Privacy Policy

Thursday, March 17, 2011

मौनातली अनुभूती विलक्षण


 

साधकाचा प्रसन्न चेहरा पाहून स्वामींना आनंद झाला.

स्वामी आसनस्थ झाले आणि आता साधक काही बोलणार तर, स्वामिंनी त्याला खुणेनेच गप्प राहायला सांगितलं.

आता साधक तर बोलायला अत्यंत आतूर पण त्याचवेळी न बोलण्याची सक्ती. साधक आतल्या आत घुसमटू लागला.

"स्वामींशी काय बोलायचे आहे, त्यांना आपल्या साधनेतला कोणता विलक्षण अनुभव सांगायचा आहे, असे अनुभव वारंवार यावेत म्हणून काय करावे? हे ही त्यांना विचारायचे आहे, मलाच असे अनुभव येतात की इतरांना पण?".. .. हे सारे स्वामींना कसे विचारावे याची साधकाने मनात हज्जार वेळा रंगीत तालिम केली होती. पण आता काहीच बोलायचे नसल्याने सारेच आत राहिले. सारेच आता व्यर्थ.

साधकाची तगमग वाढली. जितके विचार आत दाबावेत तितके ते अधिक जोरात वर उसळून येऊ लागले. आतून शांत राहण्याचा प्रयत्न केला तर ते दबलेले विचार मन जाळू लागले. आता तर बाहेरचं काही त्याला ऐकूच येईना. बाहेर निरव शांतता आणि आत विचारांचा कल्लोळ..नुसता गलबलाच!

साधक घाबरला. हवालदील झाला. साधनेतला विलक्षण अनुभव विसरला. आणि स्वामी मला बोलू का देत नाही, केवळ याच एका चिंतेने तो ग्रासून गेला. आणि जसजशी न बोलण्याची वेळ वाढू लागली  तसतशी त्याची अवस्था अधिक केविलवाणी होऊ लागली. कारण आता 'स्वामींशी आपण काय बोलणार होतो, त्यांना काय सांगणार होतो, त्यांना काय विचारणार होतो हेच तो विसरला.' आता त्याच्या मनात राग, भीती, आणि केवळ आपल्यावरच होणारा अन्याय अशाच भावना थैमान घालू लागल्या. साहजिकच साधकाचा चेहरा बदलला. साधक कावराबावरा झाला.

स्वामींचे लक्ष होतेच.

स्वामी चटकन उठले. साधकाजवळ गेले आणि त्याच्या पाठीवर हलकेच हात ठेवत म्हणाले,"मित्रा, आता याक्षणी काही बोलायचं आहे का तुला?"

साधक काहीही बोलू शकला नाही. गुरुस्पर्शाने त्याच्या बंद डोळ्यातून अश्रू घळघळू लागले. साधकाला प्रश्न पडला, तो साधनेतला अनुभव विलक्षण होता की हा मौनातला? अनुभूती नंतरचं मौन विलक्षण? की मौनातली अनुभूती विलक्षण? 

साधकाला जवळ घेत स्वामी म्हणाले,"तुझं मौन बोलकं आहे मित्रा."

साधकाने समाधानाने डोळे उघडले तेव्हा स्वामी संगमावर पोहोचले होते.

गुरुदेव दत्त.


No comments:

Post a Comment