हयूयानाच्या शवाभोवती तपास करणाऱ्या टेक्नीकल लोकांची गर्दी झाली होती. त्यांना अडचण होवू नये म्हणून जॉन आणि सॅम बेडरूममधून बाहेर आले. बाहेर हॉलमध्येसुध्दा जॉनचे काही साथीदार होते. त्या साथीदारांपैकी डॅन बाकीच्या रूम्समध्ये काही पुरावा मिळतो का ते शोधत होता. एवढ्यात डॅनचा व्हायब्रेशन मोडमध्ये ठेवलेला मोबाईल व्हायब्रेट झाला. डॅनने फोन काढून नंबर बघितला. नंबर तर ओळखीचा वाटत नव्हता. डॅनने मोबाईल बंद करून खिशात ठेऊन दिला आणि पुन्हा आपल्या कामात मग्न झाला. थोड्या वेळाने डॅनच्या फोनवर एस. एम. एस. आला. एस. एम. एस. त्याच फोन नंबरवरुन आला होता. त्याने मेसेज ओपन करुन बघितला- 'डॅन फोन उचल... ते तुझ्यासाठी खूप फायद्याचे ठरेल.' डॅन विचारात पडला. हा असा कुणाचा एस. एम. एस. असू शकतो. फायदा म्हणजे कोणत्या फायद्याबद्द्ल बोलत असावा हा. आपल्या डोक्याला ताण देऊन डॅन तो नंबर कुणाचा असावा हे आठविण्याचा प्रयत्न करू लागला. कदाचित नंबर आपल्या डायरीत असू शकतो. डायरी काढण्यासाठी त्याने खिशात हात घातला तोच पुन्हा डॅनचा मोबाईल व्हायब्रेट झाला. डॅनने मोबाईलचे बटण दाबून मोबाईल कानाला लावला. तिकडून आवाज आला, " मला माहित आहे तू सध्या कुठे आहेस... हयूयाना फिलीकींन्स च्या फ्लॅटमध्ये... लवकरात लवकर कुणी ऐकणार नाही अशा जागी जा... मला तुझ्याशी फार महत्वाचे बोलायचे आहे" जॉन आणि अँजेनी हॉलमध्ये बसले होते. " या दोन्हीही खुनांवरून मी काही निष्कर्ष काढले आहेत..." जॉन अँजेनीला सांगत होता. " कोणते?" अँजेनीने विचारले. " पहिली गोष्ट ही की खुनी ... इंटेलेक्च्यूअल्स या कॅटेगिरीत मोडायला पाहिजे" जॉन म्हणाला. " म्हणजे?" अँजेनीने विचारले " म्हणजे तो प्रोफेसर , वैज्ञानिक, मॅथेमॅटेशियन ... यापैकीच काहीतरी त्याचे प्रोफेशन असले पाहिजे" जॉनने आपला निष्कर्ष सांगितला. " कशावरून?" अँजेनीने विचारले. " त्याच्या शून्याशी असलेल्या आकर्षणावरून असं वाटतं ... पण 0+6=6 आणि 0x6 =0 असं लिहून त्याला काय सुचवायचे असेल?" जॉन म्हणाला. "असं होवू शकतं की त्याला एकूण 6 खून करायचे असतील" अँजेनी म्हणाली " होवू शकतं" जॉन विचार करीत एकटक तिच्याकडे बघत म्हणाला. जॉनने खुनाच्या जागी काढलेले काही फोटो अँजेनी जवळ दिले. " बघ या फोटोंवरून विशेष असं काही तुझ्या लक्षात येतं का?" जॉन म्हणाला. " एक गोष्ट अजून माझ्या लक्षात आली आहे..." जॉन म्हणाला. "कोणती?" फोटो न्याहाळत अँजेनीने विचारले. " की दोन्हीही खून हे अपार्टमेंटच्या दहाव्या मजल्यावरच झालेले आहेत..." जॉन म्हणाला. अँजेनीने फोटो बघता बघता जॉनकडे बघत म्हटले, " हो बरोबर ... हे तर माझ्या लक्षातच आले नव्हते" अँजेनी पुन्हा फोटो बघत होती. जॉन तिचे फोटो बघतानांचे हावभाव न्याहाळत होता. अचानक अँजेनीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे हावभाव उमटले. " जॉन हे बघ..." अँजेनी दोन फोटो जॉनच्या समोर धरीत म्हणाली. जॉनने ते दोन फोटो बघितले आणि त्याच्या तोंडातून निघाले, " माय गॉड..." जॉन उठून उभा राहिला होता. (क्रमशः ...)
No comments:
Post a Comment