|     विसंवादातून   सुसंवादाकडे     शुभांगी   आचार्य, पुणे         राष्ट्रीयीकृत बॅंकेत चांगली   नोकरी... इंजिनिअर नवऱ्याला एका नामांकित कंपनीत नोकरी... एक सुंदर, गोजिरवाणी मुलगी...स्वत-चा स्वतंत्र   संसार...बावीसेक वर्षांपूर्वी माझ्या आजूबाजूला १५-२०  जणींमध्ये माझ्यासारखी सुखी दुसरी कुणीच   नव्हती! शिवाय, आई-वडील व जिवाला जीव देणारी मोठी   बहीण-मेहुणे हेही मी ज्या शहरात राहते, त्याच शहरात.   त्यामुळे त्यांच्याकडेही आमचे लाडच...        नवऱ्याचे एक काका, मामाही आम्ही राहत असलेल्याच शहरात. तेही   अगत्यशील. माझीही स्वभाव मनमिळाऊ, प्रेमळ असल्याने आमचे सगळ्यांचे   एकमेकांकडे भरपूर येणे-जाणे असायचे. परगावी असणारे सासू-सासरेही अधूनमधून येऊन   थोडे दिवस राहून जात असल्याने व माझ्या संसारात हस्तक्षेप न करता उलट समंजसपणे   पाठिंबाच देत असत. असे सगळीकडे सौजन्यपूर्ण वातावरण होते ! विसंवाद हा शब्द   माझ्या शब्दकोशात नव्हताच मुळी.        ...पण मग गेल्या २२ वर्षांत असे काय   घडले की...? आताही आम्ही चौघेच घरात आहोत. मी, नवरा, मुलगी व   मुलगा.         सकाळी   साडेसातची वेळ.    अदिती (जवळपास तारसप्तकात) -   अजिंक्य, मला ऑफिसला उशीर होतोय. पटकन   बसस्टॉपपर्यंत सोड. ऊठ लवकर. कपडे बदल. ए आई, सांग ना   त्याला. तीनदा सांगून झालं माझं.        अजिंक्य - ए ताई, मी अजिबात येणार नाही. तुझे हे रोजचेच झालेय. एवढे   आहे तर मग रात्री ऋरलशलेज्ञ वर कशाला साडेबारा-एक वाजेपर्यंत जागत बसतेस ? आणि सकाळी उशिरा उठतेस ! आरशासमोरही किती वेळ   घालवत असतेस ! (तोंड वेंगाडून) मी जाडच झालीए...शी ऽऽबाई ऽऽ    एवढी जिम लावलेली आहे...तिकडे तरी   जातेस का तू ?        मी - जा रे, आजच्या दिवस   सोड. आत्ता तिला उशीर झालाय. रात्री मी तिला नीट समजावून सांगीन. उद्यापासून ती   लवकर आवरेल.         अजिंक्य - आई, तू काही सांगू नकोस. ती आणि तुझं ऐकणार आहे? आता मिळवायला लागलीय ना ! ती तुला जुमानते तरी का?      वाटलं तर बाबांना सांग तिला   सोडायला. मी सोडणा ऽऽ र ना ऽऽही.        बाबा - ए, शहाण्या. बाबांना सांग म्हणे! मी रात्री केवढा   दमून आलोय फॅक्टरीतून. माहितेय का ? बारा वाजून   गेले होते. तू नुसता लोध्या झाला आहेस टू-व्हीलर दिल्यापासून. नुसता टीव्ही   बघायचा. खायचं. प्यायचं. झोपायचं. अभ्यासाचं आणि व्यायामाचं नाव नाही. तुझ्या   वयाचा असताना मी १५-२० किलोमीटर सायकलिंग करीत असे. आमचे नव्हते होत असे लाड.   स्कूटर, मोबाईल, पिझ्झा, पेप्सी, कॅडबरी...असं   सगळं पाहिजे. काम नको यांना.         अजिंक्य - अहो बाबा, त्याचं आत्ता काय? हा ताईचा इश्यू   वेगळा आहे. तुम्हाला तिची चूक दिसतच नाही का? तुम्ही तिला   काहीच बोलत नाही...        मी - हे बाकी खरं आहे. ही   अदितीसुद्धा ना...सिनेमे, हॉटेलं, मित्र-मैत्रिणी   या सगळ्यांसाठी हिच्याकडे भरपूर वेळ आहे आणि साधं सकाळी वेळेवर आवरून हिला   ऑफिसला जायला जमत नाही. मला तर कामात काडीचीही मदत नाही. उलट, रोज सकाळी हिच्यासाठी नाचानाच करा. "आई मला   हे दे. ते दे. माझं हेच सापडत नाही. तेच सापडत नाही.' बरं, ते जाऊ दे...ही काही आता भांडायची वेळ   नाही, अजिंक्य. तू तिला लवकर सोडून ये बघू. की   मी जाऊ?    ...आणि तुम्ही ! तुम्ही लाडावून   ठेवा दोघांनाही आणि मग म्हणा की घरात काही कामं करत नाहीत म्हणून. मी एकटी कष्ट   करते...माझ्या कष्टांची जाणीव आहेच कुणाला?         अदिती - तुम्ही बसा भांडत ! मी   स्कूटर घेऊन जातेय. कॉर्नरला बेकरीपाशी गाडी लावतेय. दुसरी किल्ली आहेच !   (धाडकन् दार आपटून निघूनही जाते.)         मी - अगं अगं...सावकाश जा ! उगाच   तापलेल्या डोक्यानं...        अजिंक्य - ए, हे काय ? म्हणजे मी   कॉर्नरपर्यंत चालत जाऊन गाडी घ्यायची. मला नाही का क्लासला उशीर होत ? थांब आता रात्री येऊ दे बघतोच तिच्याकडे... (पाय   आपटत आत निघून जातो.)        * * *     या सगळ्याची साक्षीदार असलेली मी   मात्र सुन्न होऊन डोक्याला हात लावून बसते. रात्रीच्या "दुसऱ्या अध्याया'ला तोंड कसे द्यायचे, याची मनाशी तयारी करत...     अरे ! मुद्दा कुठला ? वेळ काय ? "प्रायॉरिटी' काय? कोण कुणावरचे कुठले "फ्रस्ट्रेशन' कुणावर काढत असतो, कुणालाच कळत   नाही. सगळेच तापलेले, ताणलेले, असमाधानी आणि   घाईत...हे असे का? घरात इन-मिन तीन-चार माणसं. पण एकही जण   दुसऱ्याशी सौजन्याने, प्रेमाने वागू शकत नाही! अपवादात्मक   प्रसंग सोडले तर प्रत्येक जण दुसऱ्याला जराही सहन करू शकत नाही? एकमेकांच्या छोट्या-छोट्या अपेक्षा पुऱ्या करणे   कोणालाच जमत नाही. त्यामुळे सगळेच जण असमाधानी आणि मग एकाचा एखाददुसरा नकारात्मक   शब्दसुद्धा दुसऱ्याच्या फारच जिव्हारी लागतो आणि मग त्यातून विसंवाद आणि   वितंडवादाची एक शृंखलाच बनून जाते आणि मग लक्षात येतं, की जे घर, त्यातली माणसं   ही प्रेमाच्या, जिव्हाळ्याच्या बंधनात बांधलेली असली   पाहिजेत, ती त्वेष, मत्सर, राग, अहंकाराच्या साखळीत जखडली गेली आहेत.   त्यातून कसे बरे सुटायचे? का बरे असे झाले?         मुलांच्या मित्र-मैत्रिणींच्या   पालकांशी व अनेक समवयस्क मैत्रिणींशी झालेल्या गप्पांमधून लक्षात येते, की बऱ्याच ठिकाणी थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती   आहे. असते. नात्यांचे संदर्भ व प्रसंग फक्त वेगवेगळे असतात. त्याची कारणेही   बऱ्याच अंशी सर्वांना माहीत आहेत. आई-वडील नोकरी-व्यवसायानिमित्त १२-१४ तास   बाहेर. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे मुले बऱ्याचदा "व्यावसायिक आई'जवळ (पाळणाघर किंवा सांभाळणाऱ्या बाई)   वाढतात. तीसुद्धा भरपूर खाऊचे आमिष, टीव्ही /   व्हिडिओ गेम, मागाल ती खेळणी यांवरच मोठी होतात.   त्यानंतर मित्र-मैत्रिणींच्या जास्त जवळ जातात. टीव्हीमुळे वाचन तर दूरच.   त्यामुळे मुले भावनिकरीत्या बरीचशी अपरिपक्व राहतात. आपली "आयडेंटिटी' प्रस्थापित   करण्यासाठी "आत्मविश्वास' समजून स्वत-चा अहंकारच जोपासत राहतात.   त्याचा परिणाम म्हणून आजची युवा पिढी विचारांनी नको एवढी स्वतंत्र झाली आहे.   अनेक मुलांमध्ये उर्मटपणा, बेदरकार वृत्ती व स्वत-बद्दलचा फाजील   आत्मविश्वास येऊ लागला आहे.         काही जण जात्याच हळुवार मनाचे   असतीलही; पण बाहेरच्या गतिमान व कठोर जगात ते   गोंधळून जातात. कारण, कुटुंबातील संवादाच्या अभावामुळे   चांगले-वाईट यांचे निश्चित स्वरूपच त्यांना समजत नाही.         मुलांचे हे "प्रॉब्लेम्स' आई-वडिलांच्या जेव्हा लक्षात येतात, तेव्हा एक तर फार उशीर झालेला असतो किंवा ते   स्वत-ला ताण-तणावांखाली इतके दडपलेले असतात किंवा त्यातून उद्भवलेल्या   विसंवादाच्या भोवऱ्यात इतके अडकलेले असतात की, मुलांच्या   प्रश्नांकडे संयमाने लक्ष देण्याची मानसिकता व वेळही त्यांच्याकडे नसतो. या   सर्वांमुळे आजची कुटुंबे ही "कॅक्टस' म्हणजे   निवडुंगाप्रमाणे झालेली आहेत. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व अगदी सरळसोट (आणि   काटेरीही) ! घरातल्या दुसऱ्या व्यक्तीच्या सुख-दु-खाशी काहीही घेणे-देणे व संबंध   नाही. सर्वचजण आत्मकेंद्रित. फक्त मूळ एक. पण प्रत्येकाच्या दुसऱ्याकडून अपेक्षा   मात्र अवास्तव असतात. मुलांच्या आईकडून, नवऱ्याच्या   बायकोकडून, बायकोच्या नवऱ्याकडून व आई-वडिलांच्या   मुलांकडून. आधी स्वत-बद्दलही अपेक्षा जास्त ठेवल्या जातात. प्रत्येक जण   महत्त्वाकांक्षी. करिअरिस्ट. पण या "प्रोसेस'मध्ये शरीराची व मनाची जी दमछाक होते, तिचा ताण व कधीकधी अपेक्षाभंगाचं दु-ख होतंच असतं.   हे सर्व पेलायला आपली "निवडुंग कुटुंबव्यवस्था' अपुरी पडत आहे. पण यावर उपाय काय? काही गोष्टी अवश्य पडताळून पाहता येतील...         वर उल्लेख   केलेल्या प्रसंगांमधून लक्षात येते की -    १) सध्याच्या गतिमान आयुष्यात   एकमेकांशी संवादाला वेळच दिला जात नाही. संवाद होतो तो अतिशय तणावपूर्ण   वातावरणात. अन्न, वस्त्र, निवारा या जशा   आपण मूलभूत गरजा मानतो, तशीच संवाद हीही मूलभूत गरज मानली पाहिजे.   संभाषण, संवाद हे मनुष्यप्राण्याला मिळालेले वरदान   होय. "सौहार्दपूर्ण' संवाद ही प्रत्येक कुटुंबाची मूलभूत गरज   बनायला हवी.    २) ज्या घरातील पुरुष   नोकरी-व्यवसायानिमित्त पूर्ण वेळ बाहेर असतात व घरात अजिबात लक्ष देऊ शकत नाहीत, त्यांनी आपल्या पत्नीवर येणारा ताण व त्यामुळे   होणारा विसंवाद यांचा गांभीर्याने विचार करावा. कामाचे काही तास कुटुंबासाठी   दिले तर होणारा व्यावसायिक तोटा व तोच वेळ पत्नी-मुलांबरोबर घालवून सर्वांचा   होणारा दीर्घकाळ फायदा याचा तुलनात्मक विचार करावा.     ३) जेथे विभक्त कुटुंबपद्धती आहे, तेथे शक्यतो एकमेकांकडून कमीत कमी अपेक्षा   ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर दुसऱ्याला आपल्याकडून काय अपेक्षा आहेत व   त्या आपण पुऱ्या करतो का, हे तपासून पाहावे. थोडक्यात   आत्मकेंद्रीपणा टाळावा.    ४) शक्य असेल तर पूर्वीची एकत्र   कुटुंबपद्धती काही फेरफारांसह वापरावी. म्हणजे आठवड्याती पाच दिवस पूर्ण   शिस्तबद्ध व नियमांनुसार कामाचे वाटप व दिनचर्या असावी. सर्वांनी एकत्रित चर्चा   करून शक्यतो ज्येष्ठ व्यक्तींच्या अनुभवी सल्ल्यानुसार नियम ठरवून घ्यावेत.   उदाहरणार्थ - जेवणाच्या वेळा, घरातील इतर कामांचे व, बाहेरची कामे इत्यादी. नंतर दोन दिवस सर्वच   व्यक्तींना स्वतंत्रपणे आपापले "रुटीन' ठरविण्याची   सवलत देण्यात यावी. उदाहरणार्थ - बाहेर जेवायला जाणे, सहलीला जाणे, शॉपिंग वगैरे    मी घरी केलेला एक वेगळा प्रयोग   आवर्जून सांगावासा वाटतो.         दोन महिन्यांपूर्वी मी मांजराची दोन   पिल्ले पाळायला आणली. अर्थात आमच्याकडे निदान कोणाला त्यांचा तिटकारा नव्हता.   गेले दोन महिने प्रत्येक जण बाहेरून आल्या आल्या त्या पिल्लांशी अतिशय प्रेमाने   बोलतो. त्याला गोंजारतो. अशा प्रकारे पाच मिनिटे प्रत्येक जण "रिलॅक्स' होतो व मग आमच्यात जो संवाद होतो, तो निश्चितच पूर्वीपेक्षा चांगला होतो !                        |   
 
No comments:
Post a Comment