  ‘मला  हवं तसंच मी राहणार. राजघराण्यात जन्माला आलो असलो तरी मी स्वतला हवं तसंच  राहतो. दुसरे लोक काय बोलतात याची मला पर्वा नाही.’ श्रीमंत छत्रपती  उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले अत्यंत ठामपणे पण खूपच हळू आवाजात बोलत  होते. ते बोलतात तेव्हा त्यांना प्रतिप्रश्न विचारायची कुणाची हिंमत होत  नाही. अगदी सगळ्या राजकीय नेत्यांना भंडावून सोडणाऱ्या साताऱ्यातल्या  पत्रकारांचीही नाही!  
सहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टीच्या उदयनराजेंचं  व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’!  त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी क्षणाक्षणाला जाणवते. धारदार  नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घाम फोडतात. लोक  त्यांना थोडे घाबरूनच असतात. थोडं अंतरही ठेवतात. पण मध्येच अचानक  उदयनराजेंचा मूड बदलतो आणि सगळीकडे हास्याची कारंजी उडतात. लोकांना धक्का  द्यायला उदयनराजेंना खूप आवडतं. 
उदयनराजेंबद्दल साताऱ्यातच नव्हे तर राज्यभर अनेक  आख्यायिका प्रसिद्ध आहेत. साताऱ्यातील पत्रकारांमध्ये तर या आख्यायिका  मोठय़ा चवीने चघळल्या जातात. पत्रकार परिषद असो वा राजकीय मेळावा; उदयनराजे  नेहमीच मद्यधुंद अवस्थेत असतात, किंवा त्यांच्या जलमंदिर वाडय़ावर त्यांना  आड जाणाऱ्यांना ते चाबकाने फोडून काढतात, या अशाच काही  
आख्यायिका. त्या खोटय़ा असतील, कदाचित खऱ्याही  असतील. पण त्यामुळे उदयनराजेंच्या इतर चांगल्या-वाईट गुणांकडे दुर्लक्ष  करायचं काही कारण नाही. 
लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार बनलेल्या  उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यातला दबदबा वाढला आहे. याचा अर्थ त्यापूर्वी  त्यांचा दबदबा नव्हता असा नाही. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या  छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘थेट’ तेरावे वंशज असलेल्या उदयनराजेंविषयी  सातारकरांच्या हृदयात एक वेगळीच आदराची जागा आहे. लोक त्यांना प्रेमाने  ‘महाराज साहेब’ म्हणतात. आजही बरेचसे लोक त्यांना (अर्धवट) मुजरा करतात.  भले मग उदयनराजेंचं त्यांच्याकडे लक्ष असो वा नसो. 
सातारा शहराच्या मधोमध वसलेल्या जलमंदिर या भोसले  घराण्याच्या परंपरागत वाडय़ापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘हॉटेल  राजकुमार रिजन्सी’मध्ये उदयनराजे भेटले तेव्हा असे अनेक अनुभव आले. ‘महाराज  साहेबां’मधल्या सामान्य माणसाला जाणून घेता आलं. 
उदयनराजे म्हणजे एकदम रांगडा गडी! फर्स्ट इम्प्रेशनच  झक्कास. त्यात तुमच्या नशिबाने महाराज साहेबांचा मूड असेल तर बातही क्या! 
‘माझ्या आईवडिलांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत.  त्यांनी मला अगदी पहिलीपासूनच शिक्षणासाठी हॉस्टेलवर ठेवलं. त्यामुळे  राजघराण्याच्या वारशाचं ओझं मला लहानपणी कधी जाणवलंच नाही. मी इतरांपेक्षा  वेगळा आहे असंही कधी वाटलं नाही. शाळेत जो मला चॉकलेट द्यायचा तो माझा  मित्र! राजेशाहीपासून मी खूपच लांब होतो,’ उदयनराजे सांगत होते. 
शालेय शिक्षण डून स्कूलमधून पूर्ण केल्यानंतर  उदयनराजेंनी पुण्यात इंजिनीअरिंग केलं. तिथेही भरपूर दंगा-मस्ती केली.  त्यावेळी आपण कधीतरी राजकारणात पडू असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं.  त्यांचं स्वप्न होतं ‘फॉम्र्युला वन रेस’मध्ये भाग घ्यायचं. खरं तर त्यात  त्यांना करीअरच करायचं होतं. 
आपल्या या स्वप्नाविषयी बोलताना ते हरखून  गेल्यासारखे वाटले. ते म्हणाले, ‘मला वेगाचं प्रचंड वेड आहे. त्यामुळेच  असेल कदाचित, राजकारणात पडण्यापूर्वी मी रेसिंगमध्येच करीअर करायचा विचार  खूप गंभीरपणे केला होता. पण ते काही जमून आलं नाही.’ 
  
‘फॉम्र्युला वन’मध्ये सहभागी होता आलं नाही म्हणून  वेगवान ड्रायव्हिंगची आवड कमी झाली नाही. पुणे-सातारा मेगाहायवेच्या रूपाने  त्यांना नवा ट्रॅक सापडला. सातारा-पुणे हे ११० किमीचं अंतर उदयनराजेंनी  फक्त ३५ मिनिटांत पार केल्याची आख्यायिका साताऱ्यात ऐकायला मिळते.  उदयनराजेंनीही हे खरं असल्याचं सांगितलं. (वर, खोटं वाटत असेल तर पुण्यात  सोडू का; म्हणूनही विचारलं. आता बोला!) फेरारी किंवा बुगाटीसारखी एखादी  चांगली रेसिंग कार घेण्याची बऱ्याच दिवसांपासून इच्छा आहे, असं  मनमोकळेपणाने सांगत ‘हॉर्स रायडिंगही मी चांगलं करतो, पण आता पूर्वीसारखा  वेळ मिळत नाही,’ अशी खंत ते व्यक्त करतात. 
हॉर्स रायडिंग, कार ड्रायव्हिंग अशा आवडी असलेले  उदयनराजे म्हणजे एकदम हाय-फाय माणूस, असं एखाद्याला वाटेल, पण वस्तुस्थिती  तशी अजिबात नाही. फॉर्मल क्लोथचा त्यांना तिटकारा. मग राजेशाही वेशभूषेची  बातच सोडा. राजकीय सभांच्या वेळी अगदी नाइलाज म्हणून ते सदरा लेंगा घालतात.  त्याला ते ‘पांढरी गोणी’ म्हणतात. ‘जीन, त्यावर एखादा कॅज्युअल शर्ट आणि  पायात कोल्हापुरी चप्पल’ हा महाराज साहेबांचा फेवरेट ड्रेसकोड! 
दिनचर्येचा विषय निघाला तेव्हा ‘राजकारण करायचं असेल  तर सकाळी लवकर उठावं लागतं, हा पवार्र्र्रफुल अलार्म आठवला. रात्री  झोपायला कितीही उशीर झाला (उशीर होण्यासाठी अनेक कारणं आहेत) तरी महाराज  साहेब सकाळी साडेसहा वाजताच उठतात! (असं त्यांनी सांगितलं.) त्यानंतर  व्यायाम असतोच. त्यांच्या शब्दात भरपूर व्यायाम. जॉगिंग दररोजचं.  
‘पूर्वी मी कराटेसुध्दा शिकलो होतो. अधूनमधून  बॉक्सिंग खेळतो. आजही मी एका मुठीत तीन विटा तोडतो,’ हे सांगताना  उदयनराजेंना स्वतचाच अभिमान वाटतो. त्यानंतर एक मोठा ग्लास मोसंबी ज्यूस  पिऊन महाराज साहेब ऑफिसमध्ये पोहोचतात तोवर साडेआठ वाजलेले असतात. मग  लोकांच्या गाठीभेटी. अनेक लोक आपल्या तक्रारी घेऊन किंवा कामं करून  घेण्यासाठी त्यांची वाट पाहत असतात. काम करण्याची महाराज साहेबांची एक  विशेष पद्धत आहे, अगदी राजाला शोभेल अशीच. आलेल्या माणसाने आपली समस्या काय  आहे आणि ती सोडवण्यासाठी काय करावं लागेल; इतकंच महाराज साहेबांना  सांगायचं. जास्त काथ्याकूट करायचा नाही. ‘काम होईल,’ म्हणून महाराज साहेब  सांगतात, तेव्हा तो गरजवंत आश्चर्यचकीत झालेला असतो. महाराज साहेबांची कामं  करायची पद्धत चांगली की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात, पण ‘महाराज साहेब  कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं साताऱ्यातील अनेकजण  सांगतात. स्वत:च्या अनुभवावरून. 
दुपारी कोल्हापुरात असतील तर महाराज साहेब जेवायला  घरी म्हणजे वाडय़ावर परततात. ‘मी शाकाहारी आहे. कारलं सोडून सगळ्या भाज्या  खातो. नॉनव्हेजचं म्हणाल तर क्वचित मटण खातो. पण मला ते फारसं आवडत नाही.’ 
लोकांमध्ये सहजतेने मिसळणारा आणि त्यांच्यातच  राहायला आवडणारा हा राजामाणूस देवधर्म, आणि त्यानुषंगाने येणारी कर्मकांडे  यांबाबत उदासीन, म्हटलं तर पुरोगामी आहे. ‘माझा फक्त पंचतत्त्वांवर विश्वास  आहे. पण कर्मकांडे मला पटत नाहीत,’ असं ते स्पष्टपणे सांगतात. पण लगेचच  ‘राजघराण्यातील परंपरा-रूढी पटो न पटो त्या पाळल्याच पाहिजेत,’ असंही ते  स्पष्ट  करतात. त्यांच्या मते या रूढी-परंपराच आपली (म्हणजे त्यांची) ओळख आहे. ही  त्यांची भूमिका थोडी सोयीस्कर वाटते. पण त्यावर महाराज साहेबांकडे वाद  किंवा चर्चा होऊ शकत नाही.  
पुढच्या पिढीनेही रूढी-परंपरा पाळून बेधडक लोकांची सेवा करत जगायला हवं, इति उदयनराजे. 
उदयनराजेंची पुढची पिढी- त्यांचा मुलगा  वीरप्रतापसिंहराजे पुण्यात त्याच्या आई कल्पनाराजेंसोबत असतो.  उदयनराजेंच्या आई अर्थात श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे प्रतापसिंह  महाराज भोसले साताऱ्याच्या जलमंदिर वाडय़ात राहतात. उदयनराजे लोकांमध्ये  मिसळतात, तर कल्पनाराजे त्यांच्या नेमक्या विरुद्ध. लोक आजही त्यांना  घाबरतात. जलमंदिरात त्यांच्याशी तब्बल दोन तास गप्पा मारण्याची संधी  मिळाली. पण ऑफ द रेकॉर्ड! घराण्यातलं द्वेषाचं राजकारण, संधिसाधूपणा,  विश्वासघात, अवहेलना (संदर्भ: अभयसिंह आणि शिवेंद्रराजे भोसले) याविषयी  त्यांनी अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. 
शेक्सपिअरने लिहिलेली सगळी नाटकं त्या दोन तासांत समजली. 
घराणेशाहीतल्या कलहामुळे मधली बरीच र्वष  कल्पनाराजेंना बरंच सोसावं लागलं. त्याचा राग त्यांच्या मनात आजही आहेच. 
मध्यंतरी निवडणुकीच्या राजकारणातही त्यांनी उतरून  पाहिलं. पण नशिबाने काही त्यांना साथ दिली नाही. आता वय झाल्यानंतर  उदयनराजेंच्या राजकीय कारकीर्दीवरच त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलंय. पण  तिथेही स्वत:च्या मुलाच्या कार्यपद्धतीशी त्यांची नाळ जुळत नाही. त्याचंही  दुख आहेच. उदयनराजेंचे वडील म्हणजे प्रतापसिंहमहाराज यांचे धाकटे बंधू  अभयसिंहराजे भोसले यांनीच घराण्याच्या नावाचा आणि समाजावरील प्रभावाचा  फायदा घेत स्वतची राजकीय पोळी भाजली, असं कल्पनाराजेंचं स्पष्ट मत आहे.  
खुद्द उदयनराजेंच्या विरोधातही अभयसिंहराजे आणि  त्यांचा मुलगा शिवेंद्रराजे (म्हणजे उदयनराजेंचे चुलतबंधू) यांनी  निवडणुकीचं राजकारण केलं. १९९६ मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष  उमेदवार म्हणून उदयनराजेंनी निवडणूक लढवली, पण त्यांच्या वाटय़ाला पराभव  आला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि १९९८ च्या सातारा  विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून उदयनराजे निवडून आले, आणि  त्या वेळी युतीच्या सरकारमध्ये त्यांना महसूल राज्यमंत्रीपद देण्यात आलं.  पण १९९९च्या विधानसभा निवडणुकीत अभयसिंहराजेंच्या विरोधात उदयनराजेंना  पुन्हा पराभूत व्हावं लागलं. तर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत  शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंचा पराभव केला होता. त्यानंतर उदयनराजेंनी  कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला, पण कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळत नाही, हे  कळल्यावर त्यांनी शरद पवारांशी संधान बांधलं.  
  कल्पनाराजे  हा अपमानास्पद भूतकाळ विसरलेल्या नाहीत. आज उदयनराजे राष्ट्रवादीच्या  तिकिटावर खासदार बनले आहेत, आणि जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची पूर्ण पकड  आहे. शिवेंद्रराजे यांनीही त्यांच्याशी पॅच-अप केलंय. पण राजमातांना ही  गोष्ट पटलेली नाही. 
राजमातांची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे त्यांनी  राजघराण्याच्या अनेक वास्तूंचा जीर्णोद्धार केलेला आहे. आज जलमंदिर म्हणून  प्रसिध्द असलेल्या वाडय़ातली बहुतेक बांधकामंही त्यांनीच करून घेतली आहेत.  त्याचा त्यांना अभिमान वाटतो.                      कल्पनाराजेंना मराठीत संवाद साधणं मात्र कठीण जातं.  बोलताना अनेकदा मराठी शब्द न सुचल्याने त्या इंग्रजी शब्द, सराईतपणे  वापरतात. आपला साडेचार वर्षांचा नातू म्हणजे श्रीमंत छत्रपती वीरप्रतापराजे  फ्ल्यूएंट इंग्रजी आणि हिंदीत बोलतो, याचं त्यांना अपार कौतुक! विशेष  म्हणजे, राजमाता कल्पनाराजे आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे हे सुध्दा  बहुतेकदा एकमेकांशी अस्खलित इंग्रजीतच संवाद साधताना दिसतात! 
खासदार म्हणून उदयनराजे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर  त्यांनी लोकसभेत त्यांचं पहिलं भाषण इंग्रजीत केलं, याचं सातारकरांना भयंकर  कौतुक वाटलं होतं. भारावलेल्या सातारकरांनी उदयनराजेंचा लोकसभेत भाषण  करतानाचा फोटो संपूर्ण जिल्ह्यात होर्डिगवर लावला. शिवाय, स्थानिक लोकल  चॅनल्सने त्याची व्हिडिओ टेप वारंवार दाखवली होती. आपले महाराज साहेब  इंग्रजीत बोलतात यावरच साताऱ्यातली प्रजा खूष आहे. मग असंतोषाला जागा  राहतेच कुठे? 
      
                        कोल्हापूरच्या गादीचे वारस असलेले ३८ वर्षांचे  श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांना एकच खंत आहे. त्यांचे वडील  श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि त्यांच्यात ‘एक कधीही न मिटणारी दरी’ आहे.  राजघराण्यात जन्माला आल्यामुळे तिथले संस्कार, रूढी-परंपरा, मान-मरातब,  त्यापाठोपाठ येणारी औपचारिकता यांमुळे कितीही म्हटलं तरी हे दोघे  सर्वसामान्य बाप-बेटय़ांसारखे मित्र बनून राहू शकत नाहीत. ही ‘जनरेशन गॅप’  संभाजीराजेंना सतावते. व्यथित करते. 
सातवीत शिकणाऱ्या स्वत:च्या मुलाबाबत मात्र ही चूक  संभाजीराजे होऊदेणार नाहीयेत. त्यांचा १३ वर्षांचा मुलगा महाराज कुमार  शहाजीराजे छत्रपती बंगलोरच्या इंडस इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो. तो सुट्टीत  कोल्हापूरला घरी येतो, तेव्हा घरातले नोकर-चाकर त्याला बाळराजे किंवा  शहाजीराजे म्हणून बोलवतात. राजघराण्यातील थोडीफार औपचारिकता त्यालाही  पाळावी लागतेच. पण संभाजीराजेंना हे फारसं आवडत नाही.  
त्याला कारणही तसंच आहे. संभाजीराजे जेव्हा लहान  होते, तेव्हा कुठेही बाहेर जाताना त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीत  ड्रायव्हर, सेक्रेटरी, हुजऱ्या असा लवाजमा असायचाच. ते ओव्हर प्रोटेक्टिव्ह  वातावरण त्यांना नकोसं वाटायचं. कधीकधी त्यात त्यांची घुसमट व्हायची.  म्हणूनच असेल कदाचित, आपल्या मुलाला ते मोकळ्या हवेत वाढवू इच्छितात.  त्यांच्या मते, ‘मुलांना जितकं स्वातंत्र्य द्याल तितकं चांगलं. वडील आणि  मुलाचं नातं कसं मित्रांसारखं असलं पाहिजे! माझ्यात आणि शहाजीत जनरेशन गॅप  असू नये.’  
‘मी त्याला सांगितलंय की, १८ र्वष पूर्ण झाली की  त्याला माझ्याकडून काहीही मिळणार नाही. राजघराण्याचा वारस म्हणून जे काही  मिळतंय, ते सारं बोनस आहे!’ संभाजीराजे मोकळेपणाने बोलत होते. 
कोल्हापुरातल्या शाही न्यू पॅलेसच्या आवारातील  त्यांच्या ऑफिसमध्ये ते लोकांना भेटतात. कुठलाही बडेजाव किंवा थाटमाट  नसलेले हे ऑफिस कोल्हापूरच्या राजघराण्यातील युवराजांचं आहे, असं कुणाला  सांगितलं तरी विश्वास बसणार नाही. पण ते तसंच आहे. अगदी संभाजीराजेंच्या  स्वभावासारखं. नम्र. शांत. एकाकी. 
संभाजीराजे बोलायला, गप्पा मारायला मनमोकळे आहेत.  समोरच्यावर त्यांची छाप पडते, पण साताऱ्याच्या उदयनराजेंसारखा दबाव नाही. 
लहानपणीच त्यांचे वडील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज  यांनी त्यांना शिक्षणासाठी राजकोटच्या ‘राजकुमार कॉलेज’ला धाडलं. तिसरी ते  आठवीपर्यंतचं त्यांचं शिक्षण तिथेच झालं. (पूर्वी तिथे फक्त राजघराण्यातील  मुलंच शिकायला जायची. आता मात्र तसं काही राहिलेलं नाही.) नंतर बी.ए. आणि  एम.बी.ए. त्यांनी कोल्हापुरातच पूर्ण केलं. शिक्षणाने असेल किंवा  समाजसुधारक शाहू महाराजांच्या पुरोगामी वारशामुळे असेल, संभाजीराजे  ‘लोकांमधले राजे’ वाटतात. गप्पा मारताना हातचं राखून ते बोलले असं वाटलं  नाही. विविध विषयांवरची मतं त्यांची कळत गेली, तसा हा माणूस आपला वाटत  गेला. 
सकाळी सहा वाजता संभाजीराजेंचा दिवस उजाडतो.  त्यांच्या रुममध्येच ट्रेड मिल आणि इतर इक्विपमेंट्सने सज्ज असलेली जिम  आहे. त्यावर ‘अर्धा-एक तास व्यायाम करतो. गेल्या काही दिवसांपासून गॉल्फ  खेळायला सुरुवात केलीय,’ संभाजीराजे सांगत होते. ‘मी दररोज योग, प्राणायाम  करावा असा घरच्यांचा आग्रह आहे. पण योग करायचं म्हटलं की खूप परिपक्वता,  संयम लागतो. मला काही तो प्रकार आवडत नाही. चाळीशीनंतर त्याचं काय करायचं  ते बघू.’  
प्राणायामासाठीचा संयम त्यांच्यात नसला तरी  देवपूजेसाठी आवश्यक असलेली श्रद्धा मात्र त्यांच्या मनात चाळीशीपूर्वीच  निर्माण झालीये. तसं पूर्वीसुद्धा ते देव-धर्म मानायचे, तरी पूजा-अर्चना  यांच्यावर त्यांचा फारसा विश्वास नव्हता. ‘पण गेल्या पाच-सहा वर्षांत  माझ्या आयुष्यात काही घटनाच अशा घडल्या की माझ्यातली भक्तिभावना वाढत गेली.  थोडासा आध्यात्मिक होत गेलोय मी.’  
सकाळच्या नाश्त्याला पोहे किंवा खिचडी. मग भले  त्याने पोट थोडं गच्च का होऊ नये! कोल्हापूरबाहेर असेन तर मात्र  ‘कॉण्टिनेंटल ब्रेकफास्ट प्रीफर करतो,’ संभाजीराजे त्यांच्या आवडीनिवडी  सांगत होते. 
जेवणाचा विषय निघाला तेव्हा तर ते अक्षरश: खुलले.  स्वत:ला फूडी (खवय्या) म्हणवून घ्यायला त्यांना आवडतं. देशातलेच नव्हे तर  जगभरातल्या विविध खाद्यपदार्थाची चव त्यांनी चाखली आहे. पण पहिलं प्रेम  कोल्हापूरच्या मटणावरच. पांढरा आणि तांबडा रस्सा. ‘दुपारच्या वेळी मी सहसा  वाडय़ावरच हलकं शाकाहारी जेवण घेतो. जेवणात मला वरण आवडत नाही.  रस्साच  लागतो. अगदी बटाटय़ाचा रस्सा असेल तरी चालेल. पण खरं सांगू का; मला मटण खूप  आवडतं. अगदी रोज दिलं तर रोज खाईन मी. पण क्वांटिटी मात्र कमी असते हं!’  
‘जपानी सु-शी (न शिजवलेले मासे) ही डिश सोडली तर मी नॉनव्हेजध्ये सगळं खातो, बीफ सोडून!’ 
अट्टल खवय्या असलेले संभाजीराजे फक्त झक्कास  जेवणासाठीही अनेकदा मुंबई, गोव्याला जातात. मुंबईतल्या मरीन ड्राइव्हवरचं  ‘जॅझ बाय द बे’ या रेस्टॉरंटमधली सलाड्स त्यांना खूपच आवडतात. कुलाब्याचं  ‘तृष्णा’ आणि जुहूचं ‘महेश‘ही त्यांच्या फेव्हरेट लिस्टमधले.  
पर्यटनाचं वेडही संभाजीराजेंच्या डोक्यात चांगलं  भिनलेलं आहे. अनेक गड-किल्ले त्यांनी स्वत: पालथे घातले आहेत. शिवरायांचा  राज्याभिषेक झालेल्या रायगडावर मेघडंबरी उभारण्यातही संभाजीराजांनी  महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ‘राजस्थानमध्ये गड-किल्ले-राजमहाल बघायला  पर्यटक प्रचंड संख्येने जातात. पण महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा इतका  समृद्ध असूनही आपल्याकडे पर्यटनाचा विकास झालेला नाही. दुर्दैवाने आपल्या  राजकीय नेतृत्वाला या क्षेत्राचं पुरेसं महत्त्वच कळलेलं नाही,’ संभाजीराजे  आपली खंत व्यक्त करतात. 
संभाजीराजे सध्याच्या राजकीय नेतृत्वाविषयी समाधानी  नसले, तरी आता त्यांनी स्वत:च राजकीय आखाडय़ात उडी घेतली आहे. ‘मला न  आवडणारी गोष्ट म्हणजे राजकारण, पण मी त्यात पडलो,’ असं ते म्हणतात.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार  म्हणून कोल्हापूरमधून उभे होते. त्यांना उमेदवारी देण्यासाठी शरद पवारांनी  तिथले राष्ट्रवादीचेच खासदार सदाशिवराव मंडलिक यांचं तिकिट कापलं. पण  त्यांच्या पदरी पराभव आला. मंडलिकांनी ४० हजारांहून अधिक मतांनी त्यांचा  पराभव केला. तरीही संभाजीराजेंविषयी कोल्हापूरकरांच्या मनात असलेली आदराची  भावना कमी झालेली नाही. खरं तर, कोल्हापुरातली शरद पवार विरोधाची लाट  त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली, असं आता संभाजीराजेंचे पाठिराखे  सांगतात.  
रॉयल फॅमिलीज्ना राजकीय पराभव काही नवीन नाही.  साताऱ्यातही उदयनराजे आणि त्यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले  पराभवाला सामोरं जावं लागलंय. पण लोकशाहीतल्या या पराभवामुळे राजेशाहीत  वाढलेल्यांची मोठी गोची होते. पराभवानंतरही स्वतचा आब आणि मान राखण्याचं  आव्हान त्यांच्यापुढे असतं. 
संभाजीराजे जरी राजकारणात या वर्षीच उतरले असले तरी  त्यांचे धाकटे बंधू महाराज कुमार श्रीमंत मालोजीराजे त्यांच्या आधीपासून  राजकीय आखाडय़ात आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते कॉंग्रेसच्या तिकिटावर  कोल्हापुरातून आमदार म्हणून निवडून गेले होते. यंदाच्या विधानसभा  निवडणुकीतही ते काँग्रेसच्याच तिकिटावर आपलं नशीब आजमावत आहेत. त्यामुळे  राजघराण्यातला थोरला भाऊ राष्ट्रवादीत, तर धाकटा कॉंग्रेसमध्ये असं थोडंसं  विचित्र चित्र दिसतं. पण राज्यातल्या राजघराण्यांसाठी ही काही नवीन गोष्ट  नाही. जो कुठला राजकीय पक्ष उमेदवारी देऊ करेल, त्याचं तिकीट स्वीकारताना  ते अवघडत नाहीत. संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराज दुसरे यांनी १९९८  मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर कॉंग्रेसच्या वर्तुळातही  त्यांचा वावर होता. खरं सांगायचं तर, राजघराणं हाच या सगळ्यांचा राजकीय  पक्ष असतो!  
याचं कारण आहे राजघराण्याचा लोकमानसावर असलेला  प्रभाव. राजघराण्यातील व्यक्ती कोणत्या पक्षाकडून उभी आहे, याला त्यामुळे  फारसं महत्त्व उरत नाही. त्यातही कोल्हापूरच्या भोसले घराण्याचा प्रभाव तर  प्रचंड आहे. दलित-बहुजनांना समानतेने वागणूक देणाऱ्या पुरोगामी  विचारधारेच्या छत्रपती शाहू महाराजांमुळे हे राजघराणं लोकांना आपल्यातलं  वाटतं. शिवाय,  राजघराण्याशी  जोडलेल्या स्थानिक रूढी-परंपरा आहेतच. उदाहरणार्थ, विजयादशमीच्या दिवशी  महाराजांनी विधिवत सोनं (आपटय़ाची पानं) लुटल्याशिवाय कोल्हापूरवासीय  एकमेकांना सोनं देत नाहीत. (साताऱ्यातही अशीच परंपरा आहे.) त्या दिवशी  महाराज-युवराज यांची मिरवणूक निघते. अवघं कोल्हापूर या मिरवणुकीत सहभागी  होतं.  
शिवाय, राजवाडा आणि तिथला राजेशाही थाट या  गोष्टींचाही सर्वसामान्य प्रजेवर प्रभाव पडतोच. राजघराण्याचं परंपरागत  निवासस्थान असलेल्या न्यू पॅलेसचा परिसरच मुळी १५० एकरहून अधिक आहे.  तिथल्या तलावाभोवतीच्या जागेत तर शेकडो हरणं, सांबर, शहामृग, ससे बागडताना  दिसतात. पूर्वी जिथे घोडय़ाची पाग होती तिथे आता शाहू हायस्कूल भरतं. शिवाय,  देश-परदेशांतून येणाऱ्या पर्यटकांचं लक्ष वेधून घेणारा दरबार हॉल, आणि एक  भलं मोठं वस्तुसंग्रहालयही आवारात आहे. कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी  छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला लाल आखाडाही इथे पाहायला मिळतो. या  आखाडय़ात अगदी पाकिस्तानातल्या नामवंत मल्लांनीही प्रशिक्षण घेतलेलं आहे. 
हा सगळा थाट सांभाळायचा म्हणजे खर्चही भरपूर येणारच.  त्यात चाळीसेक वर्षांपूर्वी इंदिरा गांधींनी संस्थानिकांचे भत्ते बंद  केल्यामुळे देशातल्या अनेक संस्थानिकांची गोची झाली. पण पूर्वी  कोल्हापूरच्या महाराजांनी स्थापन केलेल्या १७-१८ संस्थांच्या माध्यमातून आज  राजमहालाच्या देखभालीचा खर्च निघतो. ‘अवर पॅलेस इज वन ऑफ द मोस्ट मेण्टेंड  पॅलेस इन इंडिया, विदाऊट एनी एड.’ संभाजीराजे अभिमानाने सांगतात. 
पॅलेसमध्ये पूर्वी अनेकदा पाश्चात्त्य शैलीतले थ्री  कोर्स, फोर कोर्स डिनर व्हायचे. देशभरातले अनेक राजे-महाराजे, मोठमोठे  राजकीय नेते, सेलिब्रिटी यांच्यासाठी. खास वेशभूषा केलेली नोकरमाणसं तेव्हा  शाही लोकांना वाढायचे वगैरे. 
पण छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून या  दिखावेगिरीला काही प्रमाणात आळा बसला. आता गेल्या काही वर्षांपासून तर हा  प्रकार पूर्णपणे थांबला आहे. त्याचं मुख्य कारण सव्र्ह करायला  पूर्वीसारखी ट्रेण्ड माणसं मिळत नसल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं! 
      
                         सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर वसलेल्या सावंतवाडी शहराच्या  मधोमध मोठय़ा थाटात उभ्या असलेल्या राजवाडय़ात ७४ वर्षांच्या हर हायनेस  राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले भल्या पहाटे मॉर्निग वॉकला बाहेर  पडतात. लहानपणापासूनच पहाटे लवकर उठायची त्यांना सवय. पूर्वी तर त्या  घोडय़ावरून रपेट करायच्या. पण आता दिवस बदलले आहेत, आणि वयही झालंय.. 
बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांची पणती व प्रतापसिंह  गायकवाड आणि राणीदेवी शांतीदेवीसाहेब यांची तिसरी राजकन्या म्हणजे  सरलाराजे. १९५१ साली सावंतवाडी संस्थानाचे श्रीमंत शिवरामराजे खेमसावंत  भोसले यांच्याशी सरलाराजेंचा विवाह झाला आणि सावंतवाडी संस्थानाला मिळाली  त्यांची राणी सत्वशीलादेवी! 
सावंतवाडीचं संस्थान हे त्याच्या पुरोगामी  धोरणांमुळे नेहमी चर्चेत राहिलं आहे. सत्वशीलादेवी यांचे सासरे म्हणजे पंचम  खेमराज तथा बापूसाहेब महाराज यांच्या कार्यकाळात तर महात्मा गांधी  सावंतवाडी संस्थानाच्या राजवाडय़ात महिनाभर राहिले होते. त्यावेळी  संस्थानातील न्याय्य कारभाराने प्रभावित होऊन स्वत: गांधीजींनी या  संस्थानाचं वर्णन ‘रामराज्य’ असं केलं होतं. इतकंच नव्हे, तर डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांनी ‘न्यायप्रिय राजा’ असं बापूसाहेब महाराजांचं वर्णन केलं  होतं.. घराण्याचा गौरवशाली इतिहास सांगताना राजमाता सत्वशीलादेवी भरभरून  बोलतात. 
खरं तर, सावंतवाडीचं पूर्वीचं नाव सुंदरवाडी. पण  सावंतभोसले घराण्याने ही सुंदरवाडीच आपली राजधानी बनवल्यावर ती सावंतवाडी  म्हणून ओळखली जाऊ लागली. सावंत भोसले घराण्याचा आद्यपुरुष मांग सावंत यांचा  राजस्थानातील उदेपुरा येथील सिसोदिया या राजपूत घराण्याशी थेट संबंध होता.  (राज्यातल्या मराठय़ांना आणि विशेषत: राजघराण्यातील मराठय़ांना आपला संबंध  राजस्थानच्या सिसोदिया घराण्याशी असल्याचे सांगण्यात विशेष अभिमान वाटतो.)  त्यांचे वंशज खेमसावंत पहिले यांनी सन १६२७ पासून आपला अंमल सावंतवाडीच्या  प्रदेशावर बसवला. हा ऐतिहासिक आढावा पाहता छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी  साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवण्यापूर्वीच सावंत भोसले घराण्याची सत्ता  सावंतवाडी व दक्षिण कोकणच्या प्रदेशात अस्तित्वात आली होती. पुढे लखम सावंत  (१६५१-१६७५) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन होते. या दोघांमध्ये  दोन लढायाही झाल्या होत्या! 
काळ गेला, तसे दिवस पालटले. देशाला स्वातंत्र्य  मिळाल्यानंतर संस्थानिकांचं महत्व संपलं. पुढे तर इंदिरा गांधींनी  संस्थानिकांचे भत्ते बंद केले. संस्थानिकांनीही हुशारीने लोकशाही  प्रक्रियेत भाग घेतला, आणि आमदार-खासदार बनून स्वतचा मान राखला.  सत्वशीलादेवी यांचे पती म्हणजे श्रीमंत हिज हायनेस शिवरामराजे खेमसावंत  भोसले हे सुध्दा बरीच र्वष आमदार होते. 
पूर्वीची राजेशाही आणि आताची लोकशाही यांच्यामुळे  निर्माण झालेल्या बदलाला सामोरं जाणं कठीण असलं तरी सत्वशीलादेवी या बदलाचं  स्वागत करतात. ‘राजघराण्याचं ओझं निघून गेल्यामुळे आम्हाला आज खरं तर खूप  बरं वाटतं. लोकांमध्ये थेट मिसळता येतं,’ राजमाता सांगत होत्या. 
सावंतवाडीतल्या तलावासमोर असलेल्या राजवाडय़ात  राजमातांना कोणीही भेटू शकतं. पण सकाळी अकरा ते एक, आणि दुपारी चार ते सहा  या वेळेतच! अनेकदा त्यांच्याकडून इतिहास जाणून घ्यायला कॉलेजची मुलंही  येतात.  
भत्ते बंद झाल्यानंतर राजवाडय़ाची देखरेख ही  अनेकांसाठी डोकेदुखी बनली. सावंतवाडीच्या राजवाडय़ात आज हाताच्या बोटावर  मोजता येतील इतकीच नोकर-चाकर मंडळी आहेत. डेक्कन ओडिसीतून येणारी परदेशी  पर्यटक मंडळी मात्र मोठय़ा संख्येने राजदरबार बघायला मोठय़ा उत्सुकतेने  येतात. शक्य झालं तर राजमातांबरोबर एखादा फोटोही काढून घेतात.  
दरबाराला आता पूर्वीसारखी शान नसली तरी त्याचा  राजेशाही थाट काही लपत नाही. तिथला भुसा भरलेला पट्टेरी वाघ, बिबळ्या,  राजसिंहासन लक्ष वेधून घेतात. दरबारातच एका बाजूला लाकडी टेबल-खुच्र्यावर  काही कारागिर बसून लाकडी   खेळणी बनवत बसलेली दिसतात. खरं तर, सावंतवाडीच्या गंजिफा व लाखकाम कलेला प्रोत्साहन देण्याचं ऐतिहासिक काम सत्वशीलादेवींनी केलं. 
कलेची आवड असलेल्या सत्वशीलादेवींनी ही कला एका  वृध्द कलाकाराकडून शिकून घेतली. आणि आता समाजातील विविध कलावंतांना त्याचं  प्रशिक्षण देऊन ही कला जागतिक पातळीवर नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ‘पण  लोकांचा म्हणावा तितका प्रतिसाद नाही. या कला जोपासायच्या म्हणजे खूप मेहनत  करायची तयारी हवी. आताच्या कलावंतांना झटकन पैसा हवाय. कलेसाठी कळ सोसायची  त्यांची तयारी नाही,’ राजमाता आपली खंत व्यक्त करतात.                        सत्वशीलादेवी स्वत:देखील एक चांगल्या कलाकार आहेत.  चित्रकला, भरतकाम, विणकाम यांची त्यांना लहानपणापासूनच आवड. सावंतवाडीला  आल्यानंतर तेथील लोप पावत असलेल्या पारंपरिक कलाप्रकारांना संजीवनी  देण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. सावंतवाडीतील चितारी वर्गाकडे असणारे  लाखकाम आणि गंजिफा या कलाप्रकारातील बारकावे त्यांनी स्वत: पुंडलिक चितारी  नावाच्या वृद्ध कलाकाराकडून शिकून घेतले. पुढे त्यांनी या कलेच्या  प्रसारासाठी सावंतवाडी लॅकरवेअर्स ही संस्था स्थापन केली. आज ही कला  कोणत्याही जातीतील लोक शिकू शकतात. विशेष म्हणजे, मिनिएचर गंजिफा  राजमातांनी स्वत: विकसित केलेला आहे. लाकडापासून बनवलेल्या विविध वस्तू,  गंजिफा यांसारख्या अनेक वस्तू आता राजवाडय़ातल्याच एका इमारतीत उपलब्ध करून  देण्यात आल्या आहेत. अगदी तीनशे रुपयांपासून ३५ हजार रुपयांपर्यंतच्या  किमतीत त्या विकल्या जातात. स्वत: राजमातांनी बनवलेल्या वस्तूही तिथे  विक्रीला आहेत!  
सत्वशीलादेवींचे पुत्र श्रीमंत राजेसाहेब आता ५१  वर्षांचे आहेत. सावंतवाडीकर त्यांना प्रेमाने बाळराजेही म्हणतात.  राजमातांनंतर संस्थानाचा चेहरा तेच आहेत. पण मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि  कायद्याचा अभ्यास केलेल्या राजेसाहेबांना मात्र राजकीय क्षेत्राची विशेष  आवड नसल्याचं सावंतवाडीतले लोक सांगतात. सावंतवाडीतल्या शैक्षणिक  संस्थांच्या कारभारात मात्र त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांचा मुलगा  मुंबईत कॅटरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करतोय, तर मुलगी कायद्याच्या तिसऱ्या  वर्षांत आहे.  
पुढची पिढी आपल्यासारखी असणार नाही, याची राजमातांना  पूर्ण जाणीव आहे. आधुनिक जीवनशैलीला त्यांचा विरोध तर मुळीच नाही. पण  ‘मॉडर्न बनले तरी आपल्या रुढी-परंपरा त्यांनी पाळाव्यात,’ एवढीच माफक  अपेक्षा त्या व्यक्त करतात. |  
  | 
No comments:
Post a Comment