मोठा गुन्हा करा, कमी शिक्षा भोगा!
मोठा गुन्हा करा, कमी शिक्षा भोगा!
लोकप्रिय दिवार चित्रपटातील एक शॉट माझ्या डोळयासमोर तरळतो. एक शाळकरी मुलगा, घरच्यांसाठी काही पाव घेऊन पळत असताना, इन्स्पेक्टर शशी कपूर त्याचा पाठलाग करून त्याला गोळी घालतो आणि तो मुलगा मरतो.
याच्याच जवळपास जाणारे दृश्य आपण अनेकदा प्रत्यक्ष जीवनात अनुभवतो. एखादा पाकीटमार हाती लागल्यावर आपण त्याला बरेच बदडतो. पोलिसही तेच करतात. पाकीट मारणे वगैरेही गुन्हाच आहे. त्यालाही शिक्षा व्हायलाच हवी, पण अनेकदा अशा गुन्हेगारांना कोणी जामीन देऊ शकत नाही म्हणून ते अनेक महिने तुरुंगात खितपत पडतात. थोडक्यात सांगायचे तर त्या विशिष्ट गुन्ह्याबद्दल होणाऱ्या शिक्षेपेक्षा ते अधिक काळ तुरुंगात काढतात.
गेल्या वषीर् तामिळनाडूचा एक आरोपी सुमारे सहा वषेर् पुण्याच्या तुरुंगात अडकला होता. त्याला तामिळ सोडून इतर भाषा येत नव्हती. त्याच्यासाठी जामीन कोणी नव्हता. त्याच्यावर खुनाचा आरोप होतो, पण तो सिद्ध झाला नव्ह्ता.
हे सगळे आठवायचे कारण म्हणजे, भोपाळ वायू गळतीमध्ये पंधरा हजाराहून अधिक बळी आणि सुमारे पाच लाख लोकांना आलेले अपंगत्व याची शिक्षा दोन वषेर् कैद. ही कैदेची शिक्षा ठोठावायला लागली साडेपंचवीस वषेर्. ही जी बडी धेंडे आहेत ती कधीच तुरुंगात जाणार नाहीत, कारण आता ती वरच्या कोर्टात जातील. तेथे अनेक वषेर् खटला चालेल. कदाचित पुढली साडेपंचवीस वषेर्ही हा मामला चालेल. अनेक बडे वकील गलेलठ्ठ फी घेऊन त्यांची बाजू लढवतील, जशी गेली पंचवीस वषेर् भारतातील नामवंत वकीलांची फौज या व्हीआयपींच्या बाजूने कायद्याचा कीस काढत होती.
जगात अशी दुर्घटना घडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे यातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आणि भावना यात सर्वस्व गमवलेल्यांची होती. पण जितका गुन्हा मोठा, तितकी शिक्षा कमी असा न्याय आहे की काय असा सर्वसामान्यांना वारंवार प्रश्न का पडतो याचे उत्तर भोपाळ दुर्घटनेत सुनावल्या गेलेल्या शिक्षेत आहे.
अशी अनेक प्रकरणे असतात की केवळ आरोपीचे नाव बडे आहे म्हणून तो बाहेर आहे असे वाटते. सलमान खानने चौघांना चिरडले, या घटनेला आता सहा वषेर् झाली. याचा निकाल कधी लागेल सांगता येत नाही. संजय दत्त १९९३ च्या मुंबईतील बॉम्ब स्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी. त्याला शिक्षा झाली, पण सध्या तो जामीनावर बाहेर आहे. आत कधी जाईल हे सांगता येत नाही अशी स्थिती.
यामुळेच मंत्रालयात म्हटले जाते की, पन्नास रुपयांची लाच घेताना पकडले गेलात की नोकरी जाते. पन्नास कोटींचा भ्रष्टाचार केलात की रुबाबात मसिर्डिझमधून फिरता.
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातच, अनेक राजकारणी, पोलिस अधिकारी, सनदी अधिकारी यांच्याबद्दल आरोप केले गेले. काही पोलिस अधिकाऱ्यांना तर लाच घेताना पकडण्यात आले. पण यापैकी कोणी तुरुंगात गेल्याचे दिसत नाही. अँटी करप्शन ब्युरो अशा अधिकाऱ्यांना धाड घालून पकडते. पण ते जामीनावर सुटतात, खटला कधी उभा राहतो हे कळत नाही. पण ते सुटल्याची बातमी येते.
फक्त छोटे मासे सापडतात, बडे मासे निसटून जातात हे चित्र आहे. आणि ते सामान्य माणसासमोर कायम असणे हे अधिक वाईट आहे. कारण यामुळे आपण गुन्हा करायचाच तर तो फार मोठा करावा असे अनेकांना वाटण्याची शक्यता असते. कारण मोठा हात मारला की उरलेले आयुष्य बंगल्यात जाते, छोटा गुन्हा केला की तुरुंगात जावे लागते अशी भावना अगदी तरुणपणीच होते. अनेकांकडे इतकी संपती कशी आली याचे उत्तर निराश तरुण लक्षात घेतो आणि आपणही तसेच करावे असे ठरवतो.
सरकारी नोकरीतही, सरळमार्गाने काम करण्याऐवजी, काम करण्याचे, न करण्याचे दाम वसुल करावे, ते इतके मिळवावे की नोकरी गेली तरी चिंता नसावी अशा भावनेने अधिकारी आणि कर्मचारी काम करतात.
याचा दूरगामी परिणाम सरकार, न्यायव्यवस्था, पोलिस यांच्यावरील विश्वास ढळण्यावर होतो हे कोणीच लक्षात घेत नाही ही अधिक चिंतेची बाब आहे.
No comments:
Post a Comment