ड्रेस्डेन! एखाद्या ड्रमवर टिपऱ्या मारल्यानंतर जसा आवाज निघेल तसा या गावाच्या नावाचा उच्चार आहे. नेहमी मी नवीन ठिकाण बघायचं असेल तेव्हा तिथं काय बघायचं याचा शक्य होईल तितका विचार करून जातो. 'गुगल'मुळे आज हे सहज शक्य आहे. परदेशी आपल्या हातात मोजका वेळ आणि पैसे असतात. त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग व्हावा म्हणून प्रत्येक प्रवाशाने हे करायलाच पाहिजे. ड्रेस्डेनला जाऊन मी नेमकं काय बघणार आहे याची मला फारशी कल्पना नव्हती. काही युरोपियन चित्रपटांमधून झालेलं या गावाचं ओझरतं दर्शन आणि दुसऱ्या महायुद्धात युद्ध पूर्णपणे जिंकत आल्यावरसुद्धा दोस्तांच्या सैन्याने विनाकारण हवाईहल्ले करून जी दोन गावं- हॅम्बर्ग आणि ड्रेस्डेन बेचिराख केली, लक्षावधी सामान्य जर्मन नागरिकांचे प्राण घेतले, त्यातलं एक शहर एवढीच या जागेची ओळख मला होती. पण काही ठिकाणी अनपेक्षित धक्के बसतात. डायरेक्ट शिवाजी महाराजांची आठवण करून देणारी एखादी गोष्ट मला ड्रेस्डेनमध्ये बघायला मिळेल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. माझा जर्मन मित्र वुल्फगँग मला ड्रेस्डेन दाखवणार होता. ड्रेस्डेनच्या स्टेशनवर उतरल्यापासून अध्र्या तासात आम्ही गाव बघायला बाहेर पडलो. कानटोप्या घालून आणि दोन्ही हात खिशात कोंबूनसुद्धा थंडी पार हाडांपर्यंत पोहोचत होती. वुल्फगँगला मुळात आपलं शहर मनापासून दाखवायला आवडतं. त्यानुसार ६/७ तास त्याने मला तसल्या बर्फा-वाऱ्यातून पायी हिंडवलं आणि संध्याकाळी ६ वाजता आपण 'ग्रीन व्हॉल्ट' बघायला जात आहोत असं जाहीर केलं. मी अक्षरश: 'काय ही कटकट' म्हणत त्याचबरोबर ग्रीन व्हॉल्ट असलेल्या भागात (Zwinger) 'झ्विंगर'मध्ये घुसलो. दिवसभर दिसेल त्या जुन्या इमारतीसमोर थांबून तो मला दि रेनेसान्स, ति बरोक, आर्ट नोव्हा, गॉथिक, रोमन असं सांगत होता. मला ते सगळं सारखंच वाटतं! त्यातून थंडीचा कडाका! त्यामुळे ''ह्या ग्रीन व्हॉल्टमध्ये आता किती वेळ जातो कुणास ठाऊक!'' असल्या थकलेल्या अवस्थेत मी पोहोचलो होतो. आमची तिकिटं घेताना कळलं की ग्रीन व्हॉल्टची तिकिटं ३/४ महिने आधी बुक करावी लागतात. एका वेळेला फक्त ३० लोकांना इथे एक तासासाठी आत सोडतात. १६९४ ते १७३३ या काळात ऑगस्टस द स्ट्राँग नावाचा या प्रदेशाचा प्रसिद्ध राजा होऊन गेला. त्याने आयुष्यभर सोने, हिरे, माणकं, हस्तिदंत यांच्या ज्या मौल्यवान वस्तू जमवल्या त्याचं कायमस्वरूपी प्रदर्शन म्हणजे 'ग्रीन व्हॉल्ट'! प्रत्येक प्रवाशाची कडक तपासणी करून कॅमेरे, मोबाइल अशा सगळ्या गोष्टी बाहेर ठेवून आम्ही आत प्रवेश केला. आणि आतली दालनांमागून दालनं हिंडताना तिथली संपत्ती बघून अक्षरश: डोळे फाटायची वेळ आली. ऑगस्टस द स्ट्राँग हा एकाच वेळी शूर, संधिसाधू, धूर्त, कलेचा प्रेमी आणि अत्यंत डामडौलाने राहणारा राजा होता. त्याच्या दरबारात सतत उत्सव, मेजवान्या, रोषणाई असं चाललेलं असायचं. एखाद्या व्यापाऱ्यानं एखादी मौल्यवान वस्तू विकायला आणली आणि त्याच वेळी ह्या राजाचं जर एखादं युद्ध चाललेलं असेल तर हा ऑगस्टस हुकूम सोडायचा ''युद्ध कॅन्सल! तह करून टाका. मला अमूक अमूक हिरा विकत घ्यायचा आहे!'' ह्या राजाला त्याच्या भानगडींतून झालेली सुमारे ३६० मूलं होती अशा आख्यायिका आहेत. त्यातला औरस पुत्र फक्त एकच! एकंदरीत अशा छानछोकीनं राहणाऱ्या एका शौकीन राजाच्या अतिमूल्यवान वस्तूंचा संग्रह म्हणजे 'ग्रीन व्हॉल्ट!' ह्या ग्रीन व्हॉल्टचे दोन प्रकार आहेत. ऐतिहासिक व्हॉल्ट आणि सर्वसामान्य व्हॉल्ट. ऐतिहासिक व्हॉल्टमध्ये ८ दालनं आहेत आणि तिथे प्रत्येक दालनात सोन्याच्या, चांदीच्या, हस्तिदंताच्या, रत्नजडित हत्यार अशा खास राज्याच्या मर्जीतल्या गोष्टी मांडलेल्या आहेत. त्यांची किंमत करायची झाली तर अख्खं लंडन किंवा पॅरिस शहर विकत घेता येईल! यात जराही अतिशयोक्ती नाही. दुसरा सर्वसामान्य 'ग्रीन व्हॉल्ट'! ह्याला सर्वसामान्य का म्हणायचं, असा प्रश्न पडेल इतकी खच्चून संपत्ती याही व्हॉल्टमध्ये भरली आहे. ह्याच दुसऱ्या व्हॉल्टमध्ये एका कोपऱ्यात मला जरा गर्दी दिसली. मीपण त्यात घुसलो आणि समोर जे बघितलं आणि वाचलं त्यात मला चक्कर यायची वेळ आली! १६७० साली जन्मलेला ऑगस्टस द स्ट्राँग हा राजा सत्तेवर आला १६९४ साली, वयाच्या २४ व्या वर्षी. कल्पना करा, आपल्याकडे त्या वेळी शिवाजी राजांचं देहावसान होऊन १४ र्वष झाली होती. संभाजी राजेसुद्धा गेले होते. औरंगजेब मराठी राज्य संपवून टाकण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात उतरला होता. या काळात मुघल सत्तेचे आणि युरोपियन देशांचे व्यापारी संबंध खूपच पुढारलेले होते. दोन्ही प्रदेशांचे व्यापारी, वकील एकमेकांच्या प्रदेशात मुक्तपणे वावरत होते. व्यापार करत होते. युरोपियन देशांची साधारण २० हजार गलबतं दरवर्षी भारतातून माल घेऊन हॉलंड, फ्रान्स, लंडन आणि इतर प्रमुख युरोपियन शहरांत जात होती. औरंगजेब हा जगातला सर्वात बलाढय़ सम्राट आहे, हे युरोपातल्या सगळ्याच राजवटींनी मान्य केलं होतं. ह्या सगळ्या व्यापारासाठी ड्रेस्डेन आणि प्राग ही मध्यवर्ती ठिकाणं किंवा नाक्याची शहरं होती. मुघल राज्यातून आणलेला बराच किमती माल ड्रेस्डेनच्या ऑगस्टस राजाच्या संग्रहातच रिचवला जात होता. यावेळी औरंगजेब ७६ वर्षांंचा होता तर अॉगस्टस २४ वर्षांंचा! ऑगस्टस राजाला औरंगजेबाविषयी विलक्षण आकर्षण होतं. आदर होता! त्याच्या दरबारात कलेच्या प्रोत्साहनामुळे अनेक कलाकार-कारागीर जमा झाले होते. त्यात एक अफलातून सोनारकाम करणारा कारागीर होता त्याचं नाव जॉन डिंगलिंगर! आपल्या राजाचं औरंगजेबाविषयीचं प्रेम बघून या डिंगलिंगरनं आपल्या राजासाठी एक विलक्षण कलाकृती बनवायचं ठरवलं आणि कुणालाही न सांगता १७०१ साली त्यानं कामाला सुरुवात केली. औरंगजेबाच्या दरबारात जे जे व्यापारी, उच्चपदस्थ लोक जाऊन आले होते त्यांनी केलेल्या वर्णनानुसार काही वेळ अगदी मापांसकट तंतोतंत माहिती घेऊन त्यानं औरंगजेबाच्या दरबाराची हुबेहूब प्रतिकृती तयार करायला सुरुवात केली. ऑगस्टस राजासाठी ती बनवायची असल्याकारणाने सोनं, चांदी, मौल्यवान रत्नं, हिरे, माणकं, हस्तिदंत हेच वापरून त्यानं ती १७०८ साली पूर्ण केली. यावेळेला औरंगजेबसुद्धा अल्लाकडे जाऊन एकच वर्ष पूर्ण झालं होतं. जॉन डिंगलिंगरनी केलेली ती अमूल्य भेट, तो औरंगजेबाचा दरबार आज डेस्डेनच्या ग्रीन व्हॉल्टमध्ये ठेवला आहे. आजही व्हॉल्टमध्ये इतर हजारो बहुमूल्य चिजा असूनसुद्धा पर्यटकांची सर्वात जास्त गर्दी याच गोष्टीसमोर असते. साधारण दीड मीटर लांबीच्या आणि १ मीटर रूंदीच्या चांदीच्या बैठकीवर हा दरबार उभारला आहे. त्यात जवळजवळ १३० व्यक्ती किंवा हत्ती, उंट यासारखे प्राणी आहेत. हा औरंगजेबाच्या वाढदिवसाचा दरबार आहे. सर्वात पुढे त्याची सोन्या-चांदीने तुला करायचे तो तराजू आहे. विविध देशांचे प्रतिनिधी सलाम करून नजराणे करीत आहेत. निम्म्याहून अधिक पायऱ्यांवर एक कठडा आहे. तिथून पुढे खाशी मंडळी दिसत आहेत. दोन्ही बाजूला सरदार अदबीने उभे आहेत आणि अगदी उच्चासनावर स्वत: औरंगजेब थाटात बसला आहे. दरबारात चलनवलन आणि रीतीरिवाजांची स्पष्ट कल्पना या प्रतिकृतीमधून येते. जॉन डिंगलिंगरने तो भव्य दरबार आपल्या कलाकृतीनं जणू जिवंत केला आहे. प्रत्येक गोष्ट अत्यंत रेखीव आणि मापात. या प्रतिकृतीचं ऐतिहासिक मोल प्रचंड आहे. कारण औरंगजेब जिवंत असताना ३०० वर्षांपूर्वी सत्य वर्णनांवर आधारित तिची निर्मिती झाली आहे. हा दिल्लीच्या किंवा आग्य्राच्या लाल किल्ल्यातला दिवाणे-आम असणार. कारण आग्य्राच्या किंवा दिल्लीच्या किल्ल्यातला दिवाणे खास इतका मोठा नाही. दिल्लीचा दिवाणे-आम बघितला तर समोरचं प्रशस्त पटांगण आच्छादित करुन औरंगजेब कसा दरबार भरवत असेल त्याचं वैभव कसं असेल याची पूर्ण कल्पना येते. नाही म्हणायला बारकाईनं बघितलं तर जॉन डिंगलिंगरच्या कल्पनेचा खेळही बघायला मिळतो. स्वत: तो काही दिल्लीला किंवा आग्य्राला आलेला नव्हता. त्यावेळी भारतापेक्षाही चीनशी युरोपचे जास्त संबंध होते. त्यामुळे मग पूर्वेकडची माणसं म्हणजे नकटय़ा नाकाची असं समीकरण त्यानं मनाशी धरलं आहे. दरबाराच्या वरच्या बाजूच्या सजावटीमध्ये ड्रॅगन, पॅगोडासदृष्य काही आकार दिसतात. पण हे दोष अगदी मामूली! कितीही वेळ समोर उभं राहिलं तरी समाधान होत नाही अशी ही प्रतिकृती अनपेक्षितपणे शहरात बघायला मिळाली. माझ्या आजूबाजूचे लोकही ट्रान्समध्ये असल्यासारखे एकटक तिच्याकडे बघत होते. त्याच वेळी माझ्या मनामध्ये मात्र आणखीन एक पायरी ओलांडून विचार धावत होते. औरंगजेब! जगातला सर्वात शक्तिमान सम्राट! अफाट मोठय़ा खंडप्राय देशाचा राजा! युरोपच्या सगळ्या सत्ता हे मान्य करीत आहेत. त्याचा तो विलक्षण झगमगाट केलेला भव्य दरबार! असाच माझ्यासमोर आहे तसा! त्याचा ५० वा वाढदिवस. त्या दिवशी दुपारी त्याच्या एवढय़ा डामडौलात -१२ मे १६६६ या दिवशी दक्षिणेतल्या मराठी मुलखाचा एक राजा. राजा कसला सिंहच तो! भरदुपारी त्याच्यासमोर उभा आहे. कुठे उभा असेल तो? अगदी तळाशी की काही पायऱ्या चढून गेल्यानंतरच्या मोकळ्या जागेत? तिथून तो औरंगजेबाला दरडावून सांगतो की 'उडत गेली तुझी मनसबदारी! ठार मारायचं असेल तर खुशाल मार' आणि सरळ पाठ फिरवून पायऱ्या उतरतो. केवढं हे धाडस आणि हे धाडस आपल्या शिवाजी राजांचं! ड्रेस्डेनसारख्या अपरिचित शहरात असलेली ही प्रतिकृती तिच्या वैभवाकरिता आणि देखणेपणासाठी प्रत्येक भारतीयानं बघावीच. पण त्या ठिकाणी घडलेल्या एका अत्यंत देदीप्यमान प्रसंगाशी प्रत्येक मराठी माणसाची नाळ जोडली गेलेली आहे म्हणून शक्य असेल तितक्या मराठी जनांनी फक्त हा दरबार पाहण्यासाठी तरी ड्रेस्डेनला जावं! पुस्तकातून वाचलेलं शिवाजी राजाचं धाडस खरोखर किती मोठं होतं याची तिथं कल्पना येते. फ्रँकफर्टपासून रेल्वेने ४ तास आणि बर्लिनपासून केवळ २ तासावरच्या ड्रेस्डेनमध्ये खूप काही बघण्यासारखं आहे ते पुढच्या लेखात! |
No comments:
Post a Comment