राजकीय पक्षांनी हिंदुत्वाचा चुकीचा अर्थ लावल्याने आपलं खूप मोठं नुकसान झालंय. शेजारी एखादा मुसलमान वा शीख आला तरच आपलं हिंदुत्व जागृत होतं, हे चूक आहे. भाजपसारख्या पक्षाने किंवा संघासारख्या संघटनेने हिंदुत्वाचा केवळ राजकीय दृष्टिकोनातून आणि तोही अत्यंत संकुचित असा अर्थ लावला. त्याचं सांस्कृतिक अंग त्यांना कळलंच नाही. काँग्रेस व इतर पक्षांनाही हिंदुत्वाची व्याख्या करता आली नाही. म्हणूनच रूढी, परंपरा, श्ाद्धा-अंधश्रद्धा, चालीरीती, कुटुंब व्यवस्था, नातेसंबंध या सगळ्यांचा मिळून बनलेला हिंदू संस्कृतीचा पसारा समजून घेणं, वाचकांपर्यंत पोहोचवणं या गरजेतून हे कादंबरी चातुष्ट्य आकाराला आलंय...
रा. रा. भालचंद नेमाडे 'पॉप्युलर प्रकाशना'च्या कार्यालयात 'हिंदू' कादंबरीसंदर्भातल्या पत्रकार परिषदेत बसून अथक बोलत असतात. गेल्या काही दिवसांत ते मुलाखतींवर मुलाखती देत आहेत आणि तरीही त्यांचा उत्साह टिकून आहे. कारण तब्बल ३१ वर्षांच्या 'प्रेग्नंट पॉज'नंतर त्यांची 'हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ' ही सव्वासहाशे पानांची कादंबरी छापून तयार आहे आणि येत्या १५ जुलैला ती बाजारात येणार आहे. १९६३ साली 'कोसला'ने मिरॅकल केल्यानंतर 'बिढार' ते 'झूल' या चांगदेव चतुष्ट्याने आणि देशीवादाच्या मांडणीने भालचंद नेमाडे नावाची जितीजागती मिथ मराठी साहित्यात तयार झाली. त्यामुळे ७९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'झूल'नंतर नेमाड्यांच्या 'हिंदू'च्या घोषणेने मराठी वाचकांची नव्या कादंबरीसाठी प्रतीक्षा सुरू झाली. परंतु एका कादंबरीत आटोपणारा हा प्रपंच काळाच्या ओघात विस्तारत गेला आणि त्याचं अडीच हजार पानांच्या 'हिंदू चतुष्ट्या'त रूपांतर झालं.
इंग्लंडमध्ये असताना तिथे भारतीय-पाकिस्तानी लोकांचा वेगळा हिंदूसमूह असल्याचं माझ्या लक्षात आलं आणि तिथेच या कादंबरीचं बीज मनात रूजलं... नेमाडे सांगतात आणि त्याचवेळी, हिंदूंची ग्रामीण व्यवस्था, नागरी व्यवस्था, नंतरच्या शहरीकरणाच्या समस्या, अनिवासी भारतीयांच्या समस्या यांचं कादंबरीतलं दर्शन वाचून आज जे सभोवताली चाललंय त्याची व्यवस्था कशी लावता येईल, हिंदू समाजातील जातीची उभी उतरंड आडवी कशी करता येईल, हे वाचकांच्या डोक्यात यावं अशी माझी अपेक्षा आहे, असंही स्पष्टपणे नोंदवतात.
No comments:
Post a Comment