Privacy Policy

Thursday, April 14, 2011

बुवा लोकांचे मटण



आज दुपारी अचानक ढग दाटून आले आणि थोडा पाऊस पण पडला. छान वाटले.
ऑफिस मधून जरा लवकर पळायचा विचार होता पण शक्य झाले नाही.
मी घरी आल्यावर थोड्याच वेळात ही पिल्लूला घेवून 'कन्या बसायला' शेजारी घेवून गेली. कारण सध्या इथे नवरात्री चालू आहेत न.
म्हटलं चला आज सौ.ला स्वयंपाकापासून आराम देवूया. काय बनवावे बरे......सोयाबीन वड्या दिसल्या. चला बुवा लोकांचे मटण………………….. बेत फिक्स .......

बाजूला भ्रमण ध्वनीवर 'गंध फुलांचा गेला सांगून' गाणं ऐकत होतो. मूड बनत गेला आणि त्याच बरोबर स्वयंपाकही.
जे काही बनवल्याचे चीज झाल्याचे मागाहून कळले. त्याची शिक्षा म्हणून बाहेर ५ फेऱ्या मारायला लागल्या का तर म्हणे आज जास्त जेवले गेले.

तर आता जास्तीचे पाल्हाळ आवरतो.

साहित्य: सुके खोबरे किसून आणि भाजून, जिरे, हळद, हिंग, मसाला, गरम मसाला, लसून, मिरच्या (तिखट खाणारे असल्यास अन्यथा फाटा देवू शकता), कांदा बारीक चिरून, कोथिंबीर, मीठ आणि मोहरी (मी मोहरीचे तेल वापरतो १ टे. स्पू.).
महत्वाचे म्हणजे भिजवलेल्या सोयाबीन वड्या.

कृती : वरील सर्व साहित्य कांदा सोडून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.थोडे थोडे पाणी टाकत वाटा.
कढईत दोन पळ्या तेल आणि १ टे. स्पू. मोहरीचे तेल टाका.थोडे तापल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा छानसार गुलाबी होईपर्यंत तळून घ्या.
आता ह्यात ठेचलेला लसून घाला.लसून तळल्याचा मंद सुवास यायला लागला कि मिक्सर मध्ये वाटलेले वाटण ह्यात घाला. मंद आचेवर वाटणाला तेल सुटेपर्यंत हळुवार तळून घ्या.
सुक्या खोबऱ्यामुळे आणि वाढीव तेलामुळे वाटण व्यवस्थित तळले जाते. एक मनमोहक सुगंध दरवळू लागेल.
आता ह्या वाटणात भिजवलेल्या सोयाबीन वड्या घाला.सुरवातीला पाणी न घालता त्यांना मस्तपैकी वाटणातच, त्यांच्यात वाटण भिनेपर्यंत ढवळा.
आता हळू हळू त्यात आवश्यक तितके पाणी टाका, स्वादानुसार मीठ टाकून एकवार ढवळून झाकण ठेवून एक वाफ काढा.
३/४ मिनिटातच भाजी तयार होईल कारण वड्या अगोदरच भिजवलेल्या आहेत. वरून आवडत असल्यास कोथिंबीर घाला.

तयार झालेला पदार्थ पोळी किंवा भाताबरोबर वाढा.

भात बनवून पुन्हा त्याचा जीराराइस बनवायचा कंटाळा येत असेल तर भात शिजवताना त्यात १/२ टे. स्पू. साजूक तूप आणि १ टे. स्पू. जिरे टाका, आणि नेहमीप्रमाणे भातासारखा शिजवा. तुम्हाला जीराराइस तयार मिळेल.
असो अश्या जीराराइसबरोबर खायलाही मजा येते.

तर चला मंडळी या जेवायला.

आवडला तर कळवा नाही आवडला तरीही कळवा.
 


No comments:

Post a Comment