पतंगाच्या प्राक्तनाची प्रेमकथा...
पतंगाच्या प्राक्तनाची प्रेमकथा...
राकेश रोशनचे चित्रपट कायमच "परिपूर्ण मनोरंजना'ने भरलेले असतात. त्याचा नवा "काइट्स'ही त्याला अपवाद नाही. या वेळी राकेश रोशनने प्रथमच दिग्दर्शनाची धुरा स्वतः न सांभाळता बॉलिवूडच्या नव्या पिढीचा दिग्दर्शक अनुराग बसूकडं दिली. आणि या बदलाचं फळ राकेशला नक्कीच मिळालं आहे. राकेश रोशनच्या चित्रपटांत असणारं भव्यदिव्य, परिपूर्ण मनोरंजन आणि त्यात अनुरागनं टाकलेला "आत्मा' या संयोगाच्या जोरावर हा "पतंग' हवेवर जोरदारपणे स्वार झाला आहे.
"काइट्स' ही एक प्रेमकथा आहे. बॉलिवूडमधील बड्या घराण्यांनी आतापर्यंत अनेक हिरोंना मोठं करण्यासाठी भव्य-दिव्य प्रेमकथा काढल्या. "काइट्स'ही त्याहून खूप वेगळी आहे, असं नाही. मात्र, तरीही ती आजच्या काळातली प्रेमकथा आहे. देश, भाषा, धर्म या सर्व सीमा ओलांडून खरं प्रेम दशांगुळे वर उरत असतं. हा प्रेमकथांचा सनातन, पण मूलभूत संदेश अनुरागनं खास त्याच्या शैलीत दिल्यानं "काइट्स' मनाला स्पर्शून जातो.
लासवेगासमध्ये "साल्सा' नृत्य शिकवून, फावल्या वेळात बेकायदा अमेरिकेत आलेल्या मुलींसोबत (ग्रीनकार्डसाठी) लग्नं लावण्याचा "व्यवसाय' करणाऱ्या जय ऊर्फ "जे' (हृतिक रोशन) या हरफनमौला वृत्तीच्या तरुणाची आणि भलं मोठं कुटुंब पोसण्यासाठी पैसे कमावण्याच्या उद्देशाने मेक्सिकोमधून बेकायदारीतीने अमेरिकेत येऊन, टोनी (निकोलस ब्राऊन) या कसिनोमालकाच्या मुलाशी लग्न करणाऱ्या नताशा ऊर्फ लिंडा (बार्बरा मोरी) या तरुणीची ही कथा आहे. एका "नॉर्मल' बॉलिवूडी प्रेमकथेत असतं, ते सारं यात आहे. यात "जे'वर प्रेम करणारी जिना (कंगना राणावत) आहे, लासवेगासमधला सर्वांत मोठा कसिनो चालविणारा टोनीचा बाप (कबीर बेदी) आहे, "जे'चा स्पॅनिश जाणणारा मित्र आहे... आता टोनीची आणि नताशाची "एंगेजमेंट' होत असतानाच, त्याला टोनीच्या बापाने आमंत्रित करणं आणि तिथं त्याला पुन्हा नताशा भेटणं हे ओघानं आलंच. केवळ पैशासाठी "जे'नं तिच्याशी लग्न केलेलं असतं आणि ती त्याच दिवशी त्याला सोडून गेलेली असते, हे खरं असलं, तरी तो मनापासून जिच्या प्रेमात पडलेला असतो, अशी तीच ती असते. टोनीच्या घरी ती पुन्हा दिसल्यावर दोघांनाही एकमेकांवरील प्रेमाचा साक्षात्कार होतो. आता टोनी आणि त्याच्या अतिश्रीमंत बापाची दुश्मनी ओढवून घेणं आलंच. पुढं ठराविक वळणं घेत कथा क्लायमॅक्सला पोचते. किंबहुना "फ्लॅशबॅक' तंत्रानं पुढं सरकणारी ही कथा पूर्वार्धात फारशी प्रभावित करीत नाही. अनुरागनं खरी कमाल केलीय ती उत्तरार्धात. "जे' आणि नताशाचा "ऑन द रन' हा भाग कमालीचा सुंदर झालाय. किंबहुना या अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रवासातच "काइट्स'चा प्राण सामावलाय. याच भागात "जे' आणि नताशाचा सर्वांत मोठा संघर्ष साकारतो. त्यातच त्यांचं परस्परांवरचं निस्सीम प्रेम उलगडतं. महामार्गांवरचा वेगवान पाठलाग, थरारक चकमकी, लपाछपीचा जीवघेणा खेळ, असं सगळंच नाट्य या भागात रंगतं.
"जे' आणि नताशा दोघंही चतुराईनं अमेरिकेची सीमा ओलांडून मेक्सिकोत तिच्या घरी पोचतात आणि तिच्या घरच्यांच्या साक्षीनं दोघांचं लग्नही होतं. मात्र, टोनी आणि त्याचे साथीदार तिथंही पोचतात. मग...? हा "क्लायमॅक्स' अतिशय चटका लावणारा आहे. अनुरागनं आपलं दिग्दर्शकीय कसब पणाला लावून हा भाग साकारला आहे. या शेवटच्या रिळात चित्रपट मोठी उंची गाठतो. "आपल्या प्रेमासाठी स्वतःला अर्पण करणं, प्रेमाप्रती संपूर्ण समर्पित असणं म्हणजेच खरं प्रेम,' हे त्रिकालाबाधित सत्य पुन्हा अधोरेखित करतो.
सुरवातीला नमूद केल्याप्रमाणं राकेश रोशनचा मनोरंजनात्मक मसाला आणि अनुरागचं दिग्दर्शकीय कौशल्य यांचा समसमा संयोग झाल्यानं "काइट्स'च्या रूपानं एक उत्तम कलाकृती साकारली आहे. चित्रपटाची निर्मितिमूल्यं अर्थातच आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. निम्मा चित्रपट अर्थातच इंग्रजी, स्पॅनिश, मेक्सिकन भाषांमधून बोलतो. ही गोष्ट चित्रपटाच्या लोकप्रियतेच्या विरोधात जाऊ शकते. अर्थात, बऱ्याचदा बाह्यांग अप्रतिम आणि चित्रपटाचा आत्माच हरवलेला असं होऊ शकतं. मात्र, अनुरागनं "त्यागा'ची भारतीय संकल्पना चपखलपणे या कथेत बसवल्यानं हा मोठा उभारलेला डोलारा वाया जात नाही. कथेत अनेक त्रुटी, उणिवा निश्चितच आहेत. त्या दूर झाल्या असत्या, तर चित्रपट आणखी चांगला झाला असता.
अभिनयात हृतिक पुन्हा एकदा अव्वल. किंबहुना त्याच्याच जोरावर हा चित्रपट दिमाखात उभा राहिला आहे. त्याच्या निळ्या डोळ्यांतून प्रेमिकाची "वेदना' अक्षरशः बोलते. बार्बरा मोरी या मेक्सिकन अभिनेत्रीनंही त्याला समरसून साथ दिली आहे. प्रत्येक फ्रेममध्ये ती अतिशय "जेन्युइन' वाटते. सौंदर्याच्या रूढ भारतीय फुटपट्ट्या तिला लागू होत नसल्या, तरी तिच्यात काही तरी "खास' आहे, हे सदैव जाणवतं. ते काय आहे हे ज्याचं त्यानं शोधून काढावं. सो, गो फॉर इट! प्रेमात पडलेल्यांनी पाहावाच; पण न पडलेल्यांनीही हा पतंग उडवून पाहावा. कदाचित, "खऱ्या' प्रेमात पडण्याचा मोह होईल!
No comments:
Post a Comment