Sunday, July 10, 2011

Ashadhi Devshayani Ekadashi in Marathi आषाढी (देवशयनी) एकादशी
आषाढी (देवशयनी) एकादशी

इतिहास

           पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, श्रीविष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव चित्रकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करावा लागला. त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला मारले. ही जी शक्तीदेवी तीच एकादशी देवता आहे. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात.

 

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी' म्हणण्याचे कारण : मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी' (देवांच्या निद्रेची) एकादशी', असे म्हणतात.

आषाढी एकादशीचे महत्त्व : देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्‍तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते.

पूजाविधी : या दिवशी श्रीविष्णूची `श्रीधर' या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.

पंढरपूरची वारी : वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे.

श्री विठ्ठलाला तुळस आणि मंजिरींचा हार का वहातात ?

तुळस

     तुळशीमध्ये श्रीविष्णूची सूक्ष्म स्पंदने (तत्त्व) आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते. श्री विठ्ठल हे श्रीविष्णूचेच रूप आहे. विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस वाहिल्याने ती जागृत व्हायला साहाय्य होते. त्यामुळे मूर्तीतील चैतन्याचा लाभ उपासकाला मिळतो.

तुळशीची मंजिरी

     मंजिरी ही आपल्या स्पर्शातून विष्णुतत्त्वाला जागृत करणारी आहे. तुळशीत श्रीकृष्णतत्त्व असल्याने तिच्या मंजिरीतून उधळल्या जाणार्‍या चैतन्याच्या प्रवाहामुळे श्री विठ्ठलाच्या मूर्तीतील श्रीकृष्णतत्त्व जागृत होते आणि भक्ताचा भाव वाढेल, तसे त्याचे विष्णुतत्त्वात रूपांतर होऊन भक्ताला निर्गुणस्वरूप चैतन्याची अनुभूती येते.

मंजिरींचा हार

     श्री विठ्ठलाच्या छातीवर रुळणारा तुळशीच्या मंजिरींचा हार हा मूर्तीतील मध्यभागातील स्थितीविषयक श्रीविष्णुरूपी क्रिया-शक्तीला चालना देणारा असल्याने भाविकांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात.

पंढरपूरची काही वैशिष्ट्ये

     'पंढरी हे भगवान शंकराचे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र मानले आहे. आद्य शंकराचार्यांनी या क्षेत्राला 'महायोगपीठ' म्हटले आहे. (त्यांनी पांडुरंगाचे गुणगान करणारे 'पांडुरंगाष्टकम्' सुद्धा म्हटले आहे.) पंढरी हे क्षेत्र म्हणजे श्रीकृष्णाचे दक्षिणेकडील रासक्रीडेचे गोकुळच आहे. यासंदर्भात पुराणांत निरनिराळ्या कथा आहेत.

चंद्रभागा :

     पंढरपूरला जी 'चंद्रभागा' आहे, ती भीमाशंकरच्या डोंगरातून उगम पावल्यामुळे 'भीमा' झाली. तीच पंढरपुरात मांड खडकापासून विष्णुपद स्थानापर्यंत पाऊण मैल चंद्रकोरीप्रमाणे वहाते; म्हणून तिला 'चंद्रभागा' म्हणतात. ती कर्नाटकात कृष्णा नदीला मिळते.'

लोहतीर्थ :

     एकदा शंकर-पार्वती वरुण-राजाच्या भेटीस निघाले असता त्यांना तहान लागली. तेव्हा ते भीमानदीच्या काठावर थांबले. तेथे शंकराने त्याच्या त्रिशूळाने पाताळगंगेला वर आणले. ती वर येताच दोघांनी आपली तहान भागवली. त्यामुळे प्रसन्न होऊन शंकराने त्या प्रवाहाला 'लोहतीर्थ' हे नाव दिले. चंद्रभागेच्या जवळच 'लोहतीर्थ' आहे.

     पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीत श्रीकृष्णतत्त्व आणि श्रीविष्णुतत्त्व जास्त असल्याने दोन्ही मार्गांनी, म्हणजेच सगुण, तसेच निर्गुण मार्गाने उपासना करणार्‍यांसाठी ही मूर्ती लाभदायक आहे. तसेच ब्रह्मगण, शिवगण आणि अनेक शक्तीगण यांनाही अंगाखांद्यावर खेळवणारी ही मूर्ती असल्याने सर्वच स्तरांवरील उपासकांना चैतन्याची फलप्राप्ती करून देणारी आहे; म्हणून सर्वच स्तरांवरील भक्तगण श्री विठ्ठलाच्या मूर्तीला भजणारे आहेत.

संत भक्तराज महाराज आणि पांडुरंग

'एकदा बाबा पंढरपूरला गेले असता आम्ही सगळे मुक्कामाच्या ठिकाणी, म्हणजे होळकर वाड्यावर बसलो होतो. त्या वेळी पांडुरंगाचे पुजारी (बडवे) तेथे येऊन म्हणाले, ''आज गुरुवार आणि एकादशी असल्याने तुमच्या हस्ते पांडुरंगाला हार आणि पेढ्याचा नैवेद्य दाखवावयाचा आहे.'' तेव्हा बाबा म्हणाले, ''बरं, तुमची इच्छा आहे, तर तसे करू !'' बडवे म्हणाले, ''पांडुरंगाला भेटायची वेळ रात्री १० वाजता आहे.''

 

     मग बडवे म्हणाले, ''आज फराळ करायला आमच्याकडेच या.'' त्याप्रमाणे आम्ही बडव्यांकडे फराळाला गेलो. फराळ चालू असतांना बडवे आपल्या मुलाला म्हणाले, ''हार आणि पेढ्याचा पुडा घेऊन ये.'' तेवढ्यात बाबा म्हणाले, ''कशाला घाई करतोस ?'' बडवे म्हणाले, ''महाराज, साडेआठ वाजता आमच्या येथे सर्व दुकाने बंद होतात, म्हणून मी घाई करतो आहे.'' तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, ''त्याने जर १० वाजता भेटीची वेळ दिलेली आहे, त्याला जर आपल्या हातून हार घालून घ्यायचा आहे, तर तो दुकान उघडे ठेवील. नाही मिळाली तर आपण खंत वाटून घ्यायची नाही. नुसते हात जोडायचे.'' बडव्यांच्या घरून आम्ही पावणेदहा वाजता बाहेर पडलो. त्यांच्या घरासमोरच पांडुरंगाचे मंदिर. पावणेदहा वाजता पेढ्याचे आणि हाराचे दुकान उघडे पाहून पुजारी चकितच झाले. पेढ्याची पुडी आणि हार घेऊन आम्ही सर्व देवळात गेलो.

 

     प.पू. बाबा पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. त्यांच्या बाजूला आम्ही सर्व उभे राहिलो. मग बाबांनी पांडुरंगाच्या गळ्यात हार घातला आणि पेढ्याच्या पुडीतील एक पेढा उचलून पांडुरंगाच्या मुखाला लावला.(तोंडाजवळ नेला़) तेव्हा अर्धा पेढा एकदम गायब झाला. बाबांचा चेहरा लालबुंद झाला.

 

     बाजूचे बडवे बाबांना म्हणाले, ''अहो शेटजी, असा पेढा पांडुरंगाला लावायचा नसतो.'' बडव्यांनी सर्व हार दूर केले. तरी त्यांना पेढा कोठेही मिळाला नाही. बाबांनी पांडुरंगाच्या चरणांना स्पर्श केला, तेव्हा त्यांना उजव्या चरणाजवळ अर्धा पेढा मिळाला. तो पेढा बाबांनी आम्हा भक्तांना दिला. तेथून बाबा तडक होळकरांच्या वाड्यात केव्हा गेले, हे आम्हाला कळले नाही. वाड्यावर गेल्यावर बाबा खांबाला टेकून ठेवलेल्या खुर्चीत बसले. त्यांचा चेहरा लालबुंद दिसत होता. ते कोणाशी बोलण्याच्या स्थितीत नव्हते. तरीपण मी जाऊन बाबांना विचारले. तेव्हा त्यांनी हाताने खूण करून 'भजन करा', असे सांगितले. आम्ही भजन करायला सुरुवात केली. भजन चालू असतांनाच हुंदके देऊन रडण्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा पहातो, तर बाबांना गहिवरून आले होते. तेव्हा पवारसाहेब म्हणाले,''आरती करा.'' त्याप्रमाणे आरती केली. मग बाबा जाऊन झोपले. नंतर बाबांनी आम्हा भक्तांना सांगितले, ''होळकरांकडे आलेले आनंदाश्रू व दुःखाश्रू होते. आनंदाश्रू अशासाठी की, माझ्या गुरुमाऊलीने प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडविले व मी पांडुरंगाला पेढा भरविला. दुसरे दुःखाश्रू अशासाठी की, पांडुरंगाने पाषाणातून सगुण रूपात येऊन मला दर्शन दिले. परमेश्वराला पाषाणातून प्रत्यक्ष यायला किती कष्ट पडले असतील, या विचाराने. दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजताच बरोबरच्या सर्वांना घेऊन बाबांनी पंढरपूर सोडले; कारण त्यांना प्रसिद्धी नको होती.''

 

पंढपूरची वारी

आषाढी एकादशीचे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. या एकादशीनिमित्त वारकर्‍यांकडून पंढरपूरची वारी केली जाते. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायात केली जाणारी पंढपूरची वारी हादेखील एक साधनामार्गच आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही कर्मकांडातील साधना आहे. वारीचे वारकरी देहाची पर्वा न करता मैलोन्मैल चालतात. असे केल्याने शारीरिक तप घडते, म्हणजेच हठयोग होतो. मुळात वारकरी संप्रदायाची साधना ही भक्‍तियोगानुसार केली जाणारी साधना आहे. वारीच्या वेळी केले जाणारे भजन-कीर्तन, नामस्मरण यात भक्‍तियोग व नामसंकीर्तनयोग यांचा सहज मिलाप झालेला दिसतो.

विठ्ठल : महाराष्ट्राचे आराध्य दैवत

तत्त्व
श्री विठ्ठलाचे तत्त्व तारक स्वरूपाचे आहे. त्यामुळेच श्री विठ्ठलाच्या हातांत कोणतेही शस्त्र नाही. श्री विठ्ठलाचे सर्व भक्‍तगण भोळा भाव असलेले आहेत. त्यामुळे श्री विठ्ठलाला `भक्‍ताचे रक्षण करणारी आराध्यदेवता', असे संबोधले जाते. संत तुकारामांच्या आळवण्याने श्री विठ्ठलाने शिवरायांचे रक्षण केले व शत्रूपक्षाला त्या प्रसंगातून अप्रत्यक्षरीत्या त्रास दिला. श्री विठ्ठल प्रत्यक्ष कोणत्याही जिवाचा संहार करत नाही. हे त्याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे.

`पांडुरंग' या नामाचे वैशिष्ट्य
श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे. त्यामुळे दह्या-दुधाने माखल्या गेलेल्या रूपातच श्रीकृष्णाने श्री विठ्ठलाचे रूप धारण केले. त्यामुळे शास्त्रांत व पुराणांत पांडुरंगाचा रंग सावळा सांगितलेला असला, तरी अभिषेकाने तो पांढरा झाल्याने श्री विठ्ठलाला `पांडुरंग' म्हणतात.

श्री विठ्ठलाला तुळस वाहण्याची वेगळी वैशिष्ट्ये
तुळस श्रीलक्ष्मीचे प्रतीक आहे व श्रीलक्ष्मी ही श्रीविष्णूची पत्‍नी असल्यामुळे (श्री विठ्ठल हा श्रीविष्णूचे रूप आहे.) ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरी चरणी रहाते.

भक्‍ताच्या हाकेला लगेच `' देणारी देवता
श्री विठ्ठल भक्‍ताच्या हाकेला लगेच `' देणारी देवता असल्याने ती पुरुष देवता असूनही त्याला भक्‍तगण `विठूमाऊली' या नावाने संबोधतात. श्री विठ्ठल खूप मायाळू व प्रेमळ अंत:करणाचा असल्याने `तो भक्‍तांसाठी धावत येणारच आहे', असा भक्‍तांचा ठाम विश्‍वास असतो. त्याच दृढ भावापोटी विठूमाऊलीने भक्‍तांची दळणे दळली, गोवर्‍या थापल्या व भक्‍ताची सेवा केली.

मूर्तीविज्ञान
काळया रंगाची, बटबटीत डोळयांची, दोन्ही हात कमरेवर ठेवलेली व विटेवर उभी, अशी विठ्ठलाची मूर्ति असते. पुंडलिकाने केलेल्या आईवडिलांच्या सेवेने प्रसन्न होऊन विठ्ठल त्याला दर्शन द्यायला आला. त्या वेळी पुंडलिकाने विठ्ठलाकडे वीट फेकून तिच्यावर त्याला उभे रहायला सांगितले; कारण त्याला आईवडिलांच्या सेवेत खंड पडू द्यायचा नव्हता. त्याच्या सेवेकडे कौतुकाने पहात विठ्ठल उभा राहिला. इतर देवांच्या मूर्तींत हातात शस्त्र असते किंवा एखादा हात आशीर्वाद देणारा असतो. तसे या मूर्तीत नाही. काही न करता सर्वत्र साक्षिभावाने पहाणारा विठ्ठल त्यात दाखविला आहे. कमरेच्या वर ज्ञानेंद्रिये आहेत, तर खाली कर्मेंद्रिये आहेत. कमरेवर हात ठेवलेला म्हणजे कर्मेंद्रिये ताब्यात असलेला.

विठोबाची आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।


5 comments:

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive

Follow by Email