Privacy Policy

Monday, September 16, 2013

वरदविनायक Tekadi Ganesh, Varadvinayak, Nagpur


वरदविनायक



varadvinayak.jpg
Tekadi Ganesh, Varadvinayak, Nagpur



प्रत्येक गावाची ग्रामदेवता असते. नागपूरचे दैवत म्हणजे टेकडी गणेश. नागपूरचा हा गणपतीही खरं तर वरद विनायक पण, तो ओळखला जातो तो टेकडी गणेश म्हणून. नागपूरच्या मध्यभागी असलेल्या सीताबर्डी टेकडीवर ही गणेशमूर्ती आहे. सध्याचे मंदिर अलीकडचे असले तरी मूर्ती प्राचीन आहे. नागपुरात रेल्वेने आले की आधी दर्शन होते ते या गणेशाचे. मुख्य रेल्वे स्थानकापुढील टेकडीच्या उतारावर हा गणाधीश आहे.

संकट निवारक

नागपूरचा आद्य गणपती अशी टेकडी गणेशाची ओळख आहे. मनोकामना पूर्ण करणारा, इच्छित फल देणारा, संकट निवारक अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ख्याती आहे. या गणपतीच्या दर्शानाविना अष्टविनायकचे दर्शन पूर्ण होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. 


उजव्या सोंडेची बैठी मूर्ती

शुक्रवार तलाव आज मंदिरापासून बराच दूर आहे. पण एक काळ असा होता की, हा तलाव मंदिराच्या पायथ्यापर्यंत होता. भोसले राजे नौकेतून गणेश दर्शनासाठी येत. टेकडीवर भोकरीच्या झाडाखाली ही मूर्ती उघड्यावर होती. याठिकाणी पूर्वी मोठे मंदिर होते, परंतु मुस्लिम राजवटीत ते उद्ध्वस्त झाले. त्याचे अवशेष आजही दिसतात. मंदिराच्या आसपास वड-पिंपळाची झाडे आहेत. त्यामुळे परिसर निसर्गरम्य वाटतो. ही मूर्ती उजव्या सोंडेची असून संपूर्ण मूर्ती पूर्वी स्पष्ट दिसायची. आता शेंदुराच्या पुटांमुळे हे काही दिसत नाही. बैठ्या स्वरूपाची ही मूर्ती साडेचार फूट उंच व तीन फूट रूंद आहे. मूर्तीच्या मागे पिंपळाचे झाड आहे. त्याच्या मुळांमुळे मूर्ती मूळ जागेहून थोडी पुढे सरकली असावी, असा तर्क आहे.

१२व्या शतकातील मंदिर

नागपूरचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. येथे नाग नदीच्या परिसरात छोटी गावे होते. त्यांना टोली म्हणायचे. आजही नागपुरातील अनेक वस्त्यांची नावे, कुंभारटोली, मरारटोली अशी आहेत. सीताबर्डी भागात गवळ्यांची टोली होती. या टेकडीवर महादेवाची तसेच काही गणपतीची मंदिरे असल्याचा उल्लेख सापडतो. आजही टेकडीवर टेकडी गणेशसह फौजेचा गणपतीही आहे. सीताबर्डी भागात गवळ्यांसह गोसावी लोकही राहायचे. त्यांचे राम अन् हनुमानाचे मंदिर गणेश मंदिराच्या पायथ्याशी आहे. आज प्रसिद्ध असलेल्या टेकडीवरील गणेश मंदिराचा जिर्णोद्धार वाकाटकांच्या आणि नंतर यादवांच्या काळात झाला होता. १२व्या शतकात हेमाद्री पंडितांनी हे मंदिर बांधले होते. हे मंदिर प्राचीन असल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे शिलालेख. सध्या हा शिलालेख नागपूरच्या अजब बंगल्यात आहे. हा शिलालेख सीताबर्डीत सापडलेल्या एका कोरीव स्तंभावर लिहिलेला आहे. या शीलालेखावर, जमीन गाई चराईकरिता देवस्थानला दिल्याचा उल्लेख आहे. सहावा विक्रमादित्य याच्या कार्यकाळात तो लिहिला गेला. शके १००८ वैशाख शुद्ध ३ प्रभवनाम संवत्सर असा या शीलालेखाचा काळ दिला गेला आहे.

जागा संरक्षण खात्याची

टेकडी परिसर संरक्षण खात्याच्या अखत्यारित असल्याने येथे कुठल्याही कामासाठी संरक्षण खात्याची परवानगी लागते. १९२४मध्ये काही अटींवर संरक्षण खात्याने या गणपतीसाठी पत्र्याची खोली बांधण्यास परवानगी दिली. १९७२पर्यंत या गणेशमूर्तीवर टिनाचे छप्पर होते. नारायण बाबुलाल यांनी हे छप्पर बांधले होते. त्यानंतर सिमेंट काँक्रीटचे बांधकाम झाले. मात्र लष्कराचा भाग असल्याने येथे रात्री राहण्यास बंदी होती. आज मंदिरात दूरवरून भाविक येतात. मात्र त्यांच्यासाठी भक्तनिवाससारखी सुविधा मंदिर व्यवस्थापनाला करता येत नाही. कारण लष्कराच्या नियमानानुसार या परिसरात रात्री थांबायला मनाई आहे.

उत्तराखंडसाठी अर्थसाह्य

विविध सामाजिक उपक्रमांमध्ये या मंदिराचा नेहमीच सहभाग राहिला आहे. अलीकडेच उत्तराखंडमध्ये जी नैसर्गिक आपत्ती आली, त्यावेळी देशातील मंदिरांनी आर्थिक योगदान दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली होती. मात्र नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरातर्फे त्याआधीच ११ लाख रुपयांचा निधी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना पाठविला होता. १९९०च्या सुमारास नागपूरजवळ मोवाड येथे धरण फुटून शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते. त्यावेळीही या मंदिराने ११ लाख रु.चे अर्थसाह्य केले होते.

गरजूंसाठी शिबीर

मंदिरातर्फे रोगनिदान शिबीर नियमित आयोजित होते. शहरातील नामांकित डॉक्टर आपली सेवा देतात. यावेळी पेशंटांना निःशुल्क औषधे दिली जातात. औषध विक्रेता संघटना, एम. आर. संघटना यांचाही यात सहभाग असतो. मंदिर परिसरातच धर्मार्थ दवाखानाही चालविला जातो. डॉ. धमगाये व डॉ. रश्मी शुक्ला येथे वैद्यकीय सेवा देतात.

देवदर्शनातून विकास

काही वर्षांपूर्वी मंदिरातर्फे विदर्भातील अष्टविनायक यात्रा सुरू केली होती. यात नागपूर, आदासा, रामटेक, भंडारा, पवनी, भद्रावती, कळंब, केळझर येथील गणेश स्थानांचे दर्शन घडविले जायचे. यातून मिळणारा निधी हा या देवस्थानांच्या विकासासाठी दिला जायचा.

अंधांना मिळणार दृष्टी

महात्मे आय हॉस्पिटलच्या सहकार्याने नेत्र चिकित्सा व ऑपरेशन शिबिरे नेहमीच घेतली जातात. आता अंधांना दृष्टी देण्याचा एक प्रकल्प मंदिराने नुकताच सुरू केला आहे. ज्यांना दृष्टी येऊन शकते, अशांची नोंदणी मंदिरातर्फे केली जाणार आहे. त्यानंतर या यादीतील अंधांवर पद्मश्री डॉ. विकास महात्मे नेत्ररोपण ऑपरेशन करणार आहेत. एरवी अशा ऑपरेशनचे ३० हजार रु. घेतले जातात. मात्र गणेश मंदिराच्या यादीतील पेशंटांवर ७ हजार रुपयांत हे ऑपरेशन होणार आहे. गरजू पेशंटांवर हे ऑपरेशन निःशुल्क होईल, असे मंदिराचे सचिव के. सी. गांधी यांनी सांगितले.

सोन्याचे जानवे

विविध भाविक येथील दानपेटीत पैशांसह सोने-चांदी आणि अन्य ऐवजही टाकतात. मागील वर्षी एका भक्ताने गणपतीला साडेआठ लाख रुपयांचे सोन्याचे जानवे दान दिले, तर एका भाविकाने नागपूरलगत पावणेपाच एकर जमीन मंदिराला दान दिली. या जागेवर वृद्धाश्रम, गोशाळा सुरू करण्याचा विचार आहे. ​मंदिराला मिळालेले सोने महाराष्ट्र बँकेतील लॉकरमध्ये ठेवण्यात आले आहे. सोने ठेवण्यासाठी स्टेट बँकेनेही प्रस्ताव दिला होता, असे गांधी म्हणाले. मंदिराची वार्षिक उलाढाल जवळपास २.५ कोटींची आहे.

चतुर्थीला लाखो भाविकांची गर्दी

मंदिरात दररोज १० ते १५ हजार भाविक येतात. मात्र संकष्टी चतुर्थीला हीच संख्या १ लाखावर जाते. गणेशोत्सवाच्या काळात दररोज दीड ते २ लाख भाविक मंदिरात येतात. या मंदिरात सकाळी ६.३० वाजता होणाऱ्या आरतीचे थेट प्रक्षेपण दररोज यूसीएन चॅनेलवरून केले जाते. मंदिर पहाटे ४.३० ते रात्री १२ या वेळात भाविकांना दर्शनासाठी खुले असते.

लवकरच नवे मंदिर

सध्या असलेल्या मंदिराच्या ठिकाणीच शुभ्र संगमरवरी भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. जवळपास १५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी मागितली आहे. विरेंद्र खरे यांनी या नव्या मंदिराचे डिझाइन तयार केले आहे. मंदिराविषयी अधिक माहिती साठी वेबसाइट- www.ganeshmandirtekdi.org

यांचे सहकार्य

अॅडव्हायरी सोसायटी ऑफ गणेश मंदिर टेकडीतर्फे या मंदिराचे व्यवस्थापन केले जाते. या सोसायटीचे पदाधिकारी असे... अध्यक्ष - एल. एम. ढोबळे, उपाध्यक्ष- पुंडलिकराव जौंजाळ, कोषाध्यक्ष - जीवराज अग्रवाल, सचिव - के. सी. गांधी, सहसचिव - एस. एस. जोगळेकर, विश्वस्त - गणपत जोशी, एस. बी. कुळकर्णी, मधुकरराव धवड, अविनाश जावडेकर, माधव कोहळे, प्रमोद देवरणकर

1 comment: