इअरफोन घेतोय रेल्वे प्रवाशांचे बळी
कानात इअरफोन घालून मोबाइलवर गाणी ऐकत प्रवास करण्याची तरुणांची सवय अतिशय घातक सिद्घ होत आहे. दिवा ते डोंबिवली दरम्यान लोकलची धडक बसून ठार होणाऱ्या तरुणांच्या मृत्यूमागे अनेकांची ही सवय कारणीभूत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. कोपरसह दिवा व डोंबिवली या ३ रेल्वे स्टेशनांदरम्यान ८ महिन्यातच १०० जणांचे बळी गेल्याची धक्कादायक आकडेवारी उघड झाली आहे. फूट ओव्हर ब्रीजचा अभाव, लोकलच्या वेगाचा अंदाज न आल्याने बसलेली धडक, लोकलमध्ये लटकताना बाहेर पडून अपघाती मृत्यू अशा प्रमुख कारणांमुळे हे बळी गेले आहेत. मात्र या कारणांसह आणखी एक धक्कादायक कारण अपघातांमागे उघड झाले. तरुण मुलांना मोबाइलवर गाणी ऐकत रेल्वेरुळ ओलांडण्याची सवय असते. मात्र त्यामुळे वेगाने आपल्या दिशेने येणाऱ्या लोकलचा धडधडाटच त्यांना ऐकू येत नाही व त्यांचा हकनाक बळी जात असल्याचे निरीक्षण एका स्टेशन मॅनेजरने नोंदवले. कोपर रेल्वे स्टेशनात पूवेर्कडे फूट ओव्हर ब्रीज नसल्याने रुळ ओलांडताना लोकलच्या धडकेने श्रध्दा गोडबोले या तरुणीचा अलिकडेच मृत्यू झाला. या वर्षात आत्तापर्यंत १३ प्रवाशांचा रुळ ओलांडताना बळी गेल्याने कोपर स्टेशन मृत्यूचा सापळा ठरले आहे. सुरक्षा अधिभार जातो कोठे? रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून सुरक्षा अधिभार वसूल केला जातो. परंतु अपघातातील मृतांची आकडेवारी कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. त्यामुळे सुरक्षा अधिभाराचा नेमका कशासाठी विनियोग होतो, याबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. उपनगरी रेल्वेचा प्रवास सुरक्षित होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.
No comments:
Post a Comment