Privacy Policy

Saturday, November 17, 2012

बाळासाहेब गेले; मराठी मन सुन्न Bal Thakre - Shiv Sena chief Bal Thackeray passes away in Mumbai

मराठी अस्मितेचा बुलंद आवाज... ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्कर्ते... देशाच्या राजकारणातील चमत्कार... लाखो ह्दयांचे अनभिषिक्त सम्राट... तमाम शिवसैनिकांचे आधारवड... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आज, शनिवारी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. गेली साडेचार दशकं आपल्या एका ' आदेशावर ' देशाचं राजकारण फिरवणा-या या महानेत्याच्या निधनामुळे अवघे मराठी मन सुन्न झालं आहे. बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम करणा-या शिवसैनिकांच्या दुःखाला तर पारावार उरलेला नाही.

बाळासाहेबांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरीच खालावली होती. त्यांना श्वसनाचा त्रासही जाणवत होता. लीलावती रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत होते. मंगळवारी त्यांची तब्येत अधिकच नाजुक झाल्यानंतर त्यांना सातत्यानं ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर, अखेरच्या क्षणी बाळासाहेबांना व्हेंटिलेटरवर ठेवून डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. मात्र, या उपचारांना प्रतिसाद देणे थांबले आणि वांद्रे येथील ' मातोश्री ' निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीय मृत्यूसमयी त्यांच्यासोबत होते.

शिवसेनेच्या स्थापनेपासून महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जीवन ढवळून काढणारे ' बाळासाहेब ठाकरे ' नावाचे वादळ गेल्या काही काळापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे काहीसे शांत झाले होते. मागच्या दोन वर्षांपासून त्यांनी सक्रीय राजकारणातून अंग काढून घेतले होते. शिवसेनेचा दसरा मेळावा, महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाचा सोहळा, वरळीच्या जांभोरी मैदानात झालेले वारकरी संमेलन, महापालिका निवडणुकीची शिवतीर्थावरील सभा आणि जुहूतील एका हॉटेलात झालेले पुस्तक प्रकाशन असे मोजके कार्यक्रम वगळता बाळासाहेबांनी घराबाहेर पडणे बंद केले होते. ' मातोश्री ' वरूनच ते शिवसेनेचे संघटनात्मक निर्णय घेत होते. पक्षाच्या मुखपत्रातून भूमिका मांडत होते. उद्धव ठाकरे यांना मार्गदर्शन करत होते. लोकांच्या भेटीगाठीही घेत होते.

नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी शिवसैनिकांना व्हिडीओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले होते. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत शिवसैनिकांना आपल्या ढासळत्या प्रकृतीची कल्पना दिली होती. बाळासाहेबांचे ते भाषण पाहून, धीरोदात्त नेत्याचं हे भावनिक आवाहन ऐकून हजारो शिवसैनिकांचं मन हेलावलं होतं. सा-यांनाच त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता लागून राहिली होती. आपल्या लाडक्या नेत्याच्या प्रकृतीला आराम पडावा अशी प्रार्थना शिवसैनिकच नव्हे, तर इतर पक्षांतील त्यांचे चाहतेही मनोमन करत होते. अनेक बड्या राजकीय नेतेमंडळींनी, सामाजिक-सांस्कृतिक-कला क्षेत्रातील मान्यवरांनी ' मातोश्री ' वर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. बाळासाहेबांच्या दीर्घायुसाठी यज्ञही केले जात होते. मात्र, ' जातस्य हि ध्रुवा मृत्यु ' या उक्तीप्रमाणे अखेर ती दुर्दैवी बातमी आली. बाळासाहेब नावाचं एक वादळी पर्व संपलं आणि अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला, देश-विदेशातील मराठी माणूस सुन्न झाला.

No comments:

Post a Comment