Tuesday, July 19, 2011

‘अ‍ॅन्ड्रॉइड’चा धुमाकूळ!




'अ‍ॅन्ड्रॉइड'चा धुमाकूळ!

          गेल्या काही वर्षांपासून बाजारात अ‍ॅन्ड्रॉईड मोबाइल फोन्सची चलती आहे. आयफोन चांगला की अ‍ॅन्ड्रॉइड यावर अनेकांच्या रंगलेल्या चर्चाही आपण ऐकल्या असतील. पण 'अ‍ॅन्ड्रॉइड' म्हणजे नेमके काय? त्याचा उपयोग, त्याची वैशिष्टय़े आदी प्रश्न अनुत्तरितच आहेत. त्याच प्रश्नांची उत्तरे देणारा हा लेख.

           अ‍ॅन्ड्रॉइड म्हणजे नेमक काय? अ‍ॅन्ड्रॉइड फोन्स हा शब्द सारखा कानावर पडल्याने अ‍ॅन्ड्रॉइड हा एखाद्या कंपनीचा फोन आहे असा अनेकांचा गैरसमज असतो, खरं तर अ‍ॅन्ड्रॉइड हा कोणताही फोन नसून ती एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. ज्याप्रमाणे कॉम्प्युटर, लॅपटॉप चालविण्यासाठी विंडोज ७, विन्डोज एक्स पी या ऑपरेटिंग सिस्टम्स असतात, तसेच मोबाईल चालविण्यासाठी गुगल या कंपनीने अ‍ॅन्ड्रॉइड नामक ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली. 'अ‍ॅपल'ने डिझाइन केलेल्या आयफोन्सना बाजारात टक्कर देण्यासाठी अ‍ॅन्ड्रॉइडची निर्मिती करण्यात आली होती आणि त्यानेही आपले काम चोख बजावले.

          अ‍ॅन्ड्रॉइड ही एक ओपन सोर्स सिस्टम आहे. आपल्या ताकद व गरजेनुसार अ‍ॅन्ड्रॉइडच्या  रूपात बदल करून त्याद्वारे आपण आपला फोन विकसित करू शकतो. अगदी याच कारणामुळे डबघाईला आलेली अनेक कंपन्यांची दुकाने पुन्हा एकदा चालू लागली आहेत. बाजारात नजर टाकली असता एचटीसी, मोटोरोला, सोनी एरेक्सन, सॅमसंग या साऱ्या कंपन्यांनी अ‍ॅन्ड्रॉइड फोन्स डेव्हलप करण्यावरच भर दिल्याचे दिसून येते.

          काहीही असले तरी 'एचटीसी' हाच अ‍ॅन्ड्रॉइडचा जिवाभावाचा मित्र मानला जातो, कारण 'एचटीसी'नेच 'ड्रीम' हा पहिला अ‍ॅन्ड्रॉइड फोन बनविला, मग पुढे आयफोनला टक्कर देण्यासाठी एचटीसीने अ‍ॅन्ड्रॉइडला सोबत घेऊन कधी 'हीरो', तर कधी 'लिजेण्ड'ला बाजारात आणला.  आता अ‍ॅन्ड्रॉइडला सर्व ऑपरेटिंग सिस्टमपेक्षा हटके आणि बेस्ट बनविणाऱ्या त्याच्या फिचर्सबद्दल जाणून घेऊ या. सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़े म्हणजे अ‍ॅन्ड्रॉइड फोन सर्वसामान्यांच्या खिशालाही सहज परवडतो. अगदी किफायतशीर किमतीत हे फोन्स उपलब्ध होतात. तुम्ही 7 हजारांपासून पुढे कोणताही महागडा फोन घेऊ शकता.

          सर्वात जमेची बाजू म्हणजे अ‍ॅन्ड्रॉइडच्या डोक्यावर गुगल बाबांचा हात आहे. त्यामुळे गुगलच्या सर्वच सव्‍‌र्हिसेस (यू टय़ुब, गुगल मॅप्स इत्यादी) अ‍ॅन्ड्रॉइडवर वरदान म्हणून उपलब्ध होतात. तसेच अ‍ॅन्ड्रॉइड फोन्स फ्लॅश सपोर्टेड असतात, त्यामुळे वेब पेजेसचा ले आऊट अगदी लॅपटॉपइतकाच चांगला दिसतो. सध्या तरुणाईचे सर्वस्व झालेल्या सोशल नेटवर्किंगसाठी त्याचा चांगला उपयोग होतो. फेसबुक, ट्वीटरसाठी वेगवेगळे अ‍ॅप्स वापरण्यापेक्षा फक्त कॉन्टॅक्ट नेमवर क्लिक केले असता साऱ्या अपडेट्स एकाच ठिकाणी पाहता येतात.

          अ‍ॅन्ड्रॉइडमध्ये सगळा डाटा क्लाऊडवर म्हणजे दूर असलेल्या सव्‍‌र्हरवर सेव्ह होतो. त्यामुळे आपल्याला अनलिमिटेड फोन मेमरी व अनलिमिटेड कॉलहिस्टरी लिस्ट मिळते. त्याशिवाय अ‍ॅन्ड्रॉइड ओपन सोर्स असल्याने आपणही आपल्या गरजेनुसार अ‍ॅप्स बनवता येऊ शकतात. अशाप्रकारे अनेकांकडून डिझाइन केल्या गेलेल्या उपलब्ध असणाऱ्या अ‍ॅप्लिकेशन्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

          टेक्नोसॅव्ही लोकांच्या हातात अ‍ॅन्ड्रॉइडच नवीन व्हर्जन येते, तोपर्यंत ते जुने झालेले असते. म्हणजेच अ‍ॅन्ड्रॉइड एकानंतर एक असे अनेक सर्वोत्तम व्हर्जन्स बाजारात आणते, त्यांची नावेही जिभेला पाणी आणणारी असतात. अ‍ॅन्ड्रॉइड१.५- कप केक, अ‍ॅन्ड्रॉइड१.६ डोनट, अ‍ॅन्ड्रॉइड २.० एक्लेअर इ.. आता अ‍ॅन्ड्रॉइड हनिकॉम्ब व जिंजरब्रेड यांच संकरित रूप असलेल 'अ‍ॅन्ड्रॉइड-आईस्क्रीम सॅण्डविच' हे नवीन व्हर्जन लवकरच बाजारात आणणार आहे.

          एकूणच दिवसागणिक अधिक शक्तिशाली होत जाणाऱ्या अ‍ॅन्ड्रॉइडने सध्या साऱ्या बाजारात धुमाकूळ घातला आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive