Privacy Policy

Thursday, December 8, 2011

सावधान, ती संतापली आहे !



तिच वैतागणं, तावातावानं बोलणं यात त्यानं चेष्टा करून, सल्ले देऊन तेल ओतलं तर भडका होणारच !

आज सकाळपासूनच तिच्या वैतागाला सुरुवात झाली. तिनं दूध गरम करायला ठेवलं तर ते नासलं, पाण्याच्या नळाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तो गळू लागला, त्यातच मोलकरणीचा फोन आला की, ती आज येणार नाही. तिच्यासमोर भांड्यांचा ढीग पडला होता. कपडे धुवायचे होते आणि ऑफिसलाही वेळेवर पोहोचायचं होतं. तिच्यावर भयंकर ताण आला होता आणि 'त्याला' त्याचं काहीच नव्हतं. 'तो' रोजच्यासारखा चहा पित पेपर वाचू लागला तशी ती तणतणलीच. 'आज मोलकरीण येणार नाही आहे आणि मला ऑफिसात लवकर जायचं आहे. तो नळ बघ जरा.' तिचा रागाचा सूर ऐकून तोही बोलू लागला, 'अगं हो, जरा शांत हो, माझ्यावर कशाला रागावते आहेस?'
'तुम्हाला काय जातंय शांततेचा सल्ला द्यायला ऑफिसात वेळेवर पोचले नाही तर तो बॉस डाफरतो.'
'मग तो आरती ओवाळून स्वागत करील की काय तुझं? उशिरा आलात, छान.. वेलकम असं?' त्यानं आगीत तेलच ओतलं. ती भडकलीच. 'हौस म्हणून नाही नोकरी करत आहे मी आणि आज दुसरा चहा मिळणार नाही आणि डबाही नाही दुपारचा. हॉटेलात गिळा. दूध, कपडे, भांडी, केर. वैताग, वैताग आलाय मला सगळ्याचा. सोडून जावंसं वाटतंय. सगळंच, म्हणजे समजेल माझी किंमत.' ती असं बरंच काही बडबडत होती आणि त्याला समजत नव्हतं आपलं नक्की काय चुकलं ते?
असं का होतं?
तिच्यावर कोणताही ताण आला, वैताग आला की तिला तो बोलून व्यक्त करायचा असतो. आपल्या भावना कुणीतरी समजून घ्याव्यात एवढीच तिची अपेक्षा असते. पण ती स्वत:समोरचे अनेक प्रॉब्लेम्स 'त्याला' सांगू लागली की त्याला समजत नाही की, यात मी नक्की काय करू? खरं म्हणजे काही करावं अशी तिची फारशी अपेक्षा नसते, शांतपणे ऐकून घेतले, तिला कोणताही सल्ला न देता किंवा तिची टिंगल न करता तिचे प्रॉब्लेम ऐकून घेतले तरी तिच्यावरचा बराचसा 'तणाव' कमी होतो; पण बर्‍याचदा हे त्याच्या लक्षात राहत नाही. तो तिला काहीतरी सल्ला विशेषत: तिने भावना कशा कंट्रोल करायच्या, यासारख्या सूचना देऊ लागतो किंवा चक्क तिची चेष्टा करू लागतो आणि त्यामुळे मामला बिघडतो. ती अधिकाधिक चिडत जाते आणि एकदा संतापली की, ती काय बोलते याचा भरवसा नसतो. म्हणूनच तुमच्या आमच्या घरातल्या समस्त पुरुषवर्गाने हे कायम लक्षात ठेवायला हवं की, ती चिडचिड करू लागली. तिचे असंख्य प्रॉब्लेम्स सांगू लागली की, तिला कोणतंही सोल्युशन न सुचवता तिचं बोलणं शातपणं ऐकायचं, मध्ये मध्ये तू खूप थकत असशील, तुझ्यावर खूप ताण आहे? अशी वाक्ये मनापासून बोलायची, सल्ला नको, टिंगल नकोच. पेपर किंवा टी.व्ही बंद करून फक्त ऐकणं, बघा पुढल्या वैतागाच्या वेळी प्रयत्न करून !
- डॉ. यश वेलणकर

No comments:

Post a Comment