Privacy Policy

Monday, March 8, 2010

'मराठी भिकारीण झाली तरीही...'

'मराठी भिकारीण झाली तरीही...'


परभाषकांनी मराठीची गळचेपी केली असे मानणे, म्हणजे वाळूच्या पोत्यांवर ठोसे मारण्यासारखे आहे. वास्तव तपासले तर मराठी खतम करण्यास आपणच जबाबदार आहोत, हेच दिसेल. कुठे अतिशुद्ध मराठीचा आग्रह तर कुठे पायाभूत व्याकरणही नाकारण्याचा अट्टहास. यामुळेच मराठीची गळचेपी होत राहिली...
.............

कालच राज्यभर 'मराठी भाषा दिन' साजरा झाला. कविवर्य कुसुमाग्रज यांची ही जयंती. गेली अनेक वषेर् महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर २७ फेबुवारीला मराठी भाषा दिन साजरा होतो. तो काल जसा साजरा झाला, तसाच तो गेल्या वषीर् साजरा झाला. त्या आधीच्या आणि त्याच्याही आधीच्या वषीर् तो तसाच आला, साजरा झाला आणि गेला. पुढील वषीर्ही अश्शाच उत्साहात आपण तो साजरा करू.

तीच ती मराठीची गर्वगीते, कुसुमाग्रजांची छायाचित्रे, त्याखाली त्यांच्या कवितांच्या ओळी, तेच ते वक्तेआणि त्यांची तीच ती मराठीची थोरवी आळवणारी भाषणे... ऐकणाऱ्यांना कंटाळा आला, तरी बोलणाऱ्यांचा वाषिर्क उत्साह कायम असतो आणि कंटाळलेले श्रोते चुकता दरवषीर् येत राहतात, याचे कारण काहींचा प्रामाणिक अभिमान, काहींचा भाबडेपणा आणि काही केवळ काही गवसते का, याच्या शोधात तेथे रेंगाळलेले. अशाने मराठीचे भले कसे व्हायचे?

सर्व भारतीय भाषांमध्ये मराठी भाषा थोर खरीच. संस्कृत आणि तामीळ नंतर इतकी प्राचीन भाषा या देशात नाही. राष्ट्रभाषा हिंदीपेक्षाही मराठी जुनी आणि या भाषेतील लिखित साहित्यही अकराव्या शतकापासूनचे. ज्या काळात अनेक भाषांना स्वत:चे व्याकरणही नव्हते, त्या शतकात कवी मुकुंदराजांनी पहिला मराठी ग्रंथ लिहिला. भगवद्गीतेवरील प्राकृत भाषेतील पहिले निरुपण संत ज्ञानेश्वर या अद्वितीय तत्त्ववेत्त्याने मराठीतच लिहिले. पहिले नाटक मराठीत आले आणि पहिला चित्रपटही. फार काय चित्रपट निमिर्तीचा स्वतंत्र भारतातील पहिला राष्ट्रीय पुरस्कार 'श्यामची आई' या आचार्य अत्र्यांच्या मराठी चित्रपटालाच मिळाला.

अशा मराठीची थोरवी गाण्यासाठी केवळ एकच दिवस कशाला? पण तरीही उत्साही, ध्येयवेडी मंडळी वर्षातला एक दिवस मराठीला अर्पण करतात, हे चांगलेच म्हणायला हवे. कारण इतका उज्ज्वल इतिहास असलेल्या मराठीची आज परिस्थिती अशी की, वर्षातील किमान एक दिवस तरी आपण मराठी आहोत याची जाणीव मराठी भाषिकांना केवळ या दिवसानिमित्त होते. उरलेले ३६४ दिवस आपण सारे केवळ थकलेले, पिचलेले किंवा आमच्यावर अन्याय होतो, असे कण्हत दुसऱ्यांच्या नावाने बोटे मोडणारे असतो. घरातला कर्ता वा वडीलधारी माणूस गेला की, त्याचे स्मरण वर्षातून किमान एक दिवस तरी व्हावे म्हणून त्याची जयंती, पुण्यतिथी पाळण्याची प्रथा असते. मराठी दिवस पाळून आपण मराठीला अशीच वाषिर्क श्रद्धांजली तर वाहात नाही ना, याचा विचार आता मराठीजनांनी करायला हवा.

हे विधान दाहक वाटेल, पण ते वास्तव आहे का, याचा तपास प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून करायला हवा. घोषणांच्या गोंगाटात आणि 'गर्जा महाराष्ट्र माझा' च्या गलबल्यात आपण आत्मशोधच विसरतो किंवा त्याचे भान राहात नाही किंवा तशी आवश्यकता वाटत नाही किंवा कदाचित तसे करण्याची भीतीही वाटते. ते काहीही असले, तरी शेवटी पदरात आत्मप्रतारणाच पडते. ती अव्यक्तअसली, तरी तिचे व्हायचे ते परिणाम होतच असतात. महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच मराठीला मारण्याचे कट शिजत आहेत. ते परभाषकांकडून होत आहेत, असे आपण सारेच सोयीस्कर मानून मुठी आवळतो, हे खरे. कारण तसे करणे सोपे असते. मुष्टियुद्धाचा सराव करणारा खेळाडू वाळूचे पोते (पंचिंग बॅग) बांधून त्यास ठोसे देण्याचा सराव करतो. पण पंचिंग बॅग म्हणजे प्रतिस्पधीर् नव्हे. ती प्रतिठोसे मारत नाही. परभाषकांनी मराठीची गळचेपी केली असे मानणे, अशा सरावासारखेच आहे. वास्तव खरेच तपासले, तर असे ध्यानात येईल की, मराठी खतम करण्यास आपण मराठी भाषकच जबाबदार आहोत. कुठे अतिशुद्ध मराठीचा आग्रह तर कुठे मराठीचे पायाभूत व्याकरणही नाकारण्याचा अट्टहास. यामुळे मराठीची गळचेपी होत राहिली.

मराठी माध्यमात शिकून जगात नाव यश कमावणारी शेकडो उदाहरणे असूनही आपल्या मुलांनी इंग्रजीत अभ्यास केला, तरच यशाचे सोपान चढता येतात, असा बालिश विचार करणारे मराठीजन समाजाच्या सर्वच थरात आहेत. बरे, मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले, तरी त्याची मराठीची नाळ घरातच का तोडायची? मातृभाषेपासून मुलाला तोडताना त्याला संस्कृतीपासूनही तोडत आहोत, याचा विचार सुशिक्षित पालकही करत नाहीत. 'माझ्या नातीला माझी कविता वाचता येत नाही', असे थेट साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून जाहीर करून ख्यातनाम मराठी कवी टाळ्या मिळवतात. पण जो आपली भाषा नातीपर्यंतही पोहोचवू शकत नाही, त्याला अध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का, याचा विचार ना तिथे जमलेले भाबडे साहित्यरसिक करतात, ना मराठीचे तथाकथित 'उपासक.'

कॉलेजांमध्ये पदवीसाठी मराठी विषय घेणाऱ्यांची संख्या दरवषीर् रोडावते आहेच, पण जिल्ह्यांच्या गावांतही मराठी शाळांना पुरेसे विद्याथीर् मिळत नाहीत. मराठी पुस्तके, मासिके ठेवणाऱ्या वाचनालयांत जा. जी मंडळी येतात, त्यांनी पन्नाशी पार केलेली. आणखी किती वषेर् ते वाचणार? मराठीत दजेर्दार साहित्य येतच आहे, पण त्याला दाद देणारी पुढची पिढी कुठे आहे?

अशावेळी आपण एक तर आपण मराठी नाहीच, आपण तर विश्वाचे नागरिक अशी स्वत:ची फसवणूक करून घेतो किंवा दुकानावरील पाट्या मराठीत करा, अशा आरोळ्या ठोकत दगड फेकून दहशत निर्माण करतो. पाट्या काही काळ मराठीत येतातही, पण गल्ल्यावरचा सेठ मात्र 'स्वस्तात पटवले' म्हणून गालातल्या गालात हसत असतो. हीसुद्धा स्वत:ची फसवणूकच. माधव जूलियन यांनी लिहिले, 'मराठी भिकारीण झाली तरीही, तिच्या एक ताटात आम्ही बसूं' लहान असताना मराठी भिकारीण या वाक्प्रयोगाची चीड यायची. आज तेच वास्तव असल्याचे जाणवते आणि तिची मुले एका ताटात बसण्यास तयार नाहीत, याचे वैषम्यही सलत राहते.

पण हे आपण मान्य करत नाही. कारण तसे केले, तर मराठी दिनाला भगवे फेटे बांधण्याचे, तुताऱ्या फुंकण्याचे आणि ढोलकी बडवण्याचे नैतिक अधिष्ठान उरणार नाही. तितके आपण आजतरी प्रामाणिक आहोत!

No comments:

Post a Comment