Privacy Policy

Saturday, July 3, 2010

श्रीमाउलींनी सांगितलेले नामाचे महत्त्व -

श्रीमाउलींनी सांगितलेले नामाचे महत्त्व -

श्रीसद्गुरुज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग पाहू,

पदपदार्थसंपन्नता | व्यर्थ टवाळी कां सांगतां |
हरिनामीं नित्य अनुसरतां | हें सार सर्वार्थी || ||
हरिनाम सर्वपंथीं | पाहावें नलगे ये अर्थी |
जे अनुसरले ते कृतार्थी | भवपंथा मुकले || ||
कुळ तरले तयांचें | जीहीं स्मरण केलें नामाचें |
भय नाही त्या यमाचें | सर्व ग्रंथीं बोलियले || ||
नलगे धन नलगे मोल | लगती कष्ट बहूसाल |
कीर्तन करितां काळ वेळ | नाहीं नाहीं सर्वथा || ||
हरि सर्व काळ अविकळ | स्मरे तो योगिया धन्य केवळ ||
त्याचेनि दर्शनें सर्व काळ | सुफ़ळ संसार होतसे || ||
ज्ञानदेवीं जप केला | मन मुरडुनी हरि ध्याईला |
तेणे सर्वागीं निवाला | हरिच जाला निजांगे || ज्ञा.गा.८५. ||


अहं ब्रह्मास्मि , तत्वमसि आणि सर्वखल्विदं ब्रह्मा , ह्या महावाक्यांचा अर्थ, आपण आपल्याला पाहीजे तसा,पाहीजे तेव्हां लावतो, त्यावेळी आपण कायम शास्त्र काय सांगत ह्या कडे दुर्लक्ष करतो.ही एक आतून होणार्याबोधाची स्थिती आहे.शास्त्र अस सांगत की, आपण जो भगवंत आयुष्यभर बाहेर शोधतो, तो असतो खरा आपल्याच शरिरात. मग प्रश्न असा पडतो की, आपल्याच शरिरात त्याला शोधायचा कसा?

श्री माउली सर्व जनांस उद्देशून एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत-

प्रत्येक मनुष्य हा सुखासाठीच धडपडत असतो,मग त्याला हे सुख का सापडत नाही? तर त्याचे कारण प्रथम सांगून,ते सुख कसे कोणत्या मार्गाने प्राप्त करून घ्यावे? हे ते नंतर सांगतात.शेवटी आपला अनुभव ते सांगतात की,या मार्गाने मी स्वत: गेलो सुखरुप झालो.

या अभंगाचा अर्थ श्रीसद्गुरुकृपेने थोड्क्यात पाहू-

पदपदार्थसंपन्नता | व्यर्थ टवाळी कां सांगतां |

चार वेद,सहा शास्त्रे,यांच्या प्रत्येक पदापदाचा तर्कदृष्ट्या अभ्यास करून,पंडित बनलेल्यांची गोष्ट सांगताना, श्रीमाउली म्हणतात, त्यामूळे ते सुखरूप होता, गटांगळ्या खातात.आपल्या तुटपुंज्या पुंजीवर ते उड्या मारीत बसतात, पण सुखरुप अशा परमात्म्यास विसरतात,म्हणजे पर्यायाने श्रीपरमात्म्याची व्यर्थ टिंगल-टवाळी सांगत असतात.माउली श्रीज्ञानेश्वरीच्या १३.११ व्या अध्यायात म्हणतात, कर्मकांडापासून तर्कशास्त्रापर्यंत सर्वासर्वात प्रवीण,परंतू अध्यात्मज्ञानात मात्र जर जो जन्मांध असेल,आणि अध्यात्मशास्त्रावाचून इतर शास्त्रात, शास्त्रसिंध्दात निर्माण करण्यात तो ब्रह्मदेव जरी असला,तरी त्या त्याच्या सर्व ज्ञानाला आग लागो.

ते एकवांचूनि आघवां शास्त्रीं | सिध्दांत निर्माणधात्री |
परि जळो तें मूळनक्षत्री | पाहें गा || श्रीज्ञानेश्वरी.१३.११.८३५ ||

पुढच्या कडव्यात यावर उपाय सांगताना ते म्हणतात-

हरिनामीं नित्य अनुसरतां | हें सार सर्वार्थी || ||
हरिनाम सर्वपंथीं | पाहावें नलगे ये अर्थी |
जे अनुसरले ते कृतार्थी | भवपंथा मुकले || ||
कुळ तरले तयांचें | जीहीं स्मरण केलें नामाचें |
भय नाही त्या यमाचें | सर्व ग्रंथीं बोलियले || ||

हे वरिल श्रीमाउलींनी अनुभवांती सर्वांना सांगितलेले साधन,सुलभ-सोपे आहे.श्रीप्रभूचे प्रेमाने घेतलेले नाम हेच सारसर्वस्व आहे. कोणत्याही पंथात हे नाम घेऊ नका असे सांगितलेले नाही. उलट सर्व पंथानी आवर्जून सांगितले आहे की 'हेच श्रीवेदाच सार आहे '. त्या त्या पंथाच्यासंस्थापकांनी-सद्गुरुंनी सांगितल्यानुसार, ज्यांनी-ज्यांनी ते प्रेमाने घेतले, ते भवपंथामधून मुक्त झाले.इतकेच काय त्यांचे कूळही उध्दरून गेले, हे विशेष!

आता हे नाम घेण्यासाठी लागत काय? हे पुढे सांगतात-

नलगे धन नलगे मोल | लगती कष्ट बहूसाल |
कीर्तन करितां काळ वेळ | नाहीं नाहीं सर्वथा || ||
हरि सर्व काळ अविकळ | स्मरे तो योगिया धन्य केवळ ||
त्याचेनि दर्शनें सर्व काळ | सुफ़ळ संसार होतसे || ||

हे नाम घेताना धन द्यावे लागत नाही, मोल देवून ते कोणाकडून करवून घेता येत नाही.बरे कष्टतरी काय आहेत काय? किंवा वेळेच बंधन आहे,असेही नाही,ते केव्हांही घेता येते. मग हे अमृताहूनी गोड असलेल साध-सोप नाम, आपल्या मुखात का येत नाही? कारण आपल्याला खर्यासुखाची तळमळ नसते.

श्रीमाउली म्हणतात, हरिनाम हे सर्वकाळ-काळातीत असून, अविकल आहे. परंतू जो योगाच्या साधनेद्वारा,म्हणजेच दिव्य-सिध्द-नामाचा जप करतो, त्याच्या वासना जळून जातात, त्याचा संसारही सुफ़ळ होतो.

शेवटच्या कडव्यात श्रीमाउली मुद्दाम स्वत:ची अभ्यास करण्याची पध्दती मिळालेले फ़ळ सांगत आहेत-

ज्ञानदेवीं जप केला | मन मुरडुनी हरि ध्याईला |
तेणे सर्वागीं निवाला | हरिच जाला निजांगे || ज्ञा.गा.८५. ||

मन मुरडुनी हरि ध्याईला याचा अर्थकळण्यासाठी श्रीमाउलींचा एक अभंग पाहूया.

मन हें राम जालें, मन हें राम जालें |
प्रवृत्ति ग्रासुनि कैसें निवृत्तीसी आले || ||
श्रवण कीर्तन पादसेवन कैसें विष्णूस्मरण केलें |
अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केलें || ||
यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिलें |
ध्यानधारणा आसन मुद्रा कैंसे समाधीसी आलें || ||
बोधीं बोधलें बोधितां नये ऐसें जालें |
बापरखुमादेविवरु विठ्ठ्लें माझें मीपण हारपलें || .सं.वा..३०३. ||

असे हे नाम-महत्व सर्व साधूसंतांनी सर्व व्यक्ती करता सांगितले आहे.

आपल्या हरिपाठात श्रीमाउली म्हणतात, गगनाहूनि वाड नाम आहे.ज्याप्रमाणे गवसणी तंबोर्यापेक्षा मोठी असते,त्याप्रमाणे नाम हे आकाशाहूनी मोठे, आणि तितकेच सुक्ष्मही आहे.

 

 

 

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा-

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा | सांडी तूं अवगुणु रे भ्रमरा || ||
चरणकमळदळु रे भ्रमरा | भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा || ||
सुमनसुगंधु रे भ्रमरा | परिमळु विद्गदु रे भ्रमरा || ||
सौभाग्यसुंदरु रे भ्रमरा | बापरखुमादेविवरु रे भ्रमरा || ९२६. ||

No comments:

Post a Comment