Privacy Policy

Wednesday, November 14, 2012

बाळासाहेब ऑक्सिजनवर, आहार बंद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व्हेंटिलेटरवर नाहीत, पण त्यांना सातत्यानं ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतोय, असं वृत्त ' पीटीआय ' नं दिलं आहे. बाळासाहेब कुठलाही आहार घेत नसल्याचंही या बातमीत नमूद करण्यात आलंय.

balasaheb thackeray 
 गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेबांना श्वसनाचा त्रास होतोय. गेल्या शुक्रवारपासून तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत, तसंच ठाकरे कुटुंबातील सदस्यही ' मातोश्री ' वरच उपस्थित आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही दोन-तीन वेळा बाळासाहेबांना भेटून गेलेत. बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असून त्यांनी सूप आणि फळं खाल्ल्याचं राज यांनी शनिवारी सांगितलं होतं. पण, कालपासून बाळासाहेब काहीही खात नसल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. बाळासाहेबांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतोय, पण ते व्हेंटिलेटरवर नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी ' मातोश्री ' वर फोन करून बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यावेळी बाळासाहेब आराम करत असल्यानं शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच पवारांना त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिल्याचं समजतं. तसंच, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांनीही ' मातोश्री ' वर जाऊन शिवसेनाप्रमुखांची आस्थेनं विचारपूस केली. याआधी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, लता मंगेशकर, छगन भुजबळ आदिंनीही ' मातोश्री ' वर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली आहे.

No comments:

Post a Comment