दधिचि आणि जगदीशचंद्र बोस
दधिचि आणि जगदीशचंद्र बोस
''विश्वातील सर्व सचेतन व अचेतन वस्तू, पृथ्वीवरील सृष्टी, नभोमंडळातील असंख्य ग्रहगोल, प्रकाशलहरी या सर्वांमध्ये एकच शक्ती वास करीत असते, हे सत्य माझ्या निदर्शनाला आले, तेव्हा तीस शतकांपूर्वी गंगेच्या तीरावर माझ्या पूर्वजांनी परब्रह्माची जी कल्पना विशद केली तिचा अर्थ मला कळू लागला''- आपल्या भारतीय संस्कृतीचा, पूर्वसुरींचा, ॠषीमुनींचा सार्थ अभिमान शब्दाशब्दातून व्यक्त होणारे हे मनोगत आहे. वनस्पतिशास्त्राचे अभ्यासक जगप्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ.जगदीशचंद्र बोस ह्यांचे!
मुळात बालपणी घरात त्यांच्यावर संस्कृति, धर्म, नीती, स्वदेशप्रेम ह्या विषयांचे संस्कार रामायण-महाभारताच्या कथा ऐकत असताना नकळत होत गेले. ही संस्कारांची शिदोरी त्यांना आयुष्यभर पुरली. पुढील जीवनांत आपल्या देशाचा, संस्कृतीचा, धर्माचा सार्थ अभिमान त्यांच्या अनेक शोधांमधून विविध ठिकाणी केलेल्या भाषणांमधून संदर्भांसह व्यक्त होत राहिला.
त्यांच्या वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासाचे जगभरातून कौतुक झाले. त्या दरम्यान त्यांनी लावलेले विविध शोध हे मन थक्क करणारे आहेत. वनस्पतींनादेखील मन असते. इतर सजीव प्राण्यांप्रमाणे त्या कार्य करतात. हे त्यांनी सप्रमाण सिध्द केले. प्राणी आणि वनस्पती ह्यांच्यामधील 'नाडी'व्यवस्था सारखीच असते. फरक एवढाच की, प्राण्यांमध्ये ही नाडी हृदयाच्या दिशेने चालते तर वनस्पतींमध्ये ती प्रकाशाच्या दिशेने चालते. हा त्यांचा एक महत्त्वाचा शोध! जगदीशचंद्रांनी इतर अनेक शोध लावले, त्या आधारे विविध उपकरणे भारतातच तयार केली. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या प्रत्येक संशोधनात हिंदुस्थानातील प्राचीन काळापासून रुढ असलेल्या कल्पनांचा आधार घेतला. एवढयावरच ते थांबले नाहीत. आपले सर्व संशोधनपर ग्रंथ आपल्या देशबांधवांना अर्पण केले. तर सर्व यंत्रांची पेटण्टस् राष्ट्राला अर्पण केली.
निवृत्तीनंतर त्यांनी स्वतः बोस रिसर्च इन्स्टिटयूट स्थापन केली. त्यांनी ह्या संस्थेच्या आणि तिच्या अंतर्गत येणाऱ्या सभागृह, अंगण, प्रयोगशाळा ह्या सर्व विभागांची उभारणी प्राचीन भारतीय वास्तुशास्त्रानुसार केली. इतकेच काय, पण ह्या संस्थेच्या प्रवेशद्वारावर दोन लता (वेली) आणि आवळयाचे फळ कोरले तर सभागृहाच्या छतावर अजिंठा लेण्यातील पूर्ण विकसित कमळाचे चित्र काढून घेतले. ही संस्था 'परमेश्वरचरणीं अर्पण' केल्याचे सभागृहाच्या प्रमुख भिंतीवर लिहिले आहे. त्या व्यतिरिक्त दार्जिलिंग आणि गंगेच्या काठावर ह्या संस्थेच्या शाखा काढल्या. विशेष म्हणजे ह्या संस्थादेखील त्यांनी देशालाच अर्पण केल्या. एवढेच नव्हे तर ह्या संस्थेच्या प्रवेशद्वारावर दधीचि ॠषींच्या हाडांपासून केलेल्या वज्राचे शिल्प कोरुन 'दधीचिप्रमाणे आपले कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी प्रसंगी सर्वस्वाचा त्याग करा'- असा संदेश सर्व देशबांधवांना दिला.
'हे दधीचि कोण?' असा प्रश्न आजच्या पिढीला पडू शकतो. वृत्रासुराने सर्व देवांना विविध तऱ्हेने छळून अगदी त्रस्त करुन टाकले होते. त्यावेळी त्याचा वध करण्याचा उपाय विचारण्यासाठी यच्चयावत् देवमंडळी भगवान विष्णूंकडे गेली. त्यावेळी भगवान विष्णूंनी 'दधीचि ॠषींच्या अस्थींपासून बनविलेल्या शस्त्रानेच वृत्रासुराचा वध करणे शक्य आहे' असे सांगितले. त्यासाठी 'आश्विनीकुमारांनी दधीचिंच्या अस्थि मागून आणाव्यात. त्वष्टयाने त्या अस्थिंपासून वज्र तयार करावे, त्या वज्राने वृत्रासुराचा इंद्राने वध करावा'- असे सविस्तर मार्गदर्शनही श्रीविष्णूंनी केले. त्यानुसार आश्विनीकुमारांनी दधीचि ॠषींकडे अस्थींची मागणी केली. त्यामागील हेतू दुष्टदुर्जनाचा नाश करुन देवांना वाचविणे, अनाचाराला आळा घालणे हा असल्याचे कळल्यावर दधीचिंनी अगदी आनंदाने योगबलाने देह त्यागून आपल्या अस्थि दिल्या.
ठरल्याप्रमाणे त्वष्टयाने त्यापासून वज्र तयार केले आणि मग इंद्राने त्या वज्राने वृत्रासुराचा वध करुन सर्व देवांना भयमुक्त केले! अशी कथा महाभारतात आहे. तर पद्मपुराणासह इतर ठिकाणी ती थोडया वेगळया स्वरुपात आढळते. त्यात देवांनी आपली अस्त्रें सुरक्षित राहावीत म्हणून दधीचिंकडे ठेवली. पण बराच काळ लोटूनही ती परत घेण्यासाठी देव न आल्याने दधीचींनी त्या अस्त्रांचे तेज पाण्यात कालवून प्राशन केले. कालांतराने देव अस्त्र नेण्यासाठी आले असता दधीचिंनी त्यांना घडला प्रकार सांगून आपल्या अस्थि नेण्याची विनंती केली. त्याप्रमाणे मग त्या अस्थि देवांनी घेतल्या.
आपल्या देशासाठी, देशबांधवांच्या भल्यासाठी डॉ.जगदीशचंद्र बोस ह्यांनी दधीचि ॠषींचे उदाहरण म्हणून 'वज्र' चिन्हाचीच निवड का केली ते कळल्यावर जगदीशचंद्रांच्या पराकोटीच्या स्वदेशहिताच्या कळकळीची साक्ष पटून ऊर अभिमानाने भरुन येतो.
आज देशाला, आपल्या धर्माला एका दधीचिंची आणि एका जगदीशचंद्रांची पुन्हा एकदा तीव्र आवश्यकता आहे.
No comments:
Post a Comment