Privacy Policy

Saturday, July 3, 2010

मोगरा फ़ुलला-

मोगरा फ़ुलला-

इवलेसें रोप लाविलें द्वारीं
त्याचा वेलु गेला गगनावरी
मोगरा फ़ुलला मोगरा फ़ुलला
फ़ुलें वेचितां अतिभारु कळियांसी आला
मनाचिये गुंतीं गुंफ़ियेला शेला
बापरुखमादेविवरु विठ्ठलीं अर्पिला

सद्गुरु श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्याचा आस्वाद घेत असता, अंत:करणाला भिडलेल्या,जिवाला भावलेल्या सुंदर, गोड , अवीट, अभंगापैकी हा एक! थोडक्या, मोजक्या शब्दांत, शब्दांच्या पलीकडले कवेत घेण्याचा आनंद म्हणजे अभंग !!

श्रीमाउली या मार्मिक अभंगाद्वारे सांगतात की,

"
माझ्या चित्त-वृत्तीचे इवलेसे रोप, इंद्रिय-द्वारामध्ये लावले आणि बघता बघता त्याच्या संकल्प-विकल्परुपी शाखा आकाशाला गवसणी घालू लागल्या!

श्रीसद्गुरुंनी मला कृपावंत होऊन युक्तीसहित-शक्ती दिली, त्यामुळे, बघा कसा त्याच वेलाला सद् भावनांचा,विवेकाचा बहर आला आहे. जस-जसे त्याचे स्मरण करावे, तसतसे ते अधिकच प्रफ़ुल्लित होते आहे.

मनाच्या मूळच्या गुंत्याचाच आता सुरेख गुंफ़ून, सद् वृत्तींचा शेला झाला आहे. हे श्रीगुरुराया, आपण ज्या परमेश्वरी शक्तीच्या स्वाधीन मला केलेत, तिला शरण जाऊन, तिलाच तो शेला समर्पित करतो आहे!"

No comments:

Post a Comment