बोल्ट लिजेंड झाला
द्वारकानाथ संझगिरी

उसेन
बोल्टने इतिहास निर्माण केला. दोनशे मीटर्सच्या शर्यतीत त्याने सुवर्णपदक
मिळवलं. शंभर आणि दोनशे मीटर्सच्या शर्यतीत दोनदा सुवर्णपदक मिळवून
एकमेवाद्वितीय झाला. गंमत म्हणजे त्याने स्वत: जाहीर करून टाकलं, ‘मी आता
लिजेंड आहे. मी आता सर्वोत्तम आहे.’ त्याच वेळी त्याने कार्ल लुईस या महान
धावपटूवरही तोंडसुख घेतलं. ऑलिम्पिकमध्ये जिंकल्यावर आनंद व्यक्त करताना
वेगवेगळ्या तर्हा खेळाडूंच्या पाहायला मिळाल्या. सायकलपटू विगिन्सने जाहीर
केले की तो तर्र झाला. शूटर पीटर विल्सननेही साधारणत: तेच केलं. सुवर्णपदक
मिळाल्यावर तो म्हणाला, ‘मी खूप खूप दारू पिणार आणि काहीतरी मूर्खपणा करणार.’
२००८ साली इंग्लंडच्या क्रिकेट संघाने ऍशेस जिंकलं. त्यानंतर त्यांची मिरवणूक
निघाली. मिरवणूक ‘१० डाऊनिंग’ म्हणजे पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेली.
खेळाडू पंतप्रधानांना भेटायला खाली उतरले. टोनी ब्लेअर तेव्हा पंतप्रधान होते.
त्यावेळी इंग्लंडच्या फ्लिण्टॉफने पहिलं काय केलं असेल तर मिसेस ब्लेअरना
टॉयलेट कुठाय विचारलं. शेवटी शरीरातील दारू बाहेर फेकावी लागतेच ना? परवा
लंडन ऑलिम्पिकमध्ये पोलिसांनी जोशूआ बूथ या ऑस्ट्रेलियन रोविंगमधल्या खेळाडूला
अटक केली. कारण त्याने पहाटे लंडनमधील एका दुकानाचा दरवाजा खराब केला. पुन्हा
एकदा हा अंगातील दारू बाहेर फेकण्याचा प्रकार होता. पाश्चात्य देशांत दारूही
‘अपेय’ मानली जात नाही. फक्त तुमचं वय महत्त्वाचं. दुसरं म्हणजे, खेळापूर्वी
मद्य निषिद्ध मानलं जाते. नंतर डोक्यावरच्या दबावातून मोकळं होण्यासाठी, ताण
दूर करण्यासाठी घेतलेली दारू ही विजय साजरा करण्याची बाब मानली जाते. एकदा तर
१९५६ साली मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये इंग्लंडचा धावपटू ख्रिस ब्रॅशट ३००
मीटर्सच्या स्टिपलचेस स्पर्धेत पहिला आला. मग दुसर्या धावपटूला अडथळा
निर्माण केला म्हणून त्याला अवैध ठरविण्यात आले. पुन्हा त्याने अपील केल्यावर
त्याला सुवर्णपदक परत देण्यात आलं. त्यानंतर तो थेट लिक्विड डाएटवर गेला. इतका
की पोडियमवर सुवर्णपदक स्वीकारतानाही तो तर्र होता. त्याच्या गळ्यात
सुवर्णपदक घालण्यासाठी जेव्हा इंटरनॅशनल ऑलिम्पिकचा अधिकारी पुढे आला तेव्हा
तो खेळाडू त्याच्या गळ्यात पडला. त्याला सावरायचं की सुवर्णपदक त्या
खेळाडूच्या गळ्यात घालायचं हे त्या अधिकार्याला कळत नव्हतं.
उसेन बोल्टने विजयानंतर जमैकन रमचा आस्वाद घेतला की नाही ठाऊक नाही, पण रमपेक्षा त्याला यशच सर्वात मोठी किक देऊन गेलं. सर्वसाधारणपणे विद्या विनयेन शोभते, तसं यश विनयेन शोभते हे मानलं जातं. महान खेळाडूला इगो असतो. त्याला आपलं मोठेपण कळत असतं. त्याचा त्याला अभिमान म्हणा किंवा गर्वही असतो. पण काही मंडळी चेहर्यावर विनयाचा मुखवटा चढवू शकतात. काहींना जमत नाही. काहींना मोठेपण मिरवावंसं वाटतं. ज्यांना मिरवावंसं वाटतं त्यात बोल्ट आहे. ही वृत्ती महंमद अलीमध्ये होती. ती विव्ह रिचर्डस्मध्ये होती. ही बोल्टमध्ये आहे. मुळात हे तिघेही आक्रमक आहेत. ते तिघेही काळे आहेत हा अपघात नाही. एकेकाळी काळ्यांनी गुलामांचं जीवन जगलंय. त्यांच्यातल्या असामान्य ताकदीचा तेव्हा त्यांना अंदाज नव्हता. गुलामीच्या बेड्या तुटल्यावर आणि स्वत:तल्या असामान्यत्वाची त्यांना कल्पना आल्यावर त्यांचा विद्रोह वाढला. लाकडाचा तुकडा पाण्यात दाबला तर तो वर जोरात उसळतो. विद्रोहामुळे त्यांचं मन असं उसळी घेतं. म्हणूनच त्यांचं मोठेपण त्यांना ओरडून सांगावंसं वाटतं. ते त्यांच्या खेळातून, त्यांच्या कृतीतून हे मोठेपण दाखवण्याचा प्रयत्न करतातच, पण त्याचबरोबर जग जणू अजून त्याची दखल घेत नाही असं मानून ओरडूनही सांगतात. आपल्या भोवतालचं वलय वाढवण्याचाही हा प्रकार असतो आणि आजच्या ब्रॅण्ड आणि मार्केटिंगच्या जमान्यात त्याचा फायदा होतो. तुम्हाला यशाबरोबर नाट्य जमलं पाहिजे. बोल्ट जे नाट्य त्याच्या धावण्यातून उभं करतो ते त्याच्या धावण्याबरोबर संपत नाही. धावण्याबरोबर त्या नाटकाचा पहिला अंक संपतो. दुसरा अंक असतो. त्याच्या त्या जिंकल्यानंतरच्या स्टाइल्स आणि अदा आणि तिसरा अंक त्याची प्रेस कॉन्फरन्स आणि त्यात त्याच्या अहंकाराची उधळली जाणारी फुलं. त्यातून एक बोल्ट पॅकेज तयार होतं आणि त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढत जाते.
यावेळी त्याच्या वाटेला कार्ल लुईस गेला. बोल्टचं आणि कार्ल लुईसचं क्षेत्र तसं सारखं. लुईस थोडा जास्त अष्टपैलू. तो लांब उडीतही पदकं मिळवायचा. लुईस अमेरिकेचा आणि बोल्ट जमैकाचा! धरणी एक असली तरी कौरव-पांडव सर्वत्र असतात. दोन देशांच्या स्पर्धेबद्दल मी या स्तंभात लिहिलंच होतं. लुईसच्या काळात तेव्हा काही ड्रग्सची प्रकरणे जमैकात घडली होती आणि आजही अपेक्षेपेक्षा कुणी वेगात धावलं, कुणी लांब उडी मारली, कुणी वेगात पोहलं, कुणी अचाट ताकद दाखवली की पहिली शंका ड्रग्जचीच येते.
आणखी एका गोष्टीचा ऊहापोह करायला हवा. लुईस आणि बोल्ट यांच्या पिढीत अंतर आहे. दोन वेगवेगळ्या पिढ्यांत सख्य असतंच असं नाही आणि त्यावेळेचं ते ग्रेट हे नेहमी सर्वांनाच वाटतं. जमैकाच्या मायकल होल्डिंगला विचारलंत की मोठा कोण, त्याच्या वेळचा लॉरेन्स रो की ख्रिस गेल? तो झोपेतही लॉरेन्स रो सांगेल. दोघंही जमैकाचे. त्यामुळे ही मतं नेहमीच सबजेक्टिव्ह असतात आणि मुळात सर्वश्रेष्ठ ऑलिम्पियन किंवा धावपटू किंवा स्प्रिंटर ठरवणं कठीणच आहे. बोल्ट सर्वश्रेष्ठ आहे की नाही त्यात पडण्यापेक्षा आपण बोल्ट पाहिला यात आनंद मानू. त्याचा शंभर आणि दोनशे मीटर्सचा विश्वविक्रम कुणी मोडला तर मला एकतर ते स्वप्न पडलं असं वाटेल किंवा तो माणूस परग्रहावरचा असावा असे वाटेल.

No comments:
Post a Comment