Privacy Policy

Friday, July 2, 2010

कां रे अहंभाव, नाहीं गेला?

कां रे अहंभाव, नाहीं गेला?

 

कर्नाटकातील एका जिल्हा न्यायालयात एक न्यायाधीश होते. त्यांची परमेश्वरावर उदंड श्रध्द होती. ते शिवभक्त होते. शिवमंत्राचा निर्धारित जप पूर्ण झाल्याशिवाय ते अन्नग्रहण करीत नसत. अतिशय सच्छील, सद्सद्विवेक बुध्दि जागृत असलेले असे हे न्यायाधीश लोकप्रिय होते. त्यांची गुरुपरंपरा फार मोठी होती आणि गुरुंवरही त्यांची परमश्रध्द होती. तारुण्याचा भर ओसरण्याच्या आतच त्यांना मनापासून ईश्वरदर्शनाची ओढ लागली होती. आपल्या कामाचा महत्त्वाचा भाग तेवढा हातावेगळा केल्यानंतर उरलेला वेळ ते ईश्वर चिंतनात आणि धर्मग्रंथाचे वाचन करण्यात घालवीत. माणुस अतिशय आदर्श जीवन जगणारा असा होता. वयाची चाळीशी उलटल्यानंतर त्यांचे संसारातले लक्ष अधिकच उडाले. त्यांनी आपल्या गुरुंना विचारले, ''ईश्वर दर्शनासाठी मी काय करु?''

गुरु म्हणाले, ''स्वतःला विसर, मग तुला स्वतःमधल्या देवाची जाणीव होईल आणि ईश्वर दर्शनासाठी वेगळे काही करावे लागणार नाही.''

''
स्वतःला विसरण्यासाठी काय करावे लागेल?'' न्यायाधीशांनी गुरुला विचारले.

गुरु म्हणाले, ''तू स्वतः म्हणजे तुझा अहंकार, तो अहंकार नष्ट झाला पाहिजे. तो अहंकार नष्ट झाला की तू कोण आहेस याबद्दलचा अभिमान तुझ्या मनात उरणार नाही.''

न्यायाधीशांनी पुन्हा गुरुंना विचारले, ''त्यासाठी मी काय करु?''
गुरुंनी त्याच्याकडे रोखून पाहिले आणि म्हणाले, ''त्यासाठी जिथे तुला कोणी ओळखत नाही अशा ठिकाणी जाऊन भिक्षापात्र हातात घे. भिकारी जसे वागतात तसा वाग, लाचार होऊन लोकांकडे भीक माग, मग अहंकाराचा लवलेशही तुझ्या ठायी उरणार नाही.''

न्यायाधीशांनी ते मानले आणि नोकरी सोडून ते दूरच्या एका गावी जाऊन खरोखरच भीक मागू लागले. कमरेला पंचा, खांद्यावर दुसरा पंचा आणि हातात एक पत्र्याचे भांडे अशा स्थितीत ते तिथे देवळासमोरच्या भिकाऱ्यांच्या रांगेत उभे राहून भीक मागू लागले. कितीही आव आणला तरी त्यांना खऱ्या भिकाऱ्यांसारखे वागता येईना. कारण इतर भिकाऱ्यांचे देह काटकुळे, पोटे खपाटीला गेलेली आणि हे मात्र त्या मानाने सुदृढ आणि चेहऱ्यावर ज्ञानाचे, सच्छीलतेचे तेज असे भिकाऱ्यांच्या रांगेत उभे राहात. त्यामुळे ते चटकन कोणाचेही लक्ष वेधून घेत. इतरांपेक्षा ते वेगळे उठून दिसत.
एके दिवशी एक मोठे सरकारी अधिकारी त्या गावात दौऱ्यावर आले. त्यांनी भिकाऱ्याच्या वेषातल्या माजी न्यायाधीशांना पाहिले आणि त्यांना आपला त्यांचा परिचय आहे, असे वाटू लागले, पण नेमके नाव आठवेना. ते अधिकारी अस्वस्थ झाले, बेचैन झाले. मंदिर बंद होईपर्यंत थांबले आणि मंदिर बंद झाल्यावर भिकाऱ्याच्या वेषातील त्या माजी न्यायाधीशांच्या मागून चालू लागले. माजी न्यायाधीश भिकारी म्हणून वावरत असले तरी भिकाऱ्यांच्या वस्तीत राहात नसत. त्यांनी एक भाडयाने खोली घेतली होती, तिथे ते राहात. त्यांच्या नकळत ते सरकारी अधिकारी त्या खोलीपर्यंत त्यांच्या मागोमाग पोहोचले. माजी न्यायाधीश खोलीत शिरताच सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना आपली ओळख करुन दिली आणि, ''मी तुम्हाला ओळखले याबद्दल वैषम्य वाटू देऊ नका, पण भिकारी म्हणून तुम्ही इतक्या दूरच्या गावात का राहाता, असे औत्सुक्याने विचारले.''

त्यांचे औत्सुक्य, मनातील भाव ओळखून माजी न्यायाधीशांनी त्यांना आपली सर्व कथा सांगितली. अहंभाव विसरुन परमेश्वराच्या प्राप्तीसाठी हा माणूस इतके खडतर जीवन जगतो आहे, हे पाहून सरकारी अधिकारी गलबलले. ''मी तुमच्यासाठी काही करु का?'' असे ते पुनःपुन्हा विचारु लागले.

माजी न्यायाधीशांनी त्यांना नम्रपणे नकार दिला. सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना विचारले, ''तुम्ही एवढी खडतर तपश्चर्या करता त्यामधून मीपणा विसरता आला का? खऱ्या भिकाऱ्यासारखे तुम्ही वागू शकता का?''

न्यायाधीश क्षणभर स्तब्ध झाले. थोडयावेळाने त्या अधिकाऱ्याला म्हणाले, ''मी न्यायाधीश होतो हे मी आता पूर्णपणे विसरुन गेलो आहे. पण इतर भिकारी भीक मागताना जेवढे लाचार होतात जेवढया कळकळीने भीक मागू शकतात तसे मी करु शकत नाही. कारण मला पेन्शन असल्यामुळे अशी स्वतःची जागा भाडयाने घेऊन जगणे मला शक्य आहे आणि काही झाले तरी ह्यापेक्षा अधिक हालअपेष्टांचे जीवन स्वीकारणे मला अवघड वाटते. आता ह्याच्यातही थोडा अहंभाव असला तर काय करावयाचे, याचा मी सतत विचार करीत असतो.''

No comments:

Post a Comment