Privacy Policy

Friday, May 14, 2010

Man\rathi Novel Ch-5: स्पंदन... (शून्य- कादंबरी)

Man\rathi Novel Ch-5: स्पंदन... (शून्य- कादंबरी)


बी23 कडे जाता जाता जॉनला त्याचं त्यालाच आश्चर्य वाटायला लागलं.

ही कसली ओढ?...

असं तर पूर्वी कधी झालं नव्हतं...

आतापर्यंत कितीतरी केसेस त्याने हाताळल्या होत्या पण एका स्त्रीविषयी अशी ओढ...

आणि काही अनपेक्षित तर नसेल घडलेे अशी काळजी त्याला इतक्या तीव्रतेने कधीच वाटली नव्हती....

त्याने बी23 चे दार ठोठावले. दार उघडेच होते. दार ढकलून तो आत जायला लागला. आत बेडवर अँजेनी पडलेली होती. ती खिडकीतून बाहेर शून्यात बघत होती. चाहूल लागताच तिने दरवाज्याकडे बघितले. जॉनला पाहून तिच्या चेहऱ्यावर एक फिकं हास्य झळकलं. ती अजूनही धक्यातून सावरलेली जाणवत नव्हती. तो तिच्याजवळ जावून उभा राहिला. तिने त्याला जवळच्याच स्टूलवर बसण्याचा इशारा केला. जॉन तिच्या जवळ जाऊन स्टूलवर बसला.

त्याने फुलांचा गुच्छ तिच्या बाजूला ठेवीत म्हटले, " कशी आहेस ?"

ती पुन्हा त्याच्याकडे पाहून नुसती हसली. हसण्यासाठीही जणू तिला कष्ट करावे लागत होते.

"
संकट ज्याच्यावर कोसळते त्यालाच त्या पीडेची जाणीव असते... तू कोणत्या मनस्थितीतून जात असशील ते मी समजू शकतो..." जॉन बोलत होता.

अँजेनीच्या डोळ्यात अश्रू तरळायला लागले. जॉन बोलायचा थांबला. त्याने धीराचा हात तिच्या खांद्यावर ठेवला. आता तर तिला जास्तच गहिवरून यायला लागले. तिने आत्तापर्यंत रोखून धरलेला बांध तुटला आणि ती जॉनला बिलगून ओक्साबोक्शी रडायला लागली. जॉन तिला थोपटून धीर देण्याचा प्रयत्न करीत होता. तिला कसे समजवावे हे त्याला कळेनासे झाले होते.

आता ती थोडी नॉर्मल झाली होती. जॉनने ताडले की अँजेनीला आता खुनाच्या संदर्भात प्रश्न विचारायला काही हरकत नाही.

"
कुणी खून केला असावा? ... तुला काही माहिती ... अंदाज?" जॉनने हळूच प्रश्न विचारला.

अँजेनीने नकारार्थी फक्त मान हलविली आणि ती खिडकीच्या बाहेर शून्यात बघायला लागली. जॉनने त्याच्या खिशातून एक फोटो काढला.

"
हे बघ इथे भिंतीवर ... रक्ताने काहीतरी गोल असे काढण्यात आले आहे... हे काय असावे ... काही कल्पना? ... किंवा कुणी काढले असावे?" जॉनने विचारले.

अँजेनीने फोटोत बघितले. भिंतीवर दिसणाऱ्या गोल आकृतीच्या खाली बेडवर पडलेल्या तिच्या मृत नवऱ्याला पाहून तिला अजून भरून यायला लागले होते. जॉनने फोटो पुन्हा खिशात ठेवला.

"
नाही म्हणजे त्या गोल आकाराचा कशाशी काही संबंध जोडता येतो का?... तो एबीसीडीतला '' असू शकतो ... किंवा ते शून्यही असू शकते..." जॉन म्हणाला.

"
मी समजू शकतो की ... तुला खुनाबद्दल प्रश्न विचारण्याची ही वेळ नाही ... पण जितकी जास्त, आणि जितकी लवकर माहिती मिळेल तेवढ्या लवकर आपण खुन्याला पकडू शकू.." जॉन पुढे म्हणाला.

अँजेनी आता व्यवस्थित बसून आपल्या भावना आवरीत खंबीरपणे म्हणाली, " विचार ... तुला जे विचारायचे आहे ते विचार"

जॉनसुध्दा आता सर्व माहिती काढून घेण्याची ही योग्य वेळ आहे हे जाणून ताठ बसला.

"
सानी काय करत होता ?... म्हणजे बाय प्रोफेशन" जॉनने पहिला प्रश्न विचारला.

"
तो इंपोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय करायचा ... मेनली गारमेंटस् ... इंडीयन कॉन्टीनेंटमध्ये त्याचा व्यवसाय पसरलेला होता" अँजेनी सांगत होती.

"
कुणी प्रोफेशनल रायव्हल?" जॉनने विचारले.

"
नाही ... त्याचा डोमेन एकदम वेगळा असल्याने त्याला जवळपास कुणी प्रोफेशनल रायव्हल्स नव्हते" अँजेनी म्हणाली.

"
बरं तू काय करतेस ?" जॉनने पुढचा प्रश्न विचारला.

"
मी एक फॅशन डिझायनर आहे" अँजेनीने सांगितले.

बराच वेळ अँजेनीचा जाब जबाब सुरू होता. शेवटी स्टूलवरून उठत जॉन म्हणाला, " ठीक आहे सध्यापुरती एवढी माहिती पुरेशी आहे... आता तू थकली असशील ... म्हणजे मानसिकरित्या... आराम कर... पुन्हा काही वाटलं तर आम्ही तुला विचारूच"

जॉन जायला निघाला.

अँजेनी उठायला लागली तर जॉन म्हणाला, " तू पडून राहा... तुला आरामाची गरज आहे"

तरीपण त्याला दरवाज्यापर्यंत सोडायला अँजेनी उठलीच. जॉन दरवाज्यापर्यंत पोहोचत नाही तोच त्याला मागून अँजेनीचा आवाज आला-

"
थँक यू ..."

जॉन एकदम थांबला आणि वळून म्हणाला " कशासाठी ?"

"
माझा जीव वाचविण्यासाठी ... डॉक्टरांनी मला सगळं सांगितलं की जर तू मला वेळेवर कृत्रिम श्वास नसता दिलास तर कदाचित मी आता जिवंत नसते..." अँजेनी त्याच्याकडे डोळे भरून बघत म्हणाली.

"
त्यात काय ... मी माझं कर्तव्य केलं" जॉन म्हणाला.

"
तो तुझा मोठेपणा आहे" अँजेनी दरवाजापाशी जात म्हणाली.

एव्हाना जॉन जायला निघाला होता. तो झपाझप पावले टाकीत चालू लागला, कदाचित आपल्या अनावर झालेल्या भावना लपविण्यासाठी. तो थोड्या वेळातच वार्डच्या शेवटी जाऊन पोहोचला. उजवीकडे वळण्याच्या आधी त्याने एकदा मागे वळून अँजेनीच्या रूमकडे बघितले. ती अजूनही त्याच्याकडेच बघत होती.

जॉन पॅसेजमधून लिफ्टच्या दिशेने जात होता. अँजेनीला सोडून जातांना त्याला उगीचच हूरहूर लागून गेली होती. अचानक जॉनचं लक्ष लिफ्टकडे गेलं. लिफ्ट अजूनही त्याच्यापासून बरीच दूर होती. लिफ्टच्या पलीकडच्या बाजूने एक युवक आला. त्याने काळं टी शर्ट घातलं होतं आणि त्याच्या टी शर्टवर अगदी तसाच 'झीरो' काढला होता जसा त्याने पूर्वी खुनाच्या दिवशी बघितला होता. जॉन लगेच लिफ्टच्या दिशेनं धावायला लागला.

त्याने आवाज दिला, " हॅलो"

पण त्याचा आवाज पोहोचण्याच्या आधीच तो युवक लिफ्टमध्ये शिरला होता. जॉन अजून जोराने धावायला लागला. लिफ्ट बंद झाली होती पण अजून खाली किंवा वर गेली नव्हती. जॉन धावता धावता लिफ्टच्या जवळ गेला. त्याने लिफ्टचे बटन दाबले. पण व्यर्थ. लिफ्ट खाली जाण्यास सुरवात झाली होती. जॉनला काय करावे काही सुचत नव्हते. युवक त्या दिवशीच्या युवकासारखा नव्हता. पण का कोण जाणे जॉनला वाटत होते की खुनाचे काहीतरी रहस्य त्या 'झीरो' दडले होते. जॉन बाजूच्या पायऱ्यांनी भराभर खाली उतरायला लागला. अधून मधून तो लिफ्ट पण बघत होता. लिफ्ट मध्ये कुठेच थांबायला तयार नव्हती. कदाचित ती एकदम ग्राऊंड फ्लोअरलाच थांबणार असावी. जॉनने बघितले तर लिफ्ट त्याच्यापेक्षा दोन मजले पुढे निघून गेली होती. तो अजून जोराने पायऱ्या उतरण्याचा प्रयत्न करायला लागला.

शेवटी दम लागलेल्या अवस्थेत जोर जोराने श्वास घेत तो ग्राऊंड फ्लोअरला पोहोचला. त्याने लिफ्टकडे बघितले. लिफ्टमधले लोक कधीच बाहेर पडले होते आणि लिफ्टवरचा डिस्प्ले लिफ्ट वरच्या दिशेने चाललेली आहे असं दर्शवित होता. जॉन धावतच दवाखान्याच्या बिल्डींगच्या बाहेर आला. त्याने सगळीकडे नजर फिरविली. पार्कीगमध्ये जाऊन बघितले. दवाखान्याच्या आवारातून बाहेर येऊन रस्त्यावर बघितले. तो काळ्या टी शर्टवाला युवक त्याला कुठेही दिसत नव्हता.
(
क्रमशः ...)

No comments:

Post a Comment