रसायने वापरून फळे पिकवणा-यांना तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा ठोठावण्याचा सरकार विचार करत आहे. फळे खाल्याने आरोग्य सुधारते असे डॉक्टर सांगतात. त्यात डॉक्टरांना नैसर्गिक फळे अपेक्षित आहेत. पण रसायने वापरून पिकवलेली फळे खाल्याने आरोग्य बिघडते असे आता संशोधनातून दिसले आहे. आंबा, केळी, पपई, सफरचंद, द्राक्ष अशी फळे हल्ली सर्रास रसायनांचा वापर करून पिकवली जातात. माल झटपट तयार व्हावा आणि बाजारात विकाला जावा असा हिशेब अनेक शेतकरी आणि व्यापारी करतात. असे करताना आपण ग्राहकाला वारंवार डॉक्टरकडे पाठवतो याची त्यांना कल्पना असली तरी पैशाच्या आशेने ते हा मार्ग पत्करतात. ही प्रवृत्ती रोखण्यासाठी आता केंद्र सरकारने कायदा करायचे ठरवले असून असा 'गंदा धंदा' करणा-या व्यापा-यांना आणि शेतक-यांना सहा महिन्याचा तुरुंगवास आणि एक हजार रूपये दंड अशा शिक्षेची यात तरतूद आहे. भारतीय शेतक-यांनी आणि व्यापा-यांनी रसायनांचा वापर थांबवला तर परदेशी बाजारपेठेत भारतीय फळे अधिक विकली जातील असे शेतीतज्ज्ञ सांगतात. अनेक देशांत भारतीय फळे, भाज्या यांची कसून तपासणी केल्याशिवाय त्यांना प्रवेश दिला जात नाही. यामुळे भारतीय शेतकरी आणि व्यापार यांचे मोठ्या प्रमाणावार आर्थिक नुकसान होते असेही हे तज्ज्ञ सांगतात.
No comments:
Post a Comment