Privacy Policy

Wednesday, August 22, 2012

"मिस्टर इंडिया' व्हायचंय? Do you want to be Mr. India?

"मिस्टर इंडिया' चित्रपटात अदृश्‍य होणारा अनिल कपूर आठवतोय? त्याच्याकडे जसं "घड्याळ' हे गॅझेट होतं, तसं एखादा "चष्मा' तुम्हाला मिळाला तर? फक्त हा चष्मा इंटरनेट कनेक्‍टेड असेल आणि मनुष्याला अदृश्‍य करण्याऐवजी त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी समोर आणेल किंवा पूर्ण करेल... "गुगल'ने हे स्वप्न पाहिलंय आणि त्यांच्या "लॅब'मध्ये याबाबत प्रयोग सुरू आहेत.

हातामध्ये घड्याळाचे गॅझेट घालून गायब होणाऱ्या "मिस्टर इंडिया'चे आकर्षण कोणाला नाही? असंच एखादं गॅझेट आपल्याला मिळावं आणि मनात येईल त्याप्रमाणे गोष्टी घडाव्यात, अशी स्वप्ने फक्त तुम्ही-आम्ही सामान्य माणसंच नव्हे तर अनेक शास्त्रज्ञही पाहत आहेत. आता तर वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे आणखी भन्नाट "कन्सेप्ट्‌स'चा विचार केला जात आहे. असंच एक स्वप्न पाहिलंय "गुगल'ने.

एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी मॅप व डायरेक्‍शन्स, मित्र-मैत्रिणींबरोबर व्हिडिओ चॅटिंग ते "ट्‌विटर' किंवा फेसबुकचे अपडेट्‌स... स्मार्ट फोन किंवा टॅबचा आणि मुळात तुमच्या हाताचाच वापर न करता या सर्व गोष्टी अक्षरशः तुमच्या डोळ्यांसमोर दिसतील आणि मनात आलेल्या विचारांप्रमाणे त्यावर ऍक्‍शन घेता येईल, असा "इंटरनेट कनेक्‍टेड' चष्मा तयार करण्यासाठी गुगलची धडपड सुरू आहे. "प्रोजेक्‍ट ग्लास' असं त्याचं नामकरण गुगलनं केलं असून, ही "कन्सेप्ट' नेमकी काय आहे, याचा एक व्हिडिओ त्यांनी नुकतीच रिलीज केली आहे. गेल्या तीन, चार दिवसांत या व्हिडिओला सुमारे एक कोटी हिट्‌स मिळाल्या आहेत.

एखादं छान दृष्य बघितल्यावर "कॅमेरा असता तर याचा मस्त फोटो आला असता,' असा विचार आपल्या मनात अनेकदा येतो. गुगलच्या "ग्लास'द्वारे तुम्ही हा "इन्स्टंट' फोटो फक्त डोळे ब्लिंक करून काढू शकाल किंवा उकाडा वाढल्यासारखं वाटलं तर नेमकं तापमान किती आहे हे तुमच्या डोळ्यासमोरच दिसेल.
"टेक्‍नॉलॉजी लोकांसाठी आहे. ती पाहिजे तेव्हा असली पाहिजे आणि नको असेल तेव्हा बाजूला झाली पाहिजे. अशाप्रकारची टेक्‍नॉलॉजी तयार करण्यासाठी गुगल एक्‍स लॅब्ज प्रयत्नशील आहे. "प्रोजेक्‍ट ग्लास'ची माहिती तुमच्यापर्यंत पोचवतोय, कारण त्याबाबत तुमच्याशी संवाद साधायचा आहे आणि तुमच्या व्हॅल्युएबल फीडबॅकमधून शिकायचं आहे,' असं आवाहन गुगलने त्यांच्या वेबसाइटवर केलं आहे.

तर मग, तुम्ही पण पाठवा तुमची सजेशन्स "गुगल लॅब्ज'कडं. कोणास ठाऊक गुगलचा ग्लास घालणारे उद्याचे "मिस्टर इंडिया' तयार करण्यात तुमचाही खारीचा वाटा असेल!

No comments:

Post a Comment