सिंहाचं पिल्लू बघायला जंगलातले सगळे प्राणी जमले होते. सगळ्यांच्याच डोळ्यांत खूप खूप कौतुक होतं...सिंह आणि सिंहीण तर छोट्या सिंहाच्या आगमनानं हरखून गेले होते...एकमेकांच्या डोळ्यांत खोल बघत होते; जणू त्यांना त्या पिल्लामध्ये स्वतःचं बालपण दिसत होतं...सिंह आणि सिंहीण जंगलातल्या सगळ्या प्राण्यांशी, पक्ष्यांशी इतके मायेनं वागत की, त्यांच्या आनंदात सगळं जंगल आनंदून गेलं होतं...गुहेतल्या जुन्या-जाणत्या सिंहांनी पिल्लाला आशीर्वाद दिले आणि जंगलातल्या सर्वांच्या साक्षीनं काही ज्येष्ठ हत्ती, जिराफ यांच्याशी चर्चा करून पिल्लाचं नाव "अमर' ठेवलं....सगळ्यांनी जल्लोष केला. माकडांनी झाडाच्या फांद्या हलवून फुला-पानांचा सडा पाडला...सगळ्या पक्ष्यांनी किलबिलाट करून "अमर'चं स्वागत केलं आणि आशीर्वादही दिले.
"अमर' हळूहळू मोठा होऊ लागला...सगळ्यांनी मिळून त्याला प्रत्येक गोष्टीत तरबेज करायचं, असं ठरवूनच टाकलं होतं...चित्त्यांनी त्याला सुसाट धावण्यात तरबेज केलं...उंटांनी त्याला जंगलाबाहेरील वाळवंटाच्या गोष्टी सांगितल्या...हत्तीनं जुने अनुभव सांगून शहाणं केलं आणि बगळ्यांनी चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. सिंह आणि सिंहीण यांनी तर प्रत्येक छोट्या गोष्टीकडं बारीक लक्ष देऊन "अमर'ला शहाणं केलं आणि साऱ्या जंगलाचं बाळ असणारा अमर आता सगळ्यांचा "अभिमान' झाला...
शक्तिवान, गुणवान झालेला तरणाबांड सिंह "अमर' एकदा फिरत फिरत दूरच्या दुसऱ्या एका जंगलात येऊन पोचला...सुंदर फुलं, स्वच्छ निळंशार पाणी, शांतता यामुळं "अमर' वेडा होऊन त्या जंगलात फिरत राहिला...तिथले प्राणी, पक्षी यांनीसुद्धा गुणी, हुशार, बलवान असलेल्या "अमर'चं मनापासून स्वागत केलं आणि घरच्या जंगलासारखाच तो या नव्या जंगलातही लोकप्रिय होऊ लागला...
"अमर' या नव्या जंगलात रुळला खरा; पण त्याला त्याच्या आई-बाबांची खूप आठवण यायला लागली आणि इकडे आई-बाबासुद्धा त्याच्या परत येण्याची वाट पाहू लागले...आई तर "अमर'च्या आठवणीत वेडीपिशी झाली; पण बाबाने तिला समजावलं..."" "अमर'ला आठवण येत असेलच गं आपली; पण आपला अमर आहेच असा की, तो जाईल तिथे इतका आवडेल सगळ्यांना की, त्या जंगलात त्याला आग्रहानं ठेवून घेतलं असेल सगळ्यांनी...'' आणि "अमर'सुद्धा जुन्या जंगलातल्या सोबत्यांच्या आणि आई-वडिलांच्या आठवणीनं खूप खूप रडायचा; पण त्याला नवीन जंगलाचा आग्रहही मोडवत नव्हता.
एक दिवस जुन्या जंगलात आलेल्या हरणांच्या कळपानं बातमी आणली की, "अमर'ला एक सिंहीण भेटलीए आणि त्यांना एक गोड गोड पिल्लू झालंय...या बातमीनं "अमर'च्या आईचा बांध फुटला आणि...आणि...आणि...
""पुढे सांग ना आज्जी,'' ओम म्हणाला..""हॅलो...हॅलो आज्जी गं...सांग ना गं..तुला दिसतोय का मी? आज्जी तो माईक जवळ घे आणि कॉम्प्युटरच्या कॅमेऱ्यासमोर ये...त्याच्याशिवाय कशी दिसशील तू मला? मी इतक्या सकाळी उठलोय ना रविवार असून ते फक्त तुझी गोष्ट ऐकायला. नाही तर अमेरिकेत कोणीही रविवारी लवकर उठत नाही...सांग ना! आज्जी! पुण्यात थंडी आहे का हो आजोबा? आजोबा, सांगा ना...''
""तुला किती वेळा सांगितलंय मी आई-बाबांची आणि पिल्लाची गोष्ट नको सांगूस..पण नाही! दर वेळेला प्राणी बदलतो...कधी मांजर, कधी चिमणी, कधी सिंह; पण गोष्ट तीच सांगतेस तू सुषमा'' अरुणरावांचा पारा चढला होता. चिडण्यापेक्षाही त्यांना सुषमाला होणाऱ्या त्रासाची काळजी वाटत होती. ""नातू गोष्ट सांग म्हणतो आणि पुण्यातून तू चॅटिंग करताना दर वेळी रडतेस कशासाठी? आपल्या मुलाचं आपल्यावर खूप प्रेम आहे, हे तुलाही माहितीए, मग त्याच्या लांब असण्याचा किती त्रास करून घेणार आहेस तू...? आणि दरवर्षी भेटतो की आपण...!''
""मी दर वेळेला तीच गोष्ट सांगते ना? मग दर वेळेला दारामागे उभे राहून तीच गोष्ट दर आठवड्याला कशाला ऐकता? आणि मी मागे वळले की निघून जाता! वर म्हणताय, मी रडते...मग शेजारच्यांच्या नातवाला रोज फिरायला का घेऊन जाता...? एक दिवस तो गावाला गेला तर चार वेळा विचारून आलात, "कधी येणार आमचा छोटा मित्र?' सांगा? आता का गप्प? तरी आपली मी गोष्टीतला चिमणा असो वा सिंह...समजूतदार असतो म्हणून सांगते...''
""हॅलो, हॅलो, आजी-आजोबा, तुम्ही काय बोलताय? इतकं पटापटा मराठी नाही समजत मला,'' ओम म्हणाला.
""अरे, आजोबा मला पुढची गोष्ट सांगत होते.''
""बरं झालं, सांगितली त्यांनी पुढची गोष्ट. आता पूर्ण सांगशील तरी मला तू...दर वेळेला त्या "अमर'ला पिल्लू झालं की तू गोष्ट बंदच करतेस...म्हणतेस, आजोबांना जेवायचंय आता...आणि पुढच्या रविवारी परत पहिल्यापासून सांगतेस...सांग ना आज्जी! पुढं काय होतं?''
""पुढची गोष्ट मी सांगतो,'' टेनिस खेळून आलेला "अमर' म्हणाला, ""बाबा, तुला माहितीए पुढची गोष्ट?''
""ओम येस...! मला माहितीए...''
""नव जंगल त्या "अमर'ला पकडून ठेवतं..."अमर'ला येते जुन्या जंगलाची आठवण! आई-बाबांची आठवण! पण नवीन जंगलातले मित्र त्याला "थांब रे, थांब रे' म्हणतात आणि तो थांबतो...पण एक दिवस "अमर'चं पिल्लू म्हणतं की, मला आजी-आजोबांना रोज...सारखंसारखं भेटायचंय...त्यांच्या अंगा-खांद्यावर खेळायचंय...मांडीवर बसून रोज गोष्टी ऐकायच्यात...त्यांच्याबरोबर फिरायला जायचंय...''
मग "अमर' आणि त्याची सिंहीण म्हणते की, आता मात्र आपल्याला जुन्या जंगलात जायलाच हवं...आपल्या पिल्लाला आपले जुने सोबती, जुने डोंगर, नद्या दाखवायलाच हव्यात...''
आणि मग ते जुन्या जंगलात परत जायचं ठरवतात...अगदी लगेच...
सुषमाताई आणि अरुणरावांना समोरचा कॉम्प्युटर पुसट दिसायला लागला...ते काही बोलणार इतक्यात, त्यांना पलीकडे संवाद ऐकू आला, 'ए बाबा! किती मस्त, त्या पिल्लाला आजी-आजोबा भेटणार आता. ए बाबा, आजी नेहमी अर्धवटच गोष्ट सांगते...त्या सिंहाच्या-अमरच्या-पिल्लाचं नाव काय असतं रे? '
""बाळा, ओम...ओम असतं अमरच्या पिल्लाचं नाव...! ओम!
No comments:
Post a Comment