Privacy Policy

Saturday, April 28, 2012

आनंदीबाईं Anandibai - Doctor of Medicine

Anandibai - Doctor of Medicine




altएकोणिसाव्या शतकात स्त्री-शिक्षण, परदेशगमन, समुद्र उल्लंघन हे महापाप मानले जात असताना परदेशात उच्च शिक्षण घेऊन 'डॉक्टर ऑफ मेडिसिन' ही पदवी मिळवून डॉ. आनंदीबाई जोशींनी भारतीय स्त्री-शिक्षणाच्या इतिहासात एक विक्रमच नोंदविला. ३१ मार्च हा त्यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने हा खास लेख...एकोणिसाव्या शतकातीलच एक भारतीय शाळकरी वयोगटातील एक बंडखोर ज्ञानपिपासू नायिका व तिने तत्कालीन परंपरावादी सनातनी, रूढीग्रस्त समाजाशी केलेला संघर्ष खरंच खूप अविस्मरणीय आहे. त्या नायिकेचं नाव डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी. आनंदीबाईंचे संपूर्ण आयुष्य म्हणजे ज्ञानप्राप्तीची अखंड तपश्चर्या होती. 

डॉ. आनंदीबाईंचा जन्म ठाणे जिल्ह्य़ातील कल्याण शहरातल्या पारनाक्यावरील जोशी-इनामदारांच्या कुटुंबात ३१ मार्च १८६५ साली झाला.
आनंदीबाईंचे वडील गणपतराव जोशी यांच्या घराण्यामागे इतिहास होता. शिवाजी महाराजांच्या काळात या घराण्यातील रामचंद्र जोशी यांनी दुर्गाडी किल्ल्याला मुघलांपासून मुक्त केले. रामचंद्राचा भाऊ बाळाजींचे नातू म्हणजे 'गणपतराव' होत.
आनंदीचे नाव 'यमुना' ठेवण्यात आले. सुरुवातीपासूनच 'यमू' ही आईची गंगाबाईंची नावडती लेक होती. यमूच्या अगोदर दोन मुली झाल्या होत्या. त्यामुळे यमू जन्माला आली त्या वेळेस मुलाची अपेक्षा असताना मुलगी झाली म्हणून आईची घोर निराशा झाली. आपली हतबलता, निराशेचा सर्व राग यमूवर निघत असे. अतिशय अमानुषरीत्या आई यमूला मारत असे. वडिलांची मात्र यमू लाडकी होती.
यमू ही लहानपणापासूनच कुशाग्र, धीट, प्रचंड बुद्धिमत्तेची मुलगी होती. वडिलांना आपली मुलगी ही असामान्य आहे व पुढील आयुष्यात काही तरी चांगले कार्य सिद्ध करून दाखवील असे सतत वाटे. 
तिचा धीटपणा, तल्लख बुद्धिमत्ता, दांडगेपणा, एकपाठीपणा आईच्या दृष्टीने मुलीच्या जातीला न शोभणारे वर्तन होते. आईच्या वागण्याचा यमूच्या मनावर प्रचंड आघात होत असे. यमूचे हे बालपण पाहताना कोणा एका तळ्यात बदकाच्या सुरेख पिल्लात कुरूप वेडे ठरलेल्या राजहंसाच्या पिल्लाची आठवण होते.
आनंदीच्या जीवनाला अर्थपूर्ण वळण देणारी व्यक्ती म्हणजे आनंदीचे पती गोपाळराव जोशी. गोपाळराव सुधारणावादी आणि शिक्षित असल्यामुळे आनंदीच्या वडिलांनी गोपाळरावांना आनंदीस शिकविण्यास सांगितले. त्या काळात गोपाळराव हे ठाण्याच्या पोस्टात नोकरी करत होते. गोपाळरावांचे संस्कृत व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं. याचा आपल्या मुलीला फायदा होण्यासाठी वडिलांनी गोपाळरावांना शिकविण्यास विनंती केली. शिकविताना यमूच्या बुद्धिमत्तेचा प्रत्यय त्यांना आला.
'एक तरी स्त्री शहाणी करीन नाही तर नावाचा गोपाळ नाही' हे त्यांनी ठामपणे बोलून दाखविले. गोपाळराव व आनंदी यांच्यात फक्त एक शिक्षक आणि शिष्य एवढेच नाते होते, पण वडिलांच्या आग्रहाखातर त्यांचा विवाह ठरला. त्या वेळेस यमू दहा वर्षांची होती व गोपाळराव तिच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे होते. ३१ मार्च १८७४ मध्ये यमूचा विवाह झाला व ती यमूची आनंदी झाली.
तत्पूर्वी भारतातील स्त्रियांची परिस्थिती अतिशय बिकट होती. स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या अतिशय क्लिष्ट होत्या. बालविवाह, अकाली मातृत्व यामुळे स्त्रियांना स्वत:च्या आरोग्याच्या कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागे. पुरुष डॉक्टर तुरळक होते, पण त्यांच्याकडून तपासण्यास स्त्रिया संकोचत.
सुईणींच्या निष्काळजीपणा, अज्ञानामुळे मुलांच्या, स्त्रियांच्या हालअपेष्टांना सीमा नव्हती. अशा वेळेस आपल्याच देशातील 'स्त्री डॉक्टर' असणे याची आवश्यकता समाजाला का भासली नाही? या साऱ्या पाश्र्वभूमीचा विचार करता आनंदी जोशी यांची डॉक्टर होण्याच्या स्वप्नाची भव्यता अधिक नजरेत भरते.
आनंदीच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून गोपाळरावांनी अलिबागला बदली करून घेतली.
त्या काळात त्यांना समाजाकडून कडाडून विरोध झाला. पत्नीला शिकविणारा, कौतुक करणारा पोस्टमास्तर टवाळकीचे लक्ष्य बनला. आनंदीचा अभ्यास घरच्या घरी चालू होता. त्या वेळेस आनंदी बारा वर्षांची असताना 'आई' झाली. मुलगा झाला, पण हा आनंद क्षणभंगुर ठरला. दहा दिवसांतच बाळ मरण पावलं. याचा मोठा मानसिक धक्का बसला, पण हाच क्षण आनंदीच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. या क्षणातूनच स्वत: डॉक्टर होण्याचं ध्येय निश्चित केलं.
दु:खाच्या घरटय़ातून बाहेर पडून मनाने स्वप्नांचे पंख पसरले. ज्या काळात स्त्रियांना शिक्षण देणं महापाप मानलं जाई, त्या काळात एका १२ वर्षांच्या मुलीने डॉक्टर होण्याची आकांक्षा मनात ठेवली होती.
आनंदीच्या शिक्षणाला पोषक वातावरण शोधण्याच्या लालसेने गोपाळरावांनी अनेक ठिकाणी स्थलांतर केले. भूज, कोल्हापूर, मुंबई, कलकत्ता हे शहर त्यांच्या स्थलांतराचे शेवटचे शहर ठरले.
भूजमध्ये असताना गोपाळरावांनी अमेरिकेत शिक्षणाला मदत मिळावी म्हणून आव्हानात्मक पत्र पाठविले होते. त्या पत्राला उत्तर म्हणून एक अनपेक्षित पत्र आनंदीसाठी आलं आणि ते पत्र अमेरिकेतील 'रोझेल' या शहरातील कार्पेटर दाम्पत्यांचं होतं. एका भारतीय पुरुषाने आपल्या पत्नीच्या शिक्षणासाठी धाडस करणं हे त्यांच्यासाठी कौतुकास्पद होतं. या पत्राने ज्ञानार्जनासाठी अमेरिकेतील दारं आनंदीसाठी ठोठावली गेली.
प्रत्येक ठिकाणी शिक्षण घेताना अत्यंत घृणास्पद वाईट अनुभव येत असे. रस्त्यावरील लोक आनंदीला हसत, खडे मारत, वाईट बोलत. त्यांच्या नजरेत तिरस्कार, घृणा असे. हिंदुस्तानात कुठेही गेले तरी हाच अनुभव येणं अपरिहार्य होतं.
दररोज नवीन संकटे पुढय़ात असत. संकटे ही आत्मविकासाची सुवर्णसंधी बनत जाते व त्यातूनच या दाम्पत्याने देश सोडण्याचा निर्णय घेतला. पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आनंदीला एकटेच सातासमुद्रापलीकडे पाठविण्याचा निर्णय गोपाळरावांनी घेतला.
थियोडोसिया कार्पेटर मावशीकडून पत्रव्यवहारातून अमेरिकेतील प्रवासाची माहिती घेतली.
आनंदी वैद्यकीय शिक्षणासाठी ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार होती ते अमेरिकेतील पहिले 'फीमेल मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्व्हिनिया' हे जगातील पहिले कॉलेज १८५० साली स्थापन झाले.
आनंदीच्या देशांतराचे वारे भारतभर फिरू लागले आणि ही बाई आता धर्मातर करणार म्हणून लोकांच्या घोषणा, बहिष्कार टाकण्याच्या धमक्या यामुळे हे दाम्पत्य त्रस्त झाले होते. लोकांना त्यांच्या प्रश्नाचे जाहीरपणे उत्तर देण्यासाठी आनंदीने ठिकठिकाणी भाषणं दिली व भाषणातून आपल्या डॉक्टर होण्याची आवश्यकता काय ते पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आपल्या धर्मात, पोशाखात कुठलाच बदल होणार नाही याची ग्वाही दिली.
अमेरिकेत जाण्यासाठी निधीची जमवाजमव केली. ७ एप्रिल १८८३ रोजी 'सिटी ऑफ कलकत्ता' या आगबोटीने आनंदीचे अमेरिकेला प्रस्थान झाले.
दोन महिन्यांच्या प्रवासात आनंदीला अतिशय क्लिष्ट, त्रासदायक गोष्टींना सामोरे जावे लागले.
थंडी, वारा, उन्हाचा तडाखा, खाण्याचे हाल आणि त्यात एकटेपणाचा अनुभव यामुळे आनंदीला अतिशय असुरक्षित प्रवास करावा लागला. त्या दोघांच्या विरहपर्वाला सुरुवात झाली होती, पण त्याचा शेवट माहीत नव्हता. समुद्र प्रवासामुळे आनंदीची प्रकृती बिघडत होती. अशात तिने पुस्तकांनाच आपला सोबती केले. आनंदीला तिच्या धैर्यापासून परावृत्त करण्याच्या अनेक घटना घडल्या, पण ध्येयवादी आनंदी मागे हटली नाही.
अमेरिकेत गेल्यावर कार्पेटरांकडे आनंदीला आपले बालपण गवसले. अतिशय प्रेमाची, जिव्हाळ्याची माणसं तिला मिळाली. सौम्य व्यक्तिमत्त्व, सात भाषांचे ज्ञान व सफाईदार इंग्रजी बोलणारी ही 'लिटिल वूमन' सर्वाना तिथे नवलाईची वाटे.
आनंदी मॅट्रिकची परीक्षा पास झाली आणि ती अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरात आली. आनंदीचे कॉलेजचे जीवन सुरू झाले. पेनसिलव्हिनिया कॉलेजमध्ये आनंदीने प्रवेश घेतला. 'डीन रिचेल बॉडले' या शिक्षिका होत्या. त्यांनी आनंदीला तिच्या ज्ञानार्जनाच्या खडतर प्रवासात वेळोवेळी मदत केली. 'ऑबस्टेट्रिक्स' प्रसूतिशास्त्र हा विषय आनंदीने खास म्हणून निवडला होता.
ज्ञान आत्मसात करण्यास २४ तासही अपुरे पडत होते. त्यात बदललेल्या वातावरणामुळे तब्येतीच्या कुरकुरी चालू झाल्या. आनंदी धर्मातर करेल, अशा अफवा भारतात पसरू लागल्या. समाजाबरोबरच गोपाळरावांचे दुटप्पी वर्तन दिसू लागले. ते पण आनंदीच्या विरोधात बोलू लागले. त्यांच्या अहंभावामुळे त्यांच्यात विक्षिप्तपणा आला. यामुळे आनंदीच्या मानसिक खच्चीकरणाला सुरुवात झाली. वेगवेगळ्या निनावी पत्राने आनंदी दु:खी होत असे. हिंदुस्तानी समाजाने तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं.
अशातच महत्त्वाची घटना म्हणजे आनंदीच्या तीन वर्षांच्या अविश्रांत जीवनक्रमाचं सार्थक झालं तो क्षण म्हणजे 'पदवीदान समारंभ'.
'डॉक्टर ऑफ मेडिसिन' या पदवीसाठी विद्यार्थिनींना एक प्रबंध लिहावा लागे. आनंदीबाईंचा प्रबंध हा ५० पानांचा होता. Obstetrics - ''Among The Aryan Hindoos'' हे प्रबंधाचे नाव होते.
गोपाळरावांचे अमेरिकेत आगमन झाले. खरंतर त्यांच्या येण्याने आनंदी सुखावणार होती, पण त्यांच्या लहरी, दुटप्पी वागण्याने आनंदी खिन्न झाली. सारं काही निमूटपणे सोसत राहण्याची वृत्ती आनंदीमधील निर्भीडपणा, खंबीरपणा यांना घातक ठरली.
पदवीदान समारंभ म्हणजे आनंदीच्या जीवनातील परमोच्च आनंदाचा आणि साफल्याचा कृतार्थ क्षण होता. आशिया खंडातील एका पौर्वात्य विद्यार्थिनीला 'डॉक्टर ऑफ मेडिसिन' ही पदवी मिळाली.
११ मार्च १८८६, गुरुवार या दिवशी अमेरिकेतील अ‍ॅकेडमी ऑफ म्युझिक या उत्तम ध्वनिनियंत्रण वास्तूत 'ग्रीन रूम' सभागृहात अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष, प्रतिष्ठित डॉक्टर, नागरिक यांच्या उपस्थितीत तीन हजार जनसमुदायांत भारतीय परंपरावादी पोशाख परिधान केलेल्या आनंदीबाईंचा हा पदवीदान सोहळा भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरला.
मायदेशी परतण्याच्या आधीच कर्तबगारीला वाव असलेलं एक सुंदर भविष्य आनंदीची वाट पाहात होतं. ज्या संस्थानाच्या दबावामुळे आनंदीची शाळा बंद झाली होती, त्या कोल्हापूर संस्थानातील 'अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल'मध्ये दरमहा ३०० रुपये मानधन 'स्त्री डॉक्टर' म्हणून त्यांची नेमणूक होणार होती.
बोस्टन, रोझेल शहरांचा निरोप घेऊन ९ ऑक्टोबर १८८६, रविवार या दिवशी न्यूयॉर्क बंदरातून 'इटरुटिया' या बोटीने आनंदी-गोपाळ हिंदुस्तानात येण्यास निघाले.
परतीच्या वाटेवर आनंदीचे आजारपण वाढतच गेले. शारीरिक व मानसिक आघातांमुळे आनंदीचा आजार प्रबळ ठरला. त्या अवस्थेला सिंहाचा वाटा असणारे गोपाळराव व सतत आरोप करणारा भारतीय समाज होता. दोन महिन्यांच्या या जलप्रवासात तिने प्रकृतीच्या यमयातना सहन केल्या. तिची प्रकृती जसजशी ढासळत गेली तसा बदल गोपाळरावांमध्ये झाला. तिची प्रेमाने सेवा-शुश्रूषा करत होते. अखेर १६ नोव्हेंबर १८८६ ला बोट मुंबई किनाऱ्याला लागली. उपस्थितांनी आनंदीवर पुष्पवृष्टी केली. तिच्या विषयीचा आदर, प्रेम, धन्यता या मंडळींनी प्रकट केली. स्वदेशी आल्यावर आनंदीची मनाची उमेद वाढली होती, पण प्रकृती, शरीर साथ देईनासे झाले होते. मुंबईतील अनेक डॉक्टरांनी आनंदीवर औषधोपचार केले, पण 'क्षयरोग' शेवटच्या अवस्थेत असल्यामुळे इलाज मिळत नव्हता.
शेवटी आनंदी आपल्या जन्मस्थानी आजोळी पुण्यात बाळशास्त्री माटय़ांच्या वाडय़ात आली. पुण्यातील अनेक डॉक्टर, वैद्य यांच्याकडून उपचारांना सुरुवात झाली.
आनंदी आता 'अस्थी व चर्म' यांचा सापळा झाली होती. गोपाळरावांकडे तिने अखेरची इच्छा मागितली ती म्हणजे माझी रक्षा कार्पेटर मावशीकडे पाठवावी.
२६ फेब्रुवारी १८८७ रोजी आनंदीची अवस्था अतिशय त्रस्त, असहाय्य झाली होती. तिच्या ओठातून असहाय्य शब्द बाहेर पडले, 'माझ्या हातून जेवढं झालं तेवढं मी केलं!' क्षणार्धात हाताला नाडी लागेनासी झाली.
आनंदीची झुंज संपली..
अमेरिकेच्या दिशेने दुसऱ्यांदा प्रवास करणार होता ती आनंदी नव्हे तर तिचा रक्षाकलश. गोपाळरावांनी आनंदीची अखेरची इच्छा पूर्ण केली. अमेरिकेतील 'पोकीस्पी' गावी आनंदीची समाधी झाली.
थोडक्यात, एकोणिसाव्या शतकात स्त्री-शिक्षण, परदेशगमन, समुद्र उल्लंघन हे  महापाप मानले जात असताना परदेशात उच्च शिक्षण घेऊन 'डॉक्टर ऑफ मेडिसिन' ही पदवी मिळवून डॉ. आनंदीबाई जोशींनी भारतीय स्त्री-शिक्षणाच्या इतिहासात एक विक्रमच नोंदविला.
या पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टरने विज्ञान युगाबरोबरच कला, कायदा अशा अनेक क्षेत्रांचा दरवाजा उघडून दिला. शोकान्त पण यशस्वी अशी ही आनंदीची जीवनगाथा अनेकांना स्फूर्ती, प्रेरणा देऊन गेली.
भारतात ठिकठिकाणी स्त्री डॉक्टरांचे दवाखाने दिसू लागले. रखमाबाई, नागुताई, काशीबाई, माणकबाई, कृष्णाबाई अशा तेजाच्या ज्योती प्रज्वलित झाल्या आणि त्यांनी आपला काळ उजळून टाकला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात कल्याण, पाली, रत्नागिरी, संगमेश्वर या शहरांत डॉ. अशोक मोडक, कोकण पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली 'रुग्ण सहाय्यक प्रशिक्षण वर्ग' चालविले जातात.
'कोकण पदवीधर मंच' कल्याणमध्ये २००४ मध्ये स्थापन झाला. या मंचात वनवासी क्षेत्रातील स्त्रिया व मुलींना नर्स आणि आयांचे प्रशिक्षण दिलं जातं. अनेक हॉस्पिटल्समध्ये त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 'लोकविद्यालय' या संकल्पनेतूनच या विद्यापीठाचा रुग्ण सहाय्यक हा अभ्यासक्रम 'कोकण पदवीधर मंच' ठिकठिकाणी राबवीत आहे. डॉ. अंजली कीर्तने यांनी आनंदीबाईंवर केलेल्या लघुपटाला राज्य शासनाचा सवरेत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला होता.
आनंदीबाई जोशींच्या स्मरणार्थ कल्याणमधील अनेक महिला मंडळांत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. कल्याणकरांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट नाही का?
अशा या उत्तुंग भरारी घेतलेल्या बुद्धिमान, ध्येयवादी स्त्रीने तिच्या २२ वर्षांच्या ३१ मार्च १८६५ ते २६ फेब्रुवारी १८८७ या अल्पावधीत आपल्या भारतीय समाजातील अज्ञानाच्या अंधारात चाचपडणाऱ्या स्त्री जातीला ज्ञानाची ज्योत दाखवून ज्ञानाच्या मार्गातील प्रकाशवाट दाखविली आहे.


No comments:

Post a Comment