Marathi Novel Ch-8: अजुन एक .. (शून्य- कादंबरी )
जॉनची गाडी एका भर रहदारीच्या रस्त्यावरून धावू लागली. नंतर बरीच वळणे घेऊन त्याची गाडी एका पॉश वस्तीतल्या एका अपार्टमेंटजवळ आली. जॉन तिथे यायच्या आधीच पोलीस तिथे येऊन पोहोचलेले होते. यावळेस पोलिसांच्या व्यतिरिक्त मिडीयाची पण लक्षणीय उपस्थिती होती. गर्दीमुळे रस्त्यावर सगळी रहदारी विस्कळीत झालेली होती. जॉनने गाडी पार्क केली आणि तो गाडीतून बाहेर येताच मिडीयावाल्यांनी त्याच्या भोवती गर्दी करणं सुरू केलं. जरी तो त्याच्या प्राईव्हेट गाडीतून आला होता आणि युनिफॉर्ममध्ये नव्हता तरीही मिडीयावाल्यांना तो या केसशी संबंधित असल्याची कशी कुणकुण लागली कुणास ठाऊक? "मि. जॉन वुई वुड लाईक टू हिअर यूअर कमेंट ऑन द केस प्लीज" कुणीतरी त्याच्यासमोर कॅमेरा आणि माईक्रोफोन घेऊन गेला. "प्लीज बाजूला व्हा.... मला आत जाऊ द्या ... मला आधी इन्व्हेस्टीगेशन पूर्ण करू द्या ... मगच मी माझे मत मांडू शकेन" जॉन गर्दीतून आपला रस्ता काढीत म्हणाला. तरी कुणीही बाजूला व्हायला आणि जॉनला रस्ता देण्यास तयार नव्हते. मोठया मुश्कीलीने जॉन त्या गर्दीतून रस्ता काढीत अपार्टमेंटच्या दिशेने निघाला. दुसरे काही पोलीस त्याला जाण्यासाठी रस्ता तयार करण्यास मदत करू लागले. जॉन लिफ्टने अपार्टमेंटच्या दहाव्या मजल्यावर पोहोचला. समोरच्याच फ्लॅटमध्ये पोलिसांची गर्दी होती. जॉन फ्लॅटमध्ये शिरताच सॅम समोर आला. "सर, इकडे" सॅमने जॉनला बेडरूमकडे नेले. बेडरूममध्ये बेडवर रक्तबंबाळ अवस्थेत एका स्त्रीचे मृत शरीर होते. आणि समोर भिंतीवर रक्ताने एक मोठा गोल काढला होता. यावेळी त्या गोलाच्या आत रक्ताने 0+6=6 आणि 0x6=0 असे लिहिलेले होते. जॉन समोर जाऊन भिंतीकडे निरखून पाहू लागला. " कोण आहे ही ?" जॉनने सॅमला विचारले. " हुयाना फिलीकिन्स ... टी व्ही आर्टीस्ट आहे" सॅम म्हणाला. " एकटीच राहत होती का?" जॉनने विचारले. " हो सर, ... शेजाऱ्यांचं तरी असंच म्हणणं आहे... त्यांच्या म्हणण्यानूसार अधून मधून कुणी येत असे तिच्याकडे ... पण प्रत्येक वेळी कुणी तरी वेगळाच असतो असं शेजारी सांगतात." सॅम त्याने काढलेल्या माहितीचा सारांश सांगत होता. " खुन्याने भिंतीवर 0+6=6 आणि 0x6=0 असं लिहिलं आहे ... यावरून कमीत कमी एवढं तर स्पष्ट होतं की हा गोल म्हणजे शून्यच असला पाहिजे... पण 0+6=6 आणि 0x6=0 म्हणजे काय? ... की तो आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे?" जॉन आपला तर्क लढवित होता. " अॅडीटीव्ह आयडेंटीटी प्रॉपर्टी आणि झीरो मल्टीप्लीकेशन प्रॉपर्टी ... गणितात शिकविलेलं आठवतं थोडं थोडं..." सॅम म्हणाला. " ते ठीक आहे... पण त्या खुन्याला म्हणायचं तरी काय?" जॉनने जणू स्वत:लाच प्रश्न विचारला. दोघंही विचार करू लागले. त्या प्रश्नाचं उत्तर दोघांजवळही नव्हतं. "बाकीच्या रूम्स तपासल्या का?" जॉनने विचारलं. " हो, तपास सुरू आहे" सॅम म्हणाला. फोटोग्राफर फोटो घेऊ लागला. फिंगर प्रिन्ट एक्सपर्ट काही हाताचे, बोटांचे ठसे मिळतात का ते शोधत होते. " मोटीव्ह बद्दल काही ?" जॉनने बेडरूमधून बाहेर येत सॅमला विचारले. " नाही सर ... पण एवढं नक्की आहे की तो पहिला खून ज्याने केला होता त्यानेच हाही खून केला असावा" सॅम आपला तर्क सांगत होता. " हो ... तुझं बरोबर आहे ... हा सिरियल किलरचाच मामला दिसतो." जॉन सॅमला दुजोरा देत म्हणाला. (क्रमशः ...)
No comments:
Post a Comment