अखंड सावध असावे!
शिवराम गोपाळ वैद्य
Wednesday, November 24, 2010 AT 12:28 PM (IST)
Tags: muktpeeth
![](cid:image001.jpg@01CB8CB0.F7020AB0)
सध्या बहुतेक लोक क्रेडिट कार्ड वापरत असतात. या कार्डमुळे आपल्याला खरेदीसाठी खूप मोठी सोय झालेली आहे. तथापि, छोटीशी चूक झाल्यामुळे त्याचा कितीतरी मोठा भुर्दंड बसल्याची अनेक उदाहरणे आहेत. मी अलीकडेच एका अशाच घटनेमधून गेलो आणि थोडक्यात वाचलो असल्याने माझा हा अनुभव मी सर्वांना सांगत आहे...
ता. 27-10-2010 रोजी मला माझ्या मोबाईलवर नवी दिल्ली येथील +911143306241 या क्रमांकावरून एक फोन आला. त्या व्यक्तीने आपण स्टेट बॅंकेतून बोलत असून, माझ्या नावाची निवड बॅंकेने केली असून, मला त्यांच्यातर्फे एका कंपनीचे 4500 रुपये किमतीचे एक रिस्ट वॉच पूर्णपणे फ्री आणि देशातील 122 शहरांपैकी कोणत्याही एक शहरात तीन दिवस आणि दोन रात्री फ्री टुरसाठी निवड झाल्याचेही सांगितले. तसेच यासाठी मला चार दिवसांच्या आत पोस्टामार्फत एक पत्रसुद्धा येईल असे सांगितले. पुढे त्याने असेही सांगितले, की यासाठी मला त्यांना 6067 रुपये द्यावे लागतील. आणि तेसुद्धा लगेच नाही, तर मला बॅंकेचे पत्र आल्यानंतर दोन-तीन महिन्यांनंतर दिले तरी चालतील. यासाठी बाकी कोणत्याही अटी नसल्याचेही मला सांगण्यात आले.
त्याने माझ्या क्रेडिट कार्डचा अर्धा क्रमांक सांगितला आणि उरलेला अर्धा क्रमांक माझ्याकडून वदवून घेतला. मी त्याला सतत सांगत होतो, की हे पैसे मी त्याला लगेच देईन असे मान्य केलेले नाही. जोपर्यंत मला बॅंकेचे पत्र येत नाही तोपर्यंत मी पैसे देणार नाही, असेही मी सांगितले. यावर त्याने पुन्हा एकदा स्पष्ट केले, की आता कसल्याही प्रकारचे पैसे घेतले जाणार नाहीत आणि पत्र आल्यानंतरच माझ्या क्रेडिट कार्डमधून बॅंकच पैसे वळते करून घेईल. त्यावर मी आंधळेपणाने विश्वास ठेवला आणि तेथेच माझी मोठी चूक झाली. त्याने मला मी क्रेडिट कार्डच्या वरील क्रमांक सांगितल्यानंतर मला मोबाईलवरून कार्डच्या मागील तीन आकडी क्रमांकाची बटणे दाबायला सांगितली. ती चूक मी केली आणि तत्क्षणी तो फोन बंद झाला. दुसऱ्याच मिनिटाला मला दोन मेसेजेस आले. एक "एलएमसेल'कडून आणि दुसरा स्टेट बॅंकेकडून. तो असा, की माझ्याकडून त्यांना 6067 रुपयांचे पेमेंट मिळालेले आहे. आणि ते माझ्या कार्डमधून वसूल झालेले आहे.
मी चमकून पुन्हा त्याच क्रमांकावर याचा जाब विचारण्यासाठी फोन करण्याचा अनेकदा प्रयत्न केला असता, हा क्रमांक अस्तित्वातच नाही, अशा अर्थाची घोषणा प्रत्येक वेळेस ऐकू आली. मी मनात म्हटले, की 6067 रुपयांना चुना लागला आपल्याला या दिवाळीनिमित्त. परंतु, मी डोके चालवून दुसऱ्याच दिवळी सकाळीच स्टेट बॅंकेच्या 1800 180 1290 या हेल्पलाईनवर फोन करून तक्रार नोंदवली. तेव्हा असे आढळून आले, की अशी कोणतीही योजना बॅंकेतर्फे जाहीर झालेली नाही आणि मला बॅंकेतर्फे असा कोणताही फोन करण्यात आलेला नाही. मात्र, बॅंकेच्या अधिकाऱ्याने मला योग्य मार्गदर्शन केले. याशिवाय त्याने 6067 रुपयांचे पेमेंट ब्लॉक करून टाकले. तसेच मी सध्याचे कार्ड कॅन्सल करून नवीन कार्ड घ्यावे आणि असा फोन पुन्हा अटेंड करूच नये असा सल्ला दिला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मी माझ्या स्टेट बॅंकेतील खात्यात असलेली शिल्लक लगेच काढून घ्यावी किंवा ते खातेच बंद करून नवीन खाते सुरू करावे, असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी दिला.
त्याप्रमाणे मी लगेच बॅंकेतील माझी शिल्लक काढून घेतली आणि या घामाच्या लक्ष्मीला वाचवण्यात यशस्वी झालो. माझ्या या अनुभवावरून क्रेडिट कार्डधारकांनी योग्य ती खबरदारी घेतली, तर या लेखनाचा उपयोग झाल्याचे समाधान मला मिळेल. याबाबतीत एक नम्रपणे म्हणावेसे वाटते, की स्टेट बॅंकेच्या त्या अधिकाऱ्याने मला व्यवस्थित मार्गदर्शन केले हे त्यांचे माझ्यावरील उपकारच आहेत. स्टेट बॅंकेचा मी अत्यंत आभारी आहे.
No comments:
Post a Comment