Privacy Policy

Sunday, November 7, 2010

पायाखालची वाळू…

पायाखालची वाळू…

तुमचं वय साधारण २५ ते ३५ कितीही असेल. कधी रस्त्यावरून तुम्ही बाइक वर  एखाद्या सिग्नलला उभे आहात , एक सुंदर -हो, कारण मुलगी नेहेमीच सुंदर असते हो. जगातली प्रत्येक मुलगी ही किमान एकदा तरी वळून पहाण्यासारखी असतेच, मुलींकडे न पहाणं म्हणजे त्यांचा अपमान करणं!! बिइंग अ जंटलमन , तुम्ही त्यांचा अपमान करायला नको- किमान या  ( २५-३० ) वयात तरी!!

चेहेरा पुर्णपणे ओढणीने झाकलेला, अंगावर तो टिपिकल पांढरा पुर्ण बाह्यांचा ड्रायव्हिंग गीअर – ग्लोव्हज सुध्दा- अशा वेशात बाजूला येऊन उभी रहाते. तुम्ही आपली बाईक आयडल करीत इकडे तिकडे पहात टवाळक्या करताय, तेवढ्यात सिग्नल पिवळा होतो, आणि ती मुलगी सुसाट वेगाने टेक ऑफ घेउना तुमच्या पुढे भुर्रकन निघून जाते. तुम्ही पहिला, दुसरा, तिसरा गिअर करीत हळू हळू पुढे जाता – त्या मुलीला गाठून ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत, पण तेवढ्यात दुसराच एक मुलगा एकदम सुसाट वेगाने तिला ओव्हरटेक करून पुढे निघून जातो- आणि तुम्ही .बसता आपले हात चोळत………..!

असं झाले की विचार काय येतो मनात? च्यायला, वय झालं आपलं, अरे काय पळवते ती मुलगी गाडी.आपल्याला पण पुढे जाऊ देत नाही. थकलो आपण आता!!

असंही वाटतं की  चार पाच  वर्षापुर्वी हे शक्य नव्हतं कोणालाच. सिग्नलला  बाईक सगळ्यात पहिले पुढे जाणार ती आपली. झालं.. च्यामारी , वय झालं आपलं, म्हातारा व्हायला लागलो आपण. होतं की नाही असं??  ्तीशीमधे असतांना माझं तर व्हायचं बॉ असं !!

हल्ली तसं काही होत नाही – कारण खरंच मध्यम वयात पोहोचलोय.सिग्नलला कार उभी असली, आणि शेजारून कोणी एखादा मुलगा किंवा मुलगी अशी फास्ट निघून पुढे गेली तर काळजी वाटते- अरे पडली तर?  वयाचा परिणाम  असेल कदाचित!

असो, तर काय सांगत होतो, की वय झालंय, किंवा आपण म्हातारं झालोय/होतोय ही भावना येणं जरी साहजिक असलं तरी वाढणारं वय काही थांबवता येत नाही. पहिला पांढरा केस दिसला होता तो दिवस अजूनही आठवतो..सकाळी ऑफिसला  जाण्याची तयारी करत होतो . भांग काढतांना एकदम   पांढरा केस दिसला – अरे?? हे काय झालं? असं होणं शक्यच नाही.. कदाचित प्रकाश असेल परावर्तीत झालेला- असं म्हणून तो केस निरखून पाहिला आणि लक्षात आलं की  तो खरंच पांढरा आहे.. मग कात्री उचलून कापायचा की मुळापासून उपटायचा ? हा गहन प्रश्न समोर आल्याने मी बराच वेळ तो केस हातात धरून विचार करीत राहिलो. थोड्या वेळाने सरळ त्याला उपटायचा प्रयत्न  केला, तर तो खूप  लहान असल्यामूळे  हातातून निसटून जायचा.तेवढ्यात लक्ष गेलं आणि लक्षात आलं की तो एकटाच नव्हता, बरेच त्याचे साथीदार पण होते आजूबाजूला.

तेंव्हा वय होतं २६ !हे काय वय आहे का केस पांढरे व्हायचं.  च्यायला लग्न पण व्हायचंय आणि पांढरे केस?कुठली मुलगी लग्न करणार  आपल्याशी? माझ्या मेंदू मधे टिव्ही वरच्या सगळ्या जाहिरातीतल्या मुली  फेर धरून भोवती नाचू लागल्या- आमचा हेअर डाय लाव म्हणुन- सगळ्या जाहिराती आठवल्या . दोन ऑ्प्शन्स होते, एक काळी मेहंदी ( म्हणजे पण डाय असतो हे नंतर समजले) आणि खरोखरचा डाय..  शेवटी गोदरेज काली मेहेंदी ( तेंव्हा लिक्विड हेअर डाय नव्हतं)  आणली केस काळे करायला. अगदी जय्यत तयारी केली होती. जुना टुथ ब्रश, जुनी बशी वगैरे..  एकदाचं केस काळे केले टुथ ब्रश ने.

केस काळे करतांना सवय नसल्याने इकडे तिकडे बराच रंग लागला होता. जेंव्हा केस धुतले तेंव्हा   केसांचा रंग इतका काळाकुळकुळीत होता की तो मिशा आणि भुवयांच्या ब्राउन रंगाशी एकदम विसंगत दिसत होता. बरं कानाला लागलेला डाय पण थोडा काळे डाग मागे ठेवून गेला होता. गालावर पण थोडा काळसर डाग दिसतच होता. आता काय करायचं?  बराच प्रयत्न केला काढायचा,  पण काही निघाला नाही.शेवटी तसाच गेलो ऑफिसमधे.

ऑफिस मधे गेल्यावर सगळे जण  ते काळे डाग पाहून अरे डाय केलास? म्हणून विचारत होते. या पेक्षा ते पांढरे केस परवडले असते, असं झालं होतं मला. एका मित्राने   – ज्याला डाय करण्याचा पुर्ण अनुभव होता सांगितले की डेटॉल घेउन ये , आणि त्यानी पूस, म्हणजे ते काळे डाग जातील. ताबडतोब डेटॉल आ्णून ते काळे  डाग पुसले वॉश रुम मधे जाऊन. पुढल्या वेळेस कसं करायचं ह्याचा विचार करत बसलो जागेवर जाऊन.  छेः , काहीही आठवतंय आज, इतक्या जुन्या गोष्टी , पण अगदी कालच झाल्यासारख्या झाल्या असं वाटताहेत..

पांढरे केस हा एक मोठा सेन्सिटीव्ह इशु आहे. पांढरे केस म्हणजे एजिंगचं लक्षणं. आपण म्हातारे झालो याची जाणिव. आधी सुरुवातीला कानाखाली एखादा पांढरा दिसणारा केस जेंव्हा नंतर   बऱ्याच  पांढऱ्या केसांसोबत    दिसतो तेंव्हा आता काहीतरी केलं पाहिजे, आणि हे लपवले पाहिजे असे वाटायला लागते.काही लोकं इतके सेन्सिटीव्ह असतात की अगदी सत्तर वय झालं तरी पण केस आणि मिशा डाय करतात. केस आणि मिशा वगैरे डाय करणे ठिक आहे, चांगलं   दिसतं, पण जेंव्हा केस वाढतात तेंव्हा मुळाकडचे  नवीन वाढणारे पांढरे केस दिसले की तो एक   केविलवाणा वय लपवायचा प्रयत्न वाटतो मला  . हे जर टाळायचं असेल तर  पिरिऑडीकली केस टच अप करावे लागतात.  मला स्वतःला ग्रेसफुली एजिंग झालेलं आवडतं- वय वाढतंय,   केस पांढरे होताहेत.. तर ठीक आहे. काय हरकत आहे? एक नॅचरल प्रोसेस आहे ती. आणि हो.. ते  केस काळे करून कोणा पासुन वय लपवायचं??

केस इतका सेन्सिटीव्ह विषय आहे ,ज्याचे जातात त्यालाच मी काय म्हणतोय ते समजेल. लग्नापूर्वी बायकोचे केस कंबरेच्या खालपर्यंत लांब होते. काही दिवसांनी रोज केसांचा पुंजका दाखवायची केस विंचरल्यावर- मेले कित्ती केस जातात   म्हणुन .   केस गळायला लागले की मग डॊक्याची प्रयोगशाळा केली जाते. निरनिराळॆ शॅम्पु, तेलं, ( जबाकुसुम ते डाबर वाटीका, खोबरेल तेल शुध्द नारियलका , बदामाचं तेल, वगैरे) आणि व्हिटॅमिन ई च्या गोळ्या वगैरे घेणं सुरु होतं. कधी तरी कोणीतरी सांगतं की शाम्पु मधे खूप के्मिकल्स असतात, मग शिकेकाई, नागरमोथा, रिठा वगैरे आणुन आणि आधी उन्हात वाळवून मग बारीक कुटणे हा प्रकार पण केला जातो. अर्थात त्याने पण काही फायदा होतो असे नाही.  पण एक मानसिक समाधान मात्र मिळते. हे शिकेकाईचे प्रकरण फक्त स्त्रियाच करतात बरं कां.. एक अनूप तेल की कुठलं तरी एक तेल आहे, ते लावलं की म्हणे टकलावर पण केस येतात .( नका हो जाउ विकत घ्यायला, उ्गाच पैसे वाया जातील :) )

स्त्रियांचं तर समजू शकतो, पण पुरुष? ते पण काही कमी सेन्सिटीव्ह नसतात केसांच्या बाबतीत. आमच्या  ऑफिसमधे एक अकाउंटंट होते, त्यांचे टकलावरचे मध्य भागातले सगळे केस गेले होते , म्हणजे फक्त झाल्लरच शिल्लक होती.  ते काय करायचे, आपले डावीकडचे केस जवळपास १०-११ इंच लांब करुन , टकलावरून फिरवून उजवी कडे न्यायचे आणि टक्कल झाकायचे. पण कधी तरी थोडी हवा वगैरे आली की ते केस सरकायचे आणि टक्कल दिसायचं. मग काय, दिवसभर केसच सांभाळत रहायचे हे. कित्ती मोठं काम ना? डाविकडले केस टकलावरून उजवीकडे नेऊन नीट टक्कल झाकलं राहील याची काळजी घेण? माझं आपलं  साधं सोपं काम आहे, केस गळतात- ठिक आहे, एकदम बारीक कटींग करून येतो. त्या न्हाव्याला लालू कट मार म्हणून सांगतो.

लग्न झाल्यावर मुलं पण होतातच. मुलं झाल्यावर पण  ते कसे पटापट मोठे होता आणि कधी खांद्यापर्यंत पोहोचतात हे लक्षातच येत नाही. पण जेंव्हा मुलीला आईची साडी घालून पाहिलं किंवा  मुलाला आपला रेझर वापरताना पाहिल, जेंव्हा मुलींची उंची  झालेली दिसते तेंव्हा किंवा मुलगा तुमच्या पेक्षा पण उंच दिसतो -की मग थोडी   जाणीव होते  आपण मोठे ( म्हातारे नाही) झाल्याची  .    मुलं मोठी होत आहेत – म्हणजे आपण म्हातारे होतोय  . आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

म्हातारे होणं किंवा एजिंग होणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. त्यामधे लाज वाटून घेण्यासारखे काय आहे? हे कळत असतं, पण बरेचदा वळत नाही… समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहिल्यावर कशी पायाखालची वाळू वाहून  जाते, आणि आपण काहीच करू शकत नाही- तसच असतं वयाचं पण..

फार मोठा झालाय लेख… अ्सो…

No comments:

Post a Comment