रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्यासह देशातील इतर २९ उद्योजकांच्या खिशात वार्षिक पगारापोटी जमा होणारी रक्कम १ कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे.
या गलेलठ्ठ पगारी व्यक्तींमध्ये 'जेएसडब्ल्यू एनर्जी'चे सज्जन जिंदाल, 'हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन'चे अजित गुलाबचंद, 'रेमंड'चे गौतम हरी सिंघानिया, 'आयसीआयसीआय' बँकेच्या चंदा कोच्चर, 'ऍक्सिस बँके'च्या शिखा शर्मा व 'इन्फोसिस'चे एस. गोपालकृष्णन व एस.डी. शिबुलाल यांचाही समावेश आहे.
३१ मार्च २०११ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी वरिष्ठ व्यवस्थापकीय पदावरील व्यक्तींना देण्यात आलेल्या पगारांचे तपशील विविध कंपन्या वार्षिक अहवालांमधून प्रसिद्ध करत आहेत, त्यातून ही माहिती उजेडात आली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या अहवालांमधून पुढे आलेल्या माहितीनुसार देशातील ३० उद्योजकांचे पगार कोट्यवधीच्या घरात आहेत.
रिलायन्सचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांच्याबरोबरच कंपनीतील निखिल मेसवानी, हितल मेसवानी, पीएमएस प्रसाद व पवन कुमार या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रचंड पगार आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख कोच्चर यांच्याबरोबरच इतर तीन अधिकाऱ्यांना १ कोटी रुपयांच्यावर पगार आहे.
रिलायन्सच्या मुकेश अंबानींना मिळणारा वार्षिक पगार आहे तब्बल १५ कोटी रुपये. गेली तीन वर्षे त्यांच्या पगाराची रक्कम सारखी आहे. त्यांच्या खालोखाल त्यांच्याच कंपनीतील निखिल मेसवानी (रु. ११.०५ कोटी) व हितल मेसवानी (रु. ११.०३ कोटी) आहेत.
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या अहवालांनुसार रिलायन्सच्या अधिकाऱ्यांशिवाय कोणी १० कोटी रुपयांपेक्षा अधिक पगार घेताना आढळलेले नाहीत. अर्थात गेल्याच्या गेल्या आर्थिक वर्षामध्ये कोट्यवधींचा पगार कमाविणाऱ्यांच्या यादीत अंबानी पहिल्या दहा क्रमांकांमध्येही नव्हते; त्यावेळी 'सन टीव्ही'चे कलानिधी मारन व कावेरी मारन हे सगळ्यांत पुढे होते, त्यांचा गेल्या वर्षी नोंदविण्यात आलेला पगार होता रु. ३०.८८ कोटी. मार्च २०११ला संपलेल्या आर्थिक वर्षासाठीचे सगळे अहवाल आले की नक्की किती उद्योजकांचे पगार कोटीच्या कोटी उड्डाणे करतात त्याबद्दलचे चित्र अधिक स्पष्ट होईल.
No comments:
Post a Comment