Friday, July 30, 2010

सगळेच प्राणी लग्न करतात...

सगळेच प्राणी लग्न करतात...

माकडं असोत वा गाढवं असोत
सगळेच प्राणी लग्न करतात
माणसं असोत वा सिंह असोत
बहुतेक नवरे लाथाच खातात!

गाढवीण आपल्या गाढवाला
'
ऑफिशियली' लाथा मारते
माकडीण आपल्या माकडाला
हवं तसं 'टांगून' ठेवते
सिंहीण आपल्या सिंहराजाची
पाहिजे तेंव्हा आयाळ खेचते
अन बाई माणूस, बुवा माणसाचा
फक्त बोलून खीमा करते!
मार्ग त्यांचे काहीही असोत
उद्दिष्टं त्यांची एकच असतात
म्हणून
माणसं असोत वा सिंह असोत
बहुतेक नवरे लाथाच खातात!

गाढव नवर्याला गाढविणीवरती
गुरकताना पाहिलंय कधी?
सिंहिणीला ताटाखालचं
मांजर झालेलं पाहिलंय कधी?
आपण पहातो माकडला
माकडचेष्टा करताना
अन बुवा माणसाला, बाईमाणसाच्या
मुठीत निमूट जगताना
जात त्यांची काहीही असो
अनुभव नवर्यांचे सारखेच असतात
कारण
माणसं असोत वा सिंह असोत
बहुतेक नवरे लाथाच खातात!

गाढवासारखं 'हो' 'हो' म्हणत
नवरे आपले जगत रहातात
माकडासारखं आशांवरती
नवरे नेहमी लटकत रहातात
सिंह बनून जगण्यासाठी
हिंमत त्यांच्यात उरत नाही
माणूस म्हणून जगण्यासाठी
किंमत त्यांना उरत नाही
आलेला दिवस, आलेले क्षण
पुढे पुढे ढकलत रहातात
कारण
माणसं असोत वा सिंह असोत
बहुतेक नवरे लाथाच खातात!

- प्रसाद शिरगांवकर

 

ती कशी असेल?

ती कशी असेल?

 

 

यार, या आयुष्यात किती काळ अशी उत्कंठा राहणार? नुसतेच रोज विचार करायचा 'ती'चा. देव सुद्धा ना! अस आपल्याला कळायला हव होते. रोज एखादी छान मुलगी दिसली की वाटते 'ही आपली झाली तर!'. स्थळाच्या वेळी देखील असेच. पण शेवटी सगळे फूस. कंपनीत ज्या आवडतात त्यांना एकतर कोणी ना कोणी असते. किंवा हजार मित्र असतात. मग लढाईच्या आधीच पराभव. बर त्या हजारांच्या डोक्यात काय चालले आहे हे त्यांच्या तोंडवरूनच दिसत असते. बर मग ती नाही तर नेमकी कोण आहे हे जर कळले असते तर, जाता येत हजारदा होणारे हृदयाचे तुकडे तरी झाले नसते.

'ती' कशी असेल यावर रोज विचार करून करून आता काही दिवसांनी माझे काळे केस पांढरे तर नाही होणार ना याची भीती वाटते. इथे पुण्यात आल्यापासून ना, मी एकटा असल्याचा अनेकदा अनुभव येतो. कारण इथे रस्त्यावर, बागेत, जिकडे जाल तिकडे 'कपल्सच' असतात. आणि त्यांना बघून इच्छा आणखीन वाढणार नाही तर काय कमी होणार काय? त्यांना बघून मलाही कोणी असावे अस खूप वाटायला लागते. बर, यावर कोणाशी बोलायला गेलो तर तो काही तरी नवीनच सुरु करतो. माझ्या मैत्रिणीला परवा सांगत होतो कंपनीतील एका मुलीबद्दल. तर तिचा चेहराच पडला. उगाचंच सांगितले असे नंतर वाटायला लागले. मित्रांचा विषय तर सोडून द्या! त्याचं भलतंच चालू असते. आई वडिलांना तर सांगू शकत नाही. उरले भाऊ बहिण. ते इतके लहान आहेत ना! त्यांना काही सांगून काही कळणार नाही.

आणि बहिणाबाईला सांगायला गेलो की, तिचे आपले 'अस होतच' सांगून विषय टाळून देते. काय करू काय सुचत नाही. बर, विचार घालवण्यासाठी टीव्ही किंवा चित्रपट लावला तर इच्छा कमी होण्याऐवजी अजूनच वाढते. आणि बातम्या बघून डोक सरकते. पण विषय काही कमी होत नाही. झोपलं तर, रात्री चित्र-विचित्र स्वप्न पडतात. वडिलांनी सांगितलेला 'जप' किंवा 'देवपूजा' सोडली तर बाकीच्या वेळी डोकं हाच कायम विषय. ती कशी असेल? दिसेल त्या मुलीत मी तिला पाहतो. आणि मुर्खासारखा तिच्या प्रेमात पडतो. आणि तिच्या सोबत कोणाला बघितले की दुखी देखील. अस रोज शंभर वेळा घडते. एकतर कोणी भेटत नाही. आणि विषय देखील संपत नाही. आणि कोण भेटणार हे देखील कळत नाही. आजकाल मित्रांसोबत रस नसलेल्या विषयात गप्पा मारतांना जाम कंटाळा येतो. कधी येणार यार?, असो!

 

जहाल मुंगीची गोष्ट

जहाल मुंगीची गोष्ट

 

मुंगी मुंबईहून पुण्याला आली. पुण्यातील हायफाय ठिकाणी असलेल्या एका कंपनीत तिने आपले काम सुरु केले. मुंगी रोज प्रामाणिकपणे कामावर यायची आणि आपल काम करत राहायची. त्या कंपनीचा मालक एक सिंह होता. सिंहाला असे वाटले की आपले काम वेगाने व्हावे यासाठी आणखीन एकाला कामावर ठेवावे. मुंगी करते त्याच कामातील थोड काम दुसऱ्या कोणी केल तर काम आणखीन लवकर होईल या उद्येशाने त्याने एका झुरळाला कामावर ठेवले. झुरळ मुंगीपेक्षा वयाने जास्त असल्याने मुंगी त्याला 'सर्' म्हणू लागली. झुरळ कंपनीत आल्यापासून आपल्या दिलेल्या कामापेक्षा सिंहाची दाढी कुरवाळण्यात जास्त वेळ घालवायचे. आणि सिंहाला देखील ते आवडायचे त्यामुळे सिंह कधीच काही म्हणत नसायचा. मग झुरळ जणू आपणच कंपनीचे मालक आहोत अस वागायला लागल. सारखं सारखं मुंगीच्या मागे लागायचं. आणि काम संपल्यावर ते काम मी केल अस सिंहाला सांगायचं. सिंह मग, शाबासकीची थाप त्या झुरळाला द्यायचं.

ते पाहून मुंगी आपली बिचारी खूप दुखी व्हायची. मुंगीला काम करून देखील मग सिंहाचे बोलणे खावे लागायचे. झुरळाच्या ह्या वागण्याने कंपनीतील इतरही 'झुरळ सर्' म्हणायला लागले. मुंगीच्या डोक्यात मग कंपनी सोडायचा विचार बळावू लागला. आणि जवळपास दीड वर्षानंतर त्याला आहे त्या कंपनीपेक्षा खूप मोठ्या कंपनीत जाण्याची संधी मिळाली. नवीन कंपनीत आल्यावर मुंगी खूप खुश झाली. कारण आता झुरळाचा त्रास तिला पुन्हा होणार नव्हता. नवीन कंपनी डायनासोरप्रमाणे अवाढव्य होती. आणि हजारो मुंग्या, उंदीर, खेकडे, माश्या, हत्ती, जिराफ, घोडे, हरणे, ढेकणे कामाला असलेल पाहून मुंगी अजूनच खुश झाली.

नवीन कंपनीत मुंगीवर लक्ष ठेवायची जबाबदारी एका खेकड्याची होती. दोन मोठ्या ढेकणांच्या हाताखाली काम करायचं अस मुंगीला सांगण्यात आल. पण दोन आठवडे मुंगीला त्या कंपनीत नुसतंच बसून ठेवलं. नंतर मुंगीला कामाची हत्यारे देता काम कर अस सांगण्यात आल. काम एका हरिणीचे होते. आणि त्या कामातील प्रत्येक गोष्टीची परवानगी देण्याची जबाबदारी उंदीरमामाकडे होती. रोज झालेल्या कामाचा इमेल उंदीरमामाला पाठव अशी ताकीद दिली होती. हत्यारे नसतांना देखील मुंगीने आपले काम सुरु केले. पण हत्यारानिशी लवकर होणारे काम हत्यारविना मुंगीला जड जावू लागले. कामाला होणारा विलंब हत्यारामुळे नसून मुंगीमुळे होतो असा निष्कर्ष उंदीरमामा आणि हरिणीने काढलाहत्यारे पुरवण्याची जबाबदारी खेकड्याची होती. हत्यारे नाहीत ही माहिती त्याने हरिणीला दिलेली नव्हती. चूक लपवण्यासाठी मग खेकडा कोणतेही कारण काढून मुंगीला त्रास द्यायला लागला.

सुरवातीला मुंगीचा 'इमेल' नंतर तिची 'इंग्लिश' असे कोणतेही कारण काढून त्रास दिला जायचा. मुंगी आपली झालेली चूक देखील मान्य करायची. आणि सारखी दुखी देखील राहायची. त्यामुळे तिच्यात 'न्यूनगंड' निर्माण झाला. झालेल्या कामाचे इमेल पाठवण. आलेल्या इमेलचा रिप्लाय देण्. छोट्याशा कामासाठी उंदराची परवानगी आणि त्यासाठी सतत इमेल, फोन करून मुंगी आणखीनच वैतागली. उंदीरमामा परवानगी देतो म्हणायचा. पण देत नसायचा. कामापेक्षा इमेल आणि फोन जास्त होत असल्याने कामावर त्याचा परिणाम जाणवू लागला. आणि सतत मीटिंग मधून कामाबद्दल मुंगीला ढेकणे रागवायचे. शेवटी मग मुंगीने देखील ठरवलं की जशास तसे प्रत्युतर द्यायचे.

मग कामात होणाऱ्या उशिराबद्दल मीटिंग बोलावली गेली. ज्या हरिणीचे ते काम होते. त्या कामाचा लक्ष देणारा उंदीरमामा, एक मांजर, खेकडा, ढेकणे आणि मुंगी असे जवळपास पाच सहा लोकांची मीटिंग बोलावली. मिटींगच्या सुरवातीपासून सगळेच कामात उशीर होण्याबद्दल मुंगीलाच दोषी ठरवू लागले. पण मुंगीने चूक नसतांना माफी मागायला नकार दिला. आणि मुंगी पेटली. बोलायला सुरवात केल्यावर तिने परवानगीसाठी केलेल्या विलंबाला, हत्यारे पुरवल्याबद्दल उंदीरमामा आणि खेकड्याची सोलायला सुरवात केली. ढेकणाचा देखील समाचार घेतला. आणि आश्चर्य लहान मुंगी समोर उंदीर आणि खेकड्याने मान टाकली. मुंगीला 'हल्याच्या उत्तरासाठी प्रतिहल्ला' हे सूत्र ध्यानी आले. तेव्हापासून मुंगीची जहाल मुंगी झाली. आणि त्यानंतर असा त्रास तिला पुन्हा झाला नाही.

 


Popular Posts

Total Pageviews

Categories