भोसरीच्या पेंटरचा विक्रम : विक्रम करण्याचा मनोदय
पिंपरी : वहीच्या पानाच्या एका ओळीत १0 ते १५ शब्द याप्रमाणे संपूर्ण पानभर जवळपास ३00 शब्द लिहिता येतात. मात्र, एका तरुण पेंटरने एका ओळीत एकूण १ हजार वेळा ‘राम’ हा शब्द लिहिला आहे. तेही कोणत्याही विशेष साधनाचा वापर न करता. या प्रकारे एका पानावर ३0 हजार वेळा ‘राम’ लिहिण्याचा विक्रम त्याने केला आहे.
भोसरी येथे वास्तव्यास असलेल्या या पेंटरचे नाव गजानन दत्तू बाजड (३४) असे आहे. विदर्भातून ३ वर्षांपूर्वी तो येथे आला. पेंटिंग करून पत्नी व २ मुले अशा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. काहीतरी वेगळे करण्याचे स्वप्न तो उराशी बाळगून होता. मात्र, रात्री कामावरून आल्यानंतर लिहिण्याचा छंद जडला. छोट्या खोलीत मोबाइल टॉर्चच्या उजेडात तो साध्या वहीत राम हा शब्द लिहीत असे. सर्वच जण असे लिहितात. मग, आपण काहीतरी वेगळे करावे ्नहा विचार केला. पहिल्याच प्रयत्नात त्याने तब्बल १५ हजार शब्द लिहिले. हे करू शकल्याने गजाननचा आत्मविश्वास वाढला. पुन्हा जोमाने प्रयत्न करीत त्याने फुलस्केप वहीच्या पानावर (आकार - ६ बाय ९ इंच) एकूण ३0 हजार शब्द लिहून काढले. त्यासाठी जवळपास ७ दिवस लागले. यासाठी त्याने साधा बॉलपेन वापरला.
भविष्यात ही संख्या आणखी वाढविण्याची त्याची मनीषा आहे. उघड्या डोळ्यांनी हे शब्द वाचता येत नाहीत. इतक्या छोट्या अक्षरात ते लिहिले आहेत. अशा प्रकारे एका पानावर सर्वाधिक शब्द लिहून लिम्का बुक व गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्याचा प्रयत्न असल्याचे गजानन बाजड याने सांगितले.
No comments:
Post a Comment