Sunday, September 15, 2013

Sangali Shree Ganapati Panchayatan

श्री गणपती पंचायतन संस्थान - Sangali Shree Ganapati Panchayatan


सांगलीचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेश मंदिराचा परिसर दोन ते अडीच एकरांत विस्तारला असून मुख्य तीन चौकात विभागला आहे. मधल्या चौकात श्री गणेश मंदिर असून सभोवारच्या भागात श्री चिंतामणेश्वर (श्री शंकर), श्री सूर्यनारायण, श्री चिंतामणेश्वरी व श्री लक्ष्मीनारायण अशी मंदिरे आहेत. या पाचही देवतांना मिळून श्री गणपती पंचायतन संस्थान असे नामकरण रूढ झाले आहे.

दोनशे वर्षांचा इतिहास

सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास असणाऱ्या सांगलीच्या गणेश मंदिराच्या स्थापनेमागे एक कहाणी सांगितली जाते. सांगलीच्या पटवर्धन राजघराण्याचे मूळ पुरुष हरभटबुवा हे कोकणातील गणपतीपुळे येथे एक तप तपश्चर्येला बसले होते. त्यांना पुढे श्री गणेशाने दृष्टांत देवून संसार करण्याची आज्ञा दिल्याने ते कोकण सोडून देशावर आल्यानंतर इचलकरंजीकरांनी त्यांना आश्रय दिला. त्यांचा नातू पांडुरंगराव यांना पेशवाईतील सरदारकी मिळाल्यानंतर मिरजेतून ते कारभार पाहात असत. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मोठा मुलगा पहिले चिंतामणराव पटवर्धन यांना सरदारकीची वस्त्रे बहाल करण्यात आली. चिंतामणराव हे लढाईवर गेले असताना त्यांचे निधन झाल्याची अफवा उठली आणि इकडे मिरजेत त्यांच्या चुलत्यांनी सरदारकीचा राज्यभिषेक करून घेतला. या गृहकलहामुळे पहिल्या चिंतामणरावांनी केवळ श्रीगणेशाची मूर्ती घेऊन घर सोडले. त्यानंतरचा त्यांचा पहिला मुक्काम सध्या सांगलीकर मळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिरजेच्या परिसरात झाला. तिथे त्यांनी संकल्प करुन श्री गणेशाला साकडे घातले की, मी सांगलीत राजधानी स्थापन करू शकलो, तर एक सुंदर आणि भव्य गणेश मंदिर बांधेन. या संकल्पानंतर ते सांगलीत आले. सुरुवातीला १८००मध्ये सांगलीतील राजवाड्याचे बांधकाम सुरू झाले. त्याच दरम्यान सध्या श्री गणेश मंदिर असलेली जागा ही चिंतामणरावांनी शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी निवडली होती. ती जागा उंचावर असल्याने तेथे तटबंधी बांधली. शत्रूंनी हल्ला केल्यास तटबंदीच्या आडून काही वेळ शत्रूला थोपवून धरायचे. त्या कालावधीत चारी बाजूंनी खोल खंदक असलेल्या सातचौकी (गणेशदुर्ग) किल्ल्याचा काटे दरवाजा बंद करून घेता यावा, अशी त्यांची कल्पना होती.

जोतिबा डोंगरावरून दगड

सुरुवातीला श्री गणेशाचे मंदिर सध्याच्या चिंतामणीनगर भागात बांधण्यास सुरुवात झाल्याचे इतिहासकारांनी नोंदवले आहे. त्या जागेवर मंदिर बांधकाम सुरू झाल्याच्या खाणाखुणा दर्शविणारे अवशेष अद्यापही दिसतात. इ. स. १८०६मध्ये मंदिर बांधकामाची आखणी आणि १८१३च्या सुमारास मंदिर बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. त्या ठिकाणी खोल दरी असल्याने सुरुवातीला वाळू आणि चुन्याची भर घालण्यात आली. त्यावेळी जोतिबाचा डोंगर म्हणजे घनदाट जंगलच होते. तेथील काळा दगड पटवर्धनांनी पसंत केल्यानंतर वडारी गाड्यातून दगड आणणे सुरू झाले. सुमारे ३० वर्षे गणेश मंदिर आणि आजुबाजूच्या मंदिरांचे बांधकाम सुरू होते. १८४४ म्हणजे शके १७६६ चैत्र शुद्ध दशमीला त्या मंदिरात संगमरवरी दगडातून घडविलेल्या सुबक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. एकाच संगमरवरी दगडातून घडविलेल्या अन्य देवतांच्या मूर्तींचीही त्याच दिवशी प्रतिष्ठापना करण्यात आली. नोंदीनुसार त्यावेळी प्रतिष्ठापनेच्या धार्मिक विधीस १४ हजार रुपये इतका खर्च आला होता. श्री गणेशाची मूर्ती चतुर्भुज असून डाव्या सोंडेची आहे. बाजूला ऋद्धी आणि सिद्धीच्या सुबक मूर्ती आहेत. दिशासाधन तंत्राचा वापर केला गेल्याने श्री गणेशाचे दर्शन अगदी दूरवरून म्हणजे गणपती बाजार पेठेतूनही घेता येते. मुख्य गणेश मंदिराची लांबी ९१ फूट तर रुंदी ६० फूट आहे. मंदिराची कलापूर्ण शिखरापर्यंतची उंची ७० फूट आहे. मंदिरासमोरील भव्य असे महाद्वार १९०३मध्ये दुसरे चिंतामणराव यांनी बांधले. त्यासाठीचा लाल दगड कर्नाटकातून आणण्यात आला. हे महाद्वार दुमजली आणि सुबक कलाकुसरीचा उत्तम नमुना आहे. त्यानंतर अगदी अलीकडे श्रीमंत विजयसिंहराजे यांनी राजस्थानमधील लाल दगड मागवून मंदिराचा परिसर सुशोभित केला आहे. दोनशे वर्षांपूर्वीची ड्रेनेज व्यवस्था स्वच्छ करून मंदिर परिसरात साचणारे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था मार्गी लावल्याने मंदिराचा परिसर स्वच्छ आणि रम्य राहण्यास मदत झाली आहे. या गणपती पंचायतन संस्थानास सांगली आणि सांगलीवाडी ही दोन गावे इनाम असून त्या गावांच्या शेतसारा, बिगरशेती सारा संस्थानकडे जमा होतो. त्यातूनच दैनंदिन खर्च भागविण्याची प्रथा आहे.

दरबार हॉलमध्ये उत्सवमूर्ती

मंदिरातील गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेपासूनच संस्थानच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. परंतु गणेश मंदिराच्या परिसरात गणपतीची उत्सवमूर्ती बसविली जात नाही. ही उत्सवमूर्ती गणेशदूर्ग किल्ल्यातील भव्य अशा दरबार हॉलमध्ये बसविली जाते. पहिले चिंतामणराव पटवर्धन यांनी नेहमीच श्री गणेशाला सर्वोच्च स्थान दिले होते. त्यामुळे दरबार हॉलमध्येही उत्सवमूर्ती बसविण्याचे ठिकाण वर आहे आणि त्याच्या एक पायरी खाली श्रीमंताचे सिंहासन अशी रचना आहे. पाचव्या दिवशी दरबार हॉलमधूनच सुबक लाकडी रथातून संस्थानची गणेशमूर्ती विसर्जनासाठी बाहेर पडते.

दिमाखदार विसर्जन मिरवणूक

संस्थानच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण सांगली परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले असते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन श्रींच्या मूर्तीवर पेढ्यांची उधळण करतात. दरबार हॉलपासून राजवाडा चौकापर्यंत श्रीमंत विजयसिंहराजे, राजलक्ष्मी पटवर्धन, त्यांची कन्या अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, पोर्णिमा आणि मधुवंती यांच्यासह अन्य नातेवाईक, प्रतिष्ठित व्यक्ती मिरवणुकीच्या अग्रभागी राहून भाविकांना अभिवादन करतात. त्यानंतर राजघराण्यातील व्यक्ती पुढे जाऊन मुख्य गणेश मंदिराच्या महाद्वारावर थांबतात. त्या ठिकाणी उत्सवमूर्ती येताच फुलांचा वर्षाव करतात. तेथून पुढे मूर्ती विसर्जनासाठी मिरवणूक कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर जाते आणि सूर्यास्तापूर्वी मूर्ती विसर्जनाचा मान असलेले आंबी घराण्यातील लोक ती मूर्ती सजविलेल्या होडीतून नदीत मध्यभागी नेऊन विसर्जित करतात.

कागदाच्या लगद्यापासूनच्या मूर्ती

गणपतीचा उत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो आणि सार्वजनिक गणेशोत्सव श्री गणेश चतुर्थीला सुरू होतो. गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशीच म्हणजे प्रतिपदेला गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची संस्थानची प्रथा आहे. परंतु सार्वत्रिक अर्थाने यांचा उत्सव अगोदर कसा, अशी चर्चा होऊ नये म्हणून प्रतिपदेला प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या मूर्तींबाबत फारसा गाजावाजा होत नाही. म्हणून त्याला चोर गणपती असे नाव पडले. त्यासाठीच्या दोन मोठ्या मूर्ती दीडशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यांपासून बनविण्यात आल्या आहेत. त्या अजूनही सुस्थितीत असून त्यांचे काळजीपूर्वक जतन केले जात आहे. त्यांचे विसर्जन केले जात नाही, अशी माहिती विजयसिंह पटवर्धन यांनी दिली.

पर्यायी मूर्ती आणि कळसही

पहिले चिंतामणराव पटवर्धन यांनी सुमारे दोनशे वर्षापूर्वी सांगलीत गणेश मंदिर उभारताना दूरदृष्टी ठेवून अनेक उपाययोजना करुन ठेवल्या आहेत. त्या काळात भव्य आकाराचा संगमरवरी दगड उपलब्ध करुन तो सांगलीत आणणे. त्यापासून सुबक मूर्ती घडविणारे कारागीर शोधून काढणे, हे तसे जिकिरीचेच होते. पण त्यांनी या सर्व गोष्टी अगदी श्रद्धेने केल्या. मंदिरातील गणेश मूर्ती, दोन्ही बाजूच्या ऋद्धी, सिद्धी आणि भोवतालच्या चार देवांच्या मूर्ती एकाच दगडातून घडविल्या आहेत. या मूर्तींना काही इजा झालीच, तर पर्यायी मूर्ती असावी आणि ती पहिल्या मूर्तीइतकीच हुबेहुब असावी, असा दृष्टिकोन ठेवून चिंतामणरावांनी त्याच दगडातून, त्याच कारागिरांकडून दोनशे वर्षांपूर्वीच तशाच मूर्ती बनवून घेतल्या आहेत. त्याही सुस्थितीत आहेत. २००४मध्ये मंदिराच्या कळसांचा जिर्णोद्धार झाल्यानंतर त्यावर तांब्याचे कळस बसवून त्यावर सुवर्ण लेप देण्याचे ठरले. केवळ तांब्याच्या कळसांसाठी निविदा मागविण्यात आली. पाच लाख रुपयांची निविदाही आली. त्याच दरम्यान ५ जुलै, २००४ रोजी तेथील तळघराजवळ एक नाग घुटमळताना दिसला. सर्पमित्रांना बोलवून त्याला पकडून नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरा नाग त्याच परिसरात दिसला. त्यालाही पकडून नेण्यात आले. त्या परिसरातील अडगळीमुळे सापांनी तेथे घर केले असावे, असे समजून तेथील स्वच्छता करण्याचे ठरवले. स्वच्छतेला सुरुवात होताच तळघरात सुमारे साडेपाच फूट उंचीचे आणि अडीच फूट घेर असलेले तांब्याच्या धातूचे पुरातन असे भक्कम कळस आढळून आले. यावरून पहिल्या चिंतामणरावांनी भविष्यात मंदिराची डागडुजी करताना नेमक्या कोणत्या अडचणी येतील हे ओळखून त्याचे पर्याय उपलब्ध करून ठेवल्याचे लक्षात आले. काही जमिनींचे सातबारे गणपतीच्या नावे आहेत. काही जमिनी हत्तीच्या नावावर आहेत. या उपाययोजनांची विल्हेवाट लावता येऊ नये, अशी तजवीज दोनशे वर्षापूर्वीच केली असल्याने त्या आजतागायत कायम आहेत. या संस्थानमध्ये गणेशाइतकेच हत्तीलाही महत्त्व आहे. पहिल्या अधिपतींच्या पदरी १८ हत्ती होते. त्यानंतरही मंदिराकडे हत्ती असायचाच. पण बबलू या सर्वप्रेमी आणि सांगलीकरांना लळा लावलेल्या हत्तीच्या निधनानंतर अद्याप संस्थानने हत्ती आणलेला नाही.

मोफत अन्नछत्र

गणपती मंदिराच्या परिसरात गेल्या दहा वर्षांपासून सर्व जातीधर्मांच्या गरजूंसाठी मोफत अन्नछत्र चालविण्यात येते.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive

Follow by Email