इस्राइलमधील लष्करसक्ती आणि भारत
इस्राइलमधील लष्करसक्ती आणि भारत
ब - याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ; ८०च्या दशकातली. मी हायस्कूलमध्ये शिकत होते. त्यावेळी आमच्या टीव्हीवर लागणारी ब्रिटिश मालिका ' ज्वेल इन द क्राऊन ' ( कदाचित आपल्यापैकी काहीजणांनी ही मालिका पाहिली असेल) मी आवडीने बघायचे. मालिकेचे कथानक हे दुस - या महायुद्धानंतर , भारतावरील ब्रिटिश राजवटीच्या अखेरच्या पर्वावर बेतले असून ते खूप वैयक्तिक दृष्टिकोनातून सादर केले आहे. ती पहिली वेळ होती जेव्हा मी भारत, त्यातील सौंदर्य आणि वेगळेपणा पाहिला आणि आमच्या कृष्ण धवल (ब्लॅक अँड व्हाइट) टीव्हीवरसुद्धा मी त्यांतील वेगवेगळे गंध आणि पदार्थ चाखू शकले. जेव्हापासून मी ही मालिका पाहू लागले , त्या क्षणापासून मला भारतात येण्याची उत्कंठा लागून राहिली होती.
पण हे लगेचच घडणार नव्हते. भारताच्या सफरीवर जाण्यापूर्वी मला नियमाप्रमाणे सैन्यात भरती होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावणे आवश्यक होते. इस्राइल हा एक छोटा देश असून शेजारील राष्ट्रांतील अशांततेमुळे तसेच सदोदित युद्धजन्य परिस्थितीमुळे इस्राइलमध्ये लष्करी सेवा ही सक्तीची आहे. उच्च माध्यमिक शिक्षणानंतर म्हणजे वयाच्या १८व्या वर्षी मुलांना ३ वर्षे आणि मुलींना २ वर्षे सैन्यदलांत जावे लागते.
ज्या वयात जगात इतरत्र कोठेही मुले; कोणते कॉलेज चांगले आहे आणि मला त्यात कसा प्रवेश मिळेल या विवंचनेत मग्न असतात त्यावेळी इस्राइली तरुण देशाची सेवा करायला निघतात. सक्तीचे असूनदेखील इस्राईली तरुण-तरुणी सैन्यात जायला आसुसलेले असतात आणि गंमत म्हणजे सैन्याच्या सर्वांत चांगल्या आणि प्रसिद्ध अशा ' एलिट युनिटमध्ये ' ( विशेष दलांत) प्रवेश मिळवण्यासाठी आणि त्यांत विशेष भूमिका निभावण्यासाठी त्यांच्यात चढाओढ असते.
त्या वयात सैन्यांत नेमके कोणते काम करावे असे काही मी ठरवले नव्हते पण ही दोन वर्षे देशाच्या सेवेत स्वतःला पूर्णपणे झोकून द्यायचे आणि सैनिकी जीवनातील ते नाविन्यपूर्ण आणि विशेष अनुभव अगदी मनापासून घ्यायचे याची मात्र मी मनाशी खूणगाठ बांधली होती. मी खरोखरच नशीबवान ठरले कारण माझी आय.डी.एफ. (इस्राईली सैन्य दल) च्या मुख्य चिलखती ( आर्मर) प्रशालेत टॅंक इन्स्ट्रक्टर म्हणून निवड झाली.
झ्यासाठी हा एक अद्भुत अनुभव होता. जगात इतरत्र कुठे मुलींना रणगाडा चालवायची , मिसाईल डागायची तसेच अन्य मुलांना आणि (पुरुष) सैनिकांना हे सारे शिकवायची संधी मिळते ? एकंदरीतच ब - याच इस्राइलींसाठी सैन्यजीवनातील वर्षे ही त्यांच्यातील संशोधकवृती आणि उद्योजकतेचा पाया रचतात. जेव्हा तुम्ही सैनिक असता तेव्हा तुम्हाला रोज नव्या पेचप्रसंगांना सामोरे जावे लागते आणि त्यात गुंतून न पडता चटकन निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे तुमच्यात नाविन्यपूर्णता आणि बिकट परिस्थितीत मार्ग काढण्याची क्षमता ( इंप्रोव्हाईझेशन) येते. इस्राईलमधील जवळपास सर्वच डॉक्टर , इंजिनिअर , तंत्रज्ञ आणि वैज्ञानिकांनी महाविद्यालयीन शिक्षणास सुरवात करण्याआधी सैन्यांत काम केले असल्याने आमच्या सुप्रसिद्ध हाय-टेक इंडस्ट्रीचा पाया हा ख-या अर्थाने सैन्यात घातला जातो. याशिवाय इस्राईली टेक्नॉलोजी आणि वर्क कल्चर हे देखील सैन्यातच विकसित होते.असो. त्याबद्दल मी पुढील भागांत सविस्तरपणे लिहिन.
आज मला पुन्हा मी बघितलेल्या भारतभेटीच्या स्वप्नाकडे परत यायचे आहे. सैन्यातील सेवेनंतर मी एक वर्षं काम केले आणि माझ्या स्वप्नातील सफरीसाठी पैसे साठवले. त्यानंतर तो मोठा क्षण आला. जून १९९० मध्ये मी आणि माझा बॉयफ्रेंड (आता माझा नवरा) दोन मोठ्ठया बॅकपॅकमध्ये आमचे सामान भरुन अतिपूर्वेकडे (पूर्व अशिया) निघालो. थाईलॅंड पासून सुरवात करुन आम्ही मजल दरमजल करत दिल्लीला पोहोचलो.
दिल्लीच्या विमानतळावर आमच्यासारखेच अनेक इस्राईली बॅकपॅकर बघून आश्चर्याचा धक्काच बसला. त्यातून सावरत पुढील ६ आठवडे आम्ही उत्तर भारतात ऋषिकेश , मनाली , पुष्कर , जयपूर , आग्रा , वाराणासी आणि कोलकात्ता अशी मनसोक्त भटकंती केली आणि स्वप्नातला भारत प्रत्यक्षात अगदी जवळून बघितला. इथल्या वातावरणातील मोकळेपणा , वेगवेगळे गंध , बस आणि रेल्वेगाड्यांमधला प्रवास आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आजूबाजूच्या लोकांशी साधलेला संवाद आणि त्यांच्याशी रंगलेल्या गप्पांच्या मैफली मी आजही मनाच्या एका कोपऱ्यात साठवून ठेवल्या आहेत.
त्यावेळी मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आम्ही ज्यांच्याशी बोललो अशा बहुतांशी लोकांना इस्राईल आणि त्याच्या इतिहासाबद्दल पुष्कळशी माहिती होती. त्यांच्या तोंडून डेव्हिड बेन-गुरियन आणि मोशे दायान यांसारख्या आमच्या नेत्यांबद्दल, एनटीबी येथील कमांडो कारवाईबद्दल आणि जेरुसलेमबद्दल आणि मृत-समुद्राबद्दल वारंवार ऐकून आम्ही अचंबित झालो.
आज या गोष्टीला २० वर्षे उलटली आहेत. आजही दरवर्षी भारतात येणा-या सुमारे ४५ , ००० इस्राईली पर्यटकांपैकी बरेचसे हे बॅकपॅकर (भटके) असतात. आपली सैन्यातील सेवा संपल्यानंतर बरेचसे तरुण-तरुणी आपले उच्च शिक्षण एक-दोन वर्षांनी लांबणीवर टाकून परदेशांत , मुख्यत्वेकरुन दक्षिण अमेरीका किंवा पूर्व अशियात प्रवास करतात. ही एक उल्लेखनीय घटना आहे. अशियात येणारे बहुतांशी इस्राइली भारताला भेट दिल्याशिवाय रहात नाहीत. त्यामागे अनेक कारणे असतात. महत्वाचे म्हणजे भारतातील अध्यात्मिक शक्ती अनेकांना आकर्षित करते.
सैन्यात व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनशैलीत उमेदीची काही वर्षे घालवल्यानंतर हे तरुण जेथे थोडे विसावून आयुष्याचा आढावा घेता येईल आणि सैनिकी जीवनातून पुन्हा एकदा नागरी जीवनात परतता अशा शांत जागांच्या शोधात निघतात. भारतातील आगत्यशीलता आणि " शांतीचे " तत्वज्ञान त्यांना बोलावून घेते. भारतात केलेली भटकंती आणि तेथील अनुभव यांची इस्राइली लोकं आयुष्यभर प्रेमाने आठवण काढीत रहातात.
गंगेच्या तीरावर संध्याकाळी होणारी आरती , त्यावेळी लागणारे तैल-दिवे आणि घंटानाद यांतून निर्माण होणाऱ्या पवित्र आणि गूढ वातावरणाच्या आठवणी आजदेखील माझ्या मनात ताज्या आहेत. इस्राईलची राजधानी असलेल्या जेरुसलेमच्या जुन्या शहरातील अरुंद गल्ली-बोळांमधून फिरताना देखील अगदी असाच अध्यात्मिक अनुभव येतो..
आज या लेखाच्या निमित्ताने मी या सा - या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यातून बाहेर काढत आहे. आज २० वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतात एका अधिकृत भूमिकेतून परतल्यावर मला भारताबद्दल आणि येथील लोकांबद्दल एक नवीन आणि अधिक खोलवर अशी जाणीव आणि समज आली आहे. असं म्हणतात की तुम्ही एखाद्या माणसाला भारताच्या बाहेर काढू शकता पण त्याच्या मनांत साठवलेला भारत त्याच्यापासून वेगळा काढणे हे केवळ अशक्य आहे.
वैयक्तिकदृष्ट्या मी याच्याशी पूर्णतः सहमत आहे...
(इस्राइलच्या कॉन्सुल जनरल ओर्ना सगीव
No comments:
Post a Comment