जयपूरला असतांना स्वामी विवेकानंद पाणिनीचे संस्कृत व्याकरण शिकण्यासाठी तेथील एका प्रसिद्ध संस्कृत पंडितांकडे जात होते. पंडितजींनी त्यांना पहिले सूत्र नाना प्रकारे समजावून सांगितले, तरीही त्यांना ते येत नव्हते. तीन दिवसांच्या सततच्या प्रयत्नांनंतर पंडितजी म्हणाले, ``पुष्कळ प्रयत्न करूनसुद्धा मी आपल्याला एकही सूत्र समजावून देऊ शकलो नाही. त्यामुळे माझ्याजवळ शिकण्याने आपल्याला लाभ होईल, असे मला वाटत नाही.'' पंडितजींचे बोलणे ऐकून विवेकानंदांना फार वाईट वाटले. जोवर या सूत्राचा अर्थ समजणार नाही, तोवर जेवण-खाण सर्व बंद! असा ठाम निर्धार त्यांनी केला. त्यांनी एकाग्र चित्ताने त्या सूत्रातील भाष्य समजून घेतले. नंतर ते पंडितजींकडे गेले. त्यांच्याकडून सूत्रांचे सुरेख आणि सहज स्पष्टीकरण ऐकून पंडितजींनाही आश्चर्य वाटले. मित्रांनो, `केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे' ही म्हण तुम्हाला ठाऊकच असेल. ठाम निर्धार केला की, कुठलीही गोष्ट असाध्य नसते.
बनारसमध्ये असतांना स्वामी विवेकानंद एकदा एका अरुंद पायवाटेने चालले होते. वाटेत लाल तोंडाची माकडे त्यांच्या पाठीमागे लागली. त्यांच्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी स्वामीजी पळू लागले; पण ती माकडे काही त्यांचा पिच्छा सोडेनात. इतक्यात पळणाऱ्या स्वामीजींना कुठून तरी एका साधूचा आवाज ऐकू आला. `पळू नका ! त्यांना सामोरे जा !', असे तो त्यांना सांगत होता. त्याच्या सांगण्यानुसार स्वामीजी एकदम वळले आणि माकडांकडे तोंड करून खंबीरपणे उभे राहिले. आणि काय आश्चर्य ! सर्व माकडे मागे सरली आणि पळून गेली. या अनुभवावरून विवेकानंदांनी सर्वांना सांगितले की, संकटांना घाबरून पळू नका. त्यांना धैर्याने तोंड द्या. संकटांना कधीही घाबरू नये. त्यांना धैर्याने सामोरे जाता आले पाहिजे.
कलकत्त्यातील सिमोलिया पथावर एक मोठे घर होते. त्या घरात विश्वनाथबाबू दत्त नावाचे एक नावाजलेले अधिवक्ता (वकील) रहात होते. त्यांची कीर्ती कलकत्त्यातच नव्हे, तर बंगालमध्ये गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वत्र पोहोचलेली होती. त्यांच्या पत्नीचे नाव होते भुवनेश्वरीदेवी. आपल्याला मुलगा व्हावा; म्हणून भुवनेश्वरीदेवी काशीला गेल्या अन् काशीविश्वेश्वरापुढे तपश्चर्या करू लागल्या. एके दिवशी भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि दृष्टांत देऊन `तुझी मनोकामना पूर्ण होईल', असा आशीर्वाद त्यांना दिला.
पुढे कलकत्त्यास आल्यावर काशीविश्वेश्वराच्या कृपेने त्यांना मुलगा झाला. तो दिवस होता मकर संक्रांतीचा. १२.१.१८६३ मध्ये विश्वेश्वराच्या कृपेने मुलगा झाला; म्हणून त्याचे नाव ठेवले विरेश्वर. त्याची आई त्याला प्रेमाने `बिले' म्हणायची. त्याचे दुसरे नाव `नरेंद्र' होते.
बिले लहानपणापासूनच देवभक्त होता. लहान असतांना शिवाचा जप तो एकाग्रपणे करत असे. एखादी गोष्ट करायला घेतल्यावर आपले संपूर्ण लक्ष त्या गोष्टीकडे लागणे आणि इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नसणे, अशा प्रकारची मनाची एकाग्रता लहानपणापासूनच नरेंद्रामध्ये होती. नरेंद्र आणि त्याचे मित्र ध्यान लावून बसणे, यासारखे खेळ खेळत असत. एकदा नरेंद्र आणि त्याचे मित्र घरामध्ये देवाचे ध्यान लावून बसले होते. शांतपणे हालचाल न करता सर्व मुले बसली होती नरेंद्र तर पूर्णपणे ध्यानमग्न झाला होता. तेवढ्यात एका कडेने सळसळ ऐकू आली. नरेंद्राच्या मित्रांनी डोळे झटकन उघडून बघितले तर त्यांना तेथे साप दिसला. त्यामुळे घाबरून, ओरडून सर्व जण खोलीबाहेर पळू लागले. काय झाले; म्हणून भुवनेश्वरीदेवी येऊन पहातात तो काय ? नरेंद्र तसाच शांतपणे डोळे मिटून बसलेला! साप त्याच्या जवळून दुसरीकडे गेला, तरी नरेंद्रला त्याचा पत्ताच नव्हता. इतके त्याचे मन एकाग्र झाले होते.
एकदा अमेरिकेतील एका समुद्रकिनाऱ्यावर काही मंडळी एक खेळ खेळत होती. तो खेळ असा होता की, समोर येणाऱ्या लाटेवरील हिंदकळणाऱ्या चेंडूवर नेम धरून मारणे. चेंडू सततच हालत असल्यामुळे तेथील कुणालाच ते व्यवस्थित जमत नव्हते. एक भारतीय युवक तेथून चालला होता. त्याने त्या हिंदकळणाऱ्या चेंडूवर आपला नेम अचूक मारून दाखवला. तो युवक अर्थात् नरेंद्र दत्त होता ! तेथील अमेरिकन मंडळींनी ते पाहून आश्चर्य व्यक्त केले. `हे त्यांना कसे जमले', या अमेरिकन मुलांच्या प्रश्नाला उत्तर देतांना विवेकानंदांनी त्यांना एकाग्रतेचे महत्त्व पटवून दिले. केवळ एकाग्रतेनेच हे साध्य होऊ शकते, असे ते म्हणाले.
मुलांनो, बाण मारतांना अर्जुनाची दृष्टी केवळ त्याच्या लक्ष्यावर केंद्रित असे, हे तुम्हाला ठाऊक आहेच ना ? एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की, ती लक्षपूर्वक करण्याची तळमळच कुठल्याही गोष्टीच्या यशस्वितेला कारणीभूत ठरते. हीच तळमळ पुढे नरेंद्रालाही ईश्वरप्राप्तीच्या साधनेत उपयोगी पडली. त्यायोगे ते नरेंद्राचे स्वामी विवेकानंद होऊ शकले.
तात्पर्य : आपल्या प्रत्येकाच्या मनाची शक्ती प्रचंड असते. मनाची एकाग्रता साध्य करणे हा त्याचा पहिला टप्पा आहे. जास्तीतजास्त लक्षपूर्वक केलेले काम अल्प वेळात होऊन जास्त यश मिळवून देणारे असते. मन एकाग्र करण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. नामस्मरणाने आपल्या मनातले इतर विचार अल्प होऊन एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित व्हायला साहाय्य होते. अभ्यास करतांनाही याचा लाभ होतो. म्हणूनच मित्रांनो, आतापासूनच आपण नामाला प्रारंभ करूया. मग यशोमंदिराचा कळस आपण नक्कीच गाठू शकू.
No comments:
Post a Comment