Monday, September 16, 2013

आनंदनिधान Shree Sansthan Ganapati, Sambhajinagar



आनंदनिधान


shree.jpg
श्री संस्थान गणपती - Shree Sansthan Ganapati, Sambhajinagar


श्री संस्थान गणपती औरंगाबादचे ग्रामदैवत व आनंदनिधान. श्री संस्थान गणपतीचे मंदिर ऐतिहासिक व प्राचीन आहे. सुखकर्ता-दुःखहर्ता अशी ख्याती असलेल्या या मंदिरात वर्षभरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारा म्हणूनही संस्थान गणपतीची ख्याती आहे. मंदिर शहराच्या मध्यवस्तीत असल्याने त्याची उभारणी सुरुवातीला अत्यंत छोट्या जागेत झाली. मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नव्हती तसेच मंदिराला शिखरही नव्हते, पण जिर्णोद्धारानंतर भाविकांच्या श्रद्धेचा भाग असलेल्या या दोन्हीही गरजा पूर्ण झाल्या आहेत.

स्वयंभू मूर्ती

श्री संस्थान गणपती मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख असून, दोन फूट बाय दोन फूट आकाराची आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून, ती आसनस्थ आहे. काळ्या पाषाणातील स्वयंभू मूर्ती अशी तिची ख्याती आहे. अनेक भक्तांच्या मनोकामना या संस्थान गणपतीने पूर्ण केल्या आहेत. आजही अनेक भक्त श्री संस्थान गणपतीचे दर्शन घेऊन आपल्या दिनचर्येला सुरुवात करतात. महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या मूर्तीच्या जोडीची मूर्ती म्हणून या मूर्तीची ख्याती आहे. ही प्राचीन स्वयंभू मूर्ती पाहताच मनाला एक निखळ आनंद मिळतो. ही मूर्ती शेंदुराच्या तीन इंच थरात स्थिरावली आहे.

लोकमान्यांचे श्रद्धास्थान

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औरंगाबादला जेव्हा येत, तेव्हा ते श्री संस्थान गणपतीच्या दर्शनासाठी आवर्जून येत. मूर्तीचे दर्शन घेऊनच ते कोर्टाच्या कामाला जात. आजपर्यंत अनेक मान्यवर व्यक्ती, मोठमोठे संतमहंत, विद्वानांनी अत्यंत श्रद्धेने श्री संस्थान गणपती मंदिरात येऊन आराधना केली आहे.

शिवसेनाप्रमुखांनी नवस फेडला

औरंगाबाद महापालिकेची पहिली निवडणूक मे, १९८८मध्ये झाली. या निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना प्रथमच उतरली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रचारासाठी औरंगाबादेत आले. प्रचारसभेला जाण्यापूर्वी त्यांनी श्री संस्थान गणपतीचे दर्शन घेतले व पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला बहुमत मिळाले तर गणपतीच्या मूर्तीला सोन्याचा मुकूट अर्पण करण्याचा नवस त्यांनी केला. पुढे या निवडणुकीत शिवसेनेला बहुमत मिळाले. शिवसेनेचीच सत्ता आली. सत्तास्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे श्री संस्थान गणपतीचा नवस फेडण्यासाठी मुद्दाम औरंगाबादला आले व त्यांनी गणपतीच्या मूर्तीला सोन्याचा मुकूट अर्पण केला. ही आठवण आजही अभिमानाने सांगितले जाते.

संगमरवरी दगडातील मंदिर

ऐतिहासिक व अतिप्राचीन असलेल्या या मंदिराची व्यवस्था १९६०पासून सध्या कार्यरत असलेल्या ट्रस्टकडे आली. ट्रस्टच्या स्थापनेपर्यंत मंदिराचे वार्षिक उत्पन्न केवळ १०० रु. होते. हे उत्पन्न मंदिराच्या लहानशा जागेत उभारलेल्या एका स्टॉलकडून मिळत होते. यातूनच मंदिराचा खर्च भागवला जात असे, पण जसजसे शहर वाढत गेले, तसतसे मंदिराचे उत्पन्नही वाढू लागले. त्यामुळे मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिर्णोद्धारानंतर मंदिराचे रूपच पालटले. मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी भाविकांना जागा मिळाली, पण मंदिराच्या शिखराचे काम मात्र अपूर्णच राहिले. मंदिरावर एक कृत्रिम लोखंडी शिखर करण्यात आले. मंदिराचे वार्षिक उत्पन्न २० हजार रुपयांवर गेल्यावर मंदिराचा पूर्ण जिर्णोद्धार करण्याची कल्पना पुढे आली. संगमरवरी दगडातील सुंदर मंदिर तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पाच-सहा वर्षांपासून मंदिराच्या नवनिर्माणासाठी प्रयत्न सुरू राहिले. त्यानंतर प्रयत्नांना यश मिळाले. आज छोटेसेच पण संगमरवरी दगडातील मनाला प्रसन्न करणारे मंदिर औरंगाबादचे भूषण बनले आहे. श्री संस्थान गणपतीच्या दर्शनासाठी रोज असंख्य भक्त येथे येत असतात. चतुर्थीच्या दिवशी मात्र या मंदिरात सकाळपासूनच अलोट गर्दी असते. भाविक मनोभावे दर्शन घेतात व आपल्या मनातील इच्छा गणपतीच्या चरणी अर्पण करतात. भक्तीभावाने व्यक्त केलेली इच्छा श्री संस्थान गणपती पूर्ण करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेकांना असा अनुभव असल्याचे सांगितले जाते.

भंडारा वैशिष्ट्यपूर्ण

मंदिरात रोज सकाळी व सायंकाळी गणपतीची आरती केली जाते. गणेशोत्सवाच्या काळात श्री संस्थान गणपती मंदिरातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गणेशोत्सवातील दहाही दिवस भंडाऱ्याचा कार्यक्रम होतो. रोज किमान चार ते पाच हजार भाविक या भंडाऱ्याचा (महाप्रसादाचा) लाभ घेतात. गणेशोत्सवाचे दहाही दिवस मंदिराजवळ सनई-चौघडा वाजवला जातो. या काळात आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. नेत्रदीपक देखावे तयार करून त्यातून समाजप्रबोधन केले जाते. गणेशोत्सवाच्या काळात श्री गणपती अथर्वशीर्षच्या सहस्त्रावर्तनाचे पठण केले जाते. श्री संस्थान गणपती मंदिरातर्फे गणेशोत्सवाच्या व्यतिरिक्त दुर्गा महोत्सव दहा दिवस साजरा केला जातो. सकाळ-सायंकाळ दुर्गामातेची पूजा-आरती केली जाते. नवमीच्या दिवशी होमहवन करून महाप्रसादाचे वाटपही केले जाते. दुर्गा महोत्सवाप्रमाणे दहीहंडीचा कार्यक्रमही साजरा केला जातो. प्रत्येक राष्ट्रीय व महत्त्वाच्या धार्मिक सणाला श्री संस्थान गणपती मंदिरावर सुंदर व आकर्षक रोषणाई केली जाते. दिवाळी, होळी, दसरा, रामजन्म, कृष्णजन्म, हनुमान जयंती, महाशिवरात्री, बुद्ध जयंती, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी अशा महत्त्वाच्या दिवशी मंदिराला रोषणाई केली जाते. आज संस्थान गणपतीचे महात्म्य केवळ औरंगाबादेत नाही तर संपूर्ण मराठवाडा व महाराष्ट्रात पोचले आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागातील भाविक दर्शनासाठी श्री संस्थान गणपतीच्या मंदिरात येतात. श्री संस्थान गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सोभागचंद चोरडिया हे असून प्रफुल्ल मालाणी, नंदकुमार घोडेले, संतोष चिचाणी हे विश्वस्त आहेत. आता या मंदिराच्या कामात नवीन कार्यकर्त्यांची टीम दाखल झाली आहे. त्यामुळे नव्या दमाने नवनवीन कार्यक्रम ट्रस्टतर्फे घेतले जातात.

सामाजिक उपक्रमातही अग्रेसर

श्री संस्थान गणपती ट्रस्ट धार्मिक उपक्रमाबरोबर सामाजिक उपक्रमांतही अग्रेसर आहे. या ट्रस्टतर्फे आर्थिक दुर्बल घटकातील पेशंटांना उपचारासाठी आर्थिक मदत केली जाते. हृदयरोग, कॅन्सर व किडनीच्या आजाराच्या पेशंटांना प्रामुख्याने या ट्रस्टतर्फे मदत केली जाते. गेल्या १५ वर्षांपासून ट्रस्टचा हा उपक्रम सुरू आहे. दरवर्षी किमान १५ ते २० पेशंटांना ट्रस्टतर्फे मदत केली जाते. श्री संस्थान गणपती ट्रस्टतर्फे होमिओपथी हॉस्पिटलही चालवले जाते. ग्वाल्हेर येथील डॉ. सुरी दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात औरंगाबादला येतात. श्री संस्थान गणपती मंदिराच्या कार्यालयातील हॉस्पिटलमध्ये ते दिवसभर पेशंटांची मोफत तपासणी करतात तसेच मोफत औषधेही दिले जातात. गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. दर महिन्याला किमान ४०० पेशंट त्याचा लाभ घेतात. विविध मंदिरांच्या जिर्णोद्धारासाठीही या ट्रस्टतर्फे मदत केली जाते. येत्या काळात आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी कम्प्युटर क्लासेस सुरू करण्याचे नियोजन ट्रस्टतर्फे केले जात आहे. या क्लासच्या माध्यमातून मोफत शिक्षणही दिले जाणार आहे.



No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive