क्रांतीवीर गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर हे स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. त्यांनीच स्वा. सावरकरांना पितृतुल्य प्रेम देऊन, अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचे मोठे केले आणि त्यांच्या बरोबरीने क्रांतीकार्यातही भाग घेतला. १३ जून रोजी असणार्या बाबारावांच्या जयंतीनिमित्त त्यांचे हे पुण्यस्मरण ! बाबारावांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी १३ जून १८७९ रोजी झाला. लहानपणी त्यांची प्रकृती नाजूक होती. सहाव्या वर्षापासून चौदाव्या वर्षापर्यंत त्यांना सुमारे दोनशे वेळा विंचूदंश झाले. पुढील क्रांतीकारी आयुष्यात यातना सहन करण्याची शक्ती यावी, अशीच ही निसर्गाची योजना असावी. तरुण वयातही त्यांनी स्वत:च्या शरीरास मुद्दामहून खूप कष्ट दिले. कडक थंडीतदेखील ते उघड्या अंगाने, पांघरूण न घेता घराबाहेर झोपत. त्यांच्या डोक्यात क्रांतीचेच विचार सतत घोळत असत. बलाढ्य ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध क्रांती करणे हे एकट्यादुकट्याचे काम नाही, तर त्यासाठी प्रबळ आणि कट्टर संघटना आवश्यक आहे, हे बाबारावांनी लहान वयातच हेरले. यासाठी `मित्रमेळा' या संघटनेची स्थापना करण्यात आली. राष्ट्रगुरु रामदासस्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, नाना फडणवीस आदी थोर पुरुषांच्या जयंत्या जाहीर सभा घेऊन साजर्या करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे तरुणांत आणि जनतेत देशभक्ती जागृत होण्यास खूपच मदत झाली. या निमित्ताने लोकमान्य टिळक, `काळ' या वर्तमानपत्राचे संपादक शिवराम महादेव परांजपे यांची देशभक्तीने रसरसलेली भाषणे नाशिककरांना ऐकण्याची संधी प्राप्त झाली.
बाबारावांचा (`साहेब' हा शब्द फारसी. त्यामुळे साहेब ऐवजी `राव' हा शब्द सावरकरबंधूंनी रूढ केला. जसे बाबाराव, तात्याराव) ब्रिटीश शासनाशी पहिला संघर्ष १९०६ साली उडाला. नाशिकमध्ये जाहीर सभा घेण्यास असलेली बंदी मोडली, या गुन्ह्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आणि १० रुपये दंड करण्यात आला. बाबारावांनी याविरुद्ध वरिष्ठ न्यायालयाकडे दाद मागितली आणि त्यांचा दंड रद्द झाला. २७ सप्टेंबर १९०६ रोजी दसर्यानिमित्त नाशिक येथील कालिकेच्या मंदिराकडून सीमोल्लंघन करून परतणार्या तरुणांनी `वन्दे मातरम्'चा जयघोष केला. तो ऐकून एका पोलिसाने `बोंब मारणे बंद करा', असे म्हणत बाबांच्या अंगावर हात टाकला. मात्र त्या पोलिसावरच पश्चात्तापाची पाळी आली. बाबांसकट सर्वांनीच त्या पोलिसाला ठोकून काढले ! या प्रसंगाने संतप्त झालेल्या ब्रिटीश सरकारने ११ तरुणांवर अभियोग भरला. `वन्दे मातरम् अभियोग' या नावाने तो गाजला. यात बाबाराव मुख्य आरोपी होते. नाशिक जिल्ह्यात हा अभियोग निरनिराळया ठिकाणी सहा महिने चालला; कारण न्यायाधीश फिरतीवर असत आणि ते असतील तेथे हा अभियोग चालत असे. या अभियोगात बाबारावांना २० रुपये दंड होऊन मोठ्या रकमेचा प्रतिभू (जामीन) मागण्यात आला. अन्य तरुणांनाही अशाच प्रकारच्या शिक्षा झाल्या. बाबाराव नाशिकमध्ये असतांना त्यांनी राष्ट्रहिताच्या दृष्टीने मूलभूत स्वरूपाच्या अनेक चळवळी सुरू केल्या. स्वदेशी चळवळ, विलायती मालावर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षणाची सुरुवात इत्यादी चळवळींचे सूत्रसंचालन बाबाराव धुरिणत्वाने करत असत.
याच सुमारास बाबारावांचे पाठचे बंधू स्वा. वि.दा. सावरकर लंडनमध्ये शिक्षण घेत होते. १९०६ साली स्वा. सावरकरांनी लिहिलेले प्रसिद्ध इटालियन क्रांतीकारक जोसेफ मॅझिनी यांच्या चरित्राचे हस्तलिखित बाबारावांकडे आले. ब्रिटिशांच्या दृष्टीने हे चरित्र अत्यंत स्फोटक होते. जून १९०७ मध्ये बाबारावांनी हे पुस्तक प्रसिद्ध केले. दोन महिन्यांतच २ सहदा प्रतींची पहिली आवृत्ती जवळ जवळ संपली. पुस्तकाच्या विषयाबरोबर बाबांचे परिश्रमही याला कारणीभूत होते. या पुस्तकाला स्वा. सावरकरांनी लिहिलेली २६ पृष्ठांची प्रस्तावना त्या वेळी अनेकांनी मुखोद्गत केली. यातील ज्वलंत विचारांनी प्रभावित होऊन अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन याचा वध केला. लवकरच स्वा. सावरकरांनी लिहिलेल्या आणि हॉलंडमध्ये मुद्रित केलेल्या `१८५७ चे स्वातंत्र्यसमर' या ग्रंथाच्या प्रती बाबारावांच्या हाती आल्या. बाबारावांनी या प्रतीही अत्यंत गुप्तपणे क्रांतीकारकांपर्यंत पोहोचवल्या. या अद्वितीय ग्रंथामुळे ब्रिटिशांविरुद्ध बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्रात `गदर' पक्षाची स्थापना होऊ शकली ! `अभिनव भारत' संघटनेतील युवकांना आपण कोणत्या आगीशी खेळत आहोत, तसेच आपल्या कृत्यांना भारतीय दंडविधानात (इंडियन पिनल कोड) कोणत्या शिक्षा सांगितल्या आहेत, हे कळावे म्हणून भारतीय दंडविधानाची एक छोटी आवृत्तीही बाबारावांनी छापून घेतली होती. भावनेच्या आहारी जाऊन नव्हे, तर समजून उमजून तरुणांनी क्रांतीकार्याला हात घालावा, हा उद्देश यामागे होता ! लंडनहून स्वा. सावरकरांनी हातबाँब तयार करण्याचे तंत्र शिकवणारे कागदपत्र सेनापती बापट यांच्यामार्फत बाबारावांकडे पाठवले. बाबारावांनी हातबाँब तयार करण्याची ही कृती क्रांतीकारकांपर्यंत पोचवली. या कृतीवरूनच खुदिराम बोस यांनी न्यायाधीश किंग्जफोर्ड याच्या गाडीवर हिंदुस्थानात सिद्ध झालेला पहिला बाँब टाकला !
या सर्व व्यापांमुळे बाबारावांना अटक करण्याची संधी ब्रिटीश शासन शोधू लागले. ११ जून १९०८ रोजी शिवरामपंत परांजपे यांना पुण्यात अटक करण्यात आली आणि दुसर्याच दिवशी मुंबईला आणून त्यांच्यावर अभियोग सुरू करण्यात आला. स्वराज्य चळवळीसंबंधी परांजपे यांच्या ओघवत्या आणि परिणामकारक वक्तृत्वाने अनेक तरुण भारले होते. त्यामुळे परांजपे यांच्या अटकेने बाबारावांसहित अनेक तरुण प्रक्षुब्ध झाले. त्यांना काही मदत करावी या हेतूने बाबारावही मुंबईत आले. तेथील न्यायालयासमोर एका खोजा जमातीच्या व्यापार्याला पोलीस अधिकारी खूप त्रास देत असलेला बाबारावांनी पाहिला. बाबारावांचे तरुण रक्त उसळून आले. त्या व्यापार्यास पाठीशी घालून बाबारावांनी त्या पोलीस अधिकार्याशी वितंडवाद घालावयास सुरुवात केली. त्यामुळे चिडून पोलिसांनी बाबारावांनाच अटक केली. हे काय प्रकरण चालले आहे हे पाहण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी गायडर बाबारावांकडे आला आणि त्याने त्यांचे नाव विचारले. `बाबा सावरकर' हे नाव ऐकताच गायडरला अत्यानंद झाला. त्याने ताबडतोब बाबारावांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याजवळ रशियन क्रांतीसंबंधीचे एक पत्रक सापडले. त्या पत्रकाच्या आधारे बाबारावांना एक महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. ती त्यांनी ठाणे आणि नाशिक येथील कारागृहांत आनंदाने भोगली.
क्रांतीकारकांच्या अनेक गुप्त उद्योगांत बाबाराव सावरकरांचा हात आहे आणि त्यांना त्यांचे मार्गदर्शनही लाभले आहे, हे ब्रिटीश गुप्तहेर खात्याने ओळखले होते. १९०९ मध्ये बाबारावांनी कवी गोविंद रचित चार क्रांतीकारी कविता प्रसिद्ध केल्या. त्यांपैकी `रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?' या कवितेत प्रतिपादले होते की, गुलामगिरीत खितपत पडलेल्या जगातील कोणत्याही देशाला सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य मिळाले नाही. मग त्याला हिंदुस्थानच कसा अपवाद असेल ? या कविता प्रसिद्ध केल्या म्हणून सरकारने बाबारावांना अटक करून जन्मठेपेची अतिशय कठोर शिक्षा दिली. ८ जून १९०९ रोजी बाबारावांना शिक्षा होऊन अंदमानात नेण्यात आले. त्या वेळी ते जेमतेम ३० वर्षांचे होते !
अंदमानातील `सेल्युलर जेल'मध्ये असतांना बाबारावांच्या शारीरिक यातनांना पारावार राहिला नाही. धोकादायक क्रांतीकारक म्हणून तेथील तुरुंगाधिकार्याने बाबारावांकडून अतिशय कष्टाची कामे करवून घेतली. तरीही बाबारावांच्या मनातील क्रांतीची भावना यत्किंचितही कमी न होता ती अधिकच धारदार झाली. संघटनचातुर्य आणि अन्यायाचा प्रतिकार हे त्यांच्या रोमरोमांत भिनले असल्यामुळे त्यांनी अंदमानातच कारावास भोगत असलेल्या स्वा. सावरकरांच्या साहाय्याने तेथील राजकीय कैद्यांना संघटित केले. चांगली वागणूक आणि अन्न मिळावे म्हणून उपोषण, असहकार, संप आदी मार्गांनी लढा दिला. परिणामी त्यांना अधिकाधिक कठोर शारीरिक शिक्षा भोगाव्या लागल्या; परंतु त्याची तमा न बाळगता बाबारावांनी आपले कार्य अविरत चालू ठेवले. अंदमानातील ११ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत त्यांची प्रकृती पार ढासळली आणि त्यांना क्षयाचा विकार जडला. ते अंदमानात असतांनाच त्यांची पत्नी सौ. येसूवहिनींनी या जगाचा निरोप घेतला. त्या दोघांची शेवटची भेटही मुजोर शासनाने होऊ दिली नाही. १९२१ मध्ये बाबारावांना हिंदुस्थानात परत आणण्यात आले आणि साबरमतीच्या कारागृहात ठेवण्यात आले. त्या वेळी त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. बाबाराव आता काही तासांचेच सोबती आहेत, असे शासनाच्या डॉक्टरने सांगितले तेव्हाच म्हणजे सप्टेंबर १९२२ मध्ये सरकारने त्यांची सुटका केली !
बाबारावांनी अनेक पुस्तके लिहिली. `वीर बैरागी' या भाई परमानंदलिखित पुस्तकाचे त्यांनी भाषांतर केले. या पुस्तकात बंदा वीराचे चरित्र सांगून हिंदूंना स्फूर्ती द्यावी, सूड कसा उगवावा ते शिकवावे तसेच पंजाबातील शीख आणि मराठे यांचा दुवा जोडावा, हा बाबारावांचा उद्देश होता. या पुस्तकात औरंगजेबाच्या मुसलमानी सत्तेशी वीर बंदा बैराग्याने केलेल्या संघर्षाची कहाणी आहे. `राष्ट्रमीमांसा' या पुस्तकात त्यांनी `भारत हे हिंदुराष्ट्र आहे' हे सिद्ध केले आहे. `श्री शिवरायांची आग्र्यावरील गरुडझेप' या पुस्तकात आग्र्याला जाण्यात शिवरायांचा हेतू औरंगजेबाचा वध करण्याचा होता, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. `वीरा-रत्नमंजुष् ा' या पुस्तकात महाराणी पुष्पवती, राजा दाहिरच्या दोन वीरकन्या, राणी पद्मिनी, पन्नादायी आदी रजपूत स्त्रियांची चरित्रे वर्णिलेली आहेत. `हिंदुराष्ट्र - पूर्वी, आता नि पुढे', `धर्म हवा कशाला ?', `िख्र्तास् परिचय अर्थात् िख्र्तासचे हिंदुत्व' ही त्यांची अन्य पुस्तके आहेत. आयुष्यभर देशहितासाठी प्राणपणाने झटणारा हा वीरात्मा १६ मार्च १९४५ रोजी सांगली येथे कालवश झाला. बाबारावांचे चरित्र म्हणजे राष्ट्रासाठी चंदनाप्रमाणे अखंड झिजलेल्या एका थोर देशभक्ताची स्फूर्तीदायी कथा आहे !
जयपूरला असतांना स्वामी विवेकानंद पाणिनीचे संस्कृत व्याकरण शिकण्यासाठी तेथील एका प्रसिद्ध संस्कृत पंडितांकडे जात होते. पंडितजींनी त्यांना पहिले सूत्र नाना प्रकारे समजावून सांगितले, तरीही त्यांना ते येत नव्हते. तीन दिवसांच्या सततच्या प्रयत्नांनंतर पंडितजी म्हणाले, ``पुष्कळ प्रयत्न करूनसुद्धा मी आपल्याला एकही सूत्र समजावून देऊ शकलो नाही. त्यामुळे माझ्याजवळ शिकण्याने आपल्याला लाभ होईल, असे मला वाटत नाही.'' पंडितजींचे बोलणे ऐकून विवेकानंदांना फार वाईट वाटले. जोवर या सूत्राचा अर्थ समजणार नाही, तोवर जेवण-खाण सर्व बंद! असा ठाम निर्धार त्यांनी केला. त्यांनी एकाग्र चित्ताने त्या सूत्रातील भाष्य समजून घेतले. नंतर ते पंडितजींकडे गेले. त्यांच्याकडून सूत्रांचे सुरेख आणि सहज स्पष्टीकरण ऐकून पंडितजींनाही आश्चर्य वाटले. मित्रांनो, `केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे' ही म्हण तुम्हाला ठाऊकच असेल. ठाम निर्धार केला की, कुठलीही गोष्ट असाध्य नसते.
बनारसमध्ये असतांना स्वामी विवेकानंद एकदा एका अरुंद पायवाटेने चालले होते. वाटेत लाल तोंडाची माकडे त्यांच्या पाठीमागे लागली. त्यांच्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी स्वामीजी पळू लागले; पण ती माकडे काही त्यांचा पिच्छा सोडेनात. इतक्यात पळणाऱ्या स्वामीजींना कुठून तरी एका साधूचा आवाज ऐकू आला. `पळू नका ! त्यांना सामोरे जा !', असे तो त्यांना सांगत होता. त्याच्या सांगण्यानुसार स्वामीजी एकदम वळले आणि माकडांकडे तोंड करून खंबीरपणे उभे राहिले. आणि काय आश्चर्य ! सर्व माकडे मागे सरली आणि पळून गेली. या अनुभवावरून विवेकानंदांनी सर्वांना सांगितले की, संकटांना घाबरून पळू नका. त्यांना धैर्याने तोंड द्या. संकटांना कधीही घाबरू नये. त्यांना धैर्याने सामोरे जाता आले पाहिजे.
कलकत्त्यातील सिमोलिया पथावर एक मोठे घर होते. त्या घरात विश्वनाथबाबू दत्त नावाचे एक नावाजलेले अधिवक्ता (वकील) रहात होते. त्यांची कीर्ती कलकत्त्यातच नव्हे, तर बंगालमध्ये गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वत्र पोहोचलेली होती. त्यांच्या पत्नीचे नाव होते भुवनेश्वरीदेवी. आपल्याला मुलगा व्हावा; म्हणून भुवनेश्वरीदेवी काशीला गेल्या अन् काशीविश्वेश्वरापुढे तपश्चर्या करू लागल्या. एके दिवशी भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि दृष्टांत देऊन `तुझी मनोकामना पूर्ण होईल', असा आशीर्वाद त्यांना दिला.
पुढे कलकत्त्यास आल्यावर काशीविश्वेश्वराच्या कृपेने त्यांना मुलगा झाला. तो दिवस होता मकर संक्रांतीचा. १२.१.१८६३ मध्ये विश्वेश्वराच्या कृपेने मुलगा झाला; म्हणून त्याचे नाव ठेवले विरेश्वर. त्याची आई त्याला प्रेमाने `बिले' म्हणायची. त्याचे दुसरे नाव `नरेंद्र' होते.
बिले लहानपणापासूनच देवभक्त होता. लहान असतांना शिवाचा जप तो एकाग्रपणे करत असे. एखादी गोष्ट करायला घेतल्यावर आपले संपूर्ण लक्ष त्या गोष्टीकडे लागणे आणि इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नसणे, अशा प्रकारची मनाची एकाग्रता लहानपणापासूनच नरेंद्रामध्ये होती. नरेंद्र आणि त्याचे मित्र ध्यान लावून बसणे, यासारखे खेळ खेळत असत. एकदा नरेंद्र आणि त्याचे मित्र घरामध्ये देवाचे ध्यान लावून बसले होते. शांतपणे हालचाल न करता सर्व मुले बसली होती नरेंद्र तर पूर्णपणे ध्यानमग्न झाला होता. तेवढ्यात एका कडेने सळसळ ऐकू आली. नरेंद्राच्या मित्रांनी डोळे झटकन उघडून बघितले तर त्यांना तेथे साप दिसला. त्यामुळे घाबरून, ओरडून सर्व जण खोलीबाहेर पळू लागले. काय झाले; म्हणून भुवनेश्वरीदेवी येऊन पहातात तो काय ? नरेंद्र तसाच शांतपणे डोळे मिटून बसलेला! साप त्याच्या जवळून दुसरीकडे गेला, तरी नरेंद्रला त्याचा पत्ताच नव्हता. इतके त्याचे मन एकाग्र झाले होते.
एकदा अमेरिकेतील एका समुद्रकिनाऱ्यावर काही मंडळी एक खेळ खेळत होती. तो खेळ असा होता की, समोर येणाऱ्या लाटेवरील हिंदकळणाऱ्या चेंडूवर नेम धरून मारणे. चेंडू सततच हालत असल्यामुळे तेथील कुणालाच ते व्यवस्थित जमत नव्हते. एक भारतीय युवक तेथून चालला होता. त्याने त्या हिंदकळणाऱ्या चेंडूवर आपला नेम अचूक मारून दाखवला. तो युवक अर्थात् नरेंद्र दत्त होता ! तेथील अमेरिकन मंडळींनी ते पाहून आश्चर्य व्यक्त केले. `हे त्यांना कसे जमले', या अमेरिकन मुलांच्या प्रश्नाला उत्तर देतांना विवेकानंदांनी त्यांना एकाग्रतेचे महत्त्व पटवून दिले. केवळ एकाग्रतेनेच हे साध्य होऊ शकते, असे ते म्हणाले.
मुलांनो, बाण मारतांना अर्जुनाची दृष्टी केवळ त्याच्या लक्ष्यावर केंद्रित असे, हे तुम्हाला ठाऊक आहेच ना ? एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की, ती लक्षपूर्वक करण्याची तळमळच कुठल्याही गोष्टीच्या यशस्वितेला कारणीभूत ठरते. हीच तळमळ पुढे नरेंद्रालाही ईश्वरप्राप्तीच्या साधनेत उपयोगी पडली. त्यायोगे ते नरेंद्राचे स्वामी विवेकानंद होऊ शकले.
तात्पर्य : आपल्या प्रत्येकाच्या मनाची शक्ती प्रचंड असते. मनाची एकाग्रता साध्य करणे हा त्याचा पहिला टप्पा आहे. जास्तीतजास्त लक्षपूर्वक केलेले काम अल्प वेळात होऊन जास्त यश मिळवून देणारे असते. मन एकाग्र करण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. नामस्मरणाने आपल्या मनातले इतर विचार अल्प होऊन एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित व्हायला साहाय्य होते. अभ्यास करतांनाही याचा लाभ होतो. म्हणूनच मित्रांनो, आतापासूनच आपण नामाला प्रारंभ करूया. मग यशोमंदिराचा कळस आपण नक्कीच गाठू शकू.
टिळक अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होते. त्यांची स्मरणशक्ती चांगलीच दांडगी होती. वडील गंगाधरपंत यांच्याकडून त्यांनी संस्कृतचे धडे घेतले. संस्कृतमधील एक श्लोक पाठ केल्यामुळे त्यांना एक पै मिळत असे. त्यांनी अशा किमान २०० पाया मिळवल्या. शाळेत जायला प्रारंभ होण्यापूर्वीच अनेक गोष्टी त्यांच्या तोंडपाठ असायच्या. त्यांचे पाठांतर पाहून त्यांच्या गुरुजींनाही फारच नवल वाटत असे. एके दिवशी वर्गात गुरुजींनी शुद्धलेखन घातले. त्यात 'संत' हा शद्ब एकापेक्षा अधिक वेळा आला होता. टिळकांनी तो तीन वेगवेगळया पद्धतीने लिहिला. संत, सन्त आणि सनत. गुरुजींनी पहिला शब्द योग्य ठरवला आणि बाकी दोन चूक दिले. आपण लिहिलेले तीनही शब्द योग्य आहेत, असे त्यांनी गुरुजींना सांगितले. एवढेच नव्हे, तर ठामपणे आपले म्हणणे योग्य कसे आहे, ते उदाहरणासहित पटवून दिले. तेव्हा शिक्षकांनी त्यांचे म्हणणे योग्य असल्याचे सांगितले. टिळकांनी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाला असतांना एक वर्ष परीक्षेला न बसता केवळ व्यायामाचा सराव करून आपली शरीरयष्टी बळकट केली. ते उत्तम मल्ल आणि पट्टीचे पोहणारेही होते. शाळेत जात असल्यापासून आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य आहे, आपले नव्हे, याची टिळकांना जाणीव होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर इंग्रजांना भारतातून बाहेर घालवण्यासाठी त्यांनी प्रभावी प्रयत्न चालू केले. बालपणापासून त्यांच्या अंगी असलेले सारे गुण त्यांना इंग्रजांच्या विरोधात लढा देतांना उपयोगी पडले. सुदृढ शरीरस्वास्थ्यामुळे पुढे कारागृहातील हालाखीच्या आणि राजकीय धकाधकीच्या आयुष्यातील कष्ट ते सोसू शकले. मंडालेच्या कारागृहात 'गीतारहस्य' या ग्रंथाचे लेखन केले. आपली सत्य बाजू पटवून देण्याच्या त्यांच्या विद्यार्थीदशेपासूनच्या बाणेदार वृत्तीमुळे ते हिंदुस्तानवर अन्याय करणाऱ्या इंग्रजांच्या विरोधात मोठे आंदोलन उभारू शकले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारताचे एक आदर्श सुपुत्र म्हणून ओळखले गेले. या गोष्टीतून आपल्याला टिळकांचा बाणेदारपणा दिसून येतो. तसेच कुठचेही कार्य करायचे म्हटले की, शरीरयष्टी चांगली हवी. त्यासाठी प्रतिदिन व्यायाम करायला पाहिजे. शरीर बलवान असेल, तरच आपण कुठलीही क्रांती करू शकतो. सध्या अपले राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती चांगली नाही. तेव्हा इतरांशी लढा द्यायचा असेल, तर शारीरिक आणि त्यासह आध्यात्मिक बळही हवे. तेव्हा नामजप, प्रार्थना, कृतज्ञता यांसह लढा द्यायला सिद्ध होऊया !