायला हवा!

लोक गतानुगतिक असतात, हा एक भाग झाला. त्यांना 'अप्रिय पण हितकर' ऐकायची-वाचायची सवय नसते, हा दुसरा भाग. भक्ती व भावनेत सगळे क्षम्य असते, हाही एक अपप्रचार आहे. अशा महोत्सवातून आपण, राष्ट्रीय प्रबोधनापासून फारकत घेऊन सर्वंकष प्रदूषणाकडे वेगाने वाटचाल करत आहोत, हे लक्षात येतेय का कोणाच्या? उद्दिष्टशून्य आयुष्य जगण्यासाठी का आपण कौटुंबिक उत्सवाला महोत्सवाचे स्वरूप दिले? 


>> दाजी पणशीकर 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive