Saturday, November 16, 2013

Sachin Tendulkar got "Bharat-Ratna" award


‘आपल्या सचिन’ला भारतरत्न! दिल्लीत घोषणा, देशभर जल्लोष


Bharat


गेली जवळपास अडीच दशके भारतासह जगातील कोट्यवधी क्रिकेट रसिकांना आपल्या खेळाने परमानंद देणारा... क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला भारत सरकारने 'न भूतो, न भविष्यती' असा 'सेंड ऑफ' दिला आहे. आपल्या सचिनला 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे. 'भारतरत्न' हा सर्वोच्च पुरस्कार पटकावणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू आणि सर्वात तरुण भारतीय आहे. कोट्यवधी भारतीयांची 'इच्छापूर्ती' करणाऱ्या या घोषणेनंतर देशभरात आनंदोत्सव साजरा होत आहे.

पंतप्रधान कार्यालयातून ही घोषणा करण्यात आली. वानखेडेवर कारकीर्दीतील अखेरची, २००वी कसोटी खेळून सचिनने अत्यंत जड अंत:करणाने आज क्रिकेटचे मैदान सोडले. त्याच्या मैदानावरील एक्झिटमुळे अवघा देश हेलावला असतानाच 'भारतरत्न'ची बातमी आली. सचिन आणि त्याच्या कोट्यवधी चाहत्यांसाठी हा सुखद धक्का होता. या घोषणेनंतर संपूर्ण वातावरणच बदलून गेले आहे.

दस्तुरखुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 'भारतरत्न'साठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सचिनच्या नावाची शिफारस केल्याचे वृत्त 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिले होते. 'भारतरत्न ' साठी सचिनला पाठिंबा देणाऱ्या अनेक शिफारशी गृहमंत्रालय तसेच पंतप्रधान कार्यालयाकडे दाखल झाल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, संसदीय कामकाज मंत्री राजीव शुक्ला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यासाठी पाठिंबा दिला होता.

निकष बदलताच शिफारसींचा पाऊस

खेळाडूला ' भारतरत्न ' ‌ मिळण्याची तरतूद नव्हतीच; परंतु, २०१०मध्ये या पुरस्काराच्या नियमांमध्ये बदल करून ' कोणत्याही क्षेत्रातील ' सर्वोच्च कामगिरी किंवा योगदानासाठी हा पुरस्कार देण्याचा निकष ठरवण्यात आला होता. त्यानंतर सचिनला ' भारतरत्न ' देण्यासाठी सन २०११ मध्ये ६४ तर, २०१२मध्ये २० शिफारशी पंतप्रधान कार्यालयाकडे आल्या होत्या.

निवृत्तीनंतरही विक्रम सुरूच!

क्रिकेटच्या मैदानावरील जिवंत आख्यायिका ठरलेला सचिन जेव्हा-जेव्हा मैदानात उतरायचा, तेव्हा त्याच्या खात्यावर नवा विक्रम लिहिला जायचा. विक्रमाची ही परंपरा त्याच्या निवृत्तीनंतरही थांबली नाही. सर्वात कमी वयात आणि पहिला 'भारतरत्न' खेळाडू होण्याचा बहुमान पटकावत त्याने ही परंपरा कायम राखली आहे.

खूप खूप अभिनंदन

सचिनच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर आपल्या भावना व्यक्त करताना गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कालच सचिनला 'भारतरत्न' मिळायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. ही अपेक्षा दुसऱ्याच दिवशी पूर्ण झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला असून सचिनचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive