Privacy Policy

Tuesday, September 13, 2011

"तार्‍यांचे बेट"



प्रत्येक जण कुटुंबासाठी कष्ट करत असतो, त्यांची स्वप्नं पूर्ण व्हावीत म्हणून आटापिटा करतो पण हे स्वप्न जर आर्थिक ताकदीच्या पलिकडलं असेल तर? या आठवड्यात रीलीज होणार्‍या " तार्‍यांचे बेट" नावाच्या सिनेमाची ही साधी सरळ गोष्ट. राज्यशासन पुरस्कार विजेत्या लेखक किरण यज्ञोपवीत यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून निर्मिती नीरज पांडे ( वेन्स्डे सिनेमचे दिग्दर्शक) आणि बालाजी फ़िल्म्सची आहे.मुलाला दिलेला शब्द पाळण्यासाठी एका बापाने केलेले प्रयत्न पाहताना मजा येतेच आणि त्याच वेळी भौतिक सुखसोयींसाठी नीतिमत्तेला बाजूला सारायचे का हे बापाच्या मनातले द्वंद्व भावून जाते.

ही गोष्ट आहे श्रीधर सुर्वे ( सचिन खेडेकर ) नावाच्या कोकणातल्या एका खेड्यात ग्रामपंचायतीत नोकरी करणार्‍या एक करकुनाची.बायको आणि दोन मुलांना घेऊन तो मुंबई फ़िरवायला जातो तेव्हा त्याचा मुलगा ( इशान तांबे) फ़ाईव्ह स्टार हॉटेलात राहायचा हट्ट करतो. श्रीधरला हे शक्य नसल्याने तो साहजिकच त्याला नकार देतो पण जर पुढच्या परीक्षेत पहिला आलास तर मात्र तुला मी फ़ाईव्ह स्टार हॉटॆलात राहायला घेऊन जाईन अशी पैज लावतो. मग मुलगा ही पैज अत्यंत सीरियसली घेतो आणि त्याची चिंता वाढायला लागते.पुढे परीक्षेचा निकाल काय लागतो आणि श्रीधर आर्थिक गणित बसवायला काय काय अडचणींना सामोरा जातो हे स्क्रीनवर पाहण्यासारखे आहे...

मूळ कथा आहे सौरभ भावे यांची आणि त्यांनीच शैलेश दुपारे आणि किरण यज्ञोपवीत यांच्याबरोबर पटकथा लिहिलेली आहे. या पटकथेला पुणे फ़ेस्टिवलमध्ये सर्वोत्तम पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे. हा सिनेमा इमोशनल असला तरी कुठेही बटबटीत भडक होत नाही ... मुलांच्या शाळेतली दृश्ये मस्त जमून आलेली आहेत. बाप आणि मुलाने मंदिरात जाऊन देवाशी बोलण्याचा प्रसंग उत्तम झाला आहे. सायकलवरून येताना फ़ाईव्ह स्टार वाढदिवसाचे प्लॅनिन्ग करायचा प्रसंग झकास. शेवटाकडे मात्र सिनेमा पटकन संपल्यासारखा वाटतो...अनेक मराठी नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन करणार्‍या किरण यज्ञोपवीत यांनी गेल्या काही वर्षांत चित्रपटलेखनही केले आहे... त्यांचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न चांगला झाला आहे.


या गोष्टीत मस्त व्यक्तिरेखा आहेत.....इन्शुरन्स एजंट कांबळी ( किशोर कदम), पोलीस ( जयवन्त वाडकर) , शेअर ब्रोकर ( विनय आपटे) यांची छोटीशीच दृश्ये मजा आणतात.श्रीधरने त्याची जुनी बोट विकावी म्हणून त्याच्या सतत मागे असलेला महादेव( शशांक शेंडे) झकास...किशोर कदम आणि सचिन खेडेकर दोघेही उत्तम लिहिलेल्या त्यांच्या दृश्याला त्यांच्या अभिनयाने अधिकाधिक उंचीवर नेतात.
sudir Palsane यांचे छायाचित्रण मस्त झाले आहे. विशेषत: कोकणातल्या खेड्यातले आणि समुद्रकिनार्‍यावरचे संध्याकाळचे दृश्य अप्रतिम.सचिन खेडेकर यांनी प्रेमळ बापाची तगमग मस्त दाखवलेली आहे. त्यासाठी त्यांना पुणे फ़ेस्टिवलमध्ये उत्क्रुष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला आहे. आई ( अश्विनी गिरी) उत्तम. इशान तांबे आणि अस्मिता जोगळेकर या मुलांनी सहज आणि नैसर्गिक काम केले आहे.
नन्दकुमार घाणेकर यांचे संगीत आहे. मुग्धा वैशंपायनने गायलेले एक गाणे मस्त आहे... नरेन्द्र भिड्यांचे पार्श्वसंगीत सिनेमाच्या मूडला साजेसे.

दर आठवड्याला पाडल्या जाणार्‍या बटबटीत कॉमेडीजच्या मार्‍यामध्ये हा सिनेमा म्हणजे एक सुखावह बदल आहे.
सिनेमाची ट्रीटमेन्ट, स्टाईल , बजेट, तांत्रिक बाबी, अभिनय हे सारे महत्त्वाचे असले तरी उत्तम कथा असली तरच मनाला भावते आणि हा सिनेमा नक्कीच त्यापैकी आहे. जुन्या जमान्यातल्या कथाप्रधान सिनेमांची आठवण करून देणारा हा सिनेमा अधिकाधिक प्रेक्षकांनी पाहिला तर असे सिनेमे अजून बनतील, अशी आशा करतो....


No comments:

Post a Comment