Privacy Policy

Thursday, September 5, 2013

३० हजार लोक (इंग्रज) २० कोटी तेजस्वी, हुशार लोकांना गुलाम कसे करू शकतात?

टॉलस्टॉयचा पणतू भेटला तेव्हा...

लिओ निकोल्विच टॉलस्टॉय. केवळ रशियापुरताच नव्हे तर साऱ्या जगातील वाङ्मयजगतात अढळ स्थान मिळवणारा तत्त्वचिंतक लेखक. टॉलस्टॉयचा पणतू असलेल्या गोरान स्टीफर्ट यांना भेटण्याची संधी अचानकपणे २००१ मध्ये लाभली. जगभर पसरलेल्या ‘टॉलस्टॉय क्लॅन’चे ते स्वीडिश सदस्य. अनेक देशात विखुरलेला टॉलस्टॉय परिवार दरवर्षी यास्नाया पोलियाना येथे टॉलस्टॉयच्या पारंपरिक घरी एकत्र येतो. या वर्षीचा या परिवाराचा खास उत्सव असणार आहे तो लिओ आणि सोफिया (सोन्या) टॉलस्टॉय यांच्या विवाहाचा १५० वा स्मृतीसोहळा साजरा करण्याचा!
टॉलस्टॉय! जगाच्या इतिहासात कोरलं गेलेलं एक ठळक नाव. एकोणिसाव्या शतकाची अठ्ठय़ाहत्तर आणि विसाव्या शतकाचं पहिलं दशक पाहिलेला हा महामानव. त्याच्या हयातीतच तो उदंड कीर्तीचा आणि प्रचंड तिरस्काराचाही धनी झाला होता. त्याचं सबंध आयुष्य म्हटलं तर अत्यंत संपन्न होतं.. आणि तरीही एकेकाळचा काउन्ट (सरदार) असलेला मनस्वी लिओ वयाच्या ब्याऐंशिव्या वर्षी वैफल्यग्रस्त अवस्थेत पहाटेच्या सुमारास घर सोडून निघून गेला आणि अ‍ॅस्टोपोवो रेल्वे स्टेशनवर मृत्यूच्या अधीन झाला. ‘मला अडवू नका. गरीब शेतकरी कसे जातात.. तसंच जाऊ द्या’ असं सांगणाऱ्या टॉलस्टॉयचे अखेरचे शब्द होते- ‘सत्य! त्याचेच महत्त्व मला सगळ्यात जास्त वाटते.’ २८ ऑक्टोबरपासून अज्ञातवासात निघालेले टॉलस्टॉय २० नोव्हेंबर १९१० रोजी अनंतात विलीन झाले ही गोष्ट मात्र सगळ्या जगाला कळली. त्यांचे जगभरचे चाहते हळहळले. त्यातलं एक नाव होतं दक्षिण आफ्रिकेत गोऱ्या जुलमी राजवटीविरुद्ध अहिंसक लढा पुकारणाऱ्या एका वकिलाचं. मोहनदास करमचंद गांधी. पुढे हाच माणूस टॉलस्टॉयचा संदेश घेऊन जगात ‘महात्मा’ म्हणून ख्यातकीर्त होणार होता.
याच महात्मा गांधींचा अर्धपुतळा स्वीडनमधल्या आपल्या घरी आदराने ठेवणारा गोरान स्टीफर्ट नावाचा लिओ टॉलस्टॉयचा पणतू २००१ मध्ये भारतात आला होता. ‘स्वीडिश मॅच’ या कंपनीत ‘ह्य़ुमन रिसोर्स’ विभागात काम करणाऱ्या गोरान यांची आणि माझा मित्र रवीन्द्र वाघमारे यांची भेट ब्राझीलमधल्या एका व्यावसायिक परिषदेत झाली होती. तिथून परतल्यावर रवीन्द्रने मला त्यांच्याविषयी सांगितलं आणि ते लवकरच भारतात येणार आहेत असंही म्हणाला.
गोरान इथे आल्यावर आमचा भेटीचा दिवस ठरला. नेमकी त्या दिवशी माझ्या दाढदुखीने उचल खाल्ली. रेकॉर्डिगची तयारी केली होती, पण बोलायचं कसं? औषधांचा मारा करून दुखणं तात्पुरतं थांबवलं. कदाचित रवीने गोरानना हे सांगितलं असावं, कारण हस्तांदोलन करताच त्यांचा पहिला प्रश्न होता, ‘तुझी दाढ कशी आहे?’
‘उत्तम!’ मी म्हटलं आणि मोकळ्या वातावरणात गप्पांना सुरुवात झाली. मायक्रो कॅसेट असलेला रेकॉर्डर समोरच ठेवला होता. सागर केरकर फोटो घेत होता.
आपल्या पणजोबांविषयी कोणीतरी इतक्या आस्थेने बोलायला आलंय याचं त्यांना कुतूहल वाटत होतं. आपण टॉलस्टॉयच्या विशाल कुटुंबाचा एक वंशज असल्याचा अभिमान त्यांच्या बोलण्यातून डोकावत होता. इंग्लिशवर स्वीडिश उच्चारांचा प्रभाव जाणवत होता.
‘माझ्या आईचे वडील म्हणजे लिओ टॉलस्टॉय यांचा मुलगा. म्हणजे मी त्यांचा ग्रेट ग्रॅण्डसन. माझे पणजोबा खरोखरच एक महान माणूस होते. आम्ही स्वीडनमध्ये राहत असलो तरी बालपणापासून आपण टॉलस्टॉय घराण्यातले आहोत याची कल्पना होती. स्वीडनमध्ये अनेक टॉलस्टॉय कुटुंबीय आहेत. आम्ही तिथेही त्यांची स्मृती जतन केली आहे. सर्वसामान्य, विशेषत: पीडित माणसांविषयी त्यांना वाटणारी आस्था खूपच होती. त्यांच्यासाठीच त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. सामान्यांमध्ये मिसळून त्यांचं प्रबोधन करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला.’
गोरान स्वीडनमधल्या शाळेत असताना त्यांना टॉलस्टॉय यांच्या जीवनावर प्रेझेन्टेशन सादर करण्याची संधी मिळायची. त्यांच्या आईला सात भावंडं होती. गोरान म्हणाले, ‘रशियातील १९१७ च्या कम्युनिस्ट क्रांतीनंतर या सर्वाना रशिया सोडावा लागला. आजी मुलांना घेऊन स्वीडनला आली. आजोबा सोडून गेले होते.’
टॉलस्टॉयसारख्या अहिंसेचं, सहिष्णुतेचं तत्त्वज्ञान मांडणाऱ्या, परंपरेतील अनिष्ट रूढींना विरोध करणाऱ्या, गरीब जनतेविषयी कळवळा असलेल्या आणि मुख्य म्हणजे ‘झार’ या रशियाच्या जुलमी राजेशाहीविरुद्ध उघडपणे भूमिका घेणाऱ्या टॉलस्टॉयच्या कुटुंबाला कम्युनिस्ट क्रांतीनंतर विरोध का व्हावा?
याचं कारण म्हणजे टॉलस्टॉय झारविरुद्धच्या राजकीय क्रांतीमध्ये सक्रिय नव्हते आणि शिवाय त्यांना काउन्ट किंवा जमीनदार-सरदार ही पाश्र्वभूमी होती. त्यापलीकडेही त्यांचा उदार मानवतावाद नव्या क्रांतिकारकांच्या किती पचनी पडणार, हा एक प्रश्नच होता. या सर्वाची परिणती टॉलस्टॉयच्या कुटुंबीयांवर अनेक बंधनं येण्यात झाली.
१९१० मध्ये लिओ टॉलस्टॉय यांचा मृत्यू होईपर्यंत रशियातील झारशाहीने त्यांना थेट विरोध केला नसला तरी त्यांची मतं राजेशाहीला पटणारी नव्हती. तशीच त्यांची सर्व मतं कम्युनिस्ट राजवटीलाही मान्य होणं शक्य नव्हतं. नव्या राजवटीला हवे तसे व हवे तेवढेच टॉलस्टॉय यांचे चित्र मांडले जाऊ लागले. टॉलस्टॉयच्या ज्या कुटुंबीयांनी याला विरोध केला त्यांच्या नशिबी कधी तुरुंगवास तर अंतिमत: देशत्यागही आला. टॉलस्टॉय यांनी केवळ घर सोडलं होतं. त्यांची कन्या साशा हिला चार वेळा अत्यंत छळवादी तुरुंगवास भोगण्याची वेळ आली.
गोरान यांना हे सर्व ठाऊक होतंच. कोणत्या परिस्थितीत आपल्या आजी व आईला घर सोडावं लागलं याची कल्पना असल्याने यास्नाया पोलियाना येथील टॉलस्टॉय यांच्या स्मृतीशी त्यांचं नातं अधिकच दृढ होत गेलं. ते सांगत होते-
‘१९७८ मध्ये माझ्या जागतिक कीर्तीच्या पणजोबांची १५० वी जयंती होती. सारा टॉलस्टॉय परिवार यास्नाया येथे एकवटला होता. जगभरातून टॉलस्टॉय यांचे आमच्यासारखे नातेवाईक तर जमलेच होते, पण इतरही असंख्य लोक होते. तिथे एका नवविवाहित जोडप्याने पणजोबांच्या समाधीपुढे नतमस्तक होऊन आपली भावना व्यक्त केल्याचं पाहून डोळे पाणावले.’
ही यास्नाया पोलियाना (किंवा पोलान्या) येथील इस्टेट टॉलस्टॉय यांच्या वडिलांना लग्नात सासऱ्याकडून मिळाली होती. किंबहुना निकोलस टॉलस्टॉयचा विवाह बत्तीस वर्षे वयाच्या मारियाशी तेवढय़ासाठीच करून देण्यात आला होता. १८२२ मध्ये झालेल्या या सरंजामी विवाहातून निकोलसला ८०० गुलामांसह प्रचंड म्हणजे चार हजार एकर जमीन मिळाली होती. त्या वेळच्या रशियाच्या पाच कोटी लोकसंख्येपैकी साडेतीन कोटी लोक गुलाम, वेठबिगार होते! तेव्हाच्या रशियन वृत्तपत्रात येणाऱ्या ‘विक्री’च्या जाहिराती अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. ‘चांगल्या वागणुकीची १६ वर्षांची मुलगी, एक टेबल व थोडी वापरलेली गाडी, घोडे सांभाळू शकणारा तरुण, तसंच एक पलंग विकणे आहे’ अशा भीषण जाहिरातींविषयी तिथल्या सरंजामदार आणि राजेशाहीला काहीच वाटत नसे.
अशा सरंजामी वातावरणात जन्मलेल्या, वाढलेल्या लिओ टॉलस्टॉय यांच्या मनात करुणेची, मानवतेची, गुलामांना मुक्त करण्याची, जमीन शेतकऱ्यांना वाटून टाकण्याची आणि अहिंसक पद्धतीने सामाजिक परिवर्तन करण्याची ऊर्मी निर्माण व्हावं हे आश्चर्यच होतं. कदाचित त्यांच्या आईच्या प्रेमळ उदार स्वभावातून त्यांना ही देणगी लाभली असावी. टॉलस्टॉयची आई ते केवळ दीड वर्षांचे असताना गेली. तिच्याविषयी नंतर त्यांनी लिहिलं, ‘मला माझी आई अजिबात आठवत नाही, पण तिची चैतन्यमयी मूर्ती मात्र माझ्या मनात आहे. तिच्या चांगुलपणाविषयी मी खूप ऐकलंय.’
२००१ मध्ये भेटलेले गोरान आता स्वीडनमध्ये मॅल्मो येथे असतील. कारण त्यानंतर त्यांची भेट झाली नाही. ‘ई-मेल आयडी’ही ठाऊक नाही. पण नेटवरच्या एका लेखात त्यांनी म्हटलंय की, स्वीडनमध्ये टॉलस्टॉय कुटुंबातले एकतीसजण राहतात. गोरान यांच्या मते- ‘टॉलस्टॉय यांची पुस्तकं पूर्वी वाचली, पण ती समजायला खूप ‘ऊर्जा’ लागते. कामानिमित्त रशियाला गेलो की यास्नायाला अचूक जातो. टॉलस्टॉय यांच्या समाधीपुढे उभं राहिलं की स्फूर्ती मिळते. आम्हा सर्व टॉलस्टॉय कुटुंबीयांमध्ये जवळकीचं नातं आहे.’
स्वीडनमध्ये टॉलस्टॉय कुटुंबातले एकतीसजण राहतात. गोरान यांच्या मते- टॉलस्टॉय यांची पुस्तकं पूर्वी वाचली, पण ती समजायला खूप ‘ऊर्जा’ लागते. कामानिमित्त रशियाला गेलो की यास्नायाला अचूक जातो. टॉलस्टॉय यांच्या समाधीपुढे उभं राहिलं की स्फूर्ती मिळते.
गोरान यांच्याप्रमाणेच, टॉलस्टॉयची खापर-पतवंडं जगात ठिकठिकाणी आहेत. कोस्टान्झा कॉन्टी ही खापरपणती पॅरिसला, सोफी ल्वॉफ अमेरिकेत न्यू ऑर्लिन्स येथे, मॅक्झिन माडरेसेव्ह हे फिल्म डायरेक्टरही पॅरिसमध्ये, अ‍ॅन्डेरा अल्बाटिनी इटलीत, तर द्मित्री टॉलस्टॉय पॅरिस येथे आहे.
नेपोलियनच्या रशियातील आक्रमणाचं वर्णन करणारी टॉलस्टॉय यांची ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’ ही कादंबरी जगातील साहित्यातलं लेणं मानलं जातं. ‘अ‍ॅना कॅरनिना’ या त्यांच्या दुसऱ्या हृदयस्पर्शीकादंबरीनेही जगाला वेड लावलं. ‘अ‍ॅना कॅरनिना’मधलं त्यांचं एक वाक्य प्रसिद्ध आहे ते असं ‘सगळी आनंदी कुटुंबं सारखीच असतात, पण दु:खी कुटुंबांची स्वत:ची एक निराळी वेदना असते.’ काउन्ट म्हणून जन्मलेला आणि अ‍ॅस्टोपोवो स्टेशनवर कफल्लक अवस्थेत मरणाला सामोरा गेलेला टॉलस्टॉय त्याच्या जीवनात सुखी होता? एकदा त्याने ‘दूषित कुटुंब’ असं नाटकही लिहिलं होतं. ते त्याच्या हयातीत प्रसिद्ध झालं नाही.
टॉलस्टॉय आणि सोन्या यांचा विवाह १८६२ मध्ये झाला होता. गोरान स्टीफर्ट यांना टॉलस्टॉय यांच्या वैवाहिक विषादयोगाची कल्पना होती. ते म्हणाले, ‘माझे पणजोबा आणि पणजी यांची नेहमी भांडणं होत हे खरं आहे, पण त्यांचं बरंच साहित्य तिने लेखनिकाचं काम करून उतरवून घेतलं होतं. टॉलस्टॉय गेल्यावर अ‍ॅस्टोपोवो स्टेशनवर जमलेल्या गर्दीत तीही होती. काचेच्या खिडकीचं तावदान पुसत नवऱ्याचं अखेरचं दर्शन घ्यायचा प्रयत्न करीत होती, पण तिला कोणी पुढे जाऊ देईना..’ ती नंतर त्यांच्या आठवणींवरच जगली.’
तो खरोखरच हृदयद्रावक प्रसंग होता, पण सोफिया ऊर्फ सोन्या टॉलस्टॉयला नंतर आपल्या कजाग वागण्याचा विलक्षण पश्चात्ताप झाला. ‘लिओशिवाय मी आयुष्यात इतर कुणाचाच विचार केला नाही आणि आताही केवळ त्याचाच विचार करते’ असं तिने आपल्या मुलीला मृत्यूपूर्वी कळवळून सांगितलं होतं.
कालांतराने रशियन कम्युनिस्ट सरकारलाही टॉलस्टॉय यांच्या मोठेपणाची जाणीव झाली. त्यांचं यास्नायातील घर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं. तिथे त्यांच्यासंबंधीचं म्युझियम बनवलं गेलं. त्यांचं सर्व साहित्य, फोटो तिथे ठेवण्यात आले.
टॉलस्टॉय यांचं काही ‘डॉक्युमेन्टेशन’ उपलब्ध आहे का? असं आम्ही गोरान यांना विचारलं होतं. त्या वेळी त्यांना त्याविषयी विशेष माहिती नव्हती. १९९० नंतर जग ‘इंटरनेट’ने जवळ आणलं. माहितीचा खजिना उपलब्ध होऊ लागला. २३ मे १९०८ रोजी घेतलेला टाॅलस्टॉय यांचा एकमेव रंगीत फोटो, ३१ ऑक्टोबर १९०९ रोजी ‘एचएमव्ही’ कंपनीने ‘फॉर एव्हरी डे’मधले त्यांचे त्यांच्याच आवाजात आणि चार भाषांमध्ये रेकॉर्ड केलेले विचार, याचबरोबर ‘लेव टॉलस्टॉइ’ ही टॉलस्टॉय यांच्या जीवनातील काही क्षण आणि त्यांची अंत्ययात्रा चित्रित केलेली फिल्म ‘यू टय़ूब’वर उपलब्ध आहे.
संपर्काची अत्यंत मर्यादित साधनं असलेल्या काळातही टॉलस्टॉय ‘ग्लोबल’ झाले होते. म्हणूनच खुद्द थॉमस अल्वा एडिसन या संशोधकाने त्यांना एक ग्रामोफोन- डिक्टॅफोन भेट दिला होता आणि भारतापुरतं सांगायचं तर गांधीजींनी त्यांची महती जाणून आपल्या ‘हिंद स्वराज्य’ पुस्तकाचं भाषांतर टॉलस्टॉयना पाठवलं होतं. जागतिक वातावरणाविषयी जागरूक असलेल्या टॉलस्टॉयनी भारताविषयी लिहिलं होतं, ‘एका व्यापारी पेढीने २० कोटींच्या भारताला गुलाम केलं असं एखाद्याला सांगितलं तर त्याला आश्चर्य वाटेल. फार ताकदवान नसलेले केवळ ३० हजार लोक (इंग्रज) २० कोटी तेजस्वी, हुशार लोकांना गुलाम कसे करू शकतात?.. भारतीयांनी स्वत:लाच गुलाम बनवले आहे.’
गांधींच्या पत्राला टॉलस्टॉय यांनी सविस्तर उत्तर देताना त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील अहिंसक लढय़ाची प्रशंसा करून ‘त्यात जगातल्या लोकांनी सहभागी व्हायला हवं’ असं म्हटलं होतं. टॉलस्टॉयच्या विचारांशी नाळ जोडून महात्मा गांधींनी वैचारिक नातं जपलं.
..आणि त्या थोर कृतिशील रशियन लेखकाच्या पणतूपर्यंत गांधींची महती पोचल्याचं आमच्या लक्षात आलं.
टॉलस्टॉयचा वैचारिक परिवार खरोखरच जागतिक आहे!
(काही संदर्भ : टॉलस्टॉय एक माणूस : सुमती देवस्थळे आणि लोकमान्य ते महात्मा - खंड पहिला : डॉ. सदानंद मोरे)

No comments:

Post a Comment